- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधीस्वतःचा व्यवसाय असो किंवा अन्य फ्री लान्स काम, आपलं स्वतःचं ऑफिस असलंच पाहिजे, अशी परिस्थिती आता नाही. एकतर लॉकडाऊनमुळे लोक घरातून काम करू लागले आणि त्यालाही आता उपलब्ध झालेला उत्तम पर्याय म्हणजे, ‘ओन युअर ऑफिस स्पेस’. अर्थात, भाडेतत्त्वावर काही तासांसाठी मिळणारी तुमची हक्काची ऑफिसची जागा! काय आहे ही स्टार्टअप संकल्पना? हा व्यवसाय कसा चालतो आणि तुम्हा-आम्हालाही हा व्यवसात मुख्य उत्पन्न किंवा अतिरिक्त उत्पन्न म्हणून करणे शक्य आहे का?
संकल्पना काय आहे?मोठ्या शहरांतून आता व्यावसायिक जागांचे दर गगनाला भिडल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना स्वतःचे ऑफिस घेणे शक्य होत नाही. पण प्रत्येक वेळी घरातून काम करणे शक्य होतेच असे नाही. लोकांची होणाऱ्या या गैरसोयीतून मार्ग काढण्यासाठी ‘ओन युअर ऑफिस स्पेस’, या अभिनव संकल्पनेचा जन्म २०१५ च्या आसपास झाला. प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अशा काही महत्त्वाच्या शहरांतून या संकल्पनेने जोर धरला. या संकल्पनेअंतर्गत एका मोठ्या व्यावसायिक गाळ्यामधे अथवा कार्यालयामध्ये छोटे छोटे वर्क स्टेशन्स, केबिन्स तयार केली जातात. यामध्ये प्रत्येक केबिनमध्ये वेगवान इंटरनेट, एसी, लँडलाईन फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याखेरीज लहान आणि मोठ्या आकाराचे सुसज्ज कॉन्फरन्स हॉलदेखील तयार केले जातात. हा व्यवसाय कसा चालतो? अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे इंजिनीयर भारतामध्ये काम करतात. अशा लोकांकरिता या कंपन्यांनी स्वतंत्र ऑफिस घेतलेले नाही. हे लोक अशा ‘ओन युवर ऑफिस स्पेस’, जागेमध्ये महिन्याचे पैसे भरून कार्यालयीन सुविधेचा फायदा घेतात. इथे येणाऱ्या लोकांकडून शहरनिहाय भाडे आकारणी होते. भाड्याच्या या किमतीमध्ये जागेची किंमत काही प्रमाणात, विजेचा वापर, इंटरनेट आदी गोष्टी विचारात घेऊन भाड्याची आकारणी होते. तुम्हाला हा व्यवसाय करणे शक्य आहे का? तुमच्याकडे एखाद्या मुख्य शहरांत मोक्याच्या ठिकाणी तुमच्या मालकीची जागा हवी. अर्थात, जागा मालकीचीच असावी असा काही नियम नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये काही लोकांनी भाडेतत्त्वावर जागा घेत, तिथे कार्यालयीन सेटअप उभा केला आहे आणि त्या माध्यमातून हे लोक हा व्यवसाय करत आहेत. आता दुसरा मुद्दा आहे भांडवलाचा. कार्यालयीन सेवा देण्यासाठी आवश्यक ते इंटिरियर करणे, इंटरनेट, एसी, कॅन्टिन आदी सुविधा उपलब्ध करणे याकरिता मुख्य भांडवल खर्ची पडते. पण, इंटिरियरकरिता बँकांतर्फे कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.