आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्यांना नेहमीच खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे ज्यांची स्मरणशक्ती खूप काही चांगली नाही, सारखं विसरायला होतं, अशांना वाटतं की आपल्याला फार काही आठवत नाही, म्हणजे आपल्यात काही तरी दोष आहे. काय करावं म्हणजे आपली स्मरणशक्ती तल्लख होईल?
स्मरणशक्ती चांगली असणं हे चांगलंच असतं. पण आपल्यासाठी सगळ्या आठवणी मेंदूत ठेवणं शक्य नाही, हे आपल्या शरीरालाही माहीत असतं. म्हणून तर जन्मापासूनची प्रत्येक आठवण राहत नाही.
दिवसभरात अनेक प्रसंग घडतात. त्यातले जास्तीत जास्त प्रसंग विसरले जातात. रस्त्यावरून जाताना जे काही दिसतं, ते लगेचच विसरलं जातं. कारण ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते.
रात्रीच्या झोपेत मेंदू दिवसभराच्या घटनांचे वर्गीकरण करायला घेतो. ज्या घटना पुढच्या काळात आवश्यक नाहीत असं वाटतं त्या सर्व डिलिट होतात. त्याचप्रमाणे ज्या घटना पुढच्या काळात गरजेच्या असू शकतात, त्या सर्व आठवणी मेंदूत शिल्लक राहतात. कोणत्या आठवणी ठेवायच्या आणि कोणत्या आठवणी आधी पुसट आणि मग डिलिट करायच्या, हे मेंदू ठरवतो.
त्यामुळे आजच्या दिवसात समजा आपण १६ तास जागृतावस्थेत आहोत, त्या कालावधीतल्या किती आठवणी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी – तिसऱ्या दिवशी आठवतात? असे आपण जगलेल्या आयुष्यातील रोजचे दिवस बघितले तर एकूण किती अशा आठवणी आपल्याकडे असतात? खरं सांगायचं तर एकूण जगलेल्या आयुष्यातली फारच थोड्या, पण महत्वाच्या, नेमक्या आठवणी स्मरण केंद्रात असतात. या आठवणी आनंदाच्या असतात, दु:खांच्या, अपमानाच्या, कौतुकाच्या, मजेच्या असतात. तशाच कंटाळ्याच्या सुद्धा असतात.
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक एक घटना असते. त्या सर्व लक्षात ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक आठवण लक्षात ठेवणं हे मेंदूच्या दृष्टीने अवघड आहे आणि तसं अनावश्यकही. कारण त्या घटना तितक्या गरजेच्या नाहीत. म्हणून मेंदूने त्या डिलिट केल्या आहेत.
- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com