अंजना ठमके
राष्ट्रकुल, आशियाई खेळांच्या रस्त्याने एके दिवशी आॅलिम्पिक पदकाची महत्त्वाकांक्षा धरून स्पर्धेत धावणारी अंजना ठमके ही देशोदेशीची मैदानं गाजवणारी खेळाडू! आदिवासी खेड्यातल्या मजुरीत आयुष्य सरलेल्या तिच्या वडिलांना त्यांच्या शेताबाहेरचं जग सोडा, देश सोडा, तालुकाही माहिती नाही... अंजना म्हणते, परिस्थिती बदलली, पण कष्ट नाही संपले!तू आणि तुझे आईवडील यांच्या आयुष्यात काय फरक आहे?- विशेष काहीही फरक नाही. माझी आई नंदा व वडील ढवळू ठमके यांच्या लहानपणी जशी गरिबी होती, सोयीसुविधांचा अभाव होता, शिक्षणाची संधी नव्हती आणि जगण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते, तशीच परिस्थिती माझ्या बालपणी होती. फरक म्हणाल तर त्या कष्टांबरोबर मी शिक्षण पूर्ण करत राहिले. त्यांनी मात्र शिक्षणाची गाडी मध्येच सोडून दिली. आईने तर कधी शाळेचे तोंडही पाहिले नाही. लहानपणापासून शिक्षण पूर्ण करताना त्यांच्यासारखेच कष्ट मला करावे लागले. रानावनात हिंडणं हे आम्हा दोघांच्याही नशिबी होतं. अजूनही आहे. गणेशगाव म्हणजे त्र्यंबकचा आदिवासी पाड्यांचा परिसर. हे माझं गाव. इथे शाळा नाही. मी शिकायला मामाकडे गेले, हा त्यांच्या-माझ्यातला पहिला फरक. शाळेत गेल्यानंतर आईवडिलांपेक्षा दोन गोष्टी जास्त कळू लागल्या, दुनियादारी कळू लागली एवढाच काय तो फरक. आज मी कॉलेजात शिकते, खेळते म्हणून माझ्या आई-वडिलांपेक्षा थोडे स्थैर्य आले.. पण कष्ट आणि संघर्ष चुकले नाहीत. ना त्यांना, ना मला.आपल्या आईवडिलांपेक्षा आपण वेगळं काही करू शकतो अशी उमेद तुला कधी आणि कशी वाटली?- पहिली ते पाचवीपर्यंत मी माझ्या मामाच्या गावी नाईकवाडीला शिकले. नंतर सहावी-सातवीसाठीे गिरणारे गावातील के. बी. एच. शाळा. नाईकवाडीपासून गिरणारे आठ किलोमीटर आहे. हे अंतर आम्ही विद्यार्थी रोज पायी चालून पार करायचो. म्हणजे जवळजवळ १५ किलोमीटर चालणं व्हायचं. हे कधी चालून, तर कधी पळून पार करायचो. शाळेसाठी रोज एवढे अंतर चालून येतो, पळत येतो हे पाहून माझ्या शिक्षिका रूपाली बाप्ते यांनी मला रनिंगमध्ये भाग घेण्याविषयी सुचवलं. त्या मला नाशिकला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. स्पर्धेदरम्यान पोटच्या पोरीसारखी माझी ठेप ठेवली. २०१० साली एका स्पर्धेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा नाशिक पाहिलं. हे मोठं शहर, एवढाली वाहनं, माणसं, दुकानं सगळं नवीन. ती स्पर्धा खरंतर मी हरले, पण त्या पराभवानेच माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. याच शहरात मला माझे प्रशिक्षक विजेंदर सिंग सर भेटले. ते म्हणाले, तू नाशिकला आलीस, सराव केलास तर एक दिवस मोठी स्टार होशील. ठरव आणि नाशिकला ये.!मग मी आठवीपासून नाशिकला आले. भोसलाच्या विद्या प्रबोधिनीने बारा विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते, त्यात माझाही समावेश होता. आठवीत असताना पहिलं सुवर्णपदक मिळवलं. मग नववीत हरिद्वार, पूर्ण येथे झालेल्या स्पर्धांमधून तीन सुवर्णपदकं मिळाली. मग सुरू झाली मालिका. त्यानंतर एशियन गेम्समध्ये पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवलं. ब्राझीलच्या जागतिक शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं. आज पदवीच्या प्रथम वर्षात शिकते आहे आणि २०१७ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ युथ आणि राष्ट्रकुल स्पर्धांची तयारी करते आहे.तुझ्या आईबाबांचं आयुष्य अभावात गेलं, पण त्यांच्याकडे असे काय होते, ज्यात ते समाधानी होते आणि त्यांच्याकडची ती गोष्ट आज तुझ्याकडे नाही?- माझी आई पूर्ण निरक्षर. वडील चौथीपर्यंत शिकले. त्यामुळे शिक्षण, त्यातून आलेलं शहाणपण, पडलेले प्रश्न असं काहीही त्यांच्या वाट्याला आलं नाही. कष्ट, जिद्द यामुळे ते त्यांच्या आहे त्या जीवनात सुखी आणि समाधानी होते. रोजची चूल कशी पेटेल एवढीच काळजी! यश, समृद्धीची ओळख नव्हती, त्यामुळे कधी अमुक एक गोष्ट नसल्याची अस्वस्थता त्यांच्या वाट्याला आली नाही. त्या दोघांना मी कधीही काळजीत, तणावात पाहिलं नाही. माझ्या वाट्याला ही अज्ञानातली का असेना, शांतता, समाधान नाही.परीक्षेचं, स्पर्धांमधल्या यशाचं, माझ्या फॉर्मचं टेन्शन सतत असतं. अर्थात, हे सारे मी स्वत: निवडलेले आहे आणि हे सारे करता येते म्हणून मी समाधानीही आहे. पण कधीकधी वाटतं, ते शांत, स्वस्थ मन परत मिळावं आपल्याला!भारतापेक्षा जगाच्या वेगळ्या भागात जायला, तिथे राहायला आवडेल का तुला?मी स्पर्धांच्या निमित्ताने चीन, मलेशिया, ब्राझील या तीन देशांमध्ये जाऊन आलेय. आधी तर मी वेड्यासारखी नुस्ती बघतच बसायची. तिकडल्या खूप गोष्टी आवडतात मला. चीन हा देश खूप आवडला. तिथे जायला, काही दिवस राहायलाही आवडेल. बाकीचे देश पण बघायला आवडतील मला. पण कायमस्वरूपी विचाराल तर नाशिक आणि गणेशगाव, गिरणारे इथेच मला जास्त आवडतं.