- गौरी पटवर्धनरत्ना आणि सुरेश डोक्याला हात लावून रत्नाच्या घराच्या ओट्यावर बसले होते. दिवाळीची सुटी संपत आली होती. पुढच्या आठवड्यात त्यांची शाळा सुरू होणार होती. ते दोघंही त्यांच्या गावापासून 18 किलोमीटरवर असलेल्या आर्शमशाळेत नववीत शिकत होते. शाळा सुरू झाली की ते तिथेच राहायचे. त्यांच्या शाळेत अशी पहिलीपासून दहावीपर्यंतची मुलं चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आईवडिलांना सोडून तिथेच राहून शिकायची. त्यांच्या आर्शमशाळेतून त्यांना यावर्षी दिवाळीच्या गृहपाठात एक प्रकल्प करून आणायला सांगितला होता. विषय होता, ‘मी यावर्षी दिवाळी कशी साजरी केली?’रत्ना आणि सुरेशच्या प्रकल्पातली सगळ्यात मोठी अडचण ही होती की त्यांनी यावर्षी दिवाळी साजरी केलीच नव्हती. त्यांच्या संपूर्ण गावात कोणीच दिवाळी साजरी केली नव्हती. कारण यावर्षी उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाने त्यांच्या गावातल्या शेतीचं भयंकर नुकसान झालं होतं. त्यांच्या गावात ओला दुष्काळ पडला होता. सगळं पीक जागीच सडून गेलं होतं. काही लोकांनी त्यातल्या त्यात मध्ये ऊन पडलं तेव्हा कापणी केली होती, पण त्यांच्याहीकडे धान्य साठवायला जागा नसल्यामुळे त्यांचं कापलेलं धान्य पावसात खराब झालं होतं. आधीच गरीब असलेल्या त्या छोट्याशा गावातले लोक उरलेलं वर्ष कसं घालवायचं याचा विचार करत होते. रब्बीच्या पेरणीसाठी लोकांकडे पैसे नव्हते, सतत चालू असलेल्या पावसाने आणि ढगाळ हवेमुळे कधी नाही इतके लोक आजारी पडले होते. त्यांना जवळच्या गावातल्या दवाखान्यात न्यायला आणि औषधपाण्याची सोय करायला लोकांवर कर्ज काढायची वेळ आली होती. एरव्ही गणपतीनंतर गायब होणारा पाऊस नवरात्नात हजेरी लावून जायचा; पण यावर्षी मात्न सगळंच तंत्न बिघडलं होतं. अशा परिस्थितीत कसली दिवाळी आणि कसलं काय?लोकांनी पद्धत म्हणून घरोघरी चार पणत्या लावल्या होत्या. पण रत्ना आणि सुरेशने ही पहिलीच दिवाळी बघितली होती, ज्यात संपूर्ण गावात मिळून फक्त एक छोटी फटाक्यांची लड लावली होती. अशा दिवाळीचं काय वर्णन प्रकल्पात लिहावं हेच त्यांना समजत नव्हतं.बराच वेळ विचार करून झाल्यावर शेवटी रत्ना चिडून म्हणाली, ‘मी काय म्हणते, आपण लिहून टाकू प्रकल्पात की आमच्या गावात दिवाळी साजरी करायला पैशे नव्हते.’‘आणि तुला काय वाटलं, आपल्या सरांचा त्यावर इश्वास बसेल? ते राहातात शहरात. त्यांना काय माहीत इथं काय झालंय ते.’‘त्यांना माहिती नसेल तर आपण दाखवू.’ रत्ना म्हणाली.‘कसं काय दाखवणार? त्यांना घेऊन यायचं का आपल्या गावी?’‘कशाला? आपण आपल्या गावची शूटिंग काढून नेऊ.’ रत्ना एकदम उत्साहाने म्हणाली. ‘माझ्या दादाकडे आहे मोबाइल. त्याला सांगू का शाळेत शूटिंग दाखवायपुरता ये म्हणून. तो यील. नायतरी त्याचं कॉलेज तिथूनच पुढे आहे.’‘तो खरंच दील आपल्याला फोन?’‘मंग!’ रत्ना म्हणाली. आणि ते दोघं त्यांच्या प्रकल्पाच्या कामाला लागले. रत्नाच्या भावाने त्या दोघांना फोन तर दिलाच, शिवाय त्यांचा प्रकल्प चांगला होण्यासाठी चार इतर गोष्टीही सांगितल्या. तो एस.वाय. बी. कॉम.ला शिकत असल्यामुळे त्याने मोबाइलवर खूप व्हिडीओज बघितलेले होते. त्यामुळे चांगला प्रकल्प होण्यासाठी काय काय करावं लागेल हे त्याला बर्यापैकी माहिती होतं. शेवटी त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या दोघांनी त्यांच्या प्रकल्पाचं शूटिंग पूर्ण केलं.शाळा सुरू झाली. सरांनी प्रकल्पाबद्दल विचारलं. रत्ना आणि सुरेशने सांगितलं की आमचा प्रकल्प दादाच्या फोनमध्ये आहे. त्याला बोलावून घ्या. हे सांगितल्यावर सरांना त्यांच्या प्रकल्पाबद्दल खूपच उत्सुकता वाटायला लागली होती. त्यांनी दादाला शाळेत बोलवून घेतलं. त्याने शाळेत येऊन त्याच्या फोनमध्ये केलेलं शूटिंग शाळेतल्या कॉम्प्युटरवर कॉपी करून दिलं. सरांनी सगळ्या मुलांना गोळा करून ते शूटिंग बघितलं आणि त्यांना काय बोलावं तेच सुचेना. काय नव्हतं त्या शूटिंगमध्ये.
कुजलेली कणसं होती, पायाला चिखल्या झालेली आजीबाई होती, ओली झालेली आणि न पेटणारी लाकडं होती, सर्दीने बेजार झालेली लहान मुलं होती, धान्याची रिकामी कोठारं होती, बँकेसमोर कर्ज घेण्यासाठी लागलेली रांग होती, नदीला आलेला भयंकर पूर होता आणि भिजून खराब होऊन गेलेला आकाशकंदील होता. सगळ्यात शेवटी रत्नाची कॉमेंट्री होती. ती म्हणाली होती,‘आमच्या शाळेत, पर्यावरण या विषयात आम्हाला पहिलीपासून वातावरणातील बदलाबद्दल शिकवलं. पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, त्यामुळे सगळे ऋतू बदलतायत, कुठे हिमवादळं येतायत असं सगळं शिकवलं होतं; पण आम्हाला कधी त्याचा अर्थ नीट समजला नाही. आम्हाला वाटायचं की समुद्राची पातळी वाढली तर मुंबई बुडेल, आमच्या गावाला काय होणारे? पण असं नसतं. आमच्या गावी कधीच दिवाळीत असा पाऊस पडला नव्हता, तो यावर्षी पडला. सगळ्या गावाचं पीक वाहून गेलं. वातावरणातील बदलाचा पहिला धक्का आमच्या गावाला बसलाय. यावर्षीची दिवाळी आम्ही साजरी करू शकलो नाही. पण या दिवाळीत आम्ही ठरवलंय, की इथून पुढे कुठल्याच दिवाळीत पाऊस पडू नये यासाठी आम्ही आत्तापासून प्रयत्न करू. आपलं पर्यावरण, आपली पृथ्वी वाचवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू. कारण पृथ्वी वाचली तरच आपण वाचू.’सरांनी त्यांचं शाळेत तर कौतुक केलंच, पण ते सगळे व्हिडीओ एडिट करून त्यांनी ते समाजमाध्यमांवर टाकले. तो व्हिडीओ हजारो लोकांनी बघितला आणि शेवटी तो व्हिडीओ सरकार दरबारी पोहोचून त्या गावातली परिस्थिती सरकारला समजली. रत्ना आणि सुरेशच्या प्रकल्पामुळे दोन गोष्टी झाल्या. गावाला आत्ता गरज असताना मदत मिळाली आणि पुन्हा अशी मदत मागायची वेळ येऊ नये म्हणून गावकर्यांनी त्यांच्या परीने पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संकल्प सोडला.lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)