आज ६ डिसेंबर, २०१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त त्यांच्या स्मृतीस व कार्यास भावपूर्ण आदरांजली. कोटी-कोटी प्रणाम. खरंच बाबा आमच्यातून गेले असं वाटतच नाही. कारण प्रत्येक दिवस त्यांच्या प्रेरणेने, विचाराने जगण्याचं नवं बळ देतो आणि त्यांच्याच असीम त्यागातूनच आम्ही दररोज मोकळा श्वास व पोटभर घास घेतो. त्यांच्या विचारांचा जागर सतत सुरू असून, त्यामुळे तो आमच्यातल्या जागृतीचा विस्तव कधीही विझू देत नाही. आज बाबांना देहरूपी आमच्यातून जाऊन तब्बल ६२ वर्षे झालीत; मात्र बाबा सदैव आमच्यासोबत आहेत. कधी बोलण्यातून, कधी भाषणातून, कधी प्रबोधनातून, कधी चर्चेतून, कधी कथा कवितांमधून, कधी लेखनातून, कधी चित्रातून, कधी मूर्तीतून, कधी शिल्पकलेतून, कधी पुतळ्यातून, कधी पुस्तकातून तर कधी मस्तकातून बाबांचा विचार आमच्या जगण्याचाच आधार झाला आहे. कारण बाबांनीच दिला आम्हा मृतांना संजीवन, हीन-दीन पतितांना त्यांनीच केलं बलदंड. अन्यायाचा प्रतिकार आणि न्यायाचा संघर्ष त्यांनीच शिकविला अन् समतेसाठी झटण्याचा मंत्रही त्यांनीच दिला. त्यांनीच फोडिले ज्ञानाचे भांडार आम्हा प्रज्ञावंत करण्या, त्यांनीच पेटविले महाडच्या चवदार तळ्याला अन् माणुसकीचे व मानवतेचे रणशिंग फुंकले आणि आम्हाला पाणीदार केले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल, हे त्यांनीच सांगितले. आम्हा गुलामांना गुलामीचे साखळदंड तोडून टाकण्याचे सामर्थ्यही दिले. बाबांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडविली अन् आम्हाला शिक्षण दिले. प्रज्ञा, शील, करुणेचा मार्गही दाखविला. त्या सम्यक संबुद्धाला गुरूस्थानी ठेवून, सामाजिक क्रांती घडविली. त्या जोतिबाच्या विचारांना स्मरून अन् गुरू मानून त्यांच्या विचारांचा रथ पुढे रेटला अन् गुरू-शिष्य परंपरेचा महान संदेश जगाला दिला. संत कबीर यांच्या दोह्यांनी प्रभावित होऊन परिवर्तनाचा मार्ग दिला बहुजना अन् गुरू माणुनी केले महान कार्य या धरतीवरी, असे महामानव झाले नाही कोणी, ज्यांनी घडविली अद्वितीय धम्मक्रांती या जगी.सारे जग आता बोलू लागले, सिम्बॉल आॅफ नॉलेज म्हणून बाबांचा गुणगौरव करू लागले. जगात सर्वश्रेष्ठ ज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ, घटनातज्ञ, धर्मअभ्यासक, संशोधक, इतिहासतज्ज्ञ, प्राध्यापक, पत्रकार अशा विविधांगी गुणांनी ज्यांचा गौरव होतो जगात तो संविधानाचा शिल्पकार, बोधिसत्व प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी झुकवितो माथा त्यांना मानाचा मुजरा करोनि.अशी महती आहे जगात ज्याची त्यांचे अनुयायी की भक्त व्हावे आम्ही. केवळ जयजयकार करुनी, जल्लोशात दंग झालो आम्ही अन बाबांचे मिशन पुढे नेण्यात का अपयशी होत आहो आम्ही. बाबा म्हणाले होते, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. एकीत जय बेकीत क्षय असाही सल्ला दिला होता आम्हा, तुम्ही समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा, ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना संधी द्या आपापसात भांडणे नकोत, भुलथापास बळी न पडता सावधगिरीने वागले पाहिजे,आपला उद्धार कराया आपणच कंबर कसली पाहिजे, दैवावर विश्वास ठेवून वागू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा असे सांगून मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे हा इशाराही दिला. यासोबतच जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्वाकांक्षा जोपासा, दिर्घोद्योग व कष्ट कारण्यानेच यशप्राप्ती होते, तरुणांनो निर्भय व्हा व स्वाभिमान जपा, स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून, शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा, शिक्षणाशिवाय मा?्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत, दुस?्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा, लोकात तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे, संघटनेची ताकद प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि शिस्तपालणावर अवलंबून असते, बुद्ध धमार्नेच जगाचा उद्धार होणार आहे ...बाबा आपण किती मंत्र, उपदेश, संदेश दिले जे खरंच आम्ही प्रामाणिकपणे अंमलात आणले, त्यानुसार आम्ही वागलो तर भारत खरंच बलशाली होणार पण बाबा आपल्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त आपणास आदरांजली वाहतांना आम्ही आपल्या संदेशाचे पालन करतो का याचा विचार मनात आला पाहिजे म्हणून आपल्या विचारांची ही उजळणी. बाबा आपण संकल्प केला होता मी भारत बुद्धीमय करीन त्याचा, आपण तो लौकिकाथार्ने पूर्ण केलाही, पण ज्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आता तुमचीही जबाबदारी मोठी आहे, तुम्ही धम्माचे नीट पालन करा असं म्हटलं होतं आम्ही कुठं आहो?आपण असंही म्हटलं होतं की, मी हा समतेचा, क्रांतीचा रथ इथपर्यंत मोठ्या कष्टाने आणला जर तुम्हाला तो पुढे नेणे शक्य नसेल तर हा रथ मागे जाऊ नये एवढी काळजी घ्या? बाबा आपला समतेचा रथ मागे जाऊन विषमतेच्या चिखलात, प्रतिक्रांतीच्या चक्रव्यूहात फसतो की काय अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. बाबा आम्ही अनेक संघटना, पक्ष, संस्था काढून समाजाला पुढे नेण्यासाठी कार्य कमी पण आपापसात भांडणे करून बेकीत विभागले जात आहो. तुम्ही दिलेलं शिक्षणाचं अस्त्र समाजाच्या संरक्षणासाठी, जोपासण्यासाठी, त्याच्या उत्थानासाठी चालविण्याच तंत्र आम्हाला अवगतच झालं नाही असं वाटावं अशी आज समाजाची अवस्था झाली आहे. आपण तरतूद करून आम्हाला सगळ्या बहुजनांना आरक्षण दिलं, या आरक्षणाने आम्ही शिकलो, नोकरीत लागलो पण समाजासाठी त्याग करण्याचं भान काही मोजके अपवाद वगळले तर दिसत नाही. सारे सोहळे, उत्सव साजरे करण्यातच आम्ही धन्यता मानतो पण आपण दिलेलं मिशन पुढे नेण्यासाठी झटतो का याचा समस्त समाजाने विचार करावा एवढीच महापरिनिर्वाण दिनी बाबांच्या चरणी अभिवादन करतांना अपेक्षा. जयभीम.
- प्रा.डॉ.एम.आर.इंगळे, अकोला