- अविनाश कोळीदोन नद्यांच्या संगमाने तीर्थक्षेत्र जन्माला येते. लाखो, कोट्यवधी भाविकांच्या हृदयाशी श्रद्धेचा धागा बांधत हे तीर्थक्षेत्र अखंडितपणे सेवा करीत राहते. पिढ्या बदलत राहिल्या तरी, श्रद्धा आणि प्रेम बदलत नाही. गदिमा आणि सुधीर फडके या दोन दिग्गज कलाकारांच्या संगमातूनही एका तीर्थक्षेत्ररूपी महाकाव्याचा जन्म झाला, त्याचे नाव ‘गीतरामायण’.
१९५५ मध्ये म्हणजेच ६३ वर्षांपूर्वी जन्माला आलेले हे महाकाव्य आज अनेक भाषा, लिपी, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून जगभराच्या कलारसिकांच्या हृदयात एक तीर्थक्षेत्र बनून राहिले. सुधीर फडकेंच्या मनात फुललेले संस्कृत ‘गीतरामायणा’चे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. आता या दोन्ही दिग्गजांच्या जन्मशताब्दी वर्षात संस्कृत ‘गीतरामायणा’च्या निवडक गीतांचाच नव्हे, तर पूर्णाेत्सवाच्या कार्यक्रमाचा नजराणा आदरांजली स्वरूपात पेश केला जात आहे.
सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी ग. दि. माडगूळकरांचा जन्म झाला, तर सुधीर फडके यांचा जन्म कोल्हापुरातला. त्यामुळे सांगली-कोल्हापूरच्या मातीचा अभिमान बाळगणाऱ्या या कलाकारांनी येथील मातीलाही ऐतिहासिक कलाविष्कारातून सोन्याचा मुलामा चढविला. एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला आणि एकाच गायकाने वर्षभर गायिलेला अखंडित कार्यक्रम म्हणून ‘गीतरामायणा’ची ओळख होते. पुणे आकाशवाणीसाठी या ‘गीतरामायणा’चा जन्म झाला. महर्षी वाल्मिकींनी २८ हजार श्लोकांमध्ये लिहिलेली रामकथा गदिमांनी ५६ गीतांत शब्दबद्ध केली. सुंदर शब्दरचना, ठेका धरायला लावणारी चाल, संगीतातील माधुर्य व सुरेल सुरांचा साज चढवीत जन्मलेल्या या ‘गीतरामायणा’ने सुरुवातीला देशभर आणि आता जगभर आपला विस्तार वाढविला. हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगू, मल्याळी अशा अनेक भाषांना कवेत घेत रामायणप्रेमी रसिकांना त्यांनी चव चाखवली.
सुधीर फडके यांनी ‘गीतरामायण’ संस्कृतमध्ये रचण्याची संकल्पना मुंबईच्या सी. भा. दातार यांना सांगितली होती. दातारांनी ही संकल्पना सत्यात उतरविली, पण बाबूजींच्या हयातीत संस्कृत ‘गीतरामायण’ प्रसारित होऊ शकले नाही. म्हणूनच आज सांगलीच्या बालकलाकारांनी या दोन्ही कलाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कृत ‘गीतरामायणा’च्या पूर्णोत्सवाचे शिवधनुष्य उचलले. आजवर जगभरात संस्कृत ‘गीतरामायणा’च्या निवडक गीतांचे हजारो कार्यक्रम झाले आहेत, पण सर्व ५६ गाण्यांचा पूर्णोत्सव कधीच झाला नव्हता. पाटणकर संस्कृत अकादमीचे दीपक पाटणकर यांनी बालकलाकारांना घेऊन पूर्णोत्सवाची बांधणी केली आणि त्याचे दोन प्रयोग औरंगाबाद व पुणे येथे केले. देशभर हा पूर्णोत्सव व्हावा, अशी रसिकांची इच्छा सोबत घेऊन आता या कार्यक्रमाचा प्रवास सुरू झाला आहे.
मराठी ‘गीतरामायणा’चा गोडवा, त्याची चाल, त्याच्या रचनेचा ढाचा तसाच ठेवून केवळ संस्कृत शब्दांनी त्याला साज चढविल्याने ते तितकेच श्रवणीय ठरत आहे. विशेष म्हणजे बहुतांश बालकलाकारांना संस्कृतचा गंधही नसताना, त्यांच्या मुखातून संस्कृत ‘गीतरामायणा’ची सुरेल गीते बरसत आहेत. या पूर्णोत्सवात चिंब भिजणारे रसिक, त्यांच्या मनात, जिभेवर रेंगाळणारे शब्द, चाल, घोळणारे संगीत हीच गदिमा व बाबूजींना खरी आदरांजली आहे.