शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर:- गणितात राहाणारा माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:45 AM

जगप्रसिद्ध प्रकांडपंडित गणिती डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा 22 जुलै हा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी

-सतीश पाकणीकर 

ठिकाण होतं इको पार्क, कोलकता. 2017च्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात फाउण्ड्री कॉँग्रेसने आयोजित केलेल्या फाउण्ड्री एक्स्पोसाठी सुयश सोल्युशन्सच्या स्टॉल डिझाइनसाठी मी तेथे गेलो होतो. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या आधी स्टॉलवर शेवटचा हात फिरवून मी बाहेरच्या कॅफेटेरियापाशी पोहचलो. वाफाळत्या कॉफीचा ग्लास घेऊन मी काउण्टरवरून मागे वळलो. समोरची भिंत एका भल्या मोठय़ा फ्लेक्सने सजवली होती. शीर्षक होतं ‘सॅल्यूट टू द सायंटिस्ट्स ऑफ इंडिया’. अजरामर काम केलेल्या शास्त्रज्ञांचे फोटो व त्यांच्या कामाचा थोडक्यात परिचय. एकूण अठरा शास्त्रज्ञांचे फोटो होते. माझी नजर एकेक फोटो पाहत असताना एका फोटोवर स्थिरावली. तो फोटो होता जगद्विख्यात प्रकांडपंडित गणितज्ञ डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा. म्हणजे आमच्या अभ्यंकरसरांचा. आठवणींच्या ‘टेप’चं रिवाइण्ड बटन दाबलं गेलं आणि माझं मन एकदम चौतीस वर्षे मागं गेलं.मी पदार्थविज्ञानात बी.एस्सी. करीत होतो तर माझा जीवलग मित्र संदीप होले हा गणित विषयात. त्याच्या तोंडून मी असंख्य वेळा अभ्यंकरसरांचे नाव ऐकत होतो. त्यांच्याकडे गणित विषय शिकायला मिळण्याचे महत्त्व काय हे त्यामुळे मनात बिंबले गेले होते. संदीप अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. एरवी अमेरिकेत वास्तव्याला असलेले व तेथून जगभरातल्या पन्नास-साठ विद्यापीठात सन्मान्य व्याख्याते म्हणून जाणारे सर त्यावेळी पुण्यात राहायला आले होते. पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. मी एकेदिवशी संदीपला म्हणालो, ‘मला येता येईल का त्यांचे लेक्चर ऐकायला? मला कळणार नाही काही. पण एवढय़ा मोठय़ा व्यक्तीला पाहता तर येईल?’ आणि तो योग आला. मला तो दिवस आजही जसाच्या तसा स्पष्ट दिसतो.तो दिवस होता 28 डिसेंबर 1983. मी व संदीप सायकल मारत लॉ कॉलेज रोडवरून अशोक पथवर वळलो. छातीवर येणारा आणि दमवणारा चढ चढून आम्ही सरांच्या घरी पोहचलो. दुमजली प्रशस्त बंगला. गेटमधून आत गेल्यावर समोरच मोठय़ा खोलीच्या आकाराचा सिटआउट. मध्यभागी टांगलेला भला मोठा झोपाळा. कठड्याची भिंत कोणालाही मांडी घालून बसता यावी अशी रुंद. मंदसा झोका घेत अभ्यंकरसर झोपाळ्यावर बसलेले. समोर आमच्या आधीच आलेले आमचे स. प. महाविद्यालयातील गणिताचे सर एम. आर. मोडक, तसेच फर्गसन महाविद्यालयातील गणिताचे सर डी. व्ही. कुलकर्णी, आमचा मित्र प्रदीप केसकर हे सरांचे बोलणे जिवाचा कान करून ऐकत होते. आम्ही दोघेही त्यांच्यात सामील झालो. सर शिकवण्यात इतके गढून गेले होते की, आमच्या येण्याने सरांचे बोलणे क्षणभरही थांबले नाही. मधूनच ते त्यांच्या उजव्या हाताशी ठेवलेला दाढी करायचा इलेक्ट्रिक शेवर घेऊन गालावरून फिरवत होते. डोक्यातून गणिती संकल्पना बाहेर येत असताना हा थोर गणिती मध्येच दाढीही उरकत होता. काही वेळाने आतून त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. इव्हॉन मॅडम. बाहेर किती जण आहेत हे मोजण्यासाठी.. कदाचित. कारण नंतर सगळ्यांना चहाचे कप आले. कोणताही खंड न पडू देता अभ्यंकरसर समोर बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांवर गणिती संकल्पना संक्रमित करीत होते. काहीही न समजणारा मी एकटाच होतो. पण तरीही मी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने भारावून गेलो होतो. बर्‍याच वेळाने बाहेरून रेडिओ व दूरदर्शनच्या आवाजाचा प्रभाव जाणवू लागला. तशी विद्यार्थ्यांत चुळबूळ सुरू झाली. ती लक्षात आल्या आल्या सर म्हणाले, ‘तुमचं सगळ्यांचं लक्ष कमी झालंय. कुठं आहे ते? हा बाहेरचा आवाजही वाढलाय. तो कशामुळे?’ 

- बिचकतच संदीपने एका दमात उत्तर दिल, ‘सर, आज वेस्ट इंडीज व आपली क्रि केटची मॅच सुरू आहे. आपली बॅटिंग आहे. आणि आज जर सुनील गावसकरने सेंच्युरी मारली तर तो ब्रॅडमनचे रेकॉर्ड मोडेल. त्याची ही तिसाव्वी सेंच्युरी असेल. म्हणून सर्वांना त्याची उत्सुकता आहे.’ यावर विचारात पडलेले सर म्हणाले, ‘सुनील गावसकर. ऐकल्यासारखं वाटतंय हे नाव.’ 

आम्ही सगळे त्यांच्या या वाक्याने एकदम चकित. त्यांना गावसकरबद्दल माहिती नव्हती. पण म्हणूनच गणितासारख्या गहन विषयावर तासन्तास बोलणं, त्यात मूलभूत असं संशोधन करणं, त्या विषयासाठी स्वत:ला इतर प्रलोभनांपासून दूर ठेवून फक्त आणि फक्त त्याचाच ध्यास घेणं, तो विषय विद्यार्थ्याच्या पातळीवर येऊन शिकवणं या गोष्टी साध्य होतात; त्या व्यक्तीला म्हणतात, ‘डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर.’ आणि अशा जीनियस व्यक्तींचं वागणं हे चारचौघांच्यासारखं असेल अशी शक्यताच राहत नाही. आम्ही अशी व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवत होतो.

त्यावर्षी मी व संदीप बी.एस्सी. पास होऊन एम.एस्सी. करण्यासाठी पुणे विद्यापीठात दाखल झालो. दरम्यान, माझा मोशन पिक्चर फिजिक्स (म्हणजेच फोटोग्राफी) हा विषय असल्याने मी माझा प्रकाशचित्रणाचा व्यवसायही सुरू केला होता. अर्थार्जन आणि शिक्षण दोन्हीही सुरू होते. एकदा असेच अभ्यंकरसरांच्या घरी गेलो असताना त्यांना संदीपने हे सांगितले. त्यांना माझे कौतुक वाटले असावे. कारण ते लगेचच म्हणाले, ‘मग याला आपण भास्कराचार्य प्रतिष्ठानची छायाचित्रे काढायला सांगितले पाहिजे.’सर जेव्हा मराठीत बोलत, त्यावेळी त्यांच्या तोंडून जाणीवपूर्वक एकही इंग्रजी शब्द येत नसे. मराठी भाषेचा त्यांना अफाट अभिमान होता. झाले. मला ते काम मिळाले. पुढच्याच आठवड्यात सुट्टीच्या दिवशी मी भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या इमारतीचे, वर्गाचे, ग्रंथालयाचे असे बरेच फोटो काढले. त्याचे प्रिंट्स करून घेतले. सरांना ते दाखवले. त्यांना ते फोटो खूपच आवडले. त्यांच्या चेह-यावरचे समाधानाचे भाव बघताना मी त्यांना म्हणालो, ‘सर, तुम्ही शिकवत असताना मी तुमचे फोटो काढले तर चालेल का?’ - ‘चालेल की ! न चालायला काय झालं?’ असं सरांचं उत्तर आल्यावर मी आनंदित झालो. काहीच दिवसात प्रतिष्ठानने सरांची ‘हार्डी कोर्स ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स’ या शीर्षकाखाली एक व्याख्यानमाला आयोजित केली होती. सगळा वर्ग गणितप्रेमींनी भरून गेला होता. पदवीधर, पदव्युत्तर असे अनेक विद्यार्थी तसेच महाविद्यालय व विद्यापीठ येथे गणित शिकवणारे अनेक शिक्षक त्या वर्गात लहान मुलांप्रमाणे गणित शिकताना मी पाहिले आणि अभ्यंकर सरांची तन्मयताही. मी मधूनच पुढे जात सरांची प्रकाशिचत्रे  टिपत होतो;  पण त्यांना त्याचा काहीच त्रास झाला नाही. 

गणितातील मूलभूत लेखनाबद्दल असलेला, सर्वात मानाचा समजला जाणारा ‘शॉव्हनेट पुरस्कार’ मिळवणारे अभ्यंकरसर गणित विषय शिकवताना किती तल्लीन होऊन जात ही फक्त अनुभवण्याचीच गोष्ट होती. सरांचे अजून एक घर होते. भारती निवास कॉलनीत. ‘श्रीश् ठाकूरधाम’ असे त्याचे नाव होते. 1984 सालचा सुमार असेल. सर ते घर विकण्याच्या गडबडीत होते. तेथील कपाटे, पलंग, डायनिंग टेबल अशा अनेक वस्तू त्यांना विकून टाकायच्या होत्या. त्याची जबाबदारी त्यांनी श्री. डी. व्ही. कुलकर्णी यांच्यावर सोपविली होती. मी व संदीप असेच अचानक त्या घरी गेलो. सर, इव्हॉन मॅडम व डी. व्ही. कुलकर्णी त्याच कामात होते. एक-एक वस्तूची यादी सुरू होती. कोप-यात एक लाल रंगाचा पाच फूट उंचीचा केल्वीनेटर कंपनीचा रेफ्रीजरेटर होता. सर म्हणाले, ‘हापण विकून टाका.’ माझ्या घरी तेव्हा फ्रीज नव्हताच.  मी सरांना म्हणालो, ‘सर, हा विकायचा असेल तर मी घेतो.’यावर सर म्हणाले, ‘बरं, हा तुला हवा असेल तर तुला दोनशे रुपयाला पडेल.’त्यावेळी नवीन फ्रीजची किंमत अंदाजे पाच हजार असेल; पण अशा दैनंदिन व्यवहाराशी त्यांना काहीच देणे-घेणे नसल्याने त्यांनी किंमत सांगून टाकली दोनशे रुपये. पण त्यांना डी.व्ही. म्हणाले, ‘अहो सर, फक्त दोनशे रुपये?’ यावर सर म्हणाले, ‘कमी आहेत का हे? बरं मग पाचशे देऊन टाक.’ सरांच्या या म्हणण्यावर अपील नव्हते. आणि मला तो फ्रीज पाचशे रुपयांना मिळाला. पुढे जवळ जवळ पंधरा वर्षे अभ्यंकरसरांचा तो फ्रीज आमच्या घराचा अविभाज्य भाग होता. 

1986 नंतर संदीप होले अमेरिकेत स्थायिक झाला. सरही कधीतरी सहकुटुंब पुण्याला येत. त्यामुळे पुढे आवर्जून भेट झाली नाही. पण एकदा साधारण 1993च्या सुमारास त्यांनी मला निरोप पाठवून घरी बोलावले. मी गेलो. सर व इव्हॉन मॅडम झोपाळ्यावर बसले होते. मी गेल्यावर त्यांनी मला एक छोटा 4 इंच बाय 6 इंच आकाराचा एक प्रिंट दाखवला. कोणत्यातरी मंदिरातील उत्खननात सापडलेल्या शिलालेखाचा प्रिंट होता तो. त्यावर जे लिहिले होते ते नीट वाचण्यासाठी त्यांना त्या फोटोची मोठी कॉपी करून हवी होती. आपल्या इथे तोवर डिजिटल फोटोग्राफीचे आगमन झाले नव्हते. मी त्या प्रिंट वरून पुन्हा फोटो काढून त्याची एक मोठी प्रिंट त्यांना नेऊन दिली. त्याची वाचनीयता पाहून सरांना खूप आनंद झाला. ती माझी सरांशी झालेली शेवटची भेट. त्या शिलालेखात गणितविषयक काही लिहिलेले होते. त्यावर त्यांना संशोधन करायचे होते. गणित हा त्यांचा ध्यास होता, गणित हा त्यांचा श्वास होता. पु.ल. देशपांडे यांनी गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचं वर्णन केलंय, ‘गाण्यात राहणारा माणूस’! एकदा राजशेखर मन्सूर पुण्यात आले होते. त्यांनी मन्सूर यांच्या मृत्यूच्या वेळची आठवण सांगितली की, राजशेखर यांच्या मांडीवर डोके ठेवून तानपु-याचे गुंजन ऐकत मल्लिकार्जुन हे जग सोडून गेले. 

त्याप्रमाणेच बैजिक भूमितीतील मूलभूत संशोधन करणारे डॉ.श्रीराम शंकर अभ्यंकर हे वयाच्या 82व्या वर्षापर्यंत गणितातच जगले. 2 नोव्हेंबर 2012 रोजी आपल्या अभ्यासिकेत गणित विषयाचे लेखन करताना कागदावरील अक्षरावर त्यांचा पेन अलगद थांबला. कारण गणितातच राहणा-या  या थोर व्यक्तीने आपला शेवटचा श्वास घेतला होता.

(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

sapaknikar@gmail.com