अविनाश कोळीएरव्ही पडदा उघडण्यापूर्वी घंटा वाजत असली, तरी नाट्यपंढरी सांगलीतील यंदाच्या रंगभूमी दिनाला पडदा उघडल्यानंतर एक घंटा वाजली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी वाजविलेली ती धोक्याची घंटा होती. नव्या आभासी जगात नाट्यकला अस्तंगत होण्याची भीती या घंटेच्या निनादातून त्यांनी व्यक्त केली.‘परिवर्तन प्रकृतीचा नियम आहे’, हे तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. सध्याच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या चमत्कारिक क्रांतीने अनेक क्षेत्रांना आपल्या कवेत घेत परिवर्तन किती गतिमान असू शकते, त्याचे किती मोठे परिणाम असू शकतात, हे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. याच परिवर्तनाचा धागा पकडत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी नाट्यकलेच्या भवितव्याचा विषय मांडला. मोबाईल, इंटरनेटच्या युगात प्रत्येकजण आभासी जगात वावरत आहे. नवी पिढी त्यावर स्वार होऊन वेगाने त्या दिशेने जात आहे. त्यांना नाटकाकडे खेचणे फार सोपे राहिलेले नाही. म्हणूनच नाट्यकला अस्तंगत होतेय की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी या दोन्ही प्रवाहांना त्यांचे हे वाक्य लागू आहे. गेल्या पाच वर्षांपासून वाहत असलेले नाट्यक्षेत्रातील बदलाचे वारे आता वादळाचे रूप धारण करू पाहत आहे. परिवर्तनाच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडल्यामुळे नाट्यक्षेत्राची अवस्था सध्या सर्कशीसारखी झाल्याचे मतही मांडले जात आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, नाट्यनिर्माते, नाट्यवितरक अशा प्रत्येक विंगेतून घेतलेला आढावा समस्यांचे वेगवेगळे पदर मांडतो आहे. व्यावसायिक रंगभूमीचा विचार केला, तर मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांमध्येच हे प्रवाह आता थांबल्यासारखे वाटत आहेत.
नाट्यकलेच्या नद्यांना बांध घातल्यामुळे या कलेची पार्श्वभूमी असलेल्या महाराष्टÑातील अन्य गावांपर्यंत झिरपत झिरपत थोडेफार पाणी जात आहे. कालांतराने कलेचे याठिकाणचे पात्र कोरडे पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सांगली, कोल्हापूर, सातारा येथील व्यावसायिक रंगभूमीवरील प्रयोगांचा आलेख हा घटत आहे.
सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, कºहाड अशा केंद्रांवर गेल्या काही वर्षांपासून जेवढे नाट्यप्रयोग झाले, त्यातील काही मोजकेच यशस्वी ठरले. कोल्हापूर येथील नाट्यवितरक आनंद कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरात एकही नाटक मागविले नाही. बाहेरून येणाऱ्या नाटकांचा अवाढव्य खर्च, त्या खर्चाच्या तुलनेत वाढत जाणारे तिकिटांचे दर, मिळणारे उत्पन्न हा सर्व कसरतीचा भाग आहे. बाहेरील नाटकांचे प्रयोग सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी करणे आता तितकेच जिकिरीचे बनले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
सांगलीतील वितरक धनंजय गाडगीळ यांनाही असाच अनुभव येत आहेत. प्रेक्षकांची घटती संख्या, नाट्यगृहांची दुरवस्था, सुविधांचा अभाव, खर्चाचे बिघडलेले गणित आणि यातील अनेक घटकांची बदललेली मानसिकता, याचाही परिणाम या क्षेत्रावर झाल्याचे मत गाडगीळ यांनी मांडले. रंगकर्मी शफी नायकवडी यांच्या नजरेतूनप्रायोगिक रंगभूमीसुद्धा तितकाच कसरतीचा प्रकार बनला आहे. आजचा प्रेक्षक नाट्यगृहांची तुलना मल्टिप्लेक्स थिएटरशी करीत आहे. त्यामुळे आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत. त्यामुळेच आगाशे यांनीवाजविलेली ही घंटा तितक्याच गांभीर्याने घ्यायला हवी.
अनेक भाव-भावनांच्या रेषा चेहºयावर उमटवत प्रेक्षकांच्या काळजात घर करणारे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ अशा सर्वांचे एक मोठे घर असलेली ही रंगभूमी आता परिवर्तनाच्या वादळात आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. काहींना भवितव्याची चिंता वाटते, काहींच्या मनात संकटातूनही आशावाद जन्माला येत आहे, तर काहींना संभ्रमाचे हे ढग हटल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे वाटते.