परकीय देशांची सांस्कृतिक समज भारतीय नजरेतून
- वैशाली करमरकर
मध्यमवर्गीयांसाठीही देशोदेशी फिरणं हे काही आता अशक्यप्राय स्वप्न उरलेलं नाही. लोक नोकरीधंद्याच्या निमित्तानं, प्रशिक्षण, कॉन्फरन्सच्या निमित्तानं किंवा अगदी मुद्दाम एखादा देश फिरायचा म्हणून नियोजन करून फिरतात. जगाशी संपर्क करताना आपण प्रवासाची तयारी, काय बघायचं काय नाही याचं प्लॅनिंग अपटूडेट करतो, पण ‘सांस्कृतिक तयारी’ सुद्धा करावी लागते असं वैशाली करमरकरांचं म्हणणं. त्या जर्मन भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यासक. जर्मन आणि भारतीय कंपन्या यांच्या संयुक्त प्रकल्पांमध्ये इंटरकल्चरल फॅसिलिटेटर म्हणजे ‘सांस्कृतिक विशेषज्ञ’ म्हणून काम करतात. सध्या जर्मनीतील येना विद्यापीठ आणि म्युनिकमधील ग्योथे इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या जगभरातल्या 149 शाखांसाठी ‘मॉडेल ट्रेनिंग प्रोग्रॅम फॉर इंटरकल्चरल फॅसिलिटेटर्स’ तयार करण्यासाठी विशेष तज्ज्ञ म्हणून त्या काम पाहताहेत. इतक्या सखोल अनुभवाच्या आधारावर ‘कल्चर शॉक’ सारख्या पुस्तक मालिकेचं संपादन त्यांनी केलं आहे. त्यांच्याशी केलेल्या या गप्पा :
‘कल्चर शॉक’ म्हणजे काय? त्यावर पुस्तक मालिका कशासाठी?
- माझा प्रवास खूप होतो. तेव्हा मी पाहिलं की प्रत्येक विमानतळावर त्या-त्या देशाच्या नागरिकाची सांस्कृतिक तयारी करवून घेण्यासाठी एक भलामोठा पुस्तक संच त्या-त्या भाषेत उपलब्ध असतो. एखादा व्हिएतनामी समजा भारतात येणार आहे तर त्याला त्याच्या संस्कृतीच्या नजरेतून भारतात काय काय गोष्टी खटकू शकतात, बुचकळ्यात पाडू शकतात, तिथं त्यानं कुठल्या त:हेची सांस्कृतिक काळजी घेणं महत्त्वाचं आहे आदि स्पष्टीकरणांचा तो संच असतो. स्पेन, जर्मनी, जपान किंवा अन्य देशातले लोक भारताबद्दल काय काय लिहितात याच्या उत्सुकतेपोटी मी ही अशी पुस्तकं आवजरून वाचते. ‘कल्चर शॉक इंडिया’ असं नाव असतं अशा पुस्तकांचं. धक्काच बसला मला ते वाचून! भारतीयपणाची एक साचेबंद प्रतिमा अशा लेखनात दिसते. ‘सगळे भारतीय थुंकतात, गायीला मारलं, तिचा अपमान केला तर तुरुंगात जाऊ शकता, गुंड मागे लागू शकतात, मारले जाऊ शकता’ वगैरे.
ब:याच वर्षापूर्वीची जुनी गोष्ट आहे. जर्मनीमध्ये गुंतवणूकदारांच्या सभेत आंतरराष्ट्रीय स्टेजवर मी होते भारताची प्रतिनिधी म्हणून. भारतात भांडवल गुंतवण्याबद्दल चर्चा चालू होती. मला असंख्य प्रश्न विचारले गेले. - तुमच्याकडे अल्पसंख्याकांना स्पर्धा जिंकण्याचा हक्क आहे की नाही? तुमच्याकडे अल्पसंख्याक समाज प्रामुख्याने झोपडपट्टीत राहतो, त्यांना घरं नसतात हे खरंय का? धर्मावरून तुमच्याकडे सतत सगळे हमरीतुमरीवर येतात ना? - मी या नकारात्मक व वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने इतकी गोंधळले की क्षणभर कळेचना, यांनी या समजुती बनवल्या तरी कुठल्या आधारावर? चर्चेत उलगडत गेलं की, हे सगळं ज्ञान ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या सिनेमातून पाझरलेलं आहे. आपण रहमानला ऑस्कर मिळालं म्हणून आनंदात होतो, त्याच काळात भारताच्या प्रतिमेचा हा असा गडबडगुंडा बनत चालला होता.
तिथल्या गुंतवणूकदारांना यांच्या देशात इतकी असुरक्षितता आहे, लोकशाही नावापुरती आहे त्यामुळं माझं भांडवलं सुरक्षित राहील का असा प्रश्न पडण्याचं मुख्य कारण होतं हा सिनेमा! आपण ‘प्रतिमे’बाबत इतका दूरगामी विचारच करण्याला अजून पुरेसे सरावलेलो नाही. ‘स्वित्झर्लंड हॅज गॉट वॉचेस अॅण्ड इंडियन्स हॅज द टाइम’ असंही भारताबद्दल बोललं जातं. ते अचूकतेचा ध्यास धरून घडय़ाळं बनवतात, आणि भारतीयांकडं वाया घालवायला वेळच वेळ आहे हा खरं म्हणजे अतिशय ओंगळ शेरा आहे.
अशा समजुतींची बजबजपुरी माजल्यामुळे भारतीय बाहेरच्या देशांमध्ये जातात तेव्हा त्यांच्या वर्तनाचा, प्रत्येक कृतीचा अर्थ वेगळा निघतो. आता अस्तित्वात नसलेल्या भारताचं ‘असं’ चित्र बनवलं गेलं, विकलंही गेलं आहे. म्हणून वाटलं की आजच्या भारतीय सांस्कृतिक नजरेतून परकीय संस्कृतीचा फरक स्पष्ट करायची गरज आहे. त्यामुळे आधी जपान, जर्मनी आणि आखाती देश समोर ठेवून पुस्तकं तयार झाली. माङया आधीच्या ‘संस्कृतिरंग’ या पुस्तकाची ही अपत्यं म्हणूयात.
‘संस्कृतिरंग’ची अपत्यं? कशी काय?
- आपण हिरीरीनं जाऊन इतर देशांचे भूगोल व इतिहास समजून घेतो तसं आपल्या संस्कृतीकडं पाहतो का? मणिपूरमध्ये कोणता धर्म, कशी राहणी आहे? दक्षिणोच्या राज्यांमध्ये एकच सण किती वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो यामागे विचार काय? यातलं काहीही आपल्याला ठाऊक नसतं. आपल्या भाषा एकमेकांशी का बोलत नाहीत? युरोपमध्ये बावीस भाषा, पण फ्रेंच भाषेत इतकंसं काही लिहिलं गेलं तर सगळीकडे जातं, भाषांतरित होतं. भाषा सारख्या बोलतात. एक विचार दुस:या भाषेत जातो. संचितांचे किती किती पेटारे प्रवाहित होत असतात. पाश्चात्त्य देश व आपण एकत्र काम करतो तेव्हा वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले असल्यामुळे, आपले संस्कार वेगळे असल्यामुळे आपल्या समजुतींमध्ये कुठेतरी सारख्या गफलती होतात. हा ‘संस्कृतिरंग’ या पुस्तकाचा मूळ विषय आहे. शिवाय काळ, वावरक्षेत्र, हवामान-¬तू, त्यामुळं तत्त्वचिंतनाची घडत गेलेली बैठक अशी सगळी मांडणी यात आहे.
मानववंशशास्त्र, सांस्कृतिक वंशशास्त्र, आंतर-सांस्कृतिक संवाद या गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत, पण त्यांचं महत्त्व जाणून घेतलं तर आपल्या संस्कृतीची निराळी ओळख आपल्याला होऊ शकते याचं मला झालेलं आकलन या पुस्तकाचा कणा म्हणता येऊ शकेल. ‘संस्कृतिरंग’चा पट मोठा आहे. ‘स्वस्त आणि अर्धशिक्षित मजूर’ या प्रतिमेतून बाहेर पडून भारतीय कधी उच्च शिक्षणासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी आपलं टॅलेंट सिद्ध करायला जबाबदारी स्वीकारून जगाच्या कानाकोप:यात जातो आहे. परदेशात वावरणारा प्रत्येक भारतीय आपल्या संस्कृतीचा अनिभिषिक्त राजदूत असतो आणि यजमान संस्कृती त्याच्याकडे बघून संपूर्ण भारताचे मूल्यमापन करत असते. अशावेळी भारतीयांकडून सांस्कृतिक घोडचुका होऊ नयेत म्हणून मोठय़ा हिमनगाच्या तळाशी जाऊन ती ती संस्कृती एका भारतीयाच्या नजरेतून विशद करणारी पुस्तकं म्हणजे ‘कल्चर शॉक’ ही मालिका!
‘कल्चर शॉक’ हे प्रवासवर्णन नव्हे, टुरिस्ट गाइडही नव्हे, मग काय आहे?
- वेगळ्या संस्कृतिसमूहांना भारतीयाच्या नजरेतून पाहून, अनुभव घेऊन तो रिचवलेले निसीम बेडेकर, विशाखा पाटील यांच्यासारख्या जिज्ञासू लेखकांनी दिलेला त्या त्या देशांच्या संस्कृती-रंगाचा एक पटच आहे हा. त्या देशांचा भौगोलिक परिसर, हवामान, इतिहासाची धावती ओळख, आजची स्थिती, राहणीमान, मूल्यचित्रं-व्यवस्था, विरोधाभास, प्रतीकांचे अर्थ, सांस्कृतिक धक्क्यांबद्दलची उदाहरणं, प्रश्नमंजूषा अशी चौकट ठरवतानाही ती रंजकपणो गोष्टी पेरत सांगण्याकडे आमचा कल होता. नव्या देशात पाऊल ठेवताना भारतीयांनी वेगळ्या समजेतून तो तो देश अनुभवावा व आपल्या देशाबद्दलची नवी समज घडवावी असा या प्रयत्नांमागचा हेतू आहे. शेवटी प्रत्येक नागरिक हा आपल्या संस्कृतीचा वाहक असतो!
मुलाखत आणि शब्दांकन
- सोनाली नवांगुळ
sonali.navangul@gmail.com