- संदीप प्रधान
महापालिका मुख्यालयात आयुक्त आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त होते. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही येणार यावरून तळ्यातमळ्यात सुरू होते. तेवढ्यात साहेबांचे पीए लगबगीने आत आले आणि साहेबांच्या कानाला लागले. बोलणारे अधिकारी स्टॅच्यू केल्यासारखे स्तब्ध झाले. सारेजण साहेबांचा चेहरा न्याहाळत होते. क्षणभर साहेब गालातल्या गालात हसले. नंतर गंभीर झाले. साहेबांनी टायची नॉट घट्ट केली आणि ते उठताच सर्व अधिकारी खुर्चीला करंट मारल्यासारखे उठले. सर्व बाहेर पडताच साहेबांनी मंत्रालयात फोन लावला... पलीकडे पर्यावरण, पर्यटन व पेंग्विनप्रेमी मंत्री होते. सर, पेंग्विन कक्षातून ‘गुड न्यूज’ आहे....
साहेबांचा आनंद ओसंडून वाहत होता. पलीकडे मंत्र्यांची खुललेली कळी साहेबांना अक्षरश: समोर दिसत होती. तेवढ्यात शिपाई धावत सांगत आला, ‘महापौर बोलवताहेत.’ साहेबांनी टायची नॉट घट्ट केली व ते महापौरांच्या दालनात गेले. महापौर महोदयांनाही ती गोड बातमी कळली होती. त्यांनी त्यांच्याकडे पास झाल्याबद्दल पेढे घेऊन आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आणलेले पेढे साहेबांना चक्क भरवले. माझ्या कारकिर्दीत तिचे बाळंतपण होतेय हा सुवर्णयोगच म्हणायचा. पेंग्विनमध्ये डोहाळेजेवण करीत असते तर कदाचित त्यांनी तेही घातले असते.
सत्ताधारी गोटात व प्रशासनात आनंदाचे वातावरण असल्याची भनक विरोधकांना लागल्याने ते अस्वस्थ झाले. मात्र खुशीचे नेमके कारण काही काळ कळले नाही. कालांतराने खुशीचे कारण पेंग्विन असल्याची चर्चा सर्वदूर पसरलीच. तेवढ्यात पेंग्विनच्या देखभालीचे १५ कोटींचे टेंडर काढल्याची बातमी उघड झाली. त्यामुळे ही खुशी टेंडरबाबत असल्याचा विरोधकांचा गैरसमज झाला. मागील तीन वर्षांकरिता १० कोटी रुपयांत हीच सेवा मिळत असताना आता खर्च का वाढला म्हणून विरोधकांनी काव-काव सुरू केली. गोड बातमी येत असताना कर्कश काव-काव नको म्हणून टेंडर रद्द केल्याचे साहेबांनी जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात वाटाघाटी करून तेच टेंडर मंजूर करण्याचा मेसेज साहेबांना मंत्रालयातून आला आहे. पेंग्विनचा पायगुण तसा चांगलाच. अगोदर वर्षाकाठी काही लाखांत उत्पन्न असलेल्या या राणीच्या बागेतून आता गेल्या तीन वर्षांत चांगले १३ कोटी जमा झालेत; पण विरोधकांना पेंग्विन कक्षात पेंग्विन बिलकुल दिसत नाहीत. ते ‘पांढरा हत्ती पहा’ म्हणून आरडाओरड करतात. पेंग्विन कक्षाच्या उभारणीकरिता आलेला ११ कोटी खर्च, दक्षिण अमेरिकेतून हम्बोल्ट पेंग्विन येथे आणण्याचा अडीच कोटींचा खर्च आणि गेल्या तीन वर्षांत त्यांच्या देखभालीवर झालेला १० कोटींचा खर्च यांचा हिशेब खर्चाच्या खात्यात मांडला तर जमा झालेले १३ कोटी म्हणजे चिंचोके असल्याचा सूर विरोधक लावतात; पण सामान्यांना पेंग्विन हीच पर्वणी !
मुंबईसारख्या शहरात जेथे पावसाळ्यात ९९ टक्क्यांपर्यंत सापेक्ष आर्द्रता असते तेथे पेंग्विन नांदविणे हे महापालिकेतील सत्ता राखण्याइतकेच आव्हान. पेंग्विन ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असलेल्या वातावरणात राहू शकत नाहीत. पेंग्विन पाच ते १२ अंश तापमानात तिकडे राहतात. त्यामुळे एअर चिलर्स बसवले आहेत. ज्या पाण्यात ते विहार करून अंगावरचे तुषार उडवत डौलाने बाहेर येतात ते थंडगार असते. पाणी थंड ठेवण्याकरिता वॉटर चिलर्स बसवले आहेत. मुंबईच्या वातावरणात प्रदूषण आहे. पेंग्विनना शुद्ध हवा पुरवण्याकरिता एअर फिल्टर्स बसवले आहेत. पेंग्विनला वास्तव्य करण्यायोग्य वातावरणाबाबत असोसिएशन ऑफ झूज अँड ॲक्वेरियम (आजा) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे वातावरण असायला लागते. पेंग्विन कक्षात ४० हजार लिटर पाण्याचा कृत्रिम तलाव असून त्यामधील पाणी दर तासाला सहा पातळ्यांवर फिल्टर होते. म्हणजे पेंग्विन बिसलेरी वॉटरमध्ये सचैल स्नानाचा क्षणाक्षणाला अनुभव घेत असतात. आता ही सगळी यंत्रणा अव्याहत सुरू ठेवण्याकरिता ३६५ दिवस अहोरात्र पेंग्विनचे डॉक्टर, इंजिनिअर, कीपर तैनात असावे लागतात. पेंग्विन काही शिववडा खाऊन पोट भरत नाहीत. त्यांना ब्लास्ट फ्रोजन फिश लागतात. म्हणजे समुद्रातून पकडलेले मासे लागलीच स्वच्छ करून उणे ८० अंश तापमानाला फ्रोजन करून उणे ४० तापमानाला ठेवले जातात. हे मासे प्रतिकिलो ४५० रुपयांना उपलब्ध होतात. एवढी सगळी बडदास्त ठेवल्यामुळे पेंग्विन आता गुटगुटीत झालेत. त्यांच्या प्रेमाने, प्रणयाने राणीचा बाग मोहरून गेला आहे. पेंग्विन कक्षातील ही गोड बातमी लवकरच प्रत्यक्षात येईल तेव्हा मीडियाचे कॅमेरे तिकडे रोखलेले असतील... बाळ पेंग्विनला जोजवण्याकरिता कदाचित पाळणा आयात केला जाईल... विरोधक पेंग्विनला टोचा मारत राहतील... शंभर रुपयांत दक्षिण अमेरिकेतील बाळ पेंग्विन पाहिल्याने आम पब्लिक खूश होईल.
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
(चित्र : अनिल डांगे)