शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मानवी क्षमतांशी झुंजणारे सायकलवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 3:53 PM

काही हजार किलोमीटर सायकल चालवायची, वादळ, वारा, पाऊस, डोंगर, दºया, स्पर्धेदरम्यान झालेले अपघात, रक्तबंबाळ जखमा, डिहायड्रेशन.. कशाकशाचीही पर्वा न करता स्वत:च्या क्षमतांनाही आव्हान देत पुढे जायचं हे सोपं नाहीच. नाशिकमधल्या सायकलवीरांनी हे आव्हान स्वीकारत जगभरात तिरंगा फडकवायला सुरुवात केली आहे. यंदाही अनेकांनी आपला झेंडा अटकेपार नेला. त्याच वीरांची ही रोमहर्षक आणि प्रेरणादायी कहाणी...

- समीर मराठे10,9,8,7, ....., 3,2,1 ... काउण्टडाऊन संपलं आणि स्पर्धेला सुरुवात झाली.. पहिल्या चार तासातच आम्ही अमेरिकेचं कॅलिफोर्निया राज्य ओलांडून अ‍ॅरिझोनाच्या वाळवंटात शिरलो. पण या वाळवंटातल्या उन्हानं आज कहर केला होता. सूर्यानं आपला काटा ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकवला होता. अंगाची अक्षरश: लाही लाही होत होती. त्यात कहर म्हणजे दोनच दिवसांपूर्वी आलेल्या मोठ्या वादळामुळे वाळू रस्त्यावर येऊन पडली होती. या वाळूवरून वेगात सायकल चालवताना कपाळमोक्ष होण्याचीच भीती होती. सारखं पाणी पिऊनही जीभ कोरडी पडत होती. ऊन फारच असह्य व्हायला लागल्यावर शेवटी आम्ही सॉक्समध्ये आइस क्यूब टाकून ते पाठीला बांधले आणि खांद्यावर नॅपकिन ठेवून त्यावर पाणी मारलं. कितीदा असं केलं माहीत नाही..जवळपास पाच हजार किलोमीटर अंतर आम्हाला नऊ दिवसांत कापायचं होतं. असं असलं तरी सुरुवातीच्या १४९० किलोमीटरवर असलेल्या कोलोरॅडो राज्यातील दुरंगो गावापर्यंत ६१ तासांत पोहोचणं आवश्यक होतं. ही होती पहिली कटआॅफ लाईन. इथपर्यंत पोहोचायला काही मिनिटं जरी उशीर झाला असता, तरी संपूर्ण स्पर्धेतूनच आम्ही बाद झालो असतो.स्पर्धेचा आज तिसरा दिवस होता. निसर्ग अजूनही आमची परीक्षा पाहातच होता. मी घड्याळाकडे पाहिलं. पहिल्या कटआॅफसाठी अजून तब्बल दोनशे मैलांचं अंतर पार करायचं होतं आणि हातात होते केवळ १३ तास. पॅडलवरचा वेग आपोआपच वाढला. ताशी ४० ते ४२ किलोमीटरच्या वेगानं मी आता सायकल दामटत होतो. पार दरीत उतरणाºया त्या जीवघेण्या उतारांवर तर माझा वेग ताशी तब्बल सत्तर किलोमीटरपर्यंत जात होता. अशाच एका उतारावर मी होतो. भयानक वेगानं डोंगराचा तो उतार मी उतरत होतो आणि अचानक एक अनपेक्षित वळण आलं..सर्वसामान्यपणे कुठलाही उतार संपल्यानंतर चढ लागतो; पण इथे भयानक वळण होतं. सायकल थांबवणं अशक्यप्राय होतं. एकदा पुढचा, एकदा मागचा ब्रेक हळूहळू दाबून स्पीड कंट्रोल करण्याचा प्रयत्न मी करीत होतो. पण नाहीच.. अंगातलं त्राण गेलं, हात लटपटायला लागले. सायकल डगमगायला लागली. फॉल आता अटळ होता. पडल्यावर फ्रॅक्चर होऊ नये यासाठी खांद्यावर पडायचं मी ठरवलं. तीन कोलांट्या मारून मी खाली पडलो. हातातल्या ग्लोव्हजच्या चिंध्या झाल्या होत्या. अंगावरचे कपडे फाटले होते. अनेक ठिकाणी खरचटलं होतं. उजव्या हाताच्या बोटाचं अख्खं नखच उखडलं होतं. त्यातून रक्त वाहात होतं. सायकलचे गिअर बदलण्यासाठी आणि ब्रेक दाबण्यासाठी हेच बोट वापरावं लागतं. सुदैवानं फ्रॅक्चर मात्र कुठेच झालं नव्हतं. सायकलचं हॅण्डल वाकलं होतं, पॅडल जाम झालं होतं; पण चाकं मात्र फिरत होती. तशाच स्थितीत पुन्हा सायकलवर बसलो. उताराच्या खाली माझे सपोर्ट टीमचे मेंबर उभे होते. लांबूनच ओरडून मी त्यांना माझी दुसरी सायकल काढायला सांगितली. तुटकी सायकल खाली टाकली. दुसरी सायकल घेऊन भाऊ डॉ. महेंद्रकडे निघालो. पाच मैलांवर तो माझी वाट पाहात होता. त्याच्यापर्यंत पोहोचलो. आता त्याला सायकल चालवायची होती. इथे पोहोचेपर्यंत मला लागल्याचं कुणालाच काही कळू दिलं नाही. नाहीतर सगळ्यांचीच हिंमत खचली असती...हा थरारक अनुभव होता नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन यांचा. अमेरिकेच्या ‘रॅम’ स्पर्धेतला. ‘टीम आॅफ टू’मध्ये लहान बंधू डॉ. महेंद्र महाजन यांच्यासोबत त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेत ४८३८ किलोमीटर (३००४ मैल) अंतर सायकलवर सलगपणे त्यांना पार करायचं होतं आणि त्यासाठी होते केवळ नऊ दिवस! अख्खा अमेरिका खंड त्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत ओलांडायचा होता. भयंकर तापमानात अ‍ॅरिझोनाचं वाळवंट पार करायचं होतं, शून्य अंश सेल्सिअसपर्यंतच्या गोठवणाºया वातावरणात कोलोरॅडोच्या डोंगररांगा चढून उतरायच्या होत्या. कॅन्सासच्या वादळी पठाराला तोंड द्यायचं होतं, आपलाँचेनच्या डोंगरदºयांत स्वत:च्या क्षमतेची कसोटी पहायची होती, धो धो कोसळत अंगावर हल्ला करणाºया पावसाला थोपवत पुढे जायचं होतं आणि एकूण एक लाख सत्तर हजार फुटाची यशस्वी चढाई पूर्ण करून भारताचा तिरंगा अमेरिकेच्या भूमीवर रोवायचा होता..उतारावर पडल्यामुळे डॉ. हितेंद्र यांना जसा अपघात झाला, तसाच अपघात स्पर्धेच्या मध्यावर डॉ. महेंद्र यांचाही झाला. एका तीव्र वळणावर सायकल स्लीप झाली आणि ते खाली पडले. सुदैवानं त्यांनाही फ्रॅक्चर झालं नाही; पण मुका मार मात्र खूप लागला.स्पर्धेदरम्यान रक्ताला उकळी फोडणारं ऊन जसं लागलं, तसंच रक्त गोठवणारी थंडीही! याशिवाय वादळ, वारे, मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी तर पूर आलेला.. तब्बल दोनदा तीन तीन तास त्यांना थांबून राहावं लागलं, मार्ग बदलावा लागला, सपोट्र टीमच्या कारलाही अ‍ॅक्सिडेंट झाला. असं बरंच काही..तरीही नाशिकच्या डॉ. हितेंद्र आणि महेंद्र महाजन बंधूंनी ही स्पर्धा नुसती पूर्णच केली नाही, तर या स्पर्धेत ते पहिले आले. भारताचा तिरंगा पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवर रोवला गेला. कोणी भारतीयानंच नव्हे, तर आशिया खंडातूनही आतापर्यंत ही स्पर्धा कोणीही पूर्ण केलेली नव्हती.श्रीनिवास गोकुळनाथश्रीनिवास गोकुळनाथ हा लष्करी शिस्तीचा ३६ वर्षीय तरुण. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधे लेफ्टनंट कर्नल. एरोस्पेस मेडिसिन स्पेशालिस्ट. २०१५मध्ये ते नाशिकला आले आणि त्यानंतर ‘रॅम’नं त्यांना आणखीच झपाटून टाकलं.. एकदा नाही, दोनदा ‘रॅम’ स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. पहिल्या वेळी अगदी थोडक्यात अपयश आलं; पण यंदा मात्र हे अपयश त्यांनी धुऊन काढलं आणि ही स्पर्धा सोलो गटात पूर्ण करणारा आशिया खंडातला पहिला सायकलपटू म्हणून आपलं नाव इतिहासात अजरामर केलं.त्याच अनुभवाविषयी त्यांना विचारलं.श्रीनिवास थेट भूतकाळातच गेले.. ‘रॅम या जगातील सर्वाधिक कठीण स्पर्धेत मी भाग घेतला होता. सोलो स्पर्धा. एकट्यानंच तब्बल बारा दिवस अखंडपणे न थकता सायकल चालवायची होती. जिद्दीनं मी स्पर्धेत उतरलो; पण माझा अनुभव कमी पडला. दहा दिवस सलगपणे मी सायकल चालवली. केवळ आठशे किलोमीटर अंतर राहिलं असताना नाइलाजानं मला रेस सोडावी लागली. मी थकलो होतो किंवा माझी हिंमत खचली होती म्हणून नव्हे, आयोजकांनी दिलेल्या वेळेत मला स्पर्धा पूर्ण करता आली नसती म्हणून. एक दिवसाचा वेळ कमी पडत होता. माझी स्ट्रेटेजी थोडी चुकली होती. स्पर्धा थोडक्यात हुकली याचं दु:ख होतंच; पण त्याच वेळी ठरवून टाकलं, पुढच्या वर्षी पुन्हा इथे यायचं. जिद्दीनं मी पेटून उठलो. सलग दुसºया वर्षी म्हणजे यंदा २०१७ला पुन्हा स्पर्धेत उतरलो. आता माझ्याकडे फर्स्ट हॅण्ड अनुभव होता. गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या यावेळी होऊ द्यायच्या नव्हत्या...पण तरीही ऐनवेळी गडबड झालीच. अतिउष्णतेमुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डिहायड्रेशन झालं. अंगातला जोम, उत्साह कमी झाला, त्यातून रिकव्हर होण्यात दोन दिवस गेले; पण मनातली रग कायम होती. काहीही झालं तरी यावेळी रिकाम्या हातानं मला परतायचं नव्हतं. तशा अवस्थेतही मी सायकल चालवत होतो. पर्यायही नव्हता. कारण इथे अगदी मिनिटा मिनिटाचा प्रश्न असतो. पहिल्या कटआॅफपर्यंत वेळेत पोहोचलो नसतो, तर पहिल्या टप्प्यातच आयोजकांनी मला बाद ठरवून स्पर्धेच्या बाहेर काढलं असतं. पुढच्या टप्प्यातही निसर्गानं क्षमतेची कसोटी पाहिली. वादळ, वारा, पावसानं कहर केला होता. बºयाच ठिकाणी वारा उलटा होता. तो वारा छातीवर घेऊन पुढे जायचं म्हणजे इंचाइंचाची लढाई होती. स्पर्धेच्या आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी तर वादळच होतं. मुसळधार पाऊस तोंड फोडून काढत होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं, पण मला सायकलवरून उतरायचं नव्हतं. अचानक.. पुन्हा एकदा घात झाला. रस्त्यावर पाणी साचलं असल्यानं तिथला खड्डा दिसण्याचा प्रश्नच नव्हता. सायकलवरून मी खाली आपटलो. हाताला, पायाला, खांद्याला लागलं. मुका मारही बसला. सुदैवानं फ्रॅक्चर नव्हतं. स्पर्धेचा हा दहावा दिवस होता आणि आता केवळ ८०० किलोमीटर अंतर बाकी होतं. गेल्या वर्षी याच टप्प्यावर मला स्पर्धा सोडावी लागली होती. पण आता ही स्पर्धा पूर्ण करण्यापासून मला कोणीच रोखू शकत नव्हतं. फिनिश लाइन मी क्रॉस केली तेव्हा अमेरिकेत माझ्या सायकलवर बसण्याला झाले होते ११ दिवस, १८ तास आणि ४५ मिनिटे!..’श्रीनिवास गोकुळनाथ यांच्या शब्दाशब्दांतून स्वत:विषयी आणि देशाविषयीचा अभिमान व्यक्त होत होता.. कारण ही स्पर्धा सोलो गटात पूर्ण करणारे भारतातलेच नव्हे, आशियातलेही ते पहिले सायकलपटू ठरले होते. याआधी नाशिकच्याच डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा जिंकली; पण ती ‘टीम आॅफ टू’ गटात. यंदा नागपूरच्या डॉ. अमित समर्थ यांनीही श्रीनिवास यांच्या पाठोपाठ सोलो गटात ही स्पर्धा पूर्ण केली आणि एक नवा इतिहास रचला.रॅमच्या ३५ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत सोलो गटात तीनच भारतीयांनी सहभाग नोंदवला होता आणि तिघांनाही त्यात अपयश आलं होतं. यंदा मात्र नाशिककर श्रीनिवास गोकुळनाथ (आणि नागपूरचे डॉ. अमित समर्थ) यांनी अपयशाची ही परंपरा खंडित केली.रॅम स्पर्धेसाठी श्रीनिवास गेल्या तीन वर्षांपासून कसून सराव करीत होते. रोज जवळपास तीन ते चार तास आणि रविवारी, सुटीच्या दिवशी किमान दहा तास सायकलिंग! प्रत्यक्ष रॅम स्पर्धेत तर दिवसातले तब्बल २१ तास ते सायकलिंग करीत होते. रोज फक्त तीन तास झोप! दुपारी एक ते चार ! झोपही लष्करी शिस्तीची.श्रीनिवास यांना विचारलं, ‘इतक्या श्रमानंतरही केवळ तीन तास झोप? यासाठीही बरीच प्रॅक्टिस करावी लागली असेल..’ त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘नाही, स्पर्धेच्या अगोदर कधीच इतकं जागरण आणि इतकी सलग सायकलिंग मी केली नव्हती; पण यावेळी माझ्या मनाची ताकदच मी इतकी वाढवली होती, की जे हवं ते मी करू शकत होतो. मनावर पूर्ण कंट्रोल मिळवला होता. शिवाय गेल्या वेळी माझा फोकस चुकला होता, स्पर्धेच्या स्टार्ट लाइनवर मी फोकस केला होता, यावेळी माझा फोकस होता फिनिश लाइनवर. दिवसा, रात्री, जागेपणी, झोपेतही मला दिसत होती ती केवळ फिनिश लाइन. ती शेवटी मी पार केलीच!..’ग्यानेंद्र शर्मा२८ वर्षांचा ग्यानेंद्र शर्मा हा आणखी एक अफलातून गडी. त्यानंही यंदा सायकलिंगमध्ये अफलातून कामगिरी केलीय. युरोप खंडातले तब्बल सात देश पार करायला लावणारी ‘नॉर्थ केप ४०००’ ही ४४०० किलोमीटरची खडतर स्पर्धा पूर्ण करणारा आशिया खंडातला तो पहिलाच सायकलपटू आहे. ही स्पर्धा एकूण ३१ दिवसांत पार करण्याचं आव्हान होतं; पण या पठ्ठ्यानं ती १६ दिवसांतच पूर्ण केली.ग्यानेंद्र मुळचा कानपूरचा, सध्या नोकरीनिमित्त बंगळुरुला आहे, पण गेल्या आठ वर्षांपासून त्याचे कुटुंबीय नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत.ग्यानेंद्रची भेट घेतली. त्याचा अनुभव ऐकताना आपल्याच अंगावर शहारे येत होते..‘..यश अगदी पुढ्यात उभं होतं.. गेले तब्बल सोळा दिवस मी अखंडपणे, दिवसरात्र सायकल चालवत होतो. वादळ, वारे, मुसळधार पाऊस, थंडी.. निसर्ग रोज नवनवी आव्हानं आणि अडथळे समोर आणून ठेवत होता आणि जणू सांगत होता, बघू तुझ्यातली हिंमत. कसा पुढे जातो ते?.. पण माझ्यातल्या इच्छाशक्तीला आता ब्रेक लागणार नव्हता.. फिनिश लाइन जणू हाकेच्या अंतरावर आली होती. इतक्या दिवसांची माझी मेहनत आणि देशाचं नाव उंचवायचं माझं स्वप्न अगदी समोर दिसत होतं.. केव्हा ते स्वप्न हातात पकडतो आणि त्याला कवटाळतो असं मला झालं होतं.. शेवटचं फक्त तीस किलोमीटर अंतर ! हे अंतर पार करायला जास्तीत जास्त किती वेळ लागणार?.. एक तास. फारफार तर सव्वा तास.. पण या शेवटच्या तीस किलोमीटरनं माझ्या संयमाची आणि क्षमतेची परीक्षा पाहिली. वारा अचानक फिरला. तब्बल पन्नास किलोमीटरच्या वेगानं तो उलटा वाहायला लागला. त्यात चढ. एक एक इंचाची लढाई सुरू झाली. वारा मला पुढे जाऊ देत नव्हता. सायकलीवर साधं बॅलन्सही करू देत नव्हता. कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तरीही सायकल लटपटत होती. एक एक पायडल मारताना सारी शक्ती एकवटावी लागत होती. आता पडू की तेव्हा असं क्षणाक्षणाला होत होतं. सायकलवरची हाताची पकड निसटत होती.. पण मीही हार मानायला तयार नव्हतो. आणि नाहीच मानली. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्यासाठी मला तब्बल चार तास लागले. अंतिम रेषेला माझ्या सायकलचा स्पर्श झाला. स्वप्न आता खरोखरच माझ्या हातात आलं होतं.. अत्यानंदानं आपोआपच डोळ्यांतून अश्रू वाहू लागले!..’ही स्पर्धा खरोखरच तुमची सत्त्वपरीक्षा पाहते. कारण मुळात ही स्पर्धाच असते तुमच्या स्वत:शी. तुमच्या क्षमतेलाच ती सतत आव्हान देत असते. वादळ, वाºयाशी आणि निसर्गाशी झुंजत युरोप खंडातले तब्बल सात देश तुम्हाला सायकलवर पालथे घालायचे असतात. भाषा माहीत नाही, संस्कृती माहीत नाही, रस्ता माहीत नाही, तरीही तुम्हाला पुढेच जायचं असतं.रोज तुम्ही कुठे असाल, कुठून सुरुवात करणार, कुठे, कधी पोहोचणार, राहायला, खायला-प्यायला काही मिळणार की नाही, याचीही काहीच शाश्वती नाही. आणखी सत्त्वपरीक्षा म्हणजे कोणालाच इंग्रजीही कळत नाही. खाणाखुणांनी संपर्क साधायचा आणि तसंच समजून घ्यायचं. या स्पर्धेदरम्यान रोज जवळपास दोन हजारपेक्षाही अधिक कॅलरीज जळत होत्या, तरीही बºयाचदा ग्यानेंद्रला अर्धपोटी, उपाशी राहूनच सायकलिंग करावी लागली. कारण लोकांशी संपर्क साधतानाही दमछाक होत होती. खाणाखुणा करून भूक लागल्याचं त्यांना सांगितल्यावरही बºयाचदा पत्ता मिळत होता तो एखाद्या कॉफी शॉपचा. सोळा दिवसांच्या प्रवासात ग्यानेंद्रला केवळ पाच दिवस हॉटेलात तेही काही तास झोपण्याची ‘लक्झरी’ अनुभवता आली. कारण दिवस कधी, कुठे संपेल याचा काहीच नेम नव्हता. स्पर्धा पूर्ण करायची तर कुठल्याही परिस्थितीत पायडल मारत राहायचं हेच एक ध्येय होतं. त्यामुळेच सोळा दिवसांपैकी तब्बल ११ दिवस ग्यानेंद्रला कधी बस स्टॉपवर तर कधी गॅस स्टेशनवर उघड्यावर रात्र काढावी लागली.‘रॅम’ ही जगातली अतिशय कठीण अशी लांब पल्ल्याची सायकल शर्यत मानली जाते. तशीच किंबहुना काही बाबतीत त्यापेक्षाही कठीण अशी ही ‘नॉर्थ केप ४०००’ स्पर्धा. दोघा स्पर्धांची तुलना करणं योग्य नाही, कारण दोन्ही ठिकाणची चॅलेंजेस पूर्णत: भिन्न आहेत, पण तरीही ‘रॅम’पेक्षा या स्पर्धेचं वेगळेपण म्हणजे युरोप खंडातले तब्बल सात देश या स्पर्धेदरम्यान तुम्हाला पार करावे लागतात. इटलीमध्ये ही स्पर्धा सुरू होते. त्यानंतर आॅस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फीनलंड आणि नॉर्वेत ही स्पर्धा संपते. त्यासाठी कोणाचीच मदत तुम्हाला घेता येत नाही. जीपीएस ट्रॅकर नाही, रस्त्यात तुम्ही कुठे आजारी पडलात, तुमची सायकल बिघडली.. कोणीही तुमच्या मदतीला असणार नाही. सायकल दुरुस्तीचं किट, कपडे, खाण्यापिण्याचं सामान, आपण योग्य रस्त्यानं जात आहोत की नाही हे बघण्यासाठीचं मॅपिंग डिव्हाइस (एक छोटासा कॉम्प्युटर), त्याचं चार्जिंग किट.. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला सायकलवर स्वत:बरोबरच बाळगाव्या लागतात. ‘रॅम’ स्पर्धेत तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला रस्ता दाखवण्यापासून तर तुमच्या सायकलची, तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तुमच्याबरोबरची सपोर्ट टीम (क्रू मेंबर्स) घेत असते. तुमचं सगळं सामान कारमध्ये असतं आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असतं, ते केवळ सायकलिंगवर, पण ही ‘लक्झरी’ ‘नॉर्थ केप’ स्पर्धेत नाही. या स्पर्धेचं आणखी एक विशेष म्हणजे या स्पर्धेत कोणालाच काहीच बक्षीस मिळत नाही. स्पर्धा पूर्ण केल्याचं एक सर्टिफिकेट तेवढं तुम्हाला मिळतं, कारण ही स्पर्धा इतर कोणाशी नाही, तर तुमच्या स्व:शीच असते!..डॉ. रमाकांत पाटील, डॉ. राजेंद्र नेहेते‘रॅम’ स्पर्धा नुसती पूर्णच नाही, तर ती जिंकून नवा इतिहास घडवणारे डॉ. हितेंद्र आणि महेंद्र महाजन हे दोन्ही बंधू म्हणजे केवळ नाशिककरांनाच नव्हे, देशवासीयांसाठीही मोठी प्रेरणा आहे. कायम त्यांच्या सोबत असणाºया त्यांच्या सहकाºयांना प्रेरणेची ही लस आपसूकच टोचली जाण्यात नवल नव्हतंच.महाजन बंधूंनी २०१५ मध्ये रॅम स्पर्धा पूर्ण केली, त्यावेळी त्यांच्यासोबत क्रू मेंबर्स म्हणून नाशिकचे बालरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पाटील आणि प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते त्यांच्यासोबत होते. हे दोघंही उत्कृष्ट सायकलपटू आहेतच आणि भारतातल्या लांब पल्ल्याच्या काही सायकल शर्यतीही त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आपल्या मित्रांनी रॅम स्पर्धा पूर्ण केली, मग आपण का करू नये हा कीडा डॉ. राजेंद्र नेहेते यांच्याही डोक्यात वळवळू लागला आणि त्यातूनच मग ‘रॅम’साठी नवी टीम सज्ज झाली. ‘टीम आॅफ फोर’ म्हणजे चार जणांच्या गटात या स्पर्धेसाठी उतरण्याचं नक्की झालं. डॉ. नेहेतेंसह नाशिकचेच डॉ. रमाकांत पाटील, सध्या इंग्लंडमध्ये असलेले डॉ. संदीप शेवाळे आणि मुंबईचे पंकज मार्लेशा या चौघांची टीम फायनल झाली. या टीमचं नाव होतं ‘टीम सह्याद्री.’ यंदा रॅम स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि ती पूर्णही केली. ‘टीम आॅफ फोर’मध्ये ही स्पर्धा पूर्ण करणारे हेदेखील पहिलेच भारतीय आणि आशियाई.‘रॅम’च्या याच अनुभवाविषयी डॉ. रमाकांत पाटील यांच्याशी बोलत होतो.डॉ. पाटील आपला अनुभव सांगत होते, ‘महाजन बंधूंबरोबर या स्पर्धेसाठी क्रू मेंबर असण्याच्या अनुभवाचा खूप म्हणजे खूपच फायदा आम्हाला झाला. एकतर प्लॅनिंगची स्ट्रॅटेजी आम्हाला कळली आणि कुठल्या आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागू शकेल हेदेखील कळलं. निसर्ग तिथे अक्राळविक्राळ स्वरूपात आपल्यासमोर उभा ठाकतो आणि त्याचा सन्मान करत, आदर राखत आपल्याला मार्गक्रमणा करावी लागते हे माहीत होतंच; पण यंदा निसर्ग जरा जास्तच आक्रमक झाला होता. खरं तर ही स्पर्धा असते ४८३८ किलोमीटरची; पण विपरित नैसर्गिक परिस्थितीमुळे आणि काही ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे आम्हाला मार्ग बदलावा लागला आणि २२५ किलोमीटर जास्त सायकलिंग करावी लागली. त्यामुळे तब्बल ५१०० किलोमीटरची सायकलिंग आम्हाला करावी लागली. अ‍ॅरिझोनाच्या वाळवंटानं तर परीक्षेचीही परीक्षा पाहिली गेली. ४८ अंश सेल्सिअस तापमानात सायकल चालवणं सोपी गोष्ट नव्हतीच. उल्फ क्रिक पास करताना तर आम्हाला एकाच दिवसात समुद्रसपाटीच्याही १८० फूट खालून ११ हजार फुटाची चढाई करायची होती, तो पास उतरून पुन्हा चुचारा पासची ९५०० फुटांची चढाई करायची होती. पण हे सारं आम्ही केलं, कारण काहीही झालं तरी ही स्पर्धा पूर्ण केल्याशिवाय नाशिकला परतायचं नाही, असा निश्चयच आम्ही केलेला होता, शिवाय ज्यांनी रॅम स्पर्धा जिंकलेली आहे, असे महाजन बंधू आणि अगदी जवळचे मित्रच क्रू मेंबर म्हणून सोबत होते. स्पर्धा आम्ही पूर्ण केलीच. नाशिकचं आणि भारताचं नाव पुन्हा एकदा अमेरिकेच्या नकाशावर झळकलं..’‘रॅम’ स्पर्धेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या मदतीसाठी असणारे क्रू मेंबर्स अतिशय तयारीचे आणि माहीतगार असावे लागतात. स्पर्धकांइतकंच त्यांचंही महत्त्व अनन्यसाधारण असतं. या स्पर्धेतला खडतरपणा पाहून अमेरिकेच्या टीमचे क्रू इनचार्जसहित चार जण यंदा पळून गेले, यावरून या स्पर्धेची कठीणता लक्षात यावी. ‘टीम सह्याद्री’च्या क्रू मेंबर्समधील एकी किती असावी?.. ते सारे जवळचे मित्र तर आहेतच; पण यापैकी एकानंही कोणाकडूनही स्पर्धेचा खर्च घेतला नाही. विमानाच्या तिकिटांपासून तर खाण्यापिण्याच्या खर्चापर्यंतचा सारा भार प्रत्येकानं आपापला उचलला. अनोख्या मैत्रीची हीच टीम नाशिकमध्ये आता पुढचे सायकलवीर घडवताहेत..भारत पन्नू आणि दर्शन दुबे‘रेस अराउण्ड आॅस्ट्रिया’ ही युरोपातील आणखी एक चॅलेंजिंग सायकल स्पर्धा. जगभरातले सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतात आणि आपलं नशीब अजमावतात. दोन हजार किलोमीटरची सायकल स्पर्धा आणि त्यासाठी वेळ फक्त ११७ तास! या स्पर्धेत यंदा नाशिकचे लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी भाग घेतला होता. या अनोख्या अनुभवाचं नवेपण आणि नवखेपण अजूनही त्यांना रोमांचित करत होतं. भारत आणि दर्शन सांगत होते, ‘आंतरराष्टÑीय स्पर्धा कधीच सोपी नसते. कुठल्याही आंतरराष्टÑीय स्पर्धेतला आमचा हा पहिलाच प्रसंग असला, तरी ती किती कठीण असू शकते याची कल्पना आम्हाला होती. त्याचं प्रत्यंतर स्पर्धेतही आलं. आल्प्स पर्वतराजीतील नऊ शिखरं आम्हाला पार करायची होती आणि तब्बल १७,५०० फुटांचा चढही ओलांडायचा होता. स्पर्धेच्या दरम्यान अनेकदा गारांचा पाऊस, स्रोफॉल झाला, तुफान थंडीचा सामना करावा लागला. रस्त्यावर वाहत्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. वादळाला तोंड देत पुढे सरकावं लागलं. वादळी वाºयांमुळे आमच्या समोरच झाडं, झाडाच्या फांद्या

कोलमडून पडत होत्या. अनेकदा त्यामुळे आम्हाला थांबावंही लागलं. काही ठिकाणी तर इतकी भयानक थंडी होती, की आम्हाला पूर्ण कपडे घालूनच सायकल चालवावी लागली. त्यामुळे वजन आणखी वाढलं. यापूर्वी अंगभर कपडे घालून सायकलिंगची आम्हाला कधीच सवय नव्हती. भाषेचीही मोठी अडचण होती. आॅस्ट्रियात इंग्रजी बोलली जात नाही. त्यामुळे रस्ता शोधण्यापासून ते खाण्यापिण्याची सोय बघण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अडचण येत होती. आमची तयारी फारशी नव्हती. अगदी काही महिन्यांच्या तयारीत आम्ही या स्पर्धेत भाग घेतला आणि ती पूर्णही केली, त्याचा आनंद अपार आहे.’खरं तर भारत आणि दर्शन यांचं हे धाडसच होतं. अगदी ऐनवेळी त्यांनी स्पर्धेत उतरायचा निर्णय घेतला. कुठलीच तयारी नव्हती आणि स्पर्धेला उरले होते केवळ शंभर दिवस! सरावासाठी त्यांनी कोच शोधायला सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी नकार दिला. ‘एवढ्या कमी कालावधीत तयारी होऊच शकत नाही. त्यामुळे यावर्षी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वर्षी स्पर्धेत उतरा’ असा सल्ला त्यांना दिला गेला. त्यांच्या कोचचा शोध शेवटी आयर्नमॅन चैतन्य वेल्हाळ यांच्यापाशी येऊन थांबला. त्यांनी दोघांचाही कसून सराव करवून घेतला. त्याचा फायदा त्यांना झाला. स्पर्धेसाठी ११७ तासांचा वेळ असताना त्यांनी ९९ तासांतच स्पर्धा पूर्ण केली.अम्मार मियाजीअम्मार मियाजी हा नाशिकचा जिद्दी सायकलपटू. ‘रेस अराउण्ड आॅस्ट्रिया’ ही स्पर्धा भारतीयांना साधी परिचयाचीही नसताना गेल्या वर्षी २०१६मध्ये त्यानं या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत भाग घेणारा तो पहिला भारतीय आणि पहिला आशियाई. सगळं काही नवीन होतं. कुणाचं मार्गदर्शन नव्हतं की अनुभव. सारं काही स्वत:च करायचं होतं. स्पर्धेचे सारे नियमही जर्मन भाषेत. कोणाला काय कळणार? अम्मारनं ही स्पर्धा जिद्दीनं पूर्ण केली; पण तांत्रिक कारणावरून त्याला अपात्र घोषित करण्यात आलं!..पण या इतक्या मोठ्या धक्क्यानंही अम्मार खचला नाही. पुढच्या वर्षी याच स्पर्धेत तो पुन्हा सहभागी होणार आहे. ही स्पर्धा पूर्ण करायचीच, या जिद्दीनं त्यानं तयारी सुरू केली आहे. दरम्यानच्या काळात त्यानं ‘आयर्नमॅन’ स्पर्धेवर आपलं लक्ष केंद्रित केलं. ट्रायथलॉन प्रकारातील या स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ४२.५ किलोमीटर रनिंग आणि चार किलोमीटर स्विमिंग तुम्हाला करायचं असतं. १७ तासात ही स्पर्धा पूर्ण करण्याची अट, पण अम्मारनं पहिल्याच प्रयत्नात तेही केवळ १५ तासांत हे आव्हान पार केलं आणि ‘आयर्नमॅन’ बनला. नाशिकचा तो पहिलाच ‘आयर्नमॅन.’ याच्या पुढचा टप्पा म्हणजे ‘अल्ट्रामॅन’. ‘आयर्नमॅन’ झालेले खेळाडूच ‘अल्ट्रामॅन’ स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यासाठीचं टारगेट आहे तब्बल दुप्पट. म्हणजे ४२५ किलोमीटर सायकलिंग, ८५ किलोमीटर रनिंग आणि दहा किलोमीटर स्विमिंग तुम्हाला करावं लागतं. फेबु्रवारी २०१८मध्ये होणाºया या स्पर्धेतही तो आता तयारीनिशी उतरणार आहे.‘सायकलवाला’ किशोर काळेनाशिकचा किशोर काळे हा म्हटलं तर रूढार्थानं सायकलपटू नाही. त्याचं आहे सायकलचं दुकान. पण फारच हरहुन्नरी. कुठल्याही कामाला सदैव पुढे. ‘सायकलवाला किशोर’ म्हणूनच त्याची ओळख आहे. नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजायला लागली तसा तोही आपसूक या चळवळीत ओढला गेला. नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनमध्ये सक्रिय झाला. त्याचं सायकलीचं दुकान म्हणजे नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचं जणू हक्काचं कार्यालयच आहे. कार्यकर्ता सोडा, नाशिकमधला कुठलाही जुना, नवा सायकलपटूही हक्कानं त्याच्या दुकानात जातो आणि आपली सायकल दुरुस्त करून घेतो. अर्थात पैशासाठीही जबरदस्ती नसतेच. पैसे जेव्हा येतील तेव्हा द्या; पण आधी सायकल चालवा, हे त्याचं धोरण.सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायकलविषयी जागरूकता वाढवण्यासाठी २०१५ मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनतर्फे ‘नाशिक पेलॉटन’ ही ५० आणि १५० किलोमीटरची स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेत दरवर्षी तो स्वत: तर सहभाग घेतोच; पण त्याच्या दुकानातली अख्खी टीमही कारागिरांसह हजर असते. कोणाचं पंक्चर काढून दे, कोणाची सायकल बिघडली तर ती दुरुस्त करून दे.. स्पर्धेदरम्यान बºयाचदा अनेकांच्या सायकलींना प्रॉब्लेम येतो. अशावेळी हा पठ्ठ्या आपली रेस सोडून अगोदर त्यांची सायकल दुरुस्त करून देतो आणि मगच पुढे जातो.तीन वर्षांपूर्वी नाशिकच्या टीमनं ठाण्याच्या ‘वेलोराइड’ या १८० किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात या टीमनं पहिला क्रमांक मिळवला. त्यात किशोरचाही सहभाग होता. किशोरनं आता थेट आंतरराष्टÑीय पातळीवर उडी घेताना भूतानच्या डेथ रेसमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा जगातली एकदिवसीय सर्वाधिक कठीण स्पर्धा मानली जाते. रॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांनीदेखील पूर्वी या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र त्यावेळी केवळ डॉ. महेंद्रच ही स्पर्धा पूर्ण करू शकले होते, तर डॉ. हितेंद्र यांना केवळ दहा मिनिटं कमी पडली होती.यंदा डॉ. हितेंद्र आणि किशोर काळे या दोघांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. हा लेख लिहीत असताना ते नाशिक शहर होतंय देशाचं ‘सायकल कॅपिटल’.त्याविषयी पुढच्या अंकात..

(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत. sameer.marathe@lokmat.com)

 

टॅग्स :Sportsक्रीडा