- हृषीकेश खेडकरएक असं जग जे फक्त कल्पनांवर जगतं. एक असं जग ज्यात अशक्य काहीच नाही. एक असं जग ज्याचा जन्मच मुळी प्रत्येकाचं लक्ष वेधण्यासाठी झाला आहे.- बरोबर ! आजची डिझाइनची गोष्ट त्याच जगाचा मागोवा घेणार आहे, ज्या जगाने प्रत्येकाला आपल्या कवेत घेतलं. जाहिरातीचं जग, ह्या जगाची सुरुवात कुठे आणि कधी झाली हे ठामपणे सांगणं अवघड आहे; पण कधीकाळी रस्त्यावर वस्तू विकणार्या माणसाने आरोळी ठोकली आणि जाहिरातीचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.भारतात जाहिरात बनवायला सुरुवात झाली ती 1905 साली; जेव्हा बी. दत्ताराम यांनी गिरगावात अँडव्हर्टायजिंग एजन्सी सुरू केली. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली आणि अनेक कापड गिरण्या आपले उद्योग थाटू लागल्या. स्रोनाक, केयमर, जेडब्ल्यूटी यांच्यासारख्या व्यावसायिक एजन्सी परदेशातून भारतात दाखल झाल्या आणि खर्या अर्थाने जाहिरातीचं अभूतपूर्व पर्व भारतात सुरू झालं. एकीकडे वीस आणि तीसच्या दशकात बनवल्या जाणार्या जाहिरातींवर राजा रवि वर्मा यांच्या चित्रांचा लाभलेला वारसा आणि त्याला चित्रपटाच्या बॅनरची मिळालेली जोड याचा ठळक प्रभाव दिसू लागला, तर दुसरीकडे ब्रिटन आणि अमेरिकेत बनवलेल्या जाहिराती जशाच्या तशा भारतात छापून वितरित होऊ लागल्या. लॅरी स्रोनाक नामक भारतात काम करणार्या एका कर्मशिअल आर्टिस्टला ही गोष्ट जाणवली आणि 1925 साली त्याने थेट पेशावरपासून तुतिकोरिनपर्यंत आणि क्वेट्टापासून कोलकातापर्यंत अख्खा भारत पिंजून काढला. या अफलातून प्रवासानंतर लॅरीने बनवलेला अहवाल भारतातला पहिला मार्केट रिसर्च म्हणून ओळखला जातो.सुखवस्तू लोकांसाठी जाहिरातीच्या माध्यमांतून वस्तू विकणारं भारतीय मार्केट पुढे सर्वसामान्यांना गरजेच्या आणि परवडणार्या वस्तूंच्या विक्रीसाठी जाहिराती बनवू लागलं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन ‘लिव्हर’ कंपनी, जी भारतात साबण विकत होती. 1937 साली या कंपनीने आपल्या ग्राहकांना अधिक चांगलं समजून घेण्याच्या दृष्टीने आशिया खंडात एक शोधमोहीम राबवली आणि याचा परिपाक म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून भारतीय ग्राहकाला मिळालेलं ‘डालडा’ तूप. मूलत: ‘डाडा’ नावाच्या डच कंपनीकडून आयात केलेलं हे तूप ‘लिव्हर’ कंपनीनं ‘एल’ हे अक्षर वापरून ‘डालडा’ नावाने भारतात विकायला सुरुवात केली.भारतीय गृहिणीला आकर्षित करण्याच्या दृष्टीने डालडाने ‘लिंटास’ अँडव्हर्टायसिंग एजन्सीच्या मदतीने दहा भारतीय भाषांमध्ये जाहिराती बनवल्या, जो आजही या क्षेत्रातला एक विक्रम समजला जातो. पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा, ‘पाल्म’ झाडाचे चित्र असलेला डालडाचा डबा आजतागायत कित्येकांच्या स्वयंपाकघरात आणि परसातल्या बागेत अविभाज्य सत्ता गाजवतो आहे.जाहिरातीच्या जगाचा आपल्या रोजच्या जीवनातील सवयींवरदेखील मोठा प्रभाव आहे; याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय असलेल्या स्वस्तिक कंपनीचे ‘डेट’ डिटर्जंट. पन्नासच्या दशकात या कंपनीने जाहिरात म्हणून डिटर्जंट पावडरबरोबर प्लॅस्टिकच्या बादल्या द्यायला सुरुवात केली. नळाखाली किंवा नदीवर वाहत्या पाण्यात कपडे न धुता बादलीत पाण्याबरोबर डिटर्जंट पावडर टाकून कपडे स्वच्छ करण्याचा मंत्र या कंपनीने दिला.या जाहिरातीचा अजून एक परिणाम म्हणजे भारतात प्लॅस्टिकच्या बादल्यांचे नवीन मार्केट तयार झाले. साठचे दशक भारतावर युद्धाचे ढग घेऊन आले आणि पुन्हा जाहिरातीच्या जगाला खीळ बसली. यानंतरच्या काळात भारतात अनेक सहकारी आणि कौटुंबिक उद्योगसमूह भरभराटीस आले. यातली दोन मुख्य उदाहरणे म्हणजे ‘अमूल’ आणि टाटांचे ‘एअर इंडिया’. होर्डिंगचा वापर करून मॅस्कॉटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांसमोर कमी खर्चात पोहोचण्याचा एक नवीन ट्रेण्ड जाहिरात क्षेत्रात चालू झाला. यूस्टन्स फर्नांडिझ यांनी बनवलेली ‘अमूल गर्ल’ आणि उमेश राव यांनी बनवलेला एअर इंडियाचा ‘महाराजा’ हे आजही जाहिरात जगातले लँडमार्क मानले जातात.
स्वप्नातल्या या जगाला स्वप्न पडू पाहत होतं ते सिनेतारकांचे. अवघ्या भारतीय तरुणाईवर सिनेतारकांचा मोठा पगडा होता आणि हीच गोष्ट हेरत ‘लक्स’सारख्या ब्रॅण्डने आपल्या ग्राहकांना विकत घेता येणार्या सौंदर्याची स्वप्नं दाखवायला सुरुवात केली. लिव्हर कंपनीच्या या ब्रॅण्डने सिनेतारकांसाठी जाहिरात क्षेत्रात पायघड्या अंथरल्या आणि आजही लक्सच्या जाहिरातीत तीच परंपरा अखंडित पहायला मिळते.बदलत्या काळाबरोबर जाहिरातीची ही दुनिया आता कात टाकायला लागली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून बाहेर पडणारे विद्यार्थी आता जाहिरातीच्या क्षेत्रात आपले ज्ञान आणि कौशल्ये वापरू पाहत होती. सर्जनशीलतेला आता तर्काची जोड मिळायला लागली आणि अँडव्हर्टायजिंग एजन्सी आता फक्त जाहिरातीचा विचार न करता संपूर्ण ब्रॅण्ड मॅनेजमेंट करू लागली.ग्राहकाचा दृष्टिकोन यानंतर बदलला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर्फ पावडरच्या जाहिरातीत दिसणारी ‘ललिताजी’. ‘सस्ती चीज और अच्छी चीज मैं फरक होता है.’ असं म्हणून निर्णायक क्षणी ग्राहकाचं मन किमतीवरून मूल्याकडे वळवत, भारतीय गृहिणीचे प्रतिनिधित्व करणारी ललिताजी आजही आपल्या मनात सहज डोकावते.राजीव गांधी पंतप्रधान असतानाचा हा काळ, जेव्हा भारतात माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची नांदी होत होती. जाहिरातीद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचणं जितकं सोपं होत होतं तितकंच गरजेचंही. परदेशी गुंतवणूदारांसाठी भारतीय बाजारपेठ खुलत होती आणि जाहिरातीचं महत्त्व अधिकच वाढलं. विकासाबरोबर देशाची लोकसंख्यादेखील विक्रमी वाढू लागली आणि अपेक्षितरीत्या जाहिरातीच्या जगाचा विस्तार अनेक पटींनी फोफावला. एलेक पदमसी, प्रल्हाद कक्कर, पीयूष पांडे अशी मातब्बर लोकं आता जाहिरातीच्या जगाला नवीन दिशा देऊ पाहत होती. प्रचंड वेगाने पुढे जाणार्या या जगात पुढे घडलं तरी काय, हे आपण क्रमश: येणार्या लेखांमधून बघूयात.(संदर्भ : अँड कथा)
hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)