- मेघना ढोके
बॉल टू बॉल मॅच पाहूनही दुसर्या दिवशी पुन्हा वर्तमानपत्रातल्या बातम्या थेट स्कोअरबोर्डपर्यंत बारकाईनं वाचण्यात एकेकाळी मजा होती. क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवणारेही अनेकजण होते.कारण काय तर?पुन: प्रत्ययाचा आनंद.त्याशिवाय ओळखीच्याच काय; पण अनोळखी माणसांशी मॅचविषयी गप्पा रंगायच्या. एकेक चेंडू कसा वळला, एकेक शॉट कसा हुकला किंवा स्टेडिअमच्या बाहेर कसा गेला चेंडू, मॅच कुठं फिरली हे सारं रंगवून रंगवून चघळलं जायचं.कारण तेच, पुन: प्रत्ययाचा आनंद.टीव्हीवर सामना ‘लाइव्ह’ पाहूनही पुन्हा ‘हायलाइट्स’ही तन्मयतेनं पाहणार्यांची संख्याही कमी नव्हती. एकेक शॉट, एकेक विकेट, सगळं पुन्हा डोळे भरून पाहून घेतल्यासारखं पाहिलं जायचं, याशिवाय चॅनल्सवरच्या बातम्या, त्यांनी अनेकवार दाखवलेले शॉट्स सगळं पुन्हा पुन्हा पाहण्यात मौज वाटायची.पुन्हा कारण तेच पुन: प्रत्ययाचा आनंद!मात्र हा आनंद सामूहिक असला तरी अत्यंत व्यक्तिगत होता. लोकांनी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट पाहत राहिल्यानं बाजारपेठेची चक्र वेगानं फिरली असं काही कुठल्या मॅचनंतर ऐकलं होतं का? नाही म्हणायला क्रिकेटचं अर्थकारण हे प्रचंड मोठय़ा प्रेक्षकसंख्येभोवती फिरतंच, मात्र मॅचनंतर सामान्य माणसांनी मॅच किंवा मॅचविषयीच्या गोष्टी ‘पाहत राहणं’ हे कित्येकपट मोठय़ा अर्थकारणाचा भाग बनेल असं कुणाला वाटलं होतं?या विश्वचषक स्पर्धेत, विशेषत: भारत-पाकिस्तान मॅचनंतर मात्र तसं झालं. आता जी त्रोटक आकडेवारी समोर येतेय ती एक वेगळीच गोष्ट सांगतेय. पुन: प्रत्ययाच्या आनंदाचीच मात्र त्याचा वाहक ठरला तुमच्या आमच्या हातातला मोबाइल !भारत-पाकिस्तान मॅच झाली. एकतर्फी झाली. पाकिस्तानचा धुव्वा उडाला आणि पाकिस्तानी लोक चिडले. प्रचंड संतापले. आजवर म्हणजे समाजमाध्यमपूर्व काळातही भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत मात दिली आहेच, यंदा सातव्यांदा मात दिली. म्हणजे तसं पाहता फार काही धक्कादायक किंवा अगदीच अनपेक्षित घडलं असं नाही. आपला संघ प्रतिस्पर्धी संघापेक्षा दुबळा आहे, याची जाणीव पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह अगदी आम जनतेलाही होतीच. त्यामुळेच तर पाक पंतप्रधानांनी मॅचपूर्व केलेल्या ट्विटमध्येही शेवटच्या चेंडूपर्यंत लढा असा प्रेरणादायी संदेशही दिला होता. त्यामुळे भारत-पाक दुश्मनी बाजूला ठेवून जरी या सामन्याकडे पाहिलं तरी हे उघड दिसतं की, बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही गोष्टीत भारतीय संघ प्रोफेशनली खेळला आणि सहज जिंकला. पाकिस्तान संघाच्या उणिवा स्पष्ट दिसल्या. तरीही हा पराभव पाकिस्तानी सामान्य माणसाच्या जिव्हारी लागला वगैरे ठीक आहे, तो यापूर्वीही लागत असे आणि पाकिस्तानी चाहते आपलेच टीव्ही फोडत हे सारं आपण ऐकून होतो.मात्र यंदा मॅचनंतर जे घडलं ते समाजमाध्यमांच्या प्राबल्यानं घडलं आणि त्यातून एका भलत्याच गोष्टीनं आकार घेतला. भारतानं मॅच जिंकली असली तरी पाकिस्तानी लोकांनी ट्विटर जिंकलं अशी चर्चा झाली. पाकिस्तान हरल्यानंतर शेकडो लोकांनी शेकडो ट्विट केले, त्यातले काही अत्यंत बोचरे, हसरे, टीकास्पद होते. ते ट्विट लाखोंनी रिट्विट केले. अनेक मिम्स तयार झाल्या, त्या व्हायरल झाल्या. पाकिस्तानी टीम रात्री पिझा-बर्गर खात होती, आम्हाला फसवलं म्हणून रडणार्या एका नौटंकीबाज तरुणासह पाकिस्तानातल्या अनेक सामान्य स्री-पुरुषांनी रडून-चिडून मांडलेल्या मतांचे व्हिडीओही व्हायरल झाले. पाकिस्तानची टीम कशी ‘फालतू’ आहे असं पाकिस्तानीच म्हणत आहे म्हटल्यावर फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतात आणि जगभर हा डिजिटल कण्टेट गरगर फिरला. याशिवाय सरफराजला ‘मोटा-मोटा’ म्हणून कुणी प्रेक्षक चिडवत होता, कुणी घोड्यावरून आला, कुणी रडत होता, रणवीर सिंह विराट कोहलीला मिठी मारत होता, सुनील गावसकरांसह ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ म्हणत नाचत होता, जल्लोष करत होता ते सारे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले. सगळ्यात कळस होता तो पाक कर्णधार सरफराज जांभई देत असल्याचा व्हिडीओ आणि त्याचे फोटो, त्यावर बनलेल्या मिम्स.हे सगळं भारतात इतकं प्रचंड व्हायरल का झालं तर बहुसंख्य लोकांनी ते आपल्या मोबाइलवरून पुढे ढकललं. शक्य तेवढय़ा लोकांना पाठवलं. मॅच जिंकल्याच्या आनंदापेक्षाही पाकिस्तानची जिरली आणि आता पाकिस्तानी लोकच आपल्या संघाला कसे शिवीगाळ करत आहेत हे पाहण्याचा आनंद शेकडोंनी भरभरून लुटला. मॅच जिंकण्याहून मोठा असा हा आनंद असावा अशी शंका यावी इतकं हे प्रकरण प्रचंड व्हायरल झालेलं दिसलं.हे व्हायरल होण्यात पुन: प्रत्ययाचाच आनंद होता का? तर होताच. पण तो फक्त मॅच जिंकल्याचा नव्हता तर आपण ‘वैरी’ समजत असलेल्या देशातील लोकांना कशा वेदना होताहेत त्यांना, ते स्वत:वरच जोक करत अति झालं आणि हसू झालं असं म्हणताहेत हे सारं पाहणं अनेकांना मनोमन सुखावून गेलं. त्यातही एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ गाजला, ती म्हणते, ‘हमारी औकातही नहीं है!’ तो व्हिडीओ तर पाकिस्तानपेक्षा भारतातच जास्त व्हायरल झाला.हा घटनाक्रम काय सांगतो?तो सांगतो आपल्या हातातल्या मोबाइलवर आणि समाजमाध्यमात लोकांनी केलेलं सामूहिक वर्तन, जे वरकरणी व्यक्तिगत वाटत असलं तरी ते सामूहिकच होतं; खेळाला थेट मानवी भावभावना, राग-मत्सर-विशाद आणि पराभवाचा उद्रेक यांच्याशी जोडत होतं. आणि खेळाचा हात सोडून मैदानाबाहेरचा एक नवीन खेळ मांडत होतं. क्रिकेट पाहण्याच्या आनंदाशी याचा काहीच संबंध नव्हता, हा भलताच आनंद क्रिकेटचा मसाला म्हणून व्हायरल झाला. ते व्हायरल होणं डिजिटल जगाच्या पथ्यावर पडलं आणि त्यातून निर्माण आणि व्हायरल झालेला हा ‘कण्टेण्ट’ आर्थिक चक्राला पोषक-पूरक ठरला. डिजिटलच्या जगात ‘ओरिजिनल कण्टेण्ट’ ही ताकद ठरते. कण्टेण्ट इज किंग. भारत-पाकिस्तान मॅच नंतर तर 30 कोटी कण्टेण्टचे तुकडे (पिसेस) हे एकट्या यूसी मोबाइल ब्राउझरवर लोकांनी पाहिले, ढकलले अर्थात कन्झ्युम केले. क्रिकेटचे शॉर्ट व्हिडीओ, मिम्स, जीआयएफ यासह तमाम मसाला मनोरंजन व्हायरल झालं.कोट्यवधी लोकांची ढकलपंची डिजिटलच्या जगात कण्टेण्टचीच नाही तर आर्थिक उलाढालीचीही लाट घेऊन आली. हा देश क्रिकेटवेडा आहेच, तो आता क्रिकेटला चिकटलेला मसालाही उपभोगण्यात आघाडीवर आहे. बार्कची आकडेवारीही तेच सांगते. बार्क म्हणजे ब्रॉडकास्ट ऑर्डिअन्स रिसर्च काउन्सिल. त्यांनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2018 साली भारतात खेळाच्या एकूण प्रेक्षकसंख्येपैकी 93 टक्के प्रेक्षक क्रिकेटचे आहेत. क्रिकेटच्या प्रेक्षकसंख्येत वाढ झालेली दिसते कारण इंग्रजी कॉमेण्ट्री सोडून प्रादेशिक भाषांत कॉमेण्ट्री सुरू झाली. इंग्रजी न समजणार्या वर्गातून वाढलेला हा टक्का विशेषत: टी-20चा प्रेक्षक आहे. क्रिकेटचं ‘कन्झम्पशन’ हे क्रिकेटपलीकडे वाढत चालल्याची ही उदाहरणं आहेत. क्रिकेटला तडका देऊन मनोरंजन आणि चटपटीत मसाला यातून हा नवा प्रेक्षक आणि नवा क्रिकेट मसाला कण्टेण्ट तयार होत आहे. आयसीसीने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार जगभरात क्रिकेटचे 100 कोटी चाहते आहेत तर त्यापैकी 90 टक्के एकट्या भारतीय उपखंडात आहेत.याचा अर्थ एवढाच की, ही प्रचंड मोठी लोकसंख्या आता डिजिटली जो कण्टेण्ट तयार करेल, तो आर्थिक उलाढालीला अधिक पोषक ठरेल आणि त्यातून क्रिकेटचा मसाला अधिकाधिक आपल्या मोबाइलवर येत राहील.पाकिस्तानी फॅनचं रुदन पाहून हसताना आणि ते पुढे ढकलताना नव्या जगाची ही डिजिटल सत्तेची भूक आणि त्याचे परिणाम संदर्भासाठी सोबत असलेले बरे !
meghana.dhoke@lokmat.com(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)