डॉ. जयसिंगराव पवार -
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट आणि त्यानंतर घडूून आलेला परस्परांतील सहयोग ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अपूर्व घटना होती. महाराष्ट्राचे व परिणामी अखिल हिंदुस्थानचे दुर्दैव असे की, हा सहयोग फार काळ टिकू शकला नाही. महाराजांच्या अकाली निधनामुळे तो संपुष्टात आला.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१३ मध्ये अमेरिकेला गेले होते. तेथे कोलंबिया विद्यापीठात त्यांनी एम.ए. व पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर लंडन विद्यापीठाच्या एम.एस्सी. व बार-अॅट-लॉ या पदव्या मिळविण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केले होते; पण बडोदा सरकारने त्यांची शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना नाइलाजाने मायदेशी परतावे लागले होते. ते वर्ष होते १९१७. त्यानंतर लगेचच शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना बडोदा संस्थानात नोकरीस जावे लागले. तथापि, अस्पृश्य म्हणून त्यांना बडोद्यात राहावयास जागा मिळणेही मुश्किल झाले. आॅफिसमध्ये अस्पृश्य म्हणून त्यांची सतत अवहेलना सुरू झाली. मानखंडना व मन:स्ताप यांच्या कात्रित सापडलेल्या बाबासाहेबांची सुटका सयाजीराव महाराजही करू शकले नाहीत. परिणामी अगतिक होऊन ते बडोद्याची नोकरी सोडून मुंबईस परतले.
याच सुमारास म्हणजे १९१८ मध्ये बाबासाहेबांचे नाव शाहू महाराजांच्या कानावर गेले असावे. महार समाजातील एक तरुण परदेशातील इतक्या उच्च पदव्या प्राप्त करून आल्याचे महाराजांना समजताच त्यांना विलक्षण आनंद झाला आणि त्यांना भेटण्याची उत्सुकता त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. ही भेट दत्तोबा दळवी यांनी घडवून आणल्याचे भाई माधवराव बागल यांनी आपल्या ‘आठवणी’त सांगितले आहे. बागल यांना अर्थातच ही हकीकत खुद्द दळवींनी सांगितली होती. उत्तम आर्टिस्ट असलेले दळवी महाराजांच्या खास प्रेमातील गृहस्थ होते. त्यांनाच महाराजांनी प्रथम बाबासाहेबांकडे पाठवून दिले.
दळवींनी बाबासाहेबांची भेट घेऊन महाराजांची इच्छा त्यांना सांगितली. पुढे यथावकाश उभयतांची भेट घडून आली. असेच बागल यांनी कथन केलेल्या आठवणीवरून स्पष्ट होते; तसेच ही भेट बाबासाहेबांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे सांगतात त्याप्रमाणे, १९२० मध्ये न होता १९१९ मध्ये घडून आली असावी. कारण, जानेवारी १९२० मध्ये बाबासाहेबांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकाला मूळ अर्थसाह्य महाराजांनी दिले होते. अर्थातच, तत्पूर्वी उभयतांची भेट घडून अस्पृश्यांच्या चळवळीसंबंधी आणि त्यासाठी असे वृत्तपत्र काढण्याविषयी चर्चा झाली होती, हे उघड आहे. बाबासाहेबांचा शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले होते. बाबासाहेब परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या रूपाने अस्पृश्य समाजास एक उमदे नेतृत्व मिळत आहे, याचा महाराजांना मोठा आनंद झाला होता.
आपला आनंद व्यक्त करताना महाराजांनी म्हटले होते, ‘तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.’ इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, शाहू महाराजांनी दूरदृष्टीने बाबासाहेबांविषयी केलेले भाकीत अचूक होते.
त्यावेळच्या भाषणात बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा गौरव करताना महाराजांनी, ‘आज त्यांना पंडित ही पदवी देण्यात तरी काय हरकत आहे? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते; परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो,’ असे उद्गार काढले होते. याच परिषदेत बाबासाहेबांच्या पुढाकाराने परिषदेने ‘शाहू छत्रपतींनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा,’ असा खास ठराव मंजूर केला.
२६ जून हा शाहू महाराजांचा वाढदिवस. हा वाढदिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने माणगाव परिषदेने केला होता. नागपूर परिषदेतही तसाच ठराव केला गेला होता. त्यास अनुसरून बाबासाहेबांनी ‘मुकनायका’चा ‘स्पेशल अंक’ काढण्याचे ठरविले होते. यासंदर्भात त्यांनी महाराजांना लिहिलेले १३ जून १९२० चे पत्र उपलब्ध असून त्यात म्हटले आहे की, ‘स्पेश्ल अंकाकरिता महाराजांच्या आमदनीची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आपण कोल्हापुरास येत आहोत.’ तथापि, या पत्राप्रमाणे बाबासाहेब कोल्हापूरला आले का व त्यांनी ‘मूकनायक’चा खास अंक काढला का, याविषयीची माहिती मिळू शकत नाही.
या काळात बाबासाहेब सिडनहॅम कॉलेजमध्ये चरितार्थाचे साधन म्हणून प्राध्यापकाची नोकरी करीत होते; पण त्यांचे लक्ष आपल्या अपुऱ्या राहिलेल्या विद्याभ्यासाकडे लागून राहिले होते. तो पूर्ण करण्यासाठी ठरावीक मुदतीतच त्यांना लंडनला जाणे भाग पडल्याने त्यांनी जुलै १९२० मध्ये तिकडे प्रयाण केले. बाबासाहेबांच्या या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी महाराजांनी आर्थिक साह्य पाठवून दिले.बाबासाहेब इंग्लंडमध्ये असले तरी त्यांचा शाहू महाराजांबरोबर जिव्हाळ्याचा पत्रव्यवहार चालूच राहिला. ४ सप्टेंबर १९२१ रोजी त्यांनी महाराजांना पाठविलेल्या पत्रात इंग्लंडमधील चलनाचे भाव घसरल्यामुळे आपणापुढे आर्थिक अडचण निर्माण झाली असून, ती निवारण्यासाठी २०० पौंडाची रक्कम पाठवून देण्याची विनंती केली होती. याच पत्राच्या शेवटी बाबासाहेबांनी लिहिले होते, ‘आपली प्रकृती ठीक आहे अशी मला आशा आहे. आपली आम्हाला फारच जरूरी आहे. कारण हिंदुस्थानात प्रगती करीत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण एक आधारस्तंभ आहात.
म. फुल्यांपासून शाहू महाराजांपर्यंत चालत आलेली बहुजन समाजाच्या उद्धाराची चळवळ ही ‘सामाजिक लोकशाही’च्या प्रस्थापनेचीच चळवळ होती. या चळवळीचे महाराज एक आधारस्तंभ आहेत, हे त्यांच्या कार्याचे बाबासाहेबांनी केलेले मूल्यमापन सर्वार्थाने उचित होते आणि असा सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचा आधारस्तंभ, अस्पृश्यांचा सखा, इहलोकीची यात्रा संपवून निघून गेल्याची वार्ता जेव्हा बाबासाहेबांनी लंडनच्या वृत्तपत्रात वाचली तेव्हा या वार्तेने ते व्याकूळ झाले. १९४० मध्ये कोल्हापुरात ‘दलित प्रज्ञा परिषदे’च्या निमित्ताने ते आले असता आपल्या भाषणात त्यांनी म्हटले होते, ‘कोल्हापूरसंबंधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे व या गोष्टीबद्दल अस्पृश्यांना व मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी कोल्हापुरातच खरी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली, ही ती गोष्ट होय.
छ. शाहू महाराज व बाबासाहेब यांच्यामधील संबंधाचा विचार करता हे संबंध केवळ सामाजिक चळवळीच्याच पातळीवर अस्तित्वात होते असे नाही, तर ते वैयक्तिक जिव्हाळ्याच्या पातळीवरही पोहोचले होते, असे दिसून येते. महाराजांनी रमाबार्इंना ‘बहीण’ म्हणून माहेरपणासाठी नेण्याची तयारी दाखविणे किंवा महाराजांचे पुत्र राजाराम महाराज व कन्या आक्कासाहेब यांनी बाबासाहेबांना ‘मामा’ म्हणून संबोधणे, या बाबासाहेबांचे चरित्रकार खैरमोडे यांनी सांगितलेल्या घटना उभय नेत्यांच्या परस्परांविषयीच्या घनिष्ट जिव्हाळ्याच्या नात्याच्या निदर्शक मानाव्या लागतील.(लेखक, ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत.)