गणेश देशमुख
हा गाव म्हणजे विदर्भाच्या ‘कॅलिफोर्नियाचा' एक भाग होता. पण अचानक गावातली समृद्धी गेली, ऐश्वर्य गेले. संत्राबागा संपल्या. गाव भकास झाले. कारण गावातले पाणीच संपले. पण अचानक चमत्कार झाला. कोरड्याठाक पडलेल्या विहिरींना पान्हा फुटला. गाव हिरवा दिसू लागला. यंदाचा पावसाळाही साधारणच होता, तरीही पाण्याची साठवणक्षमता १४ कोटी लिटर्स इतकी वाढली..
विदर्भाचा कॅलिफोर्निया' ही वैभवशाली उपाधी ज्या तालुक्याला लोकांनी बहाल केली, त्या वरूड तालुक्यातील वाठोडा (चांदस) या गावातील समृद्धी अचानक लयास जाऊ लागली. हृदयावर घाव घालावे अशा आंतरिक वेदनेने शेतकरी स्वत:हून संत्राबागांवर कुऱ्हाडी चालवू लागले. बागा संपल्या. गाव भकास झाले. कारण होते पाणी. तीन पिढ्यांपूर्वी ३० फुटांवर भूगर्भातून काढता येणारे पाणी आता १२० फूट खोल खणले तरी लागत नव्हते. दोन पिढ्या पाण्यासाठी तरसलेला हा गाव आता पाण्याचा थेंब अन् थेंब गावातच जिरविण्यासाठी झपाटला आहे. दीड महिना वेडावल्यागत श्रमदान करून या गावाने १४ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण केली. विदर्भातील हे 'मॉडेल' गाव आता अनेक गावांची प्रेरणा ठरू लागले आहे.
‘ड्राय झोन’ म्हणून शासनदरबारी नोंद असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील वाठोडा (चांदस) या गावाची ही सत्यकथा.
‘ड्राय झोन’ घोषित झाला की त्या ठिकाणी विहीर किंवा बोअर खोदण्यास मनाईहुकूम जारी होतो. तीन हजार लोकसंख्येच्या या गावाने पाण्याचा इतका अविवेकी उपसा केला की, शेतातील ओलितासाठी १५ मिनिटेही मोटर सुरू राहणे कठीण झाले. अचानक आमीर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘वॉटर कप’ स्पर्धेत या गावाने सहभाग घेतला नि काय आश्चर्य, पाऊस तोकडा होऊनही अनेक विहिरींना तीन तास पाणी पुरू लागले आहे. हा करिष्मा होऊ शकला आहे गावकऱ्यांच्या चिकाटीने आणि अपार उपसलेल्या कष्टाने. 'वॉटर कप' स्पर्धेत या गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. यामुळे गावकऱ्यांच्या श्रमाला आगळी चकाकी प्राप्त झाली.
महाराष्ट्रातील ११६ आणि तालुक्यातील ६६ ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या. वाठोड्याचे सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज धोटे, विद्या भुसारी, प्रफुल्ल भुजाडे, संदीप खाडे हे पाच जण हिवराबाजार येथे चार दिवसांच्या प्रशिक्षणाला गेले. ते सांगतात, तेथे आम्हाला नवी दृष्टी मिळाली. त्यानंतर आमची झोपच उडाली. गावात पाणी जिरवण्यासाठी आम्ही कमालीचे अधीर झालो. १५ एप्रिलपासून सुरू झालेला आमचा कर्मयज्ञ ४५ दिवस अव्याहतपणे सुरूच होता.
४५ दिवसांत अशी झाली जादू
सर्व ६४० घरांसाठी ६० साधारण आकाराचे आणि २ नांदेड पॅटर्नचे मोठे शोषखड्डे, २ मोठे तलाव, ३६ मातीचे बंधारे, १६ नाल्यांतील गाळ स्वच्छता, मुंजा नाल्याचे ४ किमी खोलीकरण, बेल नदीपात्राचे खोलीकरण, ४० लूज बोल्डर स्ट्रक्चर, २५ एकरांत समतल पातळी चर, २५० एकरांत समतल पातळी चर, १५ एकरांत शेतातील धूप रोखण्यासाठी बांधबंदिस्ती, १० शेततळे, ५० एकरांत बेड सिस्टम, ७५० एकरांत ठिबक सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. पूर्वी गावातील पाण्याच्या साठवणीची क्षमता नगण्य होती. आता ती १४ कोटी लिटर्स इतकी आश्चर्यकारक वाढली आहे. गावाची परिसीमा ५९० हेक्टर जमिनीत विस्तारलेली आहे. पाणीपात्रांची बहुतांश कामे ई-वर्ग जमिनीत करण्यात आलीत. ९० एकरांत ३००० झाडेही लावली. ती जिवंत आहेत.
आमीर तलाव, सत्यजित तलाव
आमीर खान आणि सत्यजित भटकळ हे दोनदा या गावात येऊन गेलेत. त्यांनीही श्रमदान केले. सुनील बर्वे, सई ताम्हणकर आणि रीमा लागू यादेखील त्यांच्यासोबत होत्या. आमीर खानच्या गौरवार्थ ‘आमीर तलाव’ आणि सत्यजित भटकळ यांच्या सन्मानार्थ श्रमदानातून साकारलेला ‘सत्यजित तलाव’ हे भले मोठे जलपात्र गावाचे वैभव ठरले आहेत. सलग दीड महिना सारे भेदभाव विसरून सर्वांनी गावासाठी काम केले. या ४५ दिवसांत रोजच कुण्यातरी सामाजिक संघटनेने वा संस्थेने श्रमदान करणाऱ्या अवघ्या गावाला नास्ता, जेवण पुरविले. हे पुरविताना अन्न गरम आणि शुद्ध असेल याची काळजी आवर्जून घेण्यात आली. चार लक्ष ६५ हजार रुपये लोकवर्गणी जमली. आजूबाजूच्या गावांनी, संस्थांनी, लोकांनी त्यासाठी सहकार्य केले. पंचायत समिती सदस्य नीलेश मगर्दे, गावचे सरपंच मनोज वाडे, तलाठी डी. बी. मेश्राम यांची चिकाटी 'काबिले तारीफ' असल्याचे अवघा गाव सांगतो. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी खिलाडू वृत्ताने दाखविलेली सक्रियता लोकोत्साहाचे आणखी एक कारण होते.
गाव तयार; प्रतीक्षा पावसाची
गावात एरवी या काळापर्यंत ८५० मि.मी. पाऊस पडायचा. यंदा निसर्ग गावकऱ्यांची उत्सुकता ताणवतो आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ३५० मि.मी.च पाऊस झाला. या पावसाचे सारेच पाणी साठवण पात्रांनी गटागटा प्यायले. सर्व पात्रे कोरडीच आहेत. गावाशेजारून वाहणाऱ्या बेल नदीला दरवर्षी आतापर्यंत १०-१२ वेळा पूर आलेले असत. यंदा एकदाही तो आला नाही. गावाचे श्रद्धास्थान असलेल्या यशवंतबाबांना गावकरी रोज पावसासाठी साकडे घालतात. आभाळाकडे बघून विनवतात- बरस रे मेघराजा धुवाधार, भरून दे जलपात्रे सारी, क्षमवून टाक तहानलेल्या धरणीची व्याकुळता. गावकऱ्यांच्या यावेळच्या विनवणीमागे कृतज्ञता आहे. भूमायच्या उदरातून अपराध्यागत उपसलेल्या पाण्याचा परतावा त्यांना भूगर्भात पाणी पुनर्भरण करून करावयाचा आहे. होय, गाव बदलला अन् दृष्टिकोनही!
अवघा गाव गहिवरला..
गावापासून जाणाऱ्या महामार्गावरील पिंपळाच्या झाडाखाली २०-२५ वृद्ध बसतात. त्यांना निराधार योजनेतून महिन्याचे प्रत्येकी ६०० रुपये मिळतात. गाव झपाटल्यागत श्रमदान करीत होते, त्यावेळी या वृद्धांनी निर्णय घेतला.. आपण श्रमदान करू शकत नाही; पण आपल्या वेतनातील २०० रुपये देऊ.५००० रुपये या वृद्धांनी ज्यावेळी कारभाऱ्यांना दिले, त्यावेळी अवघा गाव गहिवरला.
घरोघरी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'
पाण्याचे महत्त्व कळल्यामुळे ग्रामपंचायतीने घरोघरी पाणीमीटर बसविले आहेत. लोक काटकसरीने पाण्याचा वापर करताहेत. वापरण्याच्या पाण्यात आता स्वयंस्फूर्तीने ६० टक्के कपात झाली आहे. प्रत्येक घरात आता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सांडपाण्याचा प्रत्येक थेंब शोषखड्ड्यांंमध्ये जिरविला जातो. हातपंपांतून वाहणारे पाणी सीमेंट टाक्याने अडविण्यात आले. गुरांची त्यामुळे सोय झाली. टाके ओव्हरफ्लो झाले की अनावश्यक पाणी मातीच्या खड्ड्यात जिरते.
काळ्या मातीत मातीत..
बांधावर श्रमदान सुरू असताना वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ तेथे पोहोचले. 'काळ्या मातीत मातीत' ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्यांनी स्वत: गायली. त्यावेळी सर्वांमध्ये संचारलेला जोश विलक्षण होता. कवी किशोर बढे यांनीही कविता सादर करून गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. श्रमदान नियोजनाच्या बैठकीदरम्यान काळोख नाट्य, हास्यविनोदी कार्यक्रम, जागृती पथनाट्य, भजन, कीर्तन आदि कार्यक्रमांद्वारे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे उधाण कायम ठेवण्यात आले. ४८ अंश सेल्सियसपर्यंतच्या रणरणत्या उन्हात अवघा गाव दीड महिना वेड लागल्यागत काम करीत होता. त्या कालावधीत सर्वांचाच वर्ण काळा झाला होता.
श्रमशुल्कातून 'कलेक्टर बंधारा'
एरवी आठ लक्ष रुपये खर्च येणारा आणि प्रशासकीय मान्यतेसाठी वर्षभराचा कालावधी खर्ची पडणारा बंधारा वाठोड्याच्या गावकऱ्यांनी अवघ्या तीन तासांत साकारला. त्यासाठी दिले ते केवळ श्रमशुल्क! जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची आठवण म्हणून त्या बंधाऱ्याला 'कलेक्टर बंधारा' असे नाव गावकऱ्यांनी आपुलकीने दिले आहे.
ग्रामपंचायतीत वॉटर बजेट
पाण्याच्या महत्त्वावर कधी चर्चाही न केलेल्या वाठोडा ग्रामपंचायतीत आज ‘वॉटर बजेट’चा तक्ता लावण्यात आला आहे. पाण्याशी जुळलेले हृदयस्थ बंध त्यातून डोकावतात. आमचा गाव देशातील अव्वल मॉडेल बनावे या ईर्ष्येने गावकरी आता पेटले आहेत.
पाण्यासाठी प्रशिक्षण केंद्र!
वाठोडा गावात जे घडले ते आश्चर्यच! विदर्भात पाणीप्रेम आणि पाणीकर्तव्य समजावून सांगण्यासाठी वाठोडा गावात प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. पाणी फाउंडेशनच्या पुढाकारानेच हे कार्य होऊ घातले आहे.
भूगर्भातील नद्याही जिवंत करणार
वाठोडा गावातील जमिनीच्या पोटात गुडूप झालेल्या नद्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई सर्वेक्षणाद्वारे शोधण्यात आल्या आहेत. त्या कशा जिवंत करावयाच्या याबाबत गावकऱ्यांना माहिती देऊन त्या नद्या पुन्हा प्रवाहित केल्या जातील. दिल्लीच्या यूएनडीपी या संस्थेद्वारे ही मोहीम पूर्णत्वास नेली जात आहे.
वॉटर कप : पाच
आमीर खानच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘पानी फाउंडेशन’ने यावर्षीच्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या ११६ गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्र केले आणि गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच अडवण्यासाठी लोकांच्या हाती कुदळी आणि फावडी आली.
सरकारवर अवलंबून न राहता आपले पाणी आपणच अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झालेल्या या स्वयंस्फूर्त संघर्षाच्या यशोगाथांनी ग्रामीण महाराष्ट्रात एक नवे चैतन्य आणले आहे. पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत पहिला-दुसरा क्रमांक मिळवणारी सातारा जिल्ह्यातली वेळू , जायगाव ही दोन गावं आणि बीड जिल्ह्यातल्या खापरटोनची भटकंती झाली. अंबाजोगाई तालुक्यातल्या राडीतांडा या गावाचीही गेल्या आठवड्यात भेट झाली. आज भेट आणखी एका गावाची. विभागून तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विदर्भातल्या वरुड तालुक्याच्या वाठोडा गावाची.
(लेखक 'लोकमत'च्या अमरावती युनिट कार्यालयात संपादकीय प्रमुख आहेत.)