- भाऊसाहेब चासकर
‘खरं तर परीक्षाच नसाव्यात; पण तुम्ही त्या घेतल्याच तर किमान सचोटी तरी ठेवा. अडचणीदेखील प्रत्यक्ष आयुष्यात येणार्या अडचणीच्या प्रमाणातच निवडल्या जायला हव्यात. तुम्ही वारंवार अवघड प्रश्नच निवडाल तर दुसर्याला सापळ्यात पकडण्याचा हा गंड तुम्हाला भोवतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. जणू तुम्ही मुलांविरु द्ध युद्धच पुकारलं आहे ! असं का वागता तुम्ही?.’- ‘प्रिय बाई’ या जगभर गाजलेल्या पुस्तकात परीक्षेविषयी मुलांनी आपले मनोगत वरील शब्दांत व्यक्त केले आहे. परीक्षा म्हणजे शिक्षण व्यवस्थेने आमच्याविरु द्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना का वाटतेय?. याची आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत यंदा उत्तीर्णांचे प्रमाण बारा टक्क्यांनी घटले आहे. एकूण 16.19 लाख विद्यार्थ्यांपैकी 12.47 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत 12.31 टक्के निकाल कमी झाला आहे. तब्बल तीन लाख 72 हजारांहून अधिक विद्यार्थी नापास झालेले आहेत ! 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटलीय..अभ्यासक्र म बदलेला होता, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नेहमीपेक्षा वेगळे होते, मुलांना हे नवीन होते.. अशी कारणे पुढे केली जात असली त्यात तितकेसे तथ्य नाही. अभ्यासक्रम किंवा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही पहिल्यांदा बदललेले नाहीये. शिक्षणात असे बदल वरचेवर होतच असतात. अंतर्गत मूल्यमापनाचे गुण काढून घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे.काळजीत टाकणारी बाब म्हणजे यंदा सुमारे पावणेचार लाख मुलांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारणे ! नापास केल्याने विद्यार्थी शिकतात, असे कोणतेही संशोधन उपलब्ध नाही. आयुष्यातल्या महत्त्वाच्या वळणावर परीक्षेने अपयशी ठरवल्याने बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची भीती आहे.गुण मिळविणे हे एक कौशल्य असते. परीक्षा पद्धत नीट समजून घेतली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव केला, पेपर लिहायचे तंत्न अवगत केले, की गुण मिळवता येतात. पैसे खर्च करून लावलेल्या खासगी शिकवणीवर्गामध्ये हेच तंत्न घोटून घेतले जाते. घरात शिक्षणाला पोषक वातावरण असेल, आर्थिक स्थिती चांगली असल्यास गाइड, स्वाध्याय विकत घेता येतात. आईवडील शिक्षित असलेल्या घरातली मुले शाळेत आल्यानंतर पटकन बोलू-लिहू-वाचू लागतात. म्हणजे साक्षर होतात. शालेय शिक्षणात साक्षरतेला अनुसरूनच मूल्यमापन होते. गुण मिळवलेल्या मुलांना ‘गुणवान’ समजले जाते. वर्गात अशाच मुलांकडे बघून, शिकवणार्या शिक्षकांची संख्या मोठी असते. याच मुलांच्या कथित यशाचे कौतुक सोहळे शाळा-शिक्षक साजरे करत राहतात. या सगळ्यातून शाळेतल्या बोटावर मोजण्याइतक्या मुलांचा आत्मविश्वास भरपूर उंचावतो. गुण मिळाल्याने पुढे शिकण्याच्या-रोजगाराच्या अनेक संधी त्यांच्यासाठी खुल्या होतात. आजची शिक्षणपद्धती स्मरणशक्ती बरी असलेल्या ‘कथित हुशार’ मुलांना पुढे घेऊन जाणारी आहे, अशी टीका त्यामुळेच होते.आर्थिक स्थिती बेताची असेल, घरात सोयीसुविधा नसतील, परीक्षांची तयारी करून घेणारी शाळा नसेल तर सर्वच मुलांना हे तंत्न जमणे शक्य नाही. घरात शिक्षणाला पूरक ‘सांस्कृतिक भांडवल’ अजिबात नसलेल्या कुटुंबातल्या मुलांकडे लिहून व्यक्त होण्याचे कौशल्य मुळात कमी असते. पाठय़पुस्तकांतला शिक्षणाचा आशय त्यांच्या जगण्याशी मेळ खात नसतो. परीक्षेसाठी आवश्यक असलेले पाठांतर/स्मरणशक्ती हे ‘भांडवल’ नसलेल्या मुलांना लेखी परीक्षा प्रचंड अवघड जाते. ही मुले परीक्षांत अपयशी होण्याची शक्यता वाढते. इथे खरी लवचिकतेची गरज असते. नापास होणारे बहुसंख्य विद्यार्थी साधारणपणे वंचित, गरीब, मागास, अल्पसंख्याक असतात.नापास होणे म्हणजे भयंकर अपयशी होणे, अशी धारणा पक्की असलेल्या समाजात सन्मानाने जगण्या-वागण्याचा हक्क एकप्रकारे कथित नापास मुलांकडून हिरावून घेतला जातो. समाजातली आर्थिक विषमता हे याचे महत्त्वाचे कारण आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत गटातल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण हा जणू जन्मजात विशेषाधिकार मिळाला आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व निकालपत्नकाच्या आकड्यांत मावत नाही हे तात्त्विकदृष्ट्या कितीही योग्य असले तरीही परीक्षा आणि त्यात मिळालेले गुण हे शालेय आयुष्यातले नाकारता न येणारे क्रूर वास्तव आहे. नापासी विद्यार्थ्यांना ते आयुष्यभरासाठी अपराधभाव देऊन जाते. बहुसंख्य कोर्सेसला बारावीनंतरच प्रवेश मिळत असल्याने दहावीच्या परीक्षेचे महत्त्व पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. मोठय़ा संख्येने विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्याने मुलांना खासकरून मुलींना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी खुल्या राहात असतील तर मोठय़ा संख्येने मुलं पास झाल्याने काय बिघडणार आहे? विद्यार्थी नापास होतात, तेव्हा शिक्षक-शाळा-अभ्यासक्र म-बोर्ड-सरकार अशी सगळीच व्यवस्था नापास होते, हे कसे नाकारता येईल? राष्ट्रीय अभ्यासक्र म आराखड्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यापक व्याख्या करताना म्हटले आहे की, ‘केवळ संधीची समानता पुरेशी नाही तर निष्पत्तीची समानता आवश्यक आहे. जन्माने वाट्याला आलेल्या वंचनेवर मात करून स्वतंत्न आणि समान नागरिक म्हणून तयार करणारे शिक्षण होय.’ विषम स्थितीतील मुलांनी शिकून ‘विशेषाधिकार मिळालेल्या उन्नत गटातील’ मुलांशी स्पर्धा करत त्यांच्याबरोबरीने स्वत:ला सिद्ध करायचे हीच केवढी विषमतामुलक व्यवस्था आहे, जी वर्षानुवर्षे तशीच पोसली जातेय. याबद्दल प्रश्न विचारायला पाहिजेत.अंतर्गत मूल्यमापनाचे गुण काढून घेतल्याने 90 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळणार्या मुलांची संख्या निम्म्याने घटली. सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत स्पर्धा करून प्रतिष्ठित महाविद्यालयांत अकरावीत प्रवेश मिळणे अवघड होईल, हे लक्षात आल्यानंतर निकालाच्या दिवशी पालकांची ओरड सुरू झाली. ‘आवाज’ असलेल्या पालकांचा आवाज माध्यमांनी आणखी मोठा केला. तक्र ार घेऊन पालक-शाळाचालक शिक्षणमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. इतक्या मोठय़ा संख्येने नापास झालेल्या मुलांना, पालकांना मात्र आवाज नाही. दाद मागायला या हरवलेल्या आवाजाची फिर्याद व्यवस्थेपर्यंत कशी पोहोचणार?.
‘निकाला’नं मुलींचं आयुष्य आक्रसेल..दहावीच्या घटलेल्या निकालाचा जास्त फटका मुलींना बसणार आहे. राज्यात 7.6 लाखांपैकी 6.2 लाख मुली पास झाल्यात. थोड्याथोडक्या नव्हे एक लाख 40 हजार मुली नापास झाल्यात. या मुलींचं पुढे काय होणार? राहिलेले विषय सोडवण्यासाठी खासगी शिकवणी लावायची यातल्या किती जणींची ऐपत आहे? शिकवणी नाही, शाळा-शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा स्थितीत किती जणी पुन्हा पुन्हा परीक्षा देतील? किती जणी पास होतील आणि शिक्षण पुढे सुरू ठेवतील? फारच थोड्या. एक तर गरीब, शिक्षणाचं वातावरण घरात नसलेल्या मुलीच नापास होणार्यांत अधिक संख्येने असतात. मुलींना शिकायची संधी मिळते तीच त्यांनी स्वत:ला सिद्ध करायच्या पूर्व अटीवर. नापास होणे, कमी गुण हे परवडणारे नाही हे त्या जाणतात. ग्रामीण भागात, शहरातल्या गरीब कुटुंबात अनेकींना घरकाम करून शाळेत जायला लागते. सोबत गुरंवासरं, धाकट्या भावंडांचा सांभाळ, शेतकामात मदत असे सगळे करायला लागते. त्यातून असे निकाल घटतात तेव्हा हजारो मुली एका फटक्यात शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या जातात. लगोलग लग्नाची चर्चा सुरू होते. कोवळ्या वयात मुली लग्नाच्या बेडीत अडकवल्या जातील. बालविवाह लावले जातील. अल्पवयातले मातृत्वाचे भोग त्यांच्या नशिबी येतील. निकाल घटतो तेव्हा मुलींचे आयुष्य असे आक्र सून जाते आणि शिक्षण यंत्नणा केवळ गळतीचे आकडे तेवढे नोंदवत राहते !
वाचन, संभाषण कमी दर्जाचे?दहावीला यंदा भाषा विषयाची तोंडी परीक्षा रद्द करून शंभर गुणांचा लेखी पेपर ठेवला. वास्तविक र्शवण, भाषण, वाचन, लेखन अशी भाषा शिक्षणाची मूलभूत क्षेत्ने आहेत. यात लेखन तेवढेच महत्त्वाचे आणि वाचन, भाषण-संभाषण ही क्षेत्ने कमी महत्त्वाची आहेत असे म्हणावयाचे आहे का? तोंडी परीक्षा म्हणजे करिअरच्या पुढील टप्प्यावरील मुलाखतीची पूर्वतयारी असते. सध्याच्या काळात संवाद कौशल्याचे वादातीत महत्त्व लक्षात घेता तोंडी परीक्षा रद्द करणे योग्य आहे का, याचा पुनर्विचार करायची गरज आहे.तोंडी परीक्षा रद्द करण्यासारखे महत्त्वाचे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्याआधी विद्यार्थी संघटना, पालक, विषय शिक्षक संघटना, शिक्षण क्षेत्नातले कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, अधिकारी यांच्याशी चर्चा, विचारविनिमय केला पाहिजे किंवा एखादी समिती नेमली पाहिजे. अंतर्गत गुणदानाच्या तर्हांमुळे शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तवदर्शी चित्न उभे राहात नाही, ती सूज असते, असा सूर आळवला जातो, त्याविषयी स्वतंत्न चर्चा होऊ शकते. पण म्हणून एक टोक सोडून दुसरे टोक गाठणे योग्य कसे होईल? लाखो मुलांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी जोडलेले धोरणात्मक निर्णय घेताना जास्त संवेदनशील असायला हवे.
(लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव शाळेत शिक्षक असून, अँक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक आहेत.)
bhauchaskar@gmail.com