शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

दादाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:42 PM

दादाजी खोब्रागडे. स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांनी विकसित केलेल्या ‘एचएमटी’ या वाणाची सात राज्यांतील सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवड झाली. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेतले. ग्रामीण उद्योजक म्हणून ‘फोर्ब्स’च्या यादीत त्यांना मानाचे स्थान मिळाले; पण अखेरपर्यंत विपन्नावस्थेतच ते जगले. त्यांच्या कामाची म्हणावी तशी कदर कोणीच केली नाही

गजानन जानभोर|स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेले दादाजी खोब्रागडे अखेर गेले. या जगाचा निरोप घेताना त्यांच्या शरीराला होत असलेल्या वेदना, त्यांच्या मनातील कालवाकालव आपण कुणीच समजून घेतली नाही. आपण जे करीत आहोत, त्यामुळे आपले दु:ख संपणार नाही, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत तशीच कायम राहील, हे ठाऊक असूनही हा महान कृषी संशोधक आयुष्यभर गरिबांसाठी अक्षरश: खपला. त्यांच्या संशोधनाच्या बळावर कितीतरी जण श्रीमंत झाले. शेतकºयांचे व्यापारी झाले, व्यापाºयांचे सावकार झाले. दादाजी मात्र आहेत तिथेच आयुष्यभर राहिले. कदाचित त्यांना दुनियेची रित कळून चुकली असेल म्हणूनच की काय कुणाबद्दल त्यांच्या मनात राग नव्हता. शेवटपर्यंत केवळ शेतातच त्यांचा जीव तगमगायचा.परवा ते गेल्यानंतर राज्यकर्ते, तथाकथित मान्यवर, साºयांचाच कंठ दाटून आला. सांत्वनाचा महापूर आला. पण जगण्याशी संघर्ष करीत असताना यापैकी कुणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाहीत. दादाजी तसे अल्पशिक्षित, अल्पभूधारक. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड नावाचे एक खेडे आहे. अवघ्या दीड एकराच्या शेतात दादांनी धानावर संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या ‘एचएमटी’ या वाणाची सात राज्यांतील सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवड झाली. शेतकºयांनी भरघोस उत्पन्न घेतले.काही वर्षांपूर्वी दादांचा मुलगा आजारी पडला. या आजारपणात होती नव्हती ती शेती त्यांना विकावी लागली. कर्जाचे ओझे झाले. दादांच्या नातवाने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला होता. इथेही गरिबी आड आली. वर्षभरातच त्याने शिक्षण सोडले आणि मजुरीवर जाऊ लागला. दादांच्या सुनेला वडिलांनी दीड एकर शेती दिली. तीच या कुटुंबासाठी जगण्याचे एकमेव साधन बनले. शेताच्या याच तुकड्यावर त्यांनी तांदळाच्या जाती विकसित केल्या. दादांनी शोधलेल्या ‘एचएमटी’ या वाणाच्या जन्माची कथासुद्धा अशीच रंजक..एका व्यापाºयाने दादांना विचारले, या बियाणाचे नाव काय? ‘मायबाप मुलांना जन्म देतात, जन्मापूर्वीच त्याचे नाव ठेवतात का?’ दादांनी भाबडेपणाने उत्तर दिले. जवळच असलेल्या एका शेतकºयाच्या मनगटाला एचएमटी घड्याळ बांधलेले होते. दादांचे त्याकडे लक्ष गेले. ते सहज बोलून गेले. ‘तांदळाच्या या नवीन वाणाचे नाव ‘एचएमटी.’ दादांच्या एचएमटीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. शेतकरी भरघोस पीक घेऊ लागले. तांदळाच्या बाजारात क्रांती घडविणाºया या वाणाची कीर्ती कृषी विद्यापीठापासून जगात सर्वत्र पसरली. दादांनी शोधलेले वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चोरले आणि स्वत:च्या नावावर खपवले; पण यामुळे दादा खचले नाहीत. नवनवीन वाण विकसित करण्याचे त्यांचे संशोधन सुरूच होते. नांदेड-९२, नांदेड-हिरा, विजय-नांदेड, दीपकरत्न, नांदेड-चिन्नोर, डीआरके अशा कितीतरी वाणांचा दादांनी शोध लावला. त्यांचे ‘डीआरके’ हे वाण दादांच्याच नावावरून ठेवण्यात आले.त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनाची कदर सरकारने कधी केली नाही. नावापुरते एक दोन पुरस्कार दिले, त्यातील एक सुवर्णपदक नकली निघाले. त्यांच्या सन्मानाची अशी हेटाळणी सुरू होती. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या भारतातील शक्तीशाली ग्रामीण उद्योजकांच्या यादीत दादाजींना मानाचे स्थान मिळाले. पण, त्यांच्या दारिद्र्याचे दशावतार संपले नाहीत. ‘फोर्ब्स’वाल्यांनी अभावग्रस्तांची यादी तयार केली असती तर कदाचित त्यातही दादाजी दिसले असते. कमालीचे दैन्य असूनही या माणसाने कधी तक्रार केली नाही, कुणाला शिव्या-शाप दिले नाहीत. आपल्या दु:खाचे भांडवल करून त्यांनी काही मिळवलेही नाही.अलीकडच्या काळात सत्कार, मानसन्मानांचा त्यांना उबग आला होता. ते म्हणायचे, ‘सांत्वन परवडले, पण आता कौतुक नको. ‘या सत्कारामुळे काय होते जी, सत्कार करणारे शाल पांघरुण झोपवून देतात आणि नारळ खायला देतात. घरी सहा लोकं खाणारे, मग जगायचे कसे?’...दादाजींच्या गावात जाऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना एक लाख रुपये आणि पाच एकर शेती भेट म्हणून दिली. त्यानंतर पवारही दादाजींना विसरून गेले. देणगीत मिळालेल्या शेतीत संशोधनासाठी पैसे लागतात, दादाजींकडे ते नव्हतेच. पवार आपला प्रचारकी धर्म पाळून सोयीप्रमाणे विसरून गेले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, हॉलिवूडचा जगविख्यात दिग्दर्शक जेम्स हॅमरून, आताचे पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, शेतकºयांचे कनवाळू जाणते राजे शरद पवार या साºयाच मान्यवरांनी दादाजींचे तोंडदेखले कौतुक केले. कृषिमंत्री म्हणून शरद पवारांनी ऊस, द्राक्ष उत्पादकांचा विशेष कळवळा जपला. साखर कारखानदारांचे हित जपण्यात त्यांचे आयुष्य निघून गेले. कृषिमंत्री या नात्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो एकर शेतजमीन त्यांनी पालथी घातली. पण दादाजींच्या शेतात येऊन त्यांचे संशोधन समजून घेण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. विदर्भातील शेतकºयांच्या आत्महत्यांनी आपण अस्वस्थ असल्याचे पवार नेहमीच सांगायचे. त्यामागची कारणे शोधण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे ते विदर्भात आल्यावर आवर्जून बोलायचे. दादाजींच्या शेतात जर गेले असते तर कदाचित पवारांच्या अस्वस्थतेचे निराकरणही झाले असते, पण पवार तिथे गेले नाहीत. पवारांवर टीका करायचा उद्देश नाही, पण हा गरीब संशोधक भूकमुक्तीसाठी धडपडत असताना त्यावेळचे ‘निबर’ सरकार कसे वागत होते, त्याचा हा दुर्दैवी पुरावा आहे.आजारपणात शेवटच्या काळात दादाजींना खूप वेदना व्हायच्या. उपचारासाठी पैसे नसल्याने नाइलाजास्तव त्यांना घरीच ठेवले होते. नंतर ब्रह्मपुरीला उपचार सुरू असताना राज्य सरकारने त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली. समाजातील काही सहृदय माणसेही धावून आली. शेवटचे काही दिवस दादाजी डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’मध्ये होते. पण तोवर वेळ निघून गेली होती.आता दादाजी निघून गेल्यानंतर आपण उसासे टाकत आहोत. पण आपल्या डोळ्यादेखत हा निष्कांचन कृषी संशोधक अक्षरश: वेदनेने कण्हत निघून गेला, त्या अपराधाची आपल्याला लाज का वाटत नाही? दादाजींना श्रीमंत व्हायचे नव्हते, बंगले, माड्या बांधायच्या नव्हत्या. आपल्या क्रांतिकारी संशोधनाने येणारी भौतिक प्रतिष्ठाही त्यांना नको होती. त्यांना अखेरपर्यंत शेतकरीच राहायचे होते. कष्टकºयाने पोटभर खावे आणि जगाचीही भूक भागवावी, त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे हेच सार होते. दादाजी दारिद्र्यात जन्मले आणि दारिद्र्यातच मरण पावले. बळीराजाच्या वर्तमानाचे त्या अर्थाने ते प्रतिनिधी. त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा कष्टकºयापर्यंत पोहोचल्या नाहीत किंबहुना आपणच त्या पोहोचू दिल्या नाहीत. दादाजी हे आपल्या अनास्थेचे, कृतघ्नतेचे बळी आहेत. अशी नि:स्पृह, नि:संग माणसे अभावानेच जन्माला येतात. त्यांच्या समर्पणाचा भाव आपण समजू शकत नाही, कारण तसे निरलस मन आपल्याला लाभत नाही. दादाजी गेल्यानंतर आता व्यक्त होत असलेल्या संवेदना म्हणूनच मग वांझोट्या ठरतात...(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)

टॅग्स :Farmerशेतकरी