समाजच मद्यधुंद झाला आहे आणि आत्मकेंद्रितही. म्हणूनच तरुणांची अवस्था दोरा तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. आम्ही शिक्षकसुद्धा त्या विकृतीचा एक घटक बनून जगतो आहोत. दिशाहीन झालेलं हे वादळ अचानक एके दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर येऊन आदळलं. तेव्हा वाटलं, कीकेवळ समाजाच्या निष्क्रियतेमुळे हे घडलं..निमशहरी रूप असलेलं एक तालुक्याचं ठिकाण. व्यापार-उदीम, खरेदी-विक्री यांची उलाढाल मोठी. त्यामुळे झपाट्याने शहरी चेहरा प्राप्त होत चाललेलं. तंबाखू-गांजापासून तमाशापर्यंत आणि तमाशापासून वेश्यांपर्यंत सार्या भोगविलासांचे तीर्थस्थान झालेलं. अशा या विलासभूमीत तीन-चार महाविद्यालयांची रेलचेल होती. एक डी.एड.चे, एक कला-वाणिज्यचे आणि तिसरे तंत्रज्ञानविषयक महाविद्यालय होते. चारी दिशांनी येणार्या विद्यार्थ्यांचा लोंढा शहरात खळाळत असे. शहरापासून थोड्याशा अंतरावर ही सारी महाविद्यालये विसावलेली. या महाविद्यालयांच्या परिसरातच थोडीफार वस्ती पसरलेली. काही दुकानेही थाटलेली. आमच्या कला-वाणिज्य महाविद्यालयाला लागून असलेल्या छोट्या रस्त्यावर हॉटेल्स, शीतगृहे, बेकरी आणि पान-तंबाखूच्या टपर्या यांची एक लांबलचक रांगच उभी होती. एकदा आम्हा प्राध्यापकांची बैठक संपल्यानंतर काही मोजकेच प्राध्यापक थांबलो असताना दोन शिपाई जवळ येऊन म्हणाले, ‘‘सर, विद्यार्थ्यांचे वर्ग झाडताना अलीकडे वर्गात भरपूर तंबाखू-गुटख्याच्या पुड्या सापडतात. अर्धवट चघळून टाकलेला तंबाखूचा चोथाही जागोजागी असतो. यासाठी काहीतरी नियम करावा असं वाटतं. तास संपल्यावर सायंकाळी मी आणि भीमा एकदा वर्ग झाडण्यासाठी निघालो असताना जिन्यामध्येच तोंडाला घाण वास असणारा मुलगा भेटला. कदाचित तो पिऊन आला असावा सर. त्यानं हे सांगताच आम्ही सारेजण चक्रावून गेलो. आजकालच्या मुलांमध्ये ही व्यसने झपाट्याने फोफावत आहेत, याची आम्हाला तशी कल्पना होती; पण कॉलेजमध्ये तासाला हा घाण ‘कचरा’ तोंडात घालून येतात, याची आम्हाला काळजी वाटली. निदान अशा विद्या संकुलाच्या परिसरात तरी अशी दुकाने नसावीत असे वाटायचे. पण समाजाला याचे जराही गांभीर्य वाटत नाही. आपल्याच मुलांना, आपल्याच हातांनी अशा व्यसनाच्या जबड्यात ढकलतो, हे कुणालाही पापमय वाटत नव्हते. सारा समाजच व्यसनावर उभा आहे, व्यसनावर जगतो आहे आणि उद्याच्या पिढीला नरकात ढकलतो आहे, याचे सोयरसुतक कुणालाच नाही, याची खंत आम्हाला अस्वस्थ करून गेली. या शिपायांनी सांगितलेली घटना कितपत खरी आहे, हे जाणून घेण्यासाठी प्राचार्यांनी चार-चार प्राध्यापकांचे गट तयार करून वर्गातील मुलांची झाडाझडती घेतली आणि आम्हाला निखार्यावरून जावे तसा चटका बसला. चार-सहा मुलांपैकी निदान एकाच्या तरी खिशात तंबाखूची पुडी किंवा गुटखापुडी सापडली. सार्या वर्गातला हा जहरी ‘ऐवज’ जेव्हा आम्ही गोळा केला; तेव्हा तो दोन टोपल्या भरतील एवढा निघाला. मधल्या सुट्टीत सारे विद्यार्थी मैदानात असतानाच तो जाळून टाकला. ‘यापुढे ज्यांच्याकडे पुडी सापडेल त्याला कडक शिक्षा केली जाईल,’ असा इशाराही प्राचार्यांनी दिला. व्यसनांमुळे होणारी हानी समजावून सांगितली. नंतर दोनच दिवसांनी आम्ही चार-पाच प्राध्यापक प्रवेशद्वाराजवळच असलेल्या सार्या दुकानदारांना भेटलो. पान, बिडी, सिगारेट विकणार्या दुकानदारांना कळकळीनं सांगितलं, की ‘‘शाळा-कॉलेजपासून काही ठराविक अंतरात ही विक्री केंद्रे असता कामा नये, असा सरकारी आदेश आहे. तरीही तुम्ही पोरांना मोह व्हावा अशा ठिकाणी दुकाने थाटली आहेत. ही मुले मोहापोटी, कुतुहलापोटी, आग्रहापोटी हातात पुस्तक घेण्याऐवजी तंबाखू घेतात. सिगारेट घेतात. आपल्याच नात्या-गोत्यातील या मुलांना व्यसनाची चटक लावता, हा फार मोठा गुन्हा आहे. आपण आपल्या हाताने या पिढीला बरबाद करीत आहोत. कृपा करून या गोष्टी विकायच्या बंद करा. त्यांना नीट समजावून सांगा.’’ त्यावर एक टपरीवाला ताडकन म्हणाला, ‘‘सर, आम्ही नाही विकले तरी ते थांबणार आहे का? आपल्या गावात बिडी-काडीची पन्नास दुकाने आहेत. ही पोरं इथं नाही मिळालं तर बाहेर कुठूनही घेतील. बाकीचे लोक विकायचं थोडेच थांबतील? शिवाय आमचं पोटपाणी या दुकानावर आहे. तेच बंद केलं तर आम्ही उपासमारीनं मरून जाऊ. खरं तर पालकांनी-शिक्षकांनीच जरब ठेवली पाहिजे. हे बंद केलं पाहिजे.’’ याच प्रकारचं उत्तर आणखी दोघा-तिघांनी दिल्यामुळे आम्ही निरुत्तर झालो. नंतर एका शीतगृहाच्या मालकाला भेटलो. त्याला समजावून सांगितले- ‘‘अरे, तुझ्या या दुकानात मुले फक्त कोकाकोला पित नाहीत असं समजतंय. ही पोरं त्यात दारू मिसळून पितात. कधी-कधी गावठी दारू आणून पितात, अशा तक्रारी आहेत. आपल्याच तरुण पिढीचं आपण नुकसान करतोय, ते तू लक्षात ठेव आणि असले उद्योग बंद कर.’’ त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘सर, मी चुकूनही दारू विकली नाही. या ओढय़ाच्या पलीकडं गावठी दारूच्या भट्टय़ा आहेत. तिथून ते दारू आणतात. मी विरोध केला तर तुमच्याच बागेतल्या झुडपात बसून ते दारू ढोसतात. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा. मला सांगून काय उपयोग?’’ या संभाषणातून या रोगाची मुळे किती विस्तारली आहेत आणि किती खोल गेलेली आहेत, हे आमच्या लक्षात आले. तरीही त्यांना कळकळीची विनंती केली. त्यांनीही सहकार्य करण्याचे कबूल केले. या निर्बंधामुळे थोडाफार फरक पडेल, अशी आम्हाला अशा वाटली. खरं तर फुटलेल्या धरणाला आम्ही मंडळी चिंध्याचा बोळा बसवत होतो. हाती खुळखुळणारा पैसा, पालकांचं दुर्लक्ष, व्यसनी मुलांशी मैत्री, व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठा, बदललेली जीवनमूल्ये आणि चंगळवादाचा शिकार झालेला समाज या सार्यांचा परिपाक या वाढत्या व्यसनात होतो आहे. ओठ पिळला तर दूध निघेल अशा वयातील मुले एखाद्या पार्टीच्या निमित्ताने रात्रभर दारू पिऊन गोंधळ घालतात, यासाठी कोणीच पुढे येत नाही. समाजानेच आपल्या पोटातील ही घाण स्वत:हून काढून टाकायला हवी. पण, समाजच बधिर झाला आहे, मद्यधुंद झाला आहे आणि आत्मकेंद्रितही झाला आहे. त्यामुळे तरुणांची अवस्था दोरा तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. आम्ही शिक्षकसुद्धा त्या विकृतीचा एक घटक बनून जगतो आहोत. आणि दिशाहीन झालेले हे झंझावात अचानक एके दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर येऊन आदळले. घडले असे की, परगावाहून रोज एसटीने कॉलेजला येणार्या चार-पाच मुलींची काही टारगट मुले आणि काही रिक्षावाले जाताना छेडछाड करायचे. घाणेरडे हावभाव करून टोमणे मारायचे. घाबरलेल्या या मुलींनी आधी दुर्लक्ष केले. मग तक्रार केली. नेहमीप्रमाणे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकच धीट आणि उन्मत्त झालेल्या एका तरुणाने एका मुलीचा रस्त्यावरच हात धरला. तिच्या अंगाशी झोंबू लागला. दारूच्या नशेत तो वाटेल ते बरळत होता. ती कन्या आपली सुटका करून घेण्यासाठी मोठय़ाने ओरडली. त्याच्या दंडाला चावली. तेवढय़ात तिच्या मागे असलेल्या मैत्रिणी धावत आल्या. दोन तगडे विद्यार्थीही धावले. सर्वांनी तिची सुटका केली आणि त्या नराधमाला उभा-आडवा पार बेशुद्ध होईपर्यंत धुतला. अगतिक आणि भेदरलेल्या त्या मुलीचे अश्रू खूप वेळ वाहत होते. तिचे हे अश्रू म्हणजे बधिर आणि बेजबाबदार झालेल्या समाजाचा निषेध म्हणावा लागेल. या घटनेची शोकांतिका अशी, की त्या मुलीचे शिक्षण त्या दिवसापासून पालकांनी बंद केले. तिच्या सार्या आयुष्याचे दरवाजेच जणू बंद झाले! (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)
बधिर सामाजिकतेने घेतलेला बळी
By admin | Published: April 29, 2014 3:30 PM