लगुल घ्या गोड बोला, माज्याशी तुमी भांडू नका...’- मांडव्याला जाणाºया बोटीत बसलेल्या बेने इस्रायली माणसांना तिळगूळ दिला तर प्रत्येकाने हसतहसत असं खास उत्तर दिलं... तिळगुळाचं निमित्त झालं आणि बोटीत बसलेल्या सगळ्या बेने इस्रायलींच्या मनात असलेला आठवणींचा साठा शब्दांमध्ये व्यक्त होऊ लागला... अरे हा बघ फणसपूरकर, अरे हा चिंचोलकर आपल्या वर्गात होता, तो दोन इयत्ता पुढे होता, हा एकदम हूड पोरगा होता...बोटीत बसलेल्या या चेष्टामस्करी करणाºया बहुतेक ज्यू ‘पोरां'च्या हातात आता काठ्या आल्या होत्या. इस्रायलमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये, कंपन्यांमध्ये, लष्करामध्ये केलेल्या नोकºया संपून सगळे पेन्शनीत आले होते. जाड भिंगाच्या चष्म्याच्या आत त्यांचे पाणावलेले डोळे आणखी कोण ओळखीचं सापडतंय ते शोधत होते.
ही सगळी मंडळी चालली होती भारतात पहिल्यांदा त्यांचे पूर्वज जेथे आले होते त्या नवगावच्या किनाºयावर. २००० वर्षांपूर्वी जेरुसलेमवर आक्रमण झाल्यावर तेव्हाच्या ज्यूंनी वाट फुटेल तिकडे पळून जायला सुरुवात केली. काही ज्यूंनी समुद्रात आपल्या बोटी हाकारल्या आणि देशोदेशींच्या किनाºयाला लागले. या ज्यूंना ‘लॉस्ट ट्राइब्ज’ म्हणजे ‘हरवलेल्या जमाती’ असं म्हटलं जातं. यातीलच काही लोक भारताच्या पश्चिम किनाºयावर लागले. त्यांना ‘बेने इस्रायली’ म्हणजे ‘इस्रायलची लेकरं’ म्हटलं जाऊ लागलं. भारतातील ज्यू मंडळी १९४७-४८पासून इस्रायलला स्थलांतरित होऊ लागली. नंतर १९६७ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये बहुतेक बेने इस्रायली ज्यू तिकडे गेले. यंदा पहिल्यांदाच सर्वांनी एकत्र मुंबईत भेटून नवगावला भेट द्यायचं ठरवलं होतं.
मांडव्याच्या प्रवासात माझ्या शेजारी बसलेल्या आणि वयाची पासष्टी उलटलेल्या तिघा मित्रांची चांगलीच ओळख झाली. एक होते मायकल एमिल, दुसरे इर्मियान आणि तिसरे हाईम चिंचोलकर. कधीकाळी मुंबईला डोंगरीत राहायचे. तिघांच्या बोलण्याला आणि आठवणींना, जोक्सना अक्षरश: ऊत आलेला. मुंबईत ‘एली कदुरी’ शाळेत शिकताना आम्ही कसे आंबे पाडायचो, करवंदं खायचो, भोवºया, गोट्या खेळायचो असं सगळं हसतखेळत सांगणं चाललेलं...
एमिल म्हणाले, ‘अरे तशी बोरं, आवळे पुन्हा कधी खायला मिळालीच नाहीत. काल दादरला गेल्यावर एक किलो बोरं आणून खाल्ली आम्ही.’ हे तिन्ही मित्र डोंगरीत एकाच इमारतीत राहायचे, तिथेच त्यांचा जन्मही झाला होता. एरव्ही मुंबई-अलिबागला त्यांचं येणं व्हायचं; पण आता शंभर-दीडशे लोकांबरोबर एकत्र पूर्वजांच्या भूमीत जाण्याचा त्यांना कोण आनंद झालेला!!
- त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवत होतं, ही सगळी मंडळी इस्रायलमध्ये राहतात खरी; पण पिढ्यान्पिढ्या कोकणात राहिल्यामुळं त्यांच्यातलं कोकण आणि मराठीपण संपलेलं नाही. इस्रायलमध्ये जायला जगभरातल्या ज्यूंप्रमाणे हे लोकसुद्धा तिकडे स्थायिक व्हायला उत्सुक होते; पण यांचा गाभा मराठमोळाच राहिला.
जेरुसलेममधून आजही ‘मायबोली’ नावाचं नियतकालिक काढलं जातं. सगळ्या इस्रायलमधले मराठी ज्यू त्यासाठी लिहितात, ते वाचतात. कधी एखादं नाटक तेल अविव, जेरुसलेमला आलं तर ते पाहून तेवढा वेळ तरी चारचौघात जाऊन मराठी ऐकण्याचा-बोलण्याचा प्रयत्न करतात. मध्य-पूर्वेतल्या देशात तेही इस्रायलसारख्या चिमुकल्या हिब्रूभाषिक देशात ही मराठीपण जपण्याची धडपड चकित करून सोडते.
इस्रायलच्या एकूण लोकसंख्येत बेने इस्रायली कसेबसे एक टक्का असावेत; पण भाषेची जपणूक, नाटक-सिनेमाचं वेड, मायबोली, सण साजरे करण्याच्या पद्धती यामुळे त्यांचं वेगळेपण टिकून राहिलंय. बेने इस्रायली लोक शुभकार्याच्या प्रसंगी किंवा कोणतंही चांगलं काम असलं की ‘मलिदा’ करतात. पोहे, साखर, खोबरं, फळांचे काप असं एकत्र करून हा मलिदा तयार केला जातो. घरी किंवा सिनेगॉगमध्ये सर्व नातेवाईक, मित्रांना एकत्र बोलावून प्रार्थनेनंतर प्रसादासारखा मलिदा वाटला जातो. इस्रायलमध्ये गेल्यावरही त्यांनी मलिदा करणं सुरू ठेवलं आहे. इतर कोणत्याही ज्यूंमध्ये हा प्रकार नाही.
‘मायबोली’चेसंपादक नोहा मिसिल आमच्याच बोटीमध्ये होते. मागे त्यांची जेरुसलेममध्ये भेट झाली होती. नोहांना म्हटलं, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हा सगळा खटाटोप कशाला करता?
तर नोहो शांत आवाजात उत्तरले, ‘अरे मराठीच आमची मातृभाषा आहे. रक्तामध्ये भिनलेली भाषा काढून कशी घेता येईल? आज हिंदी, इंग्रजी, हिब्रूभाषा येत असल्या तरी काही दुखलं-खुपलं की ‘आई गं!’च तोंडात येतं.’ ज्यू भारतात कसे आले याबद्दलची प्रसिद्ध गोष्ट नोहा यांनी मला प्रवासात पुन्हा सांगितली. ‘ग्रिकांनी जेरुसलेमवर आक्रमण केल्यावर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी वाट फुटेल तिकडे आणि समुद्र घेऊन जाईल तिकडे ज्यू पळून जाऊ लागले. त्यातले दोन मचवे आपल्या कोकण किनाºयापर्यंत आले’ - नोहा मिसिल सांगत होते. ‘हे मचवे आजच्या खांदेरी-उंदेरीच्या आसपास फुटले असावेत. त्यामुळे बोटीतील बहुतांश लोक मरण पावले. परंतु केवळ सात पुरुष आणि सात स्त्रिया मात्र अलिबागजवळ नवगावच्या किनाºयावर जिवंत उतरले. पाण्यात बुडून मेलेल्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक लोकांनी लाकडं आणि अग्नीची व्यवस्था केल्यावर मात्र त्या १४ लोकांनी खाणाखुणा करत थांबायला सांगितलं आणि मृतदेह पुरण्याची परवानगी मागितली. या लोकांनी तेथेच आश्रय घेतला. त्यांना आॅलिव्हपासून तेल काढता येत होतं. कोकणात आल्यावरही तेल काढण्याचं काम त्यांनी गावकºयांकडे मागितलं. कोकणात त्यांनी खोबरं, शेंगदाणे, तिळाचं तेल काढायला सुरुवात केली. त्यांनी मुखोद्गत असणारे श्लोक आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवायला सुरुवात केली. शबाथच्या ज्यू परंपरेप्रमाणे हे लोक शनिवारी काम बंद ठेवून सुटी घेत. शनिवारच्या सुटीमुळे त्यांना कोकणातल्या लोकांनी शनवार तेली असं नाव देऊन टाकलं. हिंदू तेली सोमवारी सुटी घेत म्हणून त्यांना सोमवार तेली म्हणत.’
ज्यूंची संख्या वाढत गेली आणि ते अलिबागसह उत्तर कोकणात सर्वत्र स्थायिक होऊ लागले. साधारणत: अकराव्या शतकामध्ये डेव्हिड रहाबी अलिबागजवळ आले. काही लोकांच्या मते त्यांचं १५ व्या किंवा १७व्या शतकात येणं झालं. पण ते आले यावर सगळ्यांचं एकमत आहे. रहाबी यांनी झिराडकर, शापूरकर आणि राजापूरकर अशा तीन कुटुंबातल्या एका व्यक्तीला धर्मशिक्षक बनवले आणि त्यानंतर हिब्रू शिक्षणालाही सुरुवात केली. अशाप्रकारे बेने इस्रायलींची त्यांच्या धर्मग्रंथाशी ओळख झाली आणि पुढील सांस्कृतिक, धार्मिक विकासाची वाट खुली झाली. नंतर अलिबाग, मुंबई, पुणे, ठाण्यासह लहान लहान गावांमध्ये सिनेगॉग किंवा प्रार्थनास्थळं बांधण्यात आली. हिब्रूंचं अध्ययनही सुरू झालं. त्यांना बेने इस्रायली असं नावच पडलं. मराठा साम्राज्य, अलिबागचे आंग्रे, ब्रिटिश लष्करात त्यांनी चांगल्या नोकºया मिळवल्या. शिक्षणाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या काळात विविध खात्यांमध्ये कामाची संधीही मिळाली होती.जगभरातले ज्यू जेरुसलेमला पुन्हा जाण्याचं स्वप्न मात्र विसरले नव्हते.
‘पासोव्हर’ या त्यांच्या सणाच्या दिवशी किंवा कोणीही भेटलं की ते ‘शाना हाबाआ बेयेरुशलाईम’ म्हणजे ‘नेक्स्ट इअर इन जेरुसलेम’, असं आपल्या ‘काशीस जावे, नित्य वदावे’ सारखं म्हणत असत. इस्रायल हा स्वतंत्र देश अस्तित्वात आल्यावर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. १९४८नंतर जगभरातले ज्यू इस्रायलमध्ये गोळा होऊ लागल्यावर भारतातले ज्यूसुद्धा तिकडे गेले. मोठ्या अपेक्षेने इस्त्रायलमध्ये गेलेल्या ज्यूंचा सुरुवातीचा काळ मात्र चांगलाच खडतर होता. धर्मग्रंथात वाचलेला दुधा-मधाचा प्रदेश आपल्याला आयता मिळणार नाही, तो संपन्न देश आपल्याला घडवावा लागणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळच्या अडचणी सांगताना हाईम चिंचोलकर म्हणाले, ‘इकडे नोकºया करणाºया लोकांना तिकडे गेल्यावर तशाच नोकºया मिळणं अशक्यच होतं. पण त्यांना रस्ते बांधणी, खड्डे काढण्यासह शेतीची कष्टाचीही कामं करावी लागली. सर्वांना लष्करात सेवा करण्याची सक्तीही होती.
मुंबई-ठाण्यात नोकºया करण्याची सवय असणा-यांना कष्टाची कामं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास देणारी ठरली. दोन हजार वर्षे कोकणात राहिलेल्या लोकांना कोकणच्या आठवणींचा विसर पडत नव्हता.
इस्रायलला निघताना बहुतेकांनी घरंदारं, शेती विकल्यामुळे दु:खंही होत होतंच. मुंबईच्या समुद्राची, लोकांची, सिनेगॉगची आठवणही सतत बरोबर असे. त्यातून हिब्रू येत नसल्यामुळे पदोपदी अडथळे यायचे. मग पहिल्या सहा महिन्यांत सर्वांनी हिब्रू शिकून घेतलं.’बेने इस्रायलींना भेदभावालाही सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या ज्यू असण्यावरही शंका घेतल्या गेल्या होत्या. त्यामध्येच आंदोलनं, निषेध मोर्चे असे उपाय बेने इस्रायलींना करावे लागले होते. काही लोकांना हा ‘कल्चरल शॉक’ अगदीच सहन झाला नव्हता....बोटीत सर्वांना किती सांगू किती नको असं झालं होतं.
अलिबागला हॉटेलात खाताना शिरा-पोह्यांपेक्षा सगळ्यांना ताडगोळ्यांवर ताव मारताना पाहिलं आणि त्यांच्यातला कोकणी माणूस अजूनही तसाच असल्याचं दिसून आलं.
भारतातले, इस्रायल, अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलियातले लोक बेने इस्रायलींच्या भारतातल्या सर्वात जुन्या स्मशानभूमीत नवगावला जमले होते. १९८५ साली या स्मशानामध्ये एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून, ‘जेरुसलेम गेट’ नावाने एक कमानही बांधली आहे. स्मशानभूमीजवळ जाताच सगळ्या पुरुषांच्या डोक्यावर ‘किप्पा’ आल्या, महिलांनी डोक्यावर रुमाल बांधले. पूर्वजांसाठी म्हटली जाणारी ‘कदिश’ ही प्रार्थना करण्यात आली.
शरीरसौष्ठव खेळातील ‘भारत श्री’ हा किताब मिळवणारे विजू पेणकर, अमेरिकेत राहणारे जॉन पेरी, मुंबईचे सुप्रसिद्ध वकील जोनाथन सोलोमन, इतिहास अभ्यासक निस्सिम मोझेस, नोहा मिस्सिल, लेखिका अविवा मिलर अशा जगाच्या कानाकोपºयात राहणा-या बेने इस्रायलींनी पूर्वजांसाठी प्रार्थना केली.
दोन-अडीच हजार वर्षांचा काळ जितका मोठा आहे तितकं मोठं स्थित्यंतरही प्रत्येक गोष्टीत झालं आहे. एकेकाळी जीव वाचवून या जागेवर १४ लोक उतरले होते.आज बेने इस्रायल समुदायाची लोकसंख्या एक लाख २० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. आजही त्यांच्या भावना या मूळभूमीशी गुंतलेल्या आहेत....पुढच्या मकरसंक्रांतीला इथेच येण्याचा संकल्प करणाºया सगळ्या आजी-आजोबांचा पाय मात्र तिथून निघत नव्हता.