- सतीश पाकणीकर
सुट्टीची एक सकाळ. घरच्या खिडकीतून बाहेर पाहत बसलो होतो. आकाशाच्या त्या चौकोनी तुकडय़ात पानगळ सुरू असलेले कडुनिंबाचे झाड शांत भासत होते. वा-याच्या सौम्यशा झुळुकीबरोबर एकेक पान आपली जागा सोडून जमिनीकडे निवांतपणो प्रवास करीत होते. कितीतरी वेळ मी तो खेळ पाहत बसलो होतो. आणि माझ्याही नकळत मी निवांत होत गेलो. मनात विचार येत गेला की निवांतपण, शांतपण विचारातही हवे अन् जगण्यामधेही. त्या शांतपणातच माझ्या मनात अचानक अशाच एका निवांत मैफलीची आठवण जागी झाली. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयाचे अँम्फी थिएटर. सायंकालीन मैफल होती. पाचच्या सुमारास मी कॅमे-यासह तेथे पोहोचलेलो. थेट ग्रीनरूम गाठली. ज्यांची मैफल होती अशा ज्येष्ठ गायिका सौ. मालिनी राजूरकर बसलेल्या होत्या. मी गुपचूप कोप-यात जाऊन उभा राहिलो. काही वेळाने मालिनीताईंनी तानपुरा टय़ून करायला सुरुवात केली. शेजारच्या खिडकीतून येणारा प्रकाश त्यांच्या चेह-याच्या व तानपु-याच्या एका बाजूला पसरला होता. मी पुढे होऊन तो क्षण कॅमे-यात टिपला. त्यांची तल्लीनता, साधेपणा, बोलण्यातील सहजता आणि त्यांचा सुसंस्कृतपणा याचं माझ्यासाठी ते पहिलं दर्शन होतं.थोडय़ाच वेळात मैफल सुरू झाली. वेळ होऊन गेलेली असूनही काही श्रोते उशिरा येऊन स्टेजच्या पुढच्या भागातून जात होते. याचा मालिनीताईंना त्रास होत नसेल असे नाही. पण त्या शांतपणो आलापी करीत होत्या. मग श्रोते जरा स्थिरसावर झाले. थोडय़ा वेळाने फोटो काढू असा विचार करीत मीही कॅमेरा बॅगमध्ये ठेवून दिला. काही वेळाने अचानकपणो वीज गेली. स्वाभाविकच मायक्रोफोन बंद पडले. थिएटरमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले. जनरेटरही नव्हता. आता काय? टाचणी पडली तरी ऐकू येईल, असा काही सेकंदांचा पॉज गेला. कोणत्याही निवेदनाशिवाय मालिनी राजूरकर यांनी आपल्या स्वत:च्या आवाजाचा व्हॉल्युम वाढवला. पुढची सगळी मैफल त्या मिट्ट अंधारात पार पडली. कलाकाराला श्रोते दिसत नव्हते अन् श्रोत्यांना कलाकार. पण त्या संध्याकाळी थिएटरमधील प्रत्येकाच्या हृदयाच्या कप्यात ते स्वर्गीय स्वर साठवले गेले. मालिनीतरईचा स्वत:चा हा ठाम विश्वास आहेच की, ‘ऑडियन्स सहिष्णू असतो, फक्त आपली सिन्सियरिटी त्यांच्यार्पयत पोहोचली पाहिजे !’- अशी निवांत मैफल मला या आधी अनुभवायला मिळाली नव्हती. फक्त तानपुरा टय़ून करतानाचा एकमेव फोटो मिळाला होता.त्या काळात बेंगलोरहून ‘मायटेक डिरेक्टरी ऑफ फोटोग्राफर्स’ नावाने एक डिरेक्टरी प्रसिद्ध होत असे. भारतातील प्रत्येक राज्यातील काही फोटोग्राफर्सचे काम त्यात प्रसिद्ध होत असे. मायटेककडून मला विचारणा झाली आणि मी उस्ताद अमजद अली खाँ, पं. कुमारगंधर्व यांच्या फोटोंबरोबर सौ. मालिनी राजूरकर यांचा तो फोटो त्यांना पाठवून दिला. यथावकाश ‘मायटेक’ने मला नवी आवृत्ती व माझ्या पानाच्या शंभरप्रति पाठवल्या. काहीच दिवसात मालिनीताईंची गरवारे सभागृहात मैफल होती. त्यांचे पुण्यात आल्यावर राहण्याचे आवडते ठिकाण म्हणजे हॉटेल श्रेयस. मैफलीनंतर मी श्रेयस गाठले. त्यांचा साधेपणा माहीत असल्याने मनावर दडपण नव्हते. ‘मायटेक’ची काही पाने व त्या फोटोची प्रिंट त्यांना देण्यासाठी मी घेऊन गेलो होतोच. त्यांना तो फोटो खूप आवडला. त्या पानात कुमारजींचा फोटो आहे हे पाहून त्या म्हणाल्या, ‘पुढच्याच आठवडय़ात मी देवासला जाणार आहे. मला जसा हा प्रिंट दिलात तसा तो तुम्हाला कुमारजींनाही द्यायचा आहे का?’ मी मान हलवली. त्यावर त्या म्हणाल्या, ‘तुमची हरकत नसेल तर माझ्याकडे द्या. मी देईन त्यांना !’ अहमहमिकेच्या या क्षेत्रात इतका साधेपणा? मनाला फार भावला !! मी कुमारजींच्या फोटोची प्रिंट नेली नसल्याने असमर्थता व्यक्त केली आणि एका आभाळाएव्हढय़ा कलावतीला भेटल्याच्या आनंदात तेथून बाहेर पडलो. पुढे अशा अनेक प्रसंगातून या श्रेष्ठ कलावतीचा आणि त्यांचे पती श्री. वसंतराव राजूरकरांचा प्रेमळ सहवास मला लाभत गेला.1986च्या जून महिन्यात माझं कलाकारांच्या भावमुद्रा असलेलं पहिलं प्रकाशचित्र प्रदर्शन पार पडलं. तो जमाना कॅसेट्सचा होता. माझी काही प्रकाशचित्रं वापरून कॅसेट्सची मुखपृष्ठ केली गेली होती. पुण्यातील त्यावेळेचे आघाडीचे कॅसेट निर्माते म्हणजे सुरेश अलूरकर. त्यांचा मला फोन आला. मालिनीताईंच्या काही कॅसेट्स ते काढणार होते. त्याच्या ‘इन ले’चे काम होत आले होते. कव्हर्ससाठी फोटो लागणार होते. त्या पुण्यात आल्यावर त्यांचे फोटोसेशन करण्याचे ठरले. मैफलीसाठी त्या पुण्यात आल्या; पण जोडूनच पुढचा दौरा असल्याने त्यांचे वास्तव्य एकाच दिवसाचे होते. त्यात त्यांनी फोटोसेशनसाठी थोडा वेळ ठेवला होता. त्यामुळे हॉटेल श्रेयसवरच फोटोसेशन करण्याचे ठरले. पण तेथील खोलीतील पाश्र्वभूमी चालणार नव्हती. मग पर्याय होता तो फक्त बाल्कनीचा. तेथे एक भिंत मोकळी मिळाली. कव्हरची रचना ठरली होती. त्याप्रमाणो मालिनीताईंना उभे राहायला लागणार होते. त्यांच्या भल्यामोठय़ा चष्म्यात कशाचेच रिफ्लेक्शन येऊन चालणार नव्हते. माझ्या फ्लॅशलाइटचे तर नाहीच नाही. गाताना त्यांचा हात ठरावीक उंचीर्पयतच न्यावा लागणार होता. त्यांचा चेहराही एका विशिष्ट कोनातच असावा लागणार होता. एक दोनदा साडीही बदलावी लागणार होती. आणि यात कमी म्हणून की काय चेह:यावर गातानाचे भाव येण्यासाठी त्यांना गावेही लागणार होते. थोडक्यात त्या सर्व कामात त्यांच्यासाठी ब-याच गोष्टी एरवी कराव्या लागणार नाहीत अशा होत्या. त्यांनी त्या सर्व शांतपणो ऐकून घेतल्या.सुमारे अर्धा तास आमचे फोटोसेशन चालले. वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या पाश्र्वभूमीवर मी त्यांची प्रकाशचित्रे टिपली. समोरची व्यक्तीही एक कलाकार आहे ही प्रामाणिक जाणीव ठेवून त्याला सहकार्य करण्याचा मालिनीताईंचा स्वभाव अनुभवायला मिळाला. सेशन संपता संपता गंमतीने त्या एक वाक्य बोलल्या जे नंतर माङया पथ्यावरच पडले. त्या म्हणाल्या, ‘सतीश, या फोटोसेशनपेक्षा एक स्वतंत्र मैफल तुझ्यासाठी केली असती तरी ते उत्तम झालं असतं !’ मी लगेचच म्हणालो, ‘मग पुढच्यावेळी ती माझ्या स्टुडिओतच करू. तुम्ही वेळ काढून यायचं !’आणि खरोखरच पुढच्यावेळी मैफल माझ्या स्टुडिओत झाली, आणि फोटोसेशनही! माझ्या थीम कॅलेंडरमधील 2013 सालचे कॅलेंडर होते ‘स्वरनक्षत्र’. सवाई गंधर्वमहोत्सवात ज्या कलाकारांनी अनेकवेळा आपली कला सादर केली आहे असे गायक-गायिका. अर्थातच प्रत्येक वर्षी मालिनीताईंच्या गायनाने एका सत्रची समाप्ती होत असल्यालाही बरीच वर्षे झाली होती. त्यामुळे त्यांचे प्रकाशचित्र कॅलेंडरमध्ये होतेच. मी त्यांना त्याबद्दल परवानगी विचारणारे पत्र पाठवले. त्यांचे पत्र येणे अपेक्षित होते. पण अचानक त्यांचा फोन आला. म्हणाल्या,‘अहो पाकणीकर, शास्रीय संगीताच्या प्रेमापोटी तुम्ही इतकं चांगलं काम करताय. फोटो तुम्हीच काढलाय, कॅलेंडरही तुम्हीच बनवताय, मग त्यात माझ्या परवानगीचा प्रश्न येतोच कुठे? तुमच्या पत्रात तुम्ही परवानगीचे पत्र पाठवा, असे लिहिले आहे. पण मी सध्या घरगुती आजारपणांत व्यग्र आहे. माझी सहमती आहेच. वेळ झाल्यावर मी पत्रही लिहीन. पण जर मी पत्र लिहिले नाही तरीही मी माझ्या या शब्दांपासून मागे फिरणार नाही. तुम्ही निश्चिंत असा!’त्या कॅलेंडरमध्ये वेगळेपणा यावा यासाठी मी त्या त्या गायक-गायिकांनी जास्त प्रमाणात गायलेल्या बंदिशी लिहिल्या होत्या. मालिनीताईंच्या फोटोखाली त्या नेहमी गात असलेल्या काफी रागातील टप्पा लिहायचा होता. तो ऐकून त्याचे शब्द लिहू, असा माझा विचार होता. पण त्यातील काही शब्दांची माझ्या समजण्यात अडचण येत होती. आता काय करायचे? समोर कॅलेंडरचे आर्ट वर्क तयार होत होते. आम्ही त्या शब्दांवर अडलो होतो. वेळ दुपारची. करावा का फोन मालिनीताईंना? असा अवेळी? पण दुसरा पर्यायही नव्हता. मी त्यांचा मोबाइल नंबर लावला. पलीकडून त्यांचा आवाज आला, ‘काय म्हणताय? कुठर्पयत आलीय कॅलेंडरची तयारी?’माझं दडपण कमी झालं. मी त्यांना म्हणालो, ‘काफी मधल्या तुमच्या एका टप्प्याचे शब्द लिहितोय आम्ही. पण काही ठिकाणी अडलोय. ते शब्द सांगता का?’ असे म्हणून मी त्यांना ‘हो मियाँ जानेवाले ..’ हे सुरुवातीचे शब्द सांगितले. पण असा अचानक फोन आल्याने त्यांना पुढचे शब्द पटकन आठवेनात. एका क्षणात विचार करून त्या म्हणाल्या, ‘ते शब्द गाताना बरोबर येतात. थांबा, मी तो टप्पा आधी गाते. मग शब्द सांगते !’- असे म्हणून पुढच्याच क्षणी त्या तो टप्पा गाऊ लागल्या. पूर्ण टप्पा गायल्या. मी मोबाइलवर असलेला एकमेव श्रोता. गाऊन थांबल्या. आणि म्हणाल्या, ‘हं, घ्या आता लिहून!’त्या टप्याचे शब्द होते
हो मियाँ जानेवाले सांनूअल्ला दे कसम, फेरी आरे नैनवालेआन्दा जान्दा तूसी, मन ले जान्देआवो सजना गले लाग जा, शरशा मतवाले
- अवधच्या राजदरबारातील गायक शौरीमियाँ यांनी लिहिलेला हा टप्पा मला असा माझ्याच फोनवरून मालिनीताईंच्या आवाजात ऐकायला मिळावा असे कदाचित नियतीने लिहून ठेवलेले असावे.2016च्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची यादी वर्तमानपत्रतून जाहीर झाली. मालिनीताईंचे नाव त्यात नव्हते. रसिकांना त्यांच्या असण्याची सवय झाली होती. तशीच ती सवय मलाही होती. वर्तमानपत्र हातातून खाली ठेवले. मालिनीताईंना फोन केला. आणि त्या नसण्याचे आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या नेहमीच्याच शांतपणो त्या माझ्याशी जवळ जवळ वीस मिनिटे बोलल्या. माझ्या फोनला कॉल रेकॉर्डिगची सोय नाही याचे मला त्या दिवशी महान दु:ख झाले. एखाद्या कलाकाराने आदर्श कसे असावे याचा ते बोलणो सर्वोत्तम नमुना होता.त्या म्हणाल्या, ‘मला माझ्या मुली म्हणतात की, तू तेथे जाऊन गायला हवे. तू काळजी करू नकोस आम्ही बरोबर येतो तुझ्या! पण पाकणीकर, मला सांगा मुली माझ्यासोबत स्टेजर्पयतच येतील ना? गावं तर मलाच लागणार आहे नां? बसून माझी पाठ अवघडते. त्या वेदना मी एकवेळ सहन करीन. पण त्याचा माझ्या गाण्यावर परिणाम तर होणारच नां? मग मी जर रसिकांपुढे उत्तम सादरीकरण करू शकणार नसेन तर मला कुठेतरी थांबायला हवे नां? मी पहिल्यांदा 1966 मध्ये ‘सवाई’त गायले. पं. भीमसेनजींनी मला आशीर्वाद दिले. नंतर काही काळाने सांगितले की, दरवर्षी तुला यायचे आहे आणि एका सत्राचा शेवट तुझ्या गाण्याने होईल. त्यांना दिलेला शब्द मी पाळत आले. माझ्यापरीने उत्तम सादर करत आले. आता जमत नसेल तर त्यांच्याशी प्रतारणा करू का? माझं गाणं इथे घरात सुरू आहे. ते नेहमीच माझ्याबरोबर राहील. तुम्ही इथे या. मी रोज रियाज करते!’ - त्यांच्या निमंत्रणाचा आनंद मानायचा का त्या इथे येणार नाहीत याचे दु:ख; हे मला त्या दिवसापासून पडलेले कोडे मी आज 2020 सालीही सोडवू शकलो नाहीये!
sapaknikar@gmail.com (लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)