डॉ. संप्रसाद विनोद
अभिजात योगसाधना शिकायला येण्यापूर्वी दिनेशजींनी ‘शांतिमंदिर’विषयी आणि माझ्याविषयी बरीच माहिती घेतली होती. माझ्याकडे कोण येऊन गेले, त्यांना योगाचे काय परिणाम मिळाले, ते टिकाऊ स्वरूपाचे होते की तात्पुरते होते, याची त्यांनी काळजीपूर्वक छाननी केली. पुरेसा विचारविर्मश केला. व्यक्तिगत साहायिकेकडून दूरध्वनीवर वेळ घेतली. अचूक वेळेवर शांतिमंदिरमध्ये आले. आमचे बोलणे झाले, त्या वेळीदेखील त्यांची चिकित्सक वृत्ती लपून राहिली नाही. दिनेशजी हे प्राधान्याने ‘टाइप ए’ व्यक्तित्वाचे किंवा ज्यांच्या मेंदूचा डावा अर्धा भाग हा उजव्या अध्र्या भागापेक्षा अधिक सक्रिय असणार्या व्यक्तींपैकी एक होते. अशा चिकित्सकतेला माझा कधीच आक्षेप नसतो. खरे तर मला अशी चिकित्सकता आवडते, असे म्हणणे जास्त योग्य होईल. त्यामुळे मी अशा प्रवृत्तीला नेहमी प्रोत्साहन देत आलो आहे. माझा असा अनुभव आहे, की चिकित्सक व्यक्तींना त्यांच्या प्रश्नांची तर्कनिष्ठ आणि तर्कशुद्ध उत्तरे मिळाली, तर त्यांच्यासारखी निष्ठावान माणसे दुसरी कुठली नसतात. शिवाय, अशी ‘डोळस निष्ठा’ टिकावू असल्यामुळे ती योगसाधनेसाठी फार उपयुक्त ठरते. एकंदरीत दिनेशजींबरोबरची माझी पहिली भेट खूप चांगली झाली. तेही अगदी मोकळेपणाने बोलले.
दुसर्या दिवसापासून त्यांच्या व्याधींवर - उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर योगाद्वारे उपाययोजना सुरू झाली. त्यांचे दैनंदिन जीवन फारच व्यग्र होते. सकाळी आठपासून संध्याकाळी सहापर्यंत ते त्यांच्या कार्यालयातच असायचे. एका मल्टिनॅशनल कंपनीचे ते एमडी होते. ब्रिटिश सहकार्याने सुरू झालेल्या कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते या कंपनीबरोबर होते. खरे तर त्यांनीच ही कंपनी उभी केली होती. म्हणजे जागा मिळवणे, सगळ्या सरकारी परवानग्या मिळवणे, कर्मचारी निवडणे, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आणि पाच वर्षांत फायदा होईल इथपर्यंत तिला मोठी करणे एवढी प्रचंड मजल त्यांनी मारली होती. कंपनीत कामाला असलेल्या महाराष्ट्रातल्या अनेक होतकरू तरुणांना त्यांनी अगदी हाताला धरून तयार केले. योगाच्या साह्याने त्यांचा रक्तदाब आणि मधुमेह आटोक्यात आल्यानंतर कंपनीचे ब्रिटिश प्रवर्तक आणि इतर अनेक अधिकार्यांना ते मोठय़ा आपुलकीने स्वत:च्या गाडीतून योगसाधनेसाठी घेऊन यायचे. त्यांचे आणि कंपनीचे सगळे अगदी छान चालले होते. अपेक्षेप्रमाणे किंबहुना अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक वेगाने कंपनीची वाढ होत होती. दिनेशजींची कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा, कंपनीचे हितसंबंध जपण्याची क्षमता वादातीत असल्यामुळे हे सगळे शक्य झाले. पण, बदललेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढालींमुळे, कंपनीच्या कार्यक्षेत्रातल्या काही अपरिहार्य कारणांमुळे आणि प्रासंगिक, पण गंभीर स्वरूपाच्या अडचणींमुळे कंपनीचे एक वर्ष अपेक्षेएवढे चांगले गेले नाही. नफ्याचे प्रमाण थोडे घटले. दिनेशजी अतिशय मनापासून प्रयत्न करीत होते. खरे तर त्यांच्या दृष्टीने कंपनी हे त्यांचे ‘अपत्य’च होते. त्यामुळे ते या अपत्याचे सगळे खूप मनापासून करीत होते. समंजस वडील जसे आपल्या मुलाच्या थोड्याशा अपयशाने गडबडून जाऊन एकदम टोकाची भूमिका घेत नाहीत; तसेच दिनेशजींनीदेखील कंपनीविषयी टोकाची भूमिका घेतली नाही.
आपले ‘कंपनी’ नावाचे मूल कशामुळे मागे पडलेय, याचा कसोशीने शोध घेतला आणि ती कारणे दूर करण्याचा मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात थोडीदेखील कसूर केली नाही. कंपनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी जिवाचे रान केले. सहकार्यांबरोबर, वरिष्ठांबरोबर वेळोवेळी चर्चा केल्या. परिस्थितीतून मार्ग काढण्याचा त्यांच्या मदतीने आटोकाट प्रयत्न केला. या अथक प्रयत्नांमुळे पुढल्या वर्षी कंपनीची ‘तब्येत’ थोडी सुधारली; पण पूर्वीसारखे ‘बाळसे’ काही धरले नाही. तसे होणे नक्कीच खूप अवघड होते.
पण, दिनेशजींनी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची कंपनीच्या परदेशस्थ प्रवर्तकांनी पुरेशी दखल घेतली नाही. एका सकाळी अचानक इंग्लंडहून त्यांच्याकडे निरोप आला, की या प्रवर्तकांनी दिनेशजींच्या मदतीसाठी एका सहायक एमडीची नेमणूक केली आहे आणि तो पुढच्या आठवड्यापासून कामावर रुजू होणार आहे. दिनेशजींना या निरोपामागील ‘गर्भित’ अर्थ प्रथम लक्षात आला नाही; पण जेव्हा लक्षात आला, तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले. दिवसभर कामात लक्ष लागले नाही. पुढचा सगळा आठवडा ते योगासाठीदेखील आले नाहीत. तब्येत बरी नसल्याचा ऑफिसमधून फोन आला; पण नेमके काय झालेय, ते काही कळले नाही. नंतर पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयातून फोन आला, की हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलेय. रुग्णालयात भेटायला गेलो. सुरुवातीचा भावनांचा आवेग ओसरल्यानंतर कंपनीने ‘अनसेरेमोनिअसली’ म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता, हीनतेची वागणूक देऊन, नव्या व्यक्तीची नेमणूक कशी केली, याची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली. हा नवीन माणूस आधीपासून दिनेशजींच्या हाताखालीच कामाला होता. त्याला चांगला अनुभव मिळावा, यासाठी दिनेशजींनी त्याला एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आपल्याबरोबर पॅरिसलाही नेले होते. त्याला चांगले तयार करून बढती देण्याचा दिनेशजींचा विचार होता; पण दिनेशजींना किंवा कंपनीतल्या कोणाला जरादेखील कळू न देता, विश्वासात न घेता, परस्पर वरिष्ठांशी संधान साधून त्याने त्याचा स्वार्थ साधला आणि आपला विश्वासघात केला, अशी दिनेशजींची भावना झाली. त्यामुळे ते फार दुखावले गेले. संवेदनशील असल्यामुळे हे सगळे त्यांनी खूप मनाला लावून घेतले. परिणामी, हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आता सगळे चित्र माझ्यापुढे स्पष्ट झाले.
मग काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर ते घरी परतले. योगासाठी शांतिमंदिरमध्ये पुन्हा येऊ लागले. झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्याशी अधिक तपशीलवार बोलणे झाले, चर्चा झाल्या. त्यांचा एक मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला असल्यामुळे आणि दुसरा तिकडे जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या अडचणी खूपच वाढल्या होत्या. सुदैवाने आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्यामुळे ही परिस्थिती हाताळणे त्यांना तेवढे कठीण गेले नाही. त्याचा फारसा ताणही आला नाही. मग त्यांनी दीर्घ मुदतीची रजा घेतली. या काळात त्यांची औषधे चालू राहिली. जोडीला योगोपचारही सुरू होते. घडलेल्या घटनेवर सखोल चिंतन, मनन घडले. या धक्क्यातून सावरायचे कसे आणि तेही संबंधित व्यक्तीविषयी कुठलीही कटुतेची भावना न ठेवता कसे साधायचे, याबाबत माझे दिनेशजींशी विस्ताराने बोलणे झाले. हळूहळू ते या सगळ्या त्रासदायक घटनेतून पूर्णपणे सावरले. रजा संपली. मोठय़ा मनाने त्यांनी नव्याने नेमलेल्या एमडीला - त्यांच्याच ज्युनिअरला सगळे व्यवहार, जबाबदार्या समजावून सांगितल्या. शक्य तेवढे त्याला तयार केले. शांत मनाने आणि निश्चल अंत:करणाने कंपनीचा कायमचा निरोप घेतला.
या अनुभवातून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. डोळे उघडले. पूर्ण जाग आली. नंतर सावधपणे पावले टाकत त्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि पुढल्या चार-पाच वर्षांत आणखी एका मल्टिनॅशनल कंपनीला ‘जन्म’ दिला. या कंपनीचेही खूप प्रेमाने ‘संगोपन’ केले. याही कंपनीचे ते एमडी झाले. ही छान बातमी द्यायला नुकतेच ते पेढे घेऊन आले होते. योगसाधनेमुळे आपल्याला एक ‘जीवनदृष्टी’ मिळाली आणि त्यामुळे या कठीण प्रसंगातून आपण बाहेर पडलो, असे त्यांनी मला या वेळी अगदी आवर्जून सांगितले. ‘एमडी ते एमडी’ प्रवासातून मिळालेला आत्मविश्वास या वेळी त्यांच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता!!
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)