‘ पंपलड्रॉप्स’ चे स्वप्न !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 04:53 PM2019-04-08T16:53:19+5:302019-04-08T16:54:12+5:30
डब्ल्यू. जे. टर्नर या लेखकाची ‘द मॅन हू सेव्हड पंपलड्रॉप्स’ नावाची वरील कथा प्रसिद्ध आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी हीच कथा वाचली असावी.
- अविनाश थोरात-
पंपलड्रॉप्स नावाच्या शहरावर आर्थिक मंदीचे मळभ दाटलेले होते. व्यापार-उदीम ठप्प पडले होते, लोक पैसे खर्च करायलाच तयार नव्हते. सगळ्या वातावरणात निँँराशा भरलेली होती. या वेळी एका मोटार विक्रेत्याकडे सुटाबुटातील माणूस आला. त्याने दुकानमालकाला सांगितले, की पुढच्या महिन्यात आमच्या कंपनीची बिझनेस कॉन्फरन्स आहे. देश-परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांसमोर माझा रुबाब पडायला पाहिजे. यासाठी रोल्स राईस मोटारीची खरेदी करायची आहे. यासाठी १० टक्के आगाऊ रकमेचा चेकही त्याने दिला. बिझनेस कॉन्फरन्स होतेय याचा अर्थ नक्कीच उद्योगांसाठी नवी धोरणे ठरविली जात आहेत. त्यामुळे उद्योजक आता गाड्या खरेदी करतील. म्हणून मालकाने शोरूम सजविली, रोषणाई केली. त्याची पत्नी अनेक दिवसांपासून नेकलेसची मागणी करत होती. व्यवसाय वाढणार असल्याने त्याने पत्नीला नेकलेस बुक करायला सांगितला. तिने लगेच सराफाकडे जाऊन चांगला महागाचा नेकलेस बुक केला. या वातावरणात आलेली एवढी मोठी आॅर्डर पाहून सराफानेही दुकानाची सजावट केली. आपल्या पत्नीची खूप दिवसांची मागणी असलेल्या कपड्यांची खरेदी करण्याची परवानगी दिली. कपड्याच्या दुकानातही इतकी चांगली मागणी आल्याचे पाहून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अशा तºहेने साखळी सुरू झाली आणि शहरातील व्यवसायांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. बाजारपेठा सजू लागल्या. आसपासच्या गावांतील लोकापर्यंत ही माहिती पोहोचली. तेदेखील शहरात फिरण्यासाठी येऊ लागले. खरेदी करू लागले. चलन-वलन वाढले. बाजारपेठांत उत्साह निर्माण झाला. खरेदी-विक्रीही वाढली आणि पंपलड्रॉप्समधील अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आली.
काही दिवसांनी समजले, की सुटाबुटातील माणूस हा वेड्यांच्या इस्पितळातून पळाला होता. त्यानेच रोल्स राईस विकत घेण्यासाठी चेक दिला होता. मात्र, मोटारविक्रेत्याला काही काळजी नव्हती. त्याच्याकडे आणखी एका रोल्स राईसची आॅर्डर आली होती. शहरातील एका पोलाद कारखानदाराकडे खूप मोठी आॅर्डर आली होती. एका बड्या खानदानातील मानसिक रुग्ण पळाल्याने इस्पितळाभोवती संरक्षक जाळी उभारायची होती. डब्ल्यू. जे. टर्नर या लेखकाची ‘द मॅन हू सेव्हड पंपलड्रॉप्स’ नावाची वरील कथा प्रसिद्ध आहे. एका शहराची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था यांच्यात फरक असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी हीच कथा वाचली असावी. कॉँग्रेसच्या मंडळींनी तर तिच्यावर थोडा जास्तच विश्वास ठेवलेला दिसतोय.
देशातील २० टक्के गरिबांना महिन्याला सहा हजार रुपयांचे हमखास उत्पन्न देण्याची घोषणा कॉँग्रेसने केली आहे. या योजनेसाठी पैसा कसा आणणार यावर पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी उत्तर दिले, की गरिबांकडे पैसे आले की ते खर्च करायला लागतील. त्याच्यातून व्यापार वाढेल. उद्योगांचे उत्पादन वाढेल. यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छोट्या शेतकºयांच्या खात्यात २ हजार रुपये टाकण्याच्या योजनेसाठी पैसे कसे आणणार यावर उत्तर देतानाच याच पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये चैतन्य येईल. त्यातून सरकारचे उत्पन्न वाढेल, असे सांगितले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खरोखरच अशी झालीय का? नोटाबंदीच्या संकटानंतर लोक पैसे खर्च करायला तयार नाहीत असे म्हटले जातेय ते खरे आहे का? गेल्या काही वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीकडे पाहिल्यावर लक्षात येते की सेवा उद्योग वाढतोय. मध्यमवर्गीय हा सर्वांत मोठा खरेदीदार. या वर्गाची मोठी संख्या हे भारताचे सर्वांत मोठे बळ मानले जाते. महिना सहा हजार रुपये हमखास उत्पन्न मिळू लागल्यावर हा वर्ग मध्यमवर्गीय नाही पण किमान कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये जाईल. खरेदी करण्याइतपत सक्षम होईल, असा आशावाद तर वाटत नाही ना?
देशाच्या इतिहासात इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’ पासून ते नरेंद्र मोदींच्या ‘अच्छे दिन आएंगे’पर्यंत अनेक घोषणा दिल्या गेल्या. त्याचा निवडणुकांवर परिणामही झाला. मात्र, निश्चित योजना आखून जनतेला नक्की काय मिळणार हे भाजप आणि कॉँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी प्रथमच सांगितले आहे. १९९१ पासून झालेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणापासून हा ‘यू टर्न’ आहे. तथाकथित आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या ठोकळ राष्टÑीय उत्पन्नात वाढ झाली. मात्र, गरीब-श्रीमंतातील दरी रुंदावत चालली. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. पण एसटीच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्या, पैसे नसल्याने ओरिसासारख्या राज्यात खांद्यावर पत्नीचा मृतदेह वाहून नेल्याच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांना गरिबांची आठवण झाली. कदाचित पंपलड्रॉप्समधील सुटाबुटात आलेल्या माणसाने दिला होता तशाच या आश्वासनांचा खोटा चेकही असेल. पण त्यामुळे अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन चालू तरी होईल!
लेखक लोकमत’मध्ये
मुख्य उपसंपादक आहेत.)