- डॉ. जगन्नाथ दीक्षित* तुम्ही सुचवलेल्या ‘एफर्टलेस वेटलॉस डाएट प्लान’ला मिळालेला पाठिंबा आणि त्यानुसार आपल्या दिनचर्येत बदल करणाऱ्या लोकांची वाढती संख्या हे सारंच विलक्षण आहे. यामागे काय रहस्य असावं, असं तुम्हाला वाटतं?- मुळात यात रहस्य वगैरे काहीही नाही. मी जे काही सांगतो, ते शास्त्र आहे. किचकट विषय आणखी क्लिष्ट करून सांगितला तर तो लोकांच्या डोक्यावरून जातो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्या, सोप्या भाषेत आहारासंदर्भाची माहिती मी मांडतो. लोकांना रॉकेट सायन्स कळत नाही; पण विज्ञानाचा कार्यकारणभाव समजला तर लोक त्याप्रमाणे आचरण करतात. आपलं आरोग्य चांगलं राहावं, वजन आटोक्यात असावं, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. शिवाय ज्यांनी ज्यांनी या आहारपद्धतीचा वापर केला, त्यांना फायदा झाला. फायदा झालेले लोक सर्वसामान्य माणसांच्या परिचयाचे, त्यांच्या आसपास राहणारे, त्यांच्या माहितीतले आहेत. परिचितांमधील हा बदल लोकांना प्रत्यक्ष दिसला. त्यामुळे त्यांचाही या आहारपद्धतीवर विश्वास बसला आणि आपसूक त्याचा प्रसार झाला. शिवाय ज्या माणसानं ही पद्धती सुचवली आहे, त्याला त्यातून एक पैसाही मिळवण्याची अपेक्षा नाही, तो स्वत: वयाच्या पन्नाशीनंतरही २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन पळू शकतो, याचाही काही परिणाम होत असावाच!* याआधी ‘डाएट’ हे मुख्यत: सेलिब्रिटी, उच्चवर्गीय लोकांशी संबंधित होतं. तुमच्या पद्धतीने सर्वसामान्य मध्यमवर्गीय, अगदी कष्टकरी लोकांनाही आपल्या आहारामध्ये बदलाची गरज वाटली, पटलीही...- आजकाल लाइफस्टाइल डिसआॅर्डर्स प्रत्येकालाच आहेत. श्रीमंतांची त्यावर मक्तेदारी राहिलेली नाही. माझ्यासह अनेकांना या आहारपद्धतीचा फायदा झाला आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांची तळमळही लोकांना भावते. शिवाय कोणतेही खर्चिक उपाय आम्ही सांगत नाहीत, तुम्ही काल जे खात होता, तेच आजही खा, त्यामागचं शास्त्र फक्त समजून घ्या, एवढंच आम्ही लोकांना सांगतो. लोकांना ते पटतं.* स्थौल्य हे भारतीय बांध्याशी तसं विसंगतच; पण आज आपण त्याचे बळी ठरतो आहोत. भारतीयांची पारंपरिक सडसडीत शरीरयष्टी बदलण्यामागे कोणकोणती कारणं तुम्हाला दिसतात?- आज प्रत्येकाचीच जीवनशैली विसंगत झालेली आहे. गरज नसताना अनेकदा खाणं, व्यायाम नाही, कष्ट नाही, खाण्याची ‘उपलब्धता’ही वाढलेली आहे. पूर्वी साधी हॉटेल्सही फारशी दिसत नव्हती. आता तोंडात टाकण्यासाठी गल्लीच्या कानाकोपऱ्यावर तुम्हाला काही ना काही उपलब्ध आहे. गावागावांतली तरुण पोरं चहा, गुटखा येता-जाता तोंडात कोंबताना दिसतात. वाढलेलं वजन आणि आलेलं स्थुलत्व, शैथिल्य सहजपणे पाहायला मिळतं. अशा वातावरणात अंगकाठी सडसडीत, शिडशिडीत राहणार कशी?* वाढीच्या वयातल्या मुलांमधली स्थूलता हा मोठाच काळजीचा विषय होऊन बसला आहे. त्याला अटकाव कसा करता येईल?- मुलं आज मैदानावर नाही, तर मोबाइलवर फुटबॉल खेळताना दिसतात. मुलांना खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी लावण्याबाबत आपणही जबाबदार आहोत. येता-जाता त्यांच्या हातात गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट, कॅडबरी.. आपणच देतो. शाळेतही मार्कांपुढे शारीरिक शिक्षणाचं महत्त्व अगदीच कमी झालंय. मुलं जर मैदानात खेळत असतील, तर ‘व्यायाम कर’ असं त्यांना वेगळं सांगण्याची गरजच उरत नाही. कारण खेळातून सर्वांगीण व्यायाम होतो. शाळा, कॉलेजांतल्या कॅन्टिनमध्येही मुलांना काय खायला मिळतं? - फक्त जंक फूड! ज्यात तेल, मीठ, साखर अतिरेकी प्रमाणात आहेत असे पदार्थ. कोल्ड्रिंक्स ! कुठल्याही कॅन्टिनमध्ये तुम्हाला खिचडी किंवा थालीपीठ मिळणार नाही! क्लासेसच्या धबडग्यात मुलांना वेळ नसतो, मुलं खात नाहीत अशी ओरड करताना ‘निदान काही तरी खा’, म्हणून आपणच त्यांच्यापुढे टू मिनिटवाल्या नूडल्सची डिश ठेवतो.नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या सहयोगातून नाशिकमध्ये आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नुकतंच ‘विद्यार्थी जागृती अभियान’ सुरू केलं आहे. त्यासंदर्भातलं एक प्रशिक्षण झालं आहे. दिवसातून दोनदाच खा, असं न सांगता, दिवसातून चारदा खा, खेळा, पळा, जंक फूड, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहा, असं या मुलांना आम्ही सांगतो. हा उपक्रम लवकरच दोन लाख मुलांपर्यंत जाईल आणि राज्यात इतरही ठिकाणी पोहोचेल असा विश्वास आहे.* एका बाजूला कुपोषण-मुक्तीचे प्रश्न आणि दुसरीकडे स्थूलता-निवारणाची काळजी, असा विसंगत पेच भारताच्या वाट्याला येण्याची कोणती कारणं तुम्हाला दिसतात?- आपल्या देशातच दोन देश आहेत. एक आहे अमेरिकेसारखा गर्भश्रीमंत, तर दुसरा इथिओपियासारखा सर्वार्थानं वंचित. १२५ कोटींपेक्षाही अधिक लोकसंख्येच्या आपल्या देशात सामाजिक, आर्थिक आणि इतरही विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. एका गटाकडे साºयाच गोष्टींची विपुलता, तर दुसºया गटाला रोज खायला मिळेल एवढंही अन्न नाही. त्यात शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, अज्ञान, अंधश्रद्धा, मांत्रिक, वैदू, गरिबी, तेरा-चौदाव्या वर्षीच मुलींची लग्नं, वयाच्या विशीपर्यंत त्यांच्या पदरात दोन-तीन मुलं, जिला स्वत:चीच काळजी घेता येत नाही, ती मुलांची काळजी काय घेणार अशी परिस्थिती.. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ची दरी आपल्याकडे खूप मोठी आहे. त्यासाठीच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांतूनच या दरीचा विस्तार आपल्याला कमी करता येईल.
(मुलाखत : प्रतिनिधी)
manthan@lokmat.com