- स्नेहल जोशी
‘‘पुरानी जीन्स, और गिटार,मुहल्ले की वो छत, और मेरे यार’’ एखाद्या वेळेला कपाट आवरताना जुनी जीन्स सापडते आणि मन आठवणीत गुंतत जातं. ती जीन्स घालून केलेले प्रवास, ट्रेक, कॉलेजचे दिवस आणि बरंच काही. जीन्सवर पडलेले डाग, वापरल्याच्या खुणा. सगळा भूतकाळ जागा करतात. नाही का? खरंच, आपल्या वॉर्ड-रोबमध्ये जीन्स किंवा डेनिम पॅण्ट नसल्याचं कधी आठवतंय का? फॅशनच्या या क्षणभंगूर दुनियेत जीन्स मात्न 150 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे आणि यापुढेही ती लोकप्रिय राहणार यात काही वादच नाही. याच जीन्सच्या इतिहासात आपण आज डोकावणार आहोत.जीन्स हा पॅण्टचा प्रकार आहे तर डेनिम हे कापड. ही दोन्ही नावं गावांच्या नावांवरून पडली आहेत. या सगळ्याची सुरु वात मात्न भारतात झाली आहे बरं का. आपल्याकडे शेकडो वर्षांपासून कापसाच्या सुतापासून जाड आणि मजबूत कापड बनवलं जात असे. हे विणताना मजबुतीसाठी तान्याखाली अतिरिक्त बाना वापरला जात असे. या कापडाला डंगरी असं नाव बहुधा इंग्रजांनी दिलं. भारतात निळीची लागवड भरपूर असल्यानी डंगरी कापड निळं असे. शिवाय निळं कापड मळखाऊ असल्याने कामगारांच्या गणवेशाला अधिकच उपयुक्त. युरोपात हे कापड पोहोचलं आणि त्यावरून प्रेरणा घेऊन फ्रान्समध्ये नीम्स या शहरात तसंच मजबूत कापड विणण्याचं कार्य सुरू झालं. निळीत रंगवलेला ताना आणि दर 2 ते 3 धाग्यांखालून जाणारा लोकरीचा अतिरिक्त बाना या पद्धतीने कापड तयार होऊ लागलं. नीम्सचं मजबूत कापड म्हणजेच ‘‘सर्ज-डे-नीम्स’’ हे डेनिम म्हणून प्रसिद्ध झालं. यात फक्त ताना रंगवलेला असल्याने एक बाजू निळी आणि दुसरी पांढरी दिसते. डेनिम आणि डंगरीचा वापर करून इटलीतील जिनोआ शहरात पॅण्ट शिवल्या जायच्या म्हणून पॅण्टचं नाव जीन्स पडलं.पण या जीन्सची निर्मिती फॅशनसाठी मुळीच झाली नव्हती. जीन्सचे जनक लेवी स्ट्राउस हे र्जमन उद्योजक. 1851 साली लेवी हे आपल्या भावाच्या वाढत्या उद्योगाला हातभार लावायला अमेरिकेत न्यू यॉर्कला आले. धंदा घाऊक मालाचा होता. याच दरम्यान अमेरिकेत ‘‘गोल्ड रश’’ म्हणजे सोनं खणनाचे वारे सुरू झाले होते. ही संधी साधून धंदा अजून वाढवण्याचा विचार करून, लेवी यांनी आपले बस्तान सॅन फ्रान्सिस्को येथे हलवले आणि सुट्या मालविक्र ेत्यांना घाऊक माल पुरवू लागले. 1853 साली त्यांनी लेवी स्ट्राउस अँड कंपनीची रीतसर स्थापना केली. इथेच त्यांना जेकब डेव्हिस भेटले. जेकब व्यवसायाने शिंपी होते. खाण कामगारांचे कपडे अजिबात टिकत नाहीत हे पाहून, लेवींनी आयात केलेलं डेनिम वापरून मजुरांसाठी जेकब ओव्हर-ऑल तयार करू लागले. कमीत कमी जोड आणि शिवणी असल्यामुळे उसवण्याची काळजीही कमीच. कामाची साधनं, औजारं सोयीस्कररीत्या अंगावर बाळगता यावीत म्हणून पॅण्टच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लहान-मोठे खिसे लावण्यात आले. रंग अर्थातच निळा-शक्यतो डाग लपतील असाच. तरीही खिसे कशात न कशात अडकून फाटायचे. यावर उपाय म्हणून जेकब यांनी पहिल्यांदाच खिश्याचे जोड अधिक मजबूत करण्यासाठी तांब्याची रिव्हेट वापरायला सुरु वात केली. पुढे पॅण्ट बंद करण्यासाठी असलेली बटणं काढून त्याजागी झिप वापरात आणली गेली. डेनिम हे कापड मुळात सुटे असल्याने धुतल्यावर आटतं तेव्हा कपडे शिवण्यापूर्वी ते धुवून घेऊन परत आटणार नाही अशी खात्नी करूनच पॅण्ट शिवण्यात येऊ लागल्या. त्यावर लेवी आणि जेकब यांनी 1873 साली पेटंट घेतलं. लेवीच्या जीन्सचं पेटंट असलेलं ‘‘लेवी 501’’ हे मॉडेल आजही सर्वाधिक लोकप्रिय आहे. खाण कामगार तर खूश होतेच, पण आता हळूहळू अंग मेहनत करणारा प्रत्येकजण लेवी जीन्स वापरू लागला. आत्तापर्यंत उद्देशरहित, सहज परिधान करण्याच्या दृष्टीने कधी जीन्सचा कोणी विचारही केला नव्हता. दुसर्या महायुद्धापर्यंत डेनिम जीन्स काम करण्यासाठी मजबूत आणि आरामदायी म्हणूनच लोकप्रिय होती; तीदेखील फक्त अमेरिकेत. महायुद्धात परदेशी नेमणूक असलेले अमेरिकन सैनिक मात्न कामावर नसताना जीन्स घालत. या पेहेरावामुळे आकर्षक अशी बंडखोरी प्रतीत होत असे. परिणामी जीन्स जगभरात पोहोचू लागली. युद्धादरम्यान, बहुतांश पुरुष सेनेत भरती असल्याने बायका कारखाने चालवू लागल्या होत्या. त्यांचे घेरदार झगे कारखान्यात काम करताना अडचणीचे होते. तेव्हा 1934 मध्ये पहिल्यांदाच बायकांसाठी जीन्स तयार करण्यात आली. महिलांच्या क्षमतेचा, बुद्धिमत्तेचा याआधी विचार झाला नव्हता. या घटनांमुळे महिलाहक्क आणि स्त्नी-पुरु ष समानता या विषयांना वाचा फुटायला लागली होती. पाहता पाहता जीन्स हे तरु णाई आणि बंडखोरीचे प्रतीक होत गेले. इतके की शाळा-विद्यापीठांनी, उच्चभ्रू हॉटेल्स आणि नाट्यगृहांनी त्यांच्या आवारात जीन्स घालण्यावर बंदी आणली. हिप्पी आंदोलनांमध्ये जीन्स हा बुद्धिजीवी आणि उदारमतवादी लोकांचा मुख्य पेहराव म्हणून ओळखला जाऊ लागला. मुलींसाठी तर जीन्स घालणं हे अजूनही बंडखोरीचं, लैंगिक स्वातंत्र्याचं प्रतीक होतं. त्यामुळे मुलींसाठी आता जीन्सच्या नवीन फॅशनदेखील तयार होऊ लागल्या. कमरेपाशी निमूळत्या आणि पाउलापाशी भरपूर रूंद अशा बेलबॉटम जीन्स या काळात खूप लोकप्रिय झाल्या. मार्लन ब्रांडोसारखे नट, एल्विस प्रिस्लेसारखे रॉक कलाकार, यांनी आपल्या लोकप्रियतेच्या काळात जीन्स परिधान करून कला सादर केल्याने जीन्सने फॅशन जगात मोठी लाट आणली. मेरिलिन मनरो तर डेनिम आयकॉन म्हणूनसुद्धा ओळखली गेली. डेनिम आणि जीन्स आता फॅशन डिझायनरसाठी आव्हान झाली. बेलबॉटम, हिपस्टर, स्ट्रेट फिट, लो वेस्ट, हाय राइज, स्किनी जीन्स, स्टोन वॉश, मंकी वॉश, डिस्ट्रेस्ड या निळ्या कापडाचे आजवर अनंत नवीन पेहेराव तयार झालेत आणि सगळे लोकप्रियच ठरलेत.जगाचा, मानव संस्कृतीचा केवढा मोठा इतिहास या डेनिम-जीन्सने पाहिला आहे. किती तरी आठवणी या जादुई निळ्या वस्त्नात सामावल्या आहेत. डेनिम जीन्स हे डिझाइन खरोखर कालातीत आहे.
snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)