- डॉ. जनार्दन वाघमारे
महात्मा जोतिराव फुल्यांचा वारसा चालवणारा सत्यशोधक म्हणून मी डॉ. बाबा आढावांकडे पाहतो. समाज परिवर्तनाच्या कार्यातच त्यांनी आपली हयात घालवली आहे. समाजातला शेवटचा माणूस हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल, यासाठीच त्यांचा संघर्ष चालू आहे. हमाल पंचायतीची स्थापना त्यांनी त्यासाठीच केली. तसेच ‘कष्टाची भाकर’ हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ते राबवीत आहेत. स्वच्छ, स्वस्त, ताजा व सकस आहार ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ते पुण्यात गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून गोरगरिबांना देत आहेत. त्याच्या नऊ शाखा पुणे शहरात आहेत. शहरात फिरती गाडीदेखील आहे.डॉ. बाबा आढावांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे ‘हमाल पंचायत’ची निर्मिती. पाठीवर ओझी वाहणार्या हमालांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांच्या र्शमाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. गुलटेकडी येथे त्यांनी उभी केलेली हमाल पंचायतीची भव्य वास्तू त्याची साक्ष आहे. ही संस्था हमालांनीच चालवायचे धाडस केले ते डॉ. बाबा आढावांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळेच. हे ‘हमाल भवन’ समाज परिवर्तनाचे केंद्र म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहे. या इमारतीमध्ये किती तरी चर्चासत्रे बाबा आढावांनी आयोजित केली. बर्याच चर्चासत्रांमध्ये मी स्वत: भाग घेतला आहे. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’च्या बैठकाही तेथे आयोजित केल्या जात होत्या. त्या बैठकांमध्येही मी सहभागी झालेलो आहे.डॉ. बाबा आढाव हे विचाराने आणि आचाराने समाजवादी आहेत. समाजवाद हा समता या तत्वावर आधारलेला असतो. समाजवादी पक्षाशीही त्यांचा संबंध होता. पण त्यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले. समाजसेवेचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला असता तर पैसा व प्रतिष्ठा या दोन्हीही गोष्टी त्यांना मिळाल्या असत्या. पण त्यांना तोही मोह झाला नाही. मळलेल्या वाटेवर चालायचे नाही, हे त्यांनी ठरवले होते. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे अशा व्यक्तींशी त्यांचा संबंध होता. एस.एम.जोशी हे त्यांचे मार्गदर्शक. विषमता निर्मूलन समितीचे कार्य त्यांनी एस.एम.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.डॉ. बाबा आढाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित झाले ते त्यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ या अभिनव चळवळीमुळे. अलीकडच्या काळातील ही महत्वाची चळवळ. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. अस्पृश्यता हा हिंदू समाजावरचा कलंक होता व आहे. तो पुसण्यासाठी त्यांनी ही चळवळ हाती घेतली. सत्यशोधकांच्या चळवळीच्याच प्रेरणा त्यामागे होत्या. राज्य घटनेने कायद्याच्या दृष्टीने अस्पृश्यता नामशेष केली असली तरी प्रत्यक्षात तिचे अस्तित्व संपले नव्हते. गाव एक, पण पाणवठे अनेक अशी प्रत्येक गावची अवस्था होती. जातीपातींनी चिरफाळलेला समाज एकसंध करण्याचा तो प्रय} होता. स्पृश्य आणि अस्पृश्य समाजांना एकत्रित आणण्यासाठीचा हा प्रय} आणि प्रयोग होता. ही चळवळ राबवीत असताना त्यांना जे अनुभव आले, त्याविषयी ते साधना साप्ताहिकात लिहीत होते. त्यांच्या लेखांनी या चळवळीत प्रेरकाचे काम केले.साठ व सत्तरच्या दशकातील ह्या चळवळीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. पण ही चळवळ शेवटी पाण्यावरची रेघ ठरली. काही काळातच ती विरली व लुप्त झाली.
डॉ. बाबा आढावांच्या या चळवळीचे मलाही आकर्षण होते. या चळवळीच्या काळातच त्यांच्याशी माझा परिचय झाला होता. त्यांची ही चळवळ लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा प्राचार्य असताना आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) माध्यमातून लातूर परिसरामध्ये चालवत होतो. दोन-तीन गावांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मारही खावा लागला होता. या चळवळीचे वेगवेगळे अंग असू शकतात. भूकंपग्रस्त भागात जातींच्या भिंती नसलेले एक गाव आम्ही उभे केले आहे. ते ह्या चळवळीचाचा भाग आहे.जिथे कुठे अन्याय दिसेल, तिथे बाबा आढाव धावून जात होते. 1971-72 मधली ती घटना असावी. लातूरपासून नऊ-दहा किलोमीटरच्या अंतरावर भुसणी (ता.औसा, जि.लातूर) या गावी एका व्यक्तीचा खून झाला. खून करणारा धरदांडगा होता. लैंगिक छळातून हे खून प्रकरण घडले होते. या दुर्दैवी घटनेची बातमी ऐकून डॉ. बाबा आढाव तिथे धावून गेले. त्यांच्याबरोबर प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर व डॉ. अनिल अवचट हेही होते. बाबा आढावांचे मी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये व्याख्यान ठेवले. त्यांच्याबरोबर विजय तेंडुलकर व अनिल अवचट यांनीही आपले विचार मांडले. ‘खेड्यापाड्यातून गरीब माणसांवर होणारा अन्याय’, या विषयावरच ते याप्रसंगी बोलले. डॉ. बाबा आढावांचा आणि माझा दाट परिचय या घटनेतूनच झाला. पुढे परिचयाचे रूपांतर मैत्रीत झाले. ते ज्या-ज्या वेळी लातूरला येत त्या त्या वेळी ते हमखास मला भेटायचेच. त्यांच्या बर्याच कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होत असे. राजर्षी शाहू महाविद्यालयाला आम्ही समाज प्रबोधनाचे केंद्र बनविले होते.डॉ. बाबा आढावांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. जोगतिणीच्या पुनर्वसनाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. माणुसकीला काळिमा फासणारी जोगतिणीची प्रथा नामशेष करण्यासाठी त्यांनी खूप प्रय} केले आहेत. धर्माच्या नावावर अशा दुष्ट प्रथा निर्माण झाल्याने त्याची मुळे अंधर्शद्धेमध्ये आहेत. देवदासींची प्रथा संपवण्यासाठी बाबा आढावांनी फार मोठा लढा दिला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा प्रदीर्घकाळ चालला. त्या लढय़ात बाबा आढावांचा सक्रीय सहभाग होता. अभूतपूर्व चिकाटीने तो लढवला गेला. महाराष्ट्रातील पुरोगाम्यांसमोरचे ते एक फार मोठे आव्हान होते. हा लढा केवळ दलितांचा नव्हता. तो समाज परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या अस्मितेचा लढा होता. त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराची मागणी उचलून धरली आणि त्याची घोषणा केली. त्यावेळी मराठवाड्यात जाळपोळ झाली. दलितांची घरे जाळण्यात आली. पोचीराम कांबळे नावाच्या तरुणाचा खून झाला. परिस्थिती चिघळली. दलित-दलितांमध्ये खाई निर्माण झाली. विरोधकांनी बर्याच गैरसमजुती पसरवल्या. नामांतराचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला. तो लवकर सुटावा म्हणून नागपूर ते मुंबई असा ‘लाँगमार्च’ काढण्यात आला. अमेरिकेत डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांनी निग्रोंच्या नागरी हक्कांसाठी काढलेल्या लाँगमार्चची माठवण करून देणारा हा लाँमगार्च होता. ही अभूतपूर्व घटना होती. नामांतराच्या लढय़ातील अनेकांना कारागुहात डांबून ठेवण्यात आले. त्यात बाबा आढावही होते.या लढय़ाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरला तीन दिवसीय विषमता निर्मूलन परिषद आयोजित केली होती. या परिषदेची सर्व जबाबदारी बाबांनी माझ्यावर सोपविली होती. परिषदेचे उद्घाटन प्रा.गं.बा.सरदार यांनी केले होते. परिषदेत महाराष्ट्रातील दोनशे कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. प्रा.ए.बी.शाह, विनायकराव कुलकर्णी, रा.प.नेने, पुष्पा भावे, कुमार शिराळकर आदी मंडळी परिषदेस आली होती. प्राचार्य म.भि.चिटणीस, बापूसाहेब काळदाते, उद्धवराव पाटील, प्राचार्य ना.य.डोळे ही मराठवाड्यातील मंडळीही सहभागी झाली होती. प्राचार्य नरहर कुरुंदकरही परिषदेला उपस्थित होते. त्यांचा नामांतराला विरोध होता आणि म्हणून नामांतरवाद्यांचा त्यांच्यावर प्रचंड रोष हाता. तरीपण ते आमच्या निमंत्रणावरून परिषदेत उपस्थित राहिले. या तीन दिवसांमध्ये निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा झाल्या. विषमतेच्या निरनिराळ्या अंगांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यात महिलांचे प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, भटके-विमुक्तांचे प्रश्न असे निरनिराळे प्रश्न चर्चिले गेले. या परिषदेच्या आयोजनामध्ये आम्हाला बाबा आढावांचे मार्गदर्शन लाभले होते. परिषदेची सांगता आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याशी झाली. नामांतराला पाठिंबा दर्शविण्यात आला.या परिषदेनंतर असा विचार पुढे आला की महाराष्ट्रात ठिकठिकाणी काम करणार्या विषमता निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना थोडीबहुत आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. हा विचार सर्वांनी उचलून धरला. त्याची परिणती ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारण्यात झाली. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या नावाने एका ट्रस्टची नोंदणी करण्यात आली. त्यावर बाबा आढावांच्या समवेत र्शीराम लागू, पुष्पा भावे, नरेंद्र दाभोलकर इत्यादी मंडळी होती. ट्रस्टच्या बैठकांना मलाही निमंत्रित करण्यात आले होते. अनेकांनी देणग्या दिल्या. ‘लग्नाची बेडी’ हे आचार्य अत्रे यांचे नाटक बसवण्यात आले होते. त्यात र्शीराम लागू, निळू फुले आदींनी भूमिका केल्या होत्या. त्याचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग झाले. तिकिट विक्रीतून पैसा जमविण्यात आला. लातुरातही त्याचा प्रयोग झाला. त्याची जबाबदारी बाबा आढावांनी माझ्यावर टाकली होती. शहरात फिरून मी व माझ्या सहकार्यांनी तिकिट विक्री केली. बराच निधी आम्ही जमवला. नाटकाच्या मध्यंतरी मी तो कलाकारांकडे सोपवला. आम्हाला बाबा आढावांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.डॉ. बाबा आढावांनी महाराष्ट्रातील प्रगतीशील कार्यकर्त्यांना व विचारवंतांना पुरोगामी सत्यशोधक पत्रिकेच्या रूपाने एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. गेल्या 45 वर्षांपासून ही पत्रिका नियमितपणे प्रकाशित होत आहे. बाबांनी लिहिलेले संपादकीय प्रासंगिक विषयांवरचे असले तरी ते विचार-प्रवर्तक असतात. त्यांनी गतकाळात होऊन गेलेल्या सत्यशोधक चळवळींशी संबंधित व्यक्तींच्या विचारांचा व कार्याचा वाचकांना परिचय करून दिला आहे.अलीकडे डॉ. बाबा आढावांनी असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे प्रकर्षाने लक्ष दिलेले आहे. संघटित कामगारांच्या संघटना आहेत, ते शासनावर दबाव आणून आपले प्रश्न सोडवून घेतात. त्यांच्या हातात एकीचे शस्त्र असते. त्यांना प्रभावी नेतृत्वही लाभलेले असते. म्हणून त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. पण असंघटित कामगार विखूरलेले असतात. म्हणूनच ते असंघटित असतात. त्यांना नेतृत्व लाभलेले नसते आणि म्हणून त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. बाबा आढावांनी अशा असंघटित कामगारांना सर्मथ नेतृत्व देण्याचा प्रय} केला आहे. केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी कायदा पास केला आहे. तो कायदा प्रभावी असावा म्हणून डॉ. बाबा आढावांनी दिल्लीच्या वार्याही केल्या. मी त्यावेळी राज्यसभेत होतो. मलाही त्यांनी काही सूचना केल्या होत्या. शेवटी तो कायदा झाला. नुकताच मी राज्यसभेवर निवडून गेलो होतो. असंघटित कामगारांच्या विधेयकावरच माझे ‘मेडन स्पीच’ झाले हे विशेष.आज हमाल पंचायतीच्या बर्याच शाखा महाराष्ट्रात आहेत. त्यांना ते अधून-मधून भेट देतात. आपल्या कार्यकर्त्यांच्या ते सतत संपर्कात असतात. त्यांच्या प्रेरणेनेच मी आणि माझ्या सहकार्यांनी लातूर येथील आडत दुकानांवर काम करणार्या हमालांची संघटना बांधली. प्रा. मधुकर मुंडे यांचा यात विशेष पुढाकार होता. हमालांचा आम्ही संप घडवून आणला, हमाल पंचायतीच्या स्थापनेनंतर हमाल निर्भय बनले. बाबा लातूरला हमाल पंचायतीच्या कामासाठी अनेकदा आलेले आहेत. लातूरच्या हमालांनी सामूहिक प्रय}ांतून मार्केट यार्डात स्वत:चे कार्यालय बांधले आहे. ते आपली संघटना स्वबळावर चालवतात.अलीकडे सामाजिक चळवळी फारशा दिसत नाहीत. अपवाद फक्त शेतकर्यांच्या चळवळीचा आहे. राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन लोक रस्त्यावर येतात. कामगारांचे प्रश्न आज बरेच वाढलेले आहेत. पण कामगार चळवळी फारशा दिसत नाहीत. जागतिकीकरण हे त्याचे कारण असावे. आज देशातील जवळपास 40} लोकसंख्या मध्यमवर्गामध्ये मोडते. कामगारांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. विखूरलेल्या ग्रामीण भागात काम करणारे शेतकरी आणि शेतमजूर असंघटित आहेत. शेतकर्यांचे प्रश्न अतिशय भीषण स्वरूपाचे आहेत. वातावरण बदलाने ते प्रश्न अधिकच भीषण झालेले आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या होण्याचे हेच हेच प्रमुख कारण आहे. नापिकी व कर्जबाजारी या दोन प्रश्नांनी शेतकरी पूर्णत: नागवला गेला आहे.चांगल्या नेतृत्वाशिवाय चळवळी यशस्वी होत नाहीत. कामगार चळवळीचे नेतृत्व हे सहसा मध्यमवर्गातून पुढे येत असते. पण हा वर्ग स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरोत्तर उदासीन झालेला आहे. आत्मकेंद्रितता हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. खरेतर नेतृत्व हे आऊटसोर्स करता येत नाही. 1990 नंतर सामाजिक चळवळी जवळपास बंद पडलेल्या दिसतात.समाज परिवर्तन हे समाज सुधारणेच्या चळवळीतून होत असते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे समाज सुधारणा ही अपूर्ण वाक्यासारखी असते. त्या वाक्यात स्वल्पविराम, अर्धविराम असतात. पूर्णविराम मात्र नसतो. कारण ते वाक्य पूर्ण होत नाही. ते पुढे नेण्याचे काम मात्र पुढच्या पुढीतील लोकांना करायचे असते.आपल्या सामाजिक कार्यासाठी बाबा आढावांनी आपली वाणी व लेखणी झिजवली आहे. ते उत्तम लेखक व फर्डे वक्ते आहेत. आपल्या व्याख्यानाची सुरुवात महात्मा फुल्यांच्या ‘सत्य सर्वांचे आदी घर । सर्व धर्माचे माहेर’, या अखंडाने करतात. हा अखंड त्यांच्या आवडीचा आहे. अधूनमधून वृत्तपत्रातून त्यांचे लेख येतात, ते वाचनीय व विचार प्रवर्तक असतात.आणखी एक आठवण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. डिसेंबर 2001 मधील ही घटना आहे. त्या वर्षी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका थेट जनतेतून झाल्या. लातूरच्या नागरिकांच्या प्रचंड आग्रहाखातर मी लातूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. काँग्रेस सोडून बाकीचे पक्ष एकत्रित आले. त्यांनी मला पाठिंबा द्यायचे ठरविले. पण त्यांतील काहींनी ऐनवेळी आपले उमेदवार उभे केले. शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो.लातूरची नगरपरिषद प्रचंड भ्रष्टाचारात अडकली होती. मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेसचा उमेदवार उभा केला होता. त्यांनी आपली सर्व ताकद त्याच्या मागे उभी केली. कारण त्यांच्या प्रतिष्ठेचा तो प्रश्न होता. ‘भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही’ हा माझा केवळ एक कलमी जाहीरनामा होता. लोकांनी मला जिद्दीने निवडून दिले. नंतर मी जाहीर शपथ घेण्याचे ठरवले. डॉ. बाबा आढाव, नागनाथअण्णा नायकवडी, गोविंदभाई र्शॉफ व अण्णा हजारे यांना या कार्यक्रमासाठी बोलावले, यापैकी फक्त डॉ. बाबा आढाव व नागनाथअण्णा नायकवडी आले. नागनाथअण्णांच्या उपस्थितीत डॉ. बाबा आढावांच्या शुभहस्ते जाहीर सभेत ‘मी भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही’, अशी शपथ मी घेतली. या घटनेचा बाबांना खूप आनंद झाला.डॉ. बाबा आढावांनी शोषित व वंचितांच्या बर्याच प्रश्नांना हात घातला आहे. आजही ते त्या प्रश्नांशी झुंजत आहेत. त्यांनी आता नव्वदी पार केली आहे. त्यांचे काम पुढे चालू ठेवण्यासाठी कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत. ‘एकला चलो रे’ म्हणत त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे, हिंमत न हरता आणि अगदी आत्मविश्वासाने. डॉ. बाबा आढाव हे सामाजिक चळवळीतील अध्वयरू आहेत.मी त्यांना दीर्घायुरारोग्य व अभीष्ट चिंतितो. जीवेत शरद: शतम् !
drjmwaghmare@gmail.com(लेखक माजी कुलगुरू, शिक्षणतज्ञ, दलित पुरोगामी चळवळीचे अभ्यासक आहेत.)