- अरुणा ढेरेमाझे भाषाशास्राचे एक शिक्षक होते. त्यांच्या हातात ते शिकवत असलेल्या भाषाशास्राची बरीच जुनी पोथी असावी तशी पानं असायची. ते शिकवत असताना मनात काही काही शंका यायच्या, प्रश्न यायचे; पण त्यांच्याशी चर्चा करणं ही गोष्ट अवघड असायची. मग मी अशोक केळकर आणि त्यांच्यासारख्या विद्वान लोकांकडून माझ्या शंका फेडून घ्यायचे. त्या चर्चांमधून नवं समजलेलं काही लेखी पेपरमध्ये लिहिलं जायचं. ते तपासून येताना त्यावर आमच्या ‘त्या’ शिक्षकांनी अनेक ठिकाणी लाल रेघा मारलेल्या असायच्या आणि लिहिलेलं असायचं, ‘याची जरुरी नाही.’- माझ्या सन्मान-सत्कारांच्या संदर्भात माझ्या मनात अगदी हीच भावना आहे : ‘याची जरुरी नाही !’संमेलनाचं अध्यक्षपद माझ्याकडे अचानक आलं. मी माझ्या कामात गुरफटलेली असताना अनपेक्षितपणे हा सन्मान वाट्याला आला आणि चारदा नम्रपणे नाही म्हणत मी अखेर तो स्वीकारला. मला सांगण्यात आलं, निवडणुकीच्या राजकारणामुळं अनेक थोर साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदापासून दूर राहिले. आपण त्यांचा सन्मान करू शकलो नाही. निवडणूक पद्धत बदलल्यामुळं अनेकांना सन्मानानं इथं येता येणार आहे, ही ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही नाही म्हणालात तर एकमतानं होत असलेल्या या प्रक्रि येला खीळ बसेल. आणि मी या सगळ्या बदलाला, गढूळ होत गेलेल्या प्रक्रि येला नितळ करण्यासाठीचं एक निमित्त झाले. त्यामुळं हा सन्मान नव्हे एक जबाबदारी म्हणून मी हे स्वीकारते आहे असं मी म्हटलं.निमित्त कोणतंही आणि कोणाचंही का असेना, वाङ्मयाचं क्षेत्र पुन्हा एकदा नव्या उत्साहानं भरून जावं हे आपल्याला सगळ्यांना हवं आहे. प्रत्येक जाणत्या व्यक्तीला बोचणारा सध्याचा कळीचा प्रश्न आहे तो वाचन संस्कृतीचा ! आजूबाजूला नव्यानव्याने येत चाललेल्या असंख्य गलबल्यांमध्ये गुंतण्याचा मोह पडत असल्याने माणसं वाचनापासून, पुस्तकांपासून दुरावत आहेत, असं सध्या अनेकांना वाटतं. माझ्या मनाशी ही काळजी फारशी येत नाही. वाचन उरलं नाही, हे खरं नाही. प्रत्येक व्यक्तीला तिच्या तिच्या वकुबाप्रमाणे भूक आहे. आस आहेच. ज्यावेळेला खरोखरच कसदार, उत्तम असं समोर येतं तेव्हा ते हवं असतं माणसांना याचा प्रत्यय अलीकडच्या काळात अनेकदा आलाच आहे की आपल्याला.मला काळजी वाटते ती याहून अधिक काचणाऱ्या प्रश्नांची. आपल्या आधीच्या कित्येकांनी आयुष्यं खर्ची घालून शोधून आणलेलं, प्राणपणाने जतन केलेलं ज्ञान, त्यांनी एकत्र करून आपल्या हाती ठेवलेला वसा कसा पुढे नेणार आहोत आपण?वेगवेगळ्या झेंड्यांची अस्मिता वाढत चालल्यामुळे प्रत्येक गट विरोधी गटाचा कडवेपणानं प्रतिकार करतो आणि नाराज असतो. एकेक माणूस डोंगराएवढं काम करत पुढे जातो. ते काम विसरून आपण पुढे चालत राहातो. या अशा दूषित वर्तमान वातावरणात कलाकृतींचं आणि त्यातील अर्थांचं खोल तळं, भारतीय ज्ञान आपण पुढे कसं नेणार आहोत?राहुल सांकृत्यायन यांचं उदाहरण आठवतं. त्यांचं काम पाहून वाटतं की, वेडा होता हा माणूस; पण खरे झपाटलेले लोक वेडेच असतात. वेड लागल्याशिवाय मोठी कामं हातून होत नाहीत, आणि त्यापायी लौकिक गोष्टींचा विचार करत नाहीत ही माणसं ! माझ्या वडिलांनाही पुस्तकं गोळा करण्याचं वेड, नव्हे व्यसन होतं.सांकृत्यायन तर मला एक चमत्कार वाटतात. केदार पांडे नावाचा आजमगडचा शेतकरी कुटुंबातला हा माणूस. त्याच्या रक्तातच भ्रमंती, भटकंती होती. स्थिर नव्हताच तो. नवव्या वर्षी पळाला, परत आला. पुन्हा चौदाव्या वर्षी पळाला, परत आला. मग सतराव्या वर्षी पळाला तो परत आलाच नाही. त्यावेळी तो निघाला तो चालतच सुटला; बनारस, हरिद्वार, गंगोत्री, जमुनोत्री असा. वाटेत जे जे मिळेल ते तो वाचत गेला. इतकं वाचलं त्या माणसानं, इतक्या नाना प्रकारचे विचारप्रवाह बघितलेले आहे, पचवले. इस्लाम धर्मावर लिहिलं. ख्रिश्चन धर्मावर लिहिलं. दर्शन तत्त्वज्ञानसारख्या विषयावर साडेआठशे पानांचा महाग्रंथ लिहिला. त्यामध्ये या तिन्ही धर्माचा तौलनिक विश्लेषणात्मक विचार लिहिला. आयुष्याच्या उत्तरार्धात सांकृत्यायन कडवे मार्क्सवादी झाले, त्यावरची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांची बहात्तर पुस्तकं ही ललितेतर आहेत. पंचावन्न पुस्तकं ही कथा, कादंबºया, चरित्रं, प्रवासवर्णनं अशी. १८९३ सालचा त्यांचा जन्म आहे. त्र्याहत्तर वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालेलं. त्यात ते तिबेटमध्ये तीन वेळा गेले. सोळाशेपेक्षा जास्त हस्तलिखित पोथ्या त्यांनी हुडकल्या, वाचवल्या आणि खेचरांच्या पाठीवर लादून भारतात आणल्या. १३० पेक्षा अधिक दुर्मीळ चित्रं आणली. आयुष्य खर्चून जमवलेली ग्रंथ आणि चित्रांची ही सगळी संपत्ती नंतर त्यांनी पाटण्याच्या संग्रहालयाला दिली. स्मृतिभ्रंशानं ते गेले. पण त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात कामाचा इतका डोंगर उचललाय या माणसानं ! हे सगळं बघताना आश्चर्य असं वाटतं की मध्य भारताचा इतिहास, खरं म्हणजे मध्य आशियाचाही इतिहास त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्यासमोर आणलेला आहे की चकित व्हावं. त्यांची पुरातत्त्वावरची, लोकसाहित्यावरची पुस्तकं आहेत. नाना विषयांना स्पर्श केलाय नि इतकं मोठं काम केलंय...असा एकच माणूस मी उदाहरणादाखल सांगतेय; पण त्या जोडीने इतके वेगवेगळे विद्वान समोर येतात, नि प्रश्न पडतो की यांनी केलेल्या कामांचं आपण काय केलं?आज नव्याने संशोधनाच्या क्षेत्रात येणाºया माणसांच्यासमोर ही आव्हानं आहेत की, आपण यांच्या कामाचं काय करणार आहोत नि ते डोंगराएवढं काम कसं पुढे घेऊन जाणार आहोत? संशोधनक्षेत्रातील सृजनशीलतेची गजबज हे ज्ञान संस्कृतीचं, सांस्कृतिक समृद्धीचं लक्षण असतं. ना ना प्रकारची, ना ना पातळ्यांवरची कामं तरुण संशोधक करताहेत हे चित्रच फार आशादायी, उत्साहवर्धक असतं.***मी फार छोट्या क्षेत्रामध्ये काम करणारी आहे. जो ‘आलोक’ मला मिळाला तो घरातून... ग्रंथसंग्रह अफाट होता तिथं; पण तो कसा वापरावा याची दृष्टी अण्णांची होती. मी कविता करते म्हटल्यावर घरात संत-पंतांची कविता तर होतीच; पण माझ्या वाढदिवशी नामदेव ढसाळांचं, ग्रेस, अरुण कोलटकर, मर्ढेकर यांचं पुस्तक आवर्जून माझ्या हातात देण्यात आलं. हे खूप महत्त्वाचं आहे. प्राचीनाशी नवतेचा सांधा कसा जुळतो हे मला आपोआप कळत गेलं. एक मोठा पैस खुला झाला.कवितेच्या बाबतीत तर वाचत गेल्यामुळं माझ्या लक्षात आलं की तिच्यात रूढार्थानं नवं आणि जुनं असं काही नसतं. ‘मीच मला व्यालो, आपुल्याच पोटी आलो’ असं म्हणणारे तुकाराम हे पाचशे-सातशे वर्ष जुने असू शकत नाहीत. ज्ञानेश्वर ज्यावेळेला एखादं जुनंच संस्कृत सुभाषित अनुवादरूपानं समोर ठेवतात...- जसं, ‘भुंगा एखादं कठीण असं लाकूड पोखरतो; पण तोच भुंगा जेव्हा कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो त्यावेळी त्या पाकळ्या कुरतडून बाहेर नाही येऊ शकत. चंद्रविकासी कमळ पहाटे मिटतं आणि सूर्यविकासी कमळ हे संध्याकाळी मिटतं. मधाच्या लोभाने भुंगा फुलामध्ये उतरतो आणि नंतर फूल मिटणार हे न कळल्यामुळं अडकून पडतो.’- ज्ञानेश्वरांनी आयुष्याशी नि प्रेमाशी जोडून हा श्लोक इतका मोठा केला की ते नुसतं भाषांतर राहिलं नाही. ही भावना माझ्यापर्यंत आजची कविता म्हणून पोहोचते, आणि मग ज्ञानेश्वर सातशे वर्ष जुने नाही वाटत !एखादी जनी म्हणते, ‘देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते’, शेवट करताना म्हणते, ‘विठा म्हणे जनाबाई, भरूनी उरले अंतर्बाही.’...‘भरूनी उरले’ हा शब्दच माझ्यासाठी मोठा होत जातो. हे सत्त्वाचं बोलणं माझ्यासाठी खूप मोठं असतं. माझ्यासारख्या आजच्या बाईलाही हे महत्त्वाचं वाटतं.ज्ञानाच्या जुन्या वारशाचा सांधा आजच्या जगण्याशी कसा जोडून घेता येईल यासाठी सजग असायला हवं. तिथं कस लागतो. आणि या ज्ञानासाठी अतृप्तीचा शाप कायम हवा असतो.(९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाल्याबद्दल डॉ.अरुणा ढेरे यांचा ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ संस्थेच्या व्यासपीठावरून सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ.ढेरे यांनी व्यक्त केलेले मनोगत संक्षिप्त स्वरूपात.)शब्दांकन : सोनाली नवांगुळ
भरुनी उरले- ज्ञानाच्या समृद्ध वारशाविषयी सांगताहेत अरुणा ढेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 6:03 AM
ज्ञानाच्या जुन्या वारशाचा सांधा आजच्या जगण्याशी कसा जोडून घेता येईल, यासाठी सजग असायला हवं. तिथं कस लागतो. - आणि या ज्ञानासाठी अतृप्तीचा शाप कायम हवा असतो !
ठळक मुद्देआपल्या आधीच्या कित्येकांनी आयुष्यं खर्ची घालून शोधून आणलेलं, प्राणपणाने जतन केलेलं ज्ञान, त्यांनी एकत्र करून आपल्या हाती ठेवलेला वसा कसा पुढे नेणार आहोत आपण?