-डॉ. प्रकाश मुंजभारतातील संस्कृती ही जगभरासाठी मोठा कुतूहलतेचा विषय आहे. साहित्य, संगीत, सिनेमा हा तर नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रत्येक देशाला राष्टभाषा असलीच पाहिजे, असा आग्रह आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. इमरै बंग्घा धरतात. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा सारांश...भारतीय संस्कृती ही नेहमीच जगासाठी कुतूहलतेचा विषय आहे. तसेच येथील साहित्य, संगीत, सिनेमा यांचे जगभरात नेहमीच कौतुकच झाले आहे. आता तर भारताने ‘ग्लोबल योग’ ही नवसंकल्पना देत उत्तम आरोग्य आणि मन:शांतीसाठी ‘योग’शिवाय तरणोपाय नाही, अशी जणू जगाला शिकवणच दिली आहे. यामुळे भारत हा नेहमीच जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे, असे आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इमरै बंग्घा सांगतात.
प्रा. बंग्घा यांच्या मते, प्रत्येक देशाला राष्ट्रभाषा ही असलीच पाहिजे. मातृभाषेतच खऱ्या अर्थाने व्यक्तीचा भावनिक, सामाजिक, सृजनशीलतेचा विकास होत असल्याचे सांगितले. यामुळे प्रत्येक देशातील शिक्षणाचे माध्यम हे त्या-त्या देशाची राष्ट्रभाषा असले पाहिजे. विदेशी भाषा हा एक नाममात्र विषय म्हणून शिकविला गेला पाहिजे. एक संपर्काचे साधन म्हणून विदेशी भाषेकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. भारतातील शिक्षणाची भाषा ही राष्ट्रभाषेत होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रा. बंग्घा यांनी भारतातील अनेक दिग्गज नेत्यांना इंग्लिश येत नसल्याचा उल्लेख करीत अल्पशिक्षित व्यापारी अस्खलित इंग्लिश बोलून आंतरराष्ट्रीय व्यापार करीत असल्याचे नमूद केले.प्रा. बंग्घा यांनी एकूणच जगातील शिक्षणक्षेत्रातील वाटचालीबाबत चिंता व्यक्त करीत आजचे शिक्षण हे नोकºया देण्यास समर्थ नाहीच; पण त्यातून तयार होणारी पिढी ही ज्ञानप्रवण अथवा रोजगार तत्काळ मिळावा यासाठी सक्षम नसल्याचे सांगितले. आता जगातील सर्वच देशांमध्ये ज्ञानशतक, ज्ञानसमाज बनविणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील मुख्य आव्हान असल्याचे सांगितले. जग बदलतंय, या लाटेवर स्वार होत करिअर घडवावे लागेल, असे आवाहन प्रा. बंग्घा यांनी केले.
डॉ. इमरै बंग्घासहयोगी प्राध्यापक, आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंड, हंगेरियन, हिंदी, उर्दू भाषेचे अभ्यासक, मराठीचे उत्तम ज्ञान, कोलकाता येथून हिंदी विषयात पीएच.डी. पूर्ण केली. विशेष म्हणजे विविध संप्रदाय, मठांना भेटी देत पांडूलिपीचा अभ्यास केला. अनेक पुस्तके लिहिली. आज भारतीय साहित्याच्या महत्तीवर अधिकारवाणीने देश-विदेशात व्याख्याने देत आहेत. शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागात डॉ. पद्मा पाटील यांच्या प्रयत्नाने त्यांचे व्याख्यान झाले. यानिमित्त जगात भारताचे स्थान, साहित्य, संस्कृती आदी विषयांवर त्यांनी ठाम मते मांडली.
(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)