- शुभांगी कात्रेला
प्रकाशाची, उत्साहाची, चैतन्याची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा नुसता सण नाही तर मनातील नकारात्मक वृत्तींना विसरायला लावून जगण्यास प्रोत्साहित करणारा आनंदोत्सवच होय.
पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला त्याच्या श्वासाइतकीच मूलभूत गरज असते ती प्रकाशाची, प्रकाशाच्या धाग्यांशीच त्याचे जीवन बांधलेले असते. माणसाने प्रकाश तर स्वीकारलाच; पण त्याच प्रकाशाला, उत्सवाचे, पूजेचे स्वरूप प्राप्त करून दिले. उजेड आणि अंधार या द्वंद्वामध्ये तो प्रकाशपूजक ठरला. आपल्या जीवनाला व्यापून टाकणा:या उजेडाचे, प्रकाशाचे त्याने स्वागत करून उत्सवाच्या रूपाने दिवाळीसारख्या सणांमध्ये त्याचे रूपांतर केले.
दिवाळी हा भारतीयांचा सर्वात आवडता व आनंददायी सोहळा. खरं तर दिवाळीने उजेडाला एक महान मंगल असे मूल्य दिले आहे. दिवाळीचा सण कुणी झोपडीच्या अंगणात इवलीशी पणती पेटवून, तर कुणी गर्भश्रीमंत हजार दिव्यांची माळ लावून हा सारा प्रकाश आपल्यात सामावून घेत असतो. कुणी रांगोळीचे हजार ठिपके काढून, तर कुणी आकाशदिवे लावून आपल्यातला उजेडच एका अर्थाने व्यक्त करत असतो. असा हा प्रकाशाचा सण आनंदाचा, अभिमानाचा आणि मनाला टवटवीत पालवी देणारा !
दीपावलीचा सण आपल्याबरोबर अनेक सणांना घेऊन येतो. त्यात सारे जण आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघतात. आयुष्यातल्या समस्या, दु:ख, काळजी विसरायला लावतात. मनाला सकारात्मक रीतीने आयुष्याकडे पाहण्याची, आयुष्याला आनंदाने सामोरं जाण्याची प्रेरणा मिळते. दिवाळीत सा:या आसमंतातील अंधकार दूर होतो, तसा आपल्या मनातील अंधकार, निराशा दूर होऊन मनात आनंदाच्या, नवीन विचारांच्या ज्योतील उजळतात. दिवाळी येताना आपल्याबरोबर मानवी संदेशही घेऊन येत असते. फटाक्यांच्या आवाजातही तो प्रत्येकाने ऐकायला हवा. समाजातील अंध-अपंगांना मदतीच्या हाताचीही गरज आहे. तो हात आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाचे दीप पेटवताना आपणही संकल्प केला पाहिजे, की निराशा येणा:या मनाला आशेच्या ओलाव्यानं दूर करून नवीन हिरवळ स्वत:त व समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करीन.