- विजय दिवाण
लातूर शहराला मांजरा नदीवर बांधलेल्या धनेगाव धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. १९८३ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २२५ दशलक्ष घनमीटर आहे, असे सांगितले जात होते; परंतु हे धरण गेल्या ३५ वर्षांमध्ये केवळ १३ वेळा पूर्णपणे भरू शकले. २०११ सालानंतर सततच्या अवर्षणामुळे या धनेगाव धरणातील पाणीसाठा कमी कमी होत गेला आणि २०१६ साली फेब्रुवारी महिन्यात तो पूर्णपणे संपला. तेव्हा लातूर शहराला होणारा पाणीपुरवठाही बंद पडला होता. त्यावेळी लातूरसाठी पन्नास डब्यांच्या रेल्वे-मालगाडीने मिरजेहून पाणी आयात करण्याची नामुष्की ओढवली होती. लातूर शहराखेरीज लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, लोहारा, भालगाव, युसूफ वडगाव, माळेगाव, केज, धार आणि अंबाजोगाईचा पाणीपुरवठादेखील मांजरा नदीद्वारे होत असतो.
मांजरा नदीतून तेलंगणातील हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांनाही पाणीपुरवठा होतो. गेल्या तीन दशकांमध्ये हैदराबाद शहराचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यासोबतच हैदराबादच्या परिघावर निरनिराळ्या औद्योगिक वसाहतीही निर्माण झालेल्या आहेत. त्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे तेथे मांजरा नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. हैदराबादेत असणाऱ्या (उठखऊअ) ‘कोरडवाहू शेतीविषयक केंद्रीय संशोधन संस्थे’च्या एक संशोधिका डॉ. कौसल्या रामचंद्रन यांनी आपल्या प्रबंधात ते नमूद केलेले आहे. त्या म्हणतात, की मांजरा नदी आणि तीवर बांधलेल्या धरणाचा निजामसागर तलाव यांचे पाणी आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतींतील प्रक्रियाविरहित सांडपाण्यामुळे कमालीचे प्रदूषित झालेले आहे.
हैदराबादनजीक मांजरा नदीपासून १५ किलोमीटर अंतरावरील गड्डापोथरम, बोलारम आणि पटणचे येथील औद्योगिक वसाहती या प्रदूषणास जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मांजरा आणि निजामसागर याप्रमाणे हैदराबादेतील एसा नदीवरील हिमायतसागर आणि मुसा नदीवरील उस्मानसागर तलावांचे पाणीही प्रदूषित झालेले आहे, असे रामचंद्रन यांचे सांगणे आहे. मांजरा नदीच्या प्रभावक्षेत्रात हैदराबाद शहरात एकूण १५९ कारखाने आहेत. शिवाय मेदक जिल्ह्यात ९६ आणि रंगारेड्डी जिल्ह्यात ५५ कारखाने असे आहेत, ज्यातून औषधे, रसायने, पेट्रोकेमिकल्स, आॅइलपेंट्स इत्यादींचे उत्पादन होते. त्यामुळे मांजरा नदीसोबत तेथील जमीन आणि भूजलही प्रदूषित होत आहे. हैदराबादमधील (छॠठख) ‘राष्ट्रीय भूवैज्ञानिक संशोधन’ संस्थेचे उपसंचालक डॉ. पी. के. गोविल यांनीदेखील पटणचे भागांतील क्रोमियम, निकेल आणि शिसे यांच्या साठ्यांमुळे मांजरा नदी व आसपासचे तलाव यांचे पाणी कसे प्रदूषित होत आहे, हे त्यांच्या प्रबंधात नमूद केलेले आहे.