- सुजाता साळवी (लेखिका आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत)
वर्ष अखेर संपत आले आहे. या वर्षातील अनेक आव्हाने, महामारी, आर्थिक मंदीने ग्रासलेल्या एका दुःखद वर्षानंतर अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या 10 महिन्यांच्या कालावधीचे काहींनी अचूक नियोजन केले तर काहींना अजूनही या परिस्थितीशी जुळवून घेता आलेले नाही. आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी सर्वांनाच आवडेल. परंतु आजच्या हा व्यस्त जीवनशैलीमुळे हे अशक्य झाले आहे. प्रत्येकाने वेळेचे महत्त्व जाणून वेळेचे भान पाळलेच पाहिजे. स्वत:साठी पुरेसा वेळ देणे हीदेखील काळाची गरज ठरली आहे. नेहमीच घड्याळ्याच्या काट्यांबरोबर धावताना कधीतरी थांबून आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देत आहोत का हे नक्की विचारा, आपण आहोत म्हणून हे जग आहे याचा विसर पडू देऊ नका.
दिवसातून किमान एक तास जरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकत असाल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हालाच होणार आहे. मी गेल्या काही काळापासून याचा सराव करत आहे. वयाच्या २० वर्षापासून मी दिवसातील किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवते. हा संपुर्ण वेळ फक्त माझ्यासाठी असल्याने त्यातून मिळणारा आनंद मला स्वतःला उपभोगता येतो. सुरुवातीला महाविद्यालयीन शैक्षणिक, करिअरकडे फोकस करणे अशा कारणांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते पण त्यानंतर मी मात्र स्वतःला पुरेसा वेळ देण्याचा संकल्पच केला होता. आता मी 30च्या घरात पोहोचली आणि एका खोडकर बाळाची आईदेखील आहे. आणि संसारातील ही आव्हानं पेलताना अनेकदा मला स्वतःसाठी वेळ देणे शक्यच होत नाही. काहींना स्वतःसाठी वेळ देणे हे स्वार्थी किंवा मूर्ख कृत्य वाटू शकते परंतु ज्यांनी वेळेचे अचूक नियोजन आखले आहे त्यांना मात्र याचे महत्त्व नक्कीच कळू शकते.
जेव्हापासून मी स्वतःसाठी वेळ राखून ठेवण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र मला माझी खरी ओळख पटली. मला माझे सामर्थ्य समजले. एक दिवस तसेच एका आठवड्यासाठी मी काही मिनिटे निश्चित केली आणि तेवढा वेळ स्वतःसाठी राखून ठेवण्याचा मी निश्चय केला. यामधून प्रत्येक वेळी मला एक वेगळाच आनंद मिळाला, ज्यामुळे दिवसेंदिवस माझे मनोबल वाढले. या सर्व सकारात्मक परिणामांमुळे मला आता बर्याच वर्षांपासून हा वेळ राखून ठेवणे भाग पाडले आहे. प्रत्येकवेळी मला यातून सकारात्मक उर्जा मिळते. स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवावा यासाठी काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगते. आदल्या रात्री उद्याच्या दिवसाची योजना आखली पाहिजे, झोपण्यापूर्वी मी काय काय गोष्टी केल्या आहे आणि कोणत्या गोष्टी करणे शिल्लक आहे याचे गणित आपल्या डोक्यात मांडते. त्यानंतर दुसर्या दिवशी करता येणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करते. जेणेकरून सर्व काही सुरळीतपणे सुरु राहते आणि या साऱ्या नियोजनातूनच मी मला स्वतःसाठी वेळ कसा राखून ठेवता येईल याचे नियोजन आखून तसा तासाभराचा वेळ शोधून ठेवते. सहसा दुपारची वेळ असते जी मला अनुकूल असते. हा एक तास मला स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यास आणि छंद जोपासण्याकरिता देता येता. मी या वेळेत मला आवडणारे लेखन अथवा वाचन करते तुम्ही यावेळात तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता. हा वेळ मी केवळ स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींकरिता खर्च करते.
काही वेळेस मी वॉर्डरोब व्यवस्थितशीररित्या रचण्यात घालवते, जेणेकरुन अस्ताव्यस्थपणामुळे मला कंटाळवाणं वाटणार नाही. मी काही वेळेस नेल आर्ट करते, डोळे अथवा त्वचेची काळजी घेण्याच्या उद्देशाने या मी वेळेचा सदुपयोग करते. काहीवेळा मी काही व्हिडिओज किंवा नेटफ्लिक्स देखील पाहते. एखादी रोमँटिक कादंबरी वाचणे मला खूपच आवडते. तर काही वेळेस पॉवर नॅप घेते आणि दिवसभरातील तणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. असे बरेच इतर मार्ग आहेत ज्यात आपण हा एक तासाचा दर्जेदार वेळ आपल्या स्वतःसोबत घालवू शकतो. या लहान लहान गोष्टी आपल्या आपल्यासाठी बरेच काही साध्य करण्यात मदत करते. मला आशा आहे की आपण या नवीन वर्षातील रिझोल्यूशनसाठी या पर्यायाचा नक्की वापर कराल. या मी टाईममध्ये स्वतःचं परीक्षण करा, आपण कुठं कमी पडतोय का, आपण काय चांगलं करतोय आणि आणखी काय चांगलं करू शकतोय याची जाणीव आपल्याला या वेळी नक्कीच होईल.