अनिल गोरे|गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातून काढून मराठी माध्यम शाळेत दाखल केले. याबाबत वेळोवेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे व मुख्यमंत्री यांनी विधानसभेत माहिती दिली. जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी ना. विनोद तावडे यांनी केलेल्या प्रयत्नांचाही या माध्यम बदलात वाटा आहे.वरवर विचार करणाऱ्या अनेकांना वाटते की, ज्या पालकांना इंग्लिश माध्यमाचे अवाढव्य शुल्क झेपत नाही ते पालक असा बदल करतात. ही समजूत खरी नाही. मुलांना इंग्लिश माध्यमातून काढून मराठी माध्यमात दाखल करण्यामागे दोन्ही माध्यमातील फरकाचा महत्त्वाचा वाटा आहे. इंग्लिश भाषेत संवाद, संपर्क, संज्ञापनासाठी इंग्लिश वापरताना इंग्रजांनाही इतरांनाही प्रचंड गुंतागुंत, क्लिष्टतेला तोंड द्यावे लागते. बालकांच्या आकलन व अभिव्यक्ती दोन्ही बाबतीत इंग्लिशमधील गुंतागुंत व क्लिष्टतेमुळे मनावर येणारा असह्य ताण १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खरे तर झेपणारा नसतो. खुद्द इंग्लंडला इ. स. १८६० सालापासून इंग्लिश माध्यम सुरू झाले (तिथे पूर्वी कमी गुंतागुंतीची व कमी क्लिष्ट फ्रेंच किंवा लॅटिन भाषा शिक्षणाचे माध्यम असे.) तेव्हापासून इंग्लंडमधील शालेय शिक्षणाचा दर्जा सतत घसरला आहे. इंग्लिशच्या तुलनेने मराठी शब्द कमी अक्षरी असतात (सहा अक्षरी किंवा त्याहून मोठे १०० शब्द शोधून पहा). इंग्लिशच्या तुलनेने मराठी वाक्ये कमी शब्दांची असतात. इंग्लिश वाक्यात एखादा शब्द मागेपुढे झाला तर वाक्य चुकते; पण मराठीत चुकत नाही. मराठी शब्द उच्चारतानाच अर्थ सूचित करण्याचे प्रमाण मोठे तर इंग्लिश शब्दांत अर्थ सूचित करण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मराठी, इंग्लिश भाषांच्या प्रत्यक्ष वापरताना येणाºया फरकामुळे कोणताही विषय मराठीतून कमी वेळेत, कमी कष्टात सहज, सखोल स्वरूपात समजतो तर कोणताही विषय इंग्लिशमधून कळायला अधिक वेळ, अधिक कष्ट लागतात. इंग्लिशमधून संकल्पना सहज, सखोल स्वरूपात समजत नाहीत. इंग्लिशची ही त्रुटी इंग्लिश मातृभाषा असलेल्यांना, नसलेल्यांना सारखीच गैरसोयीची आहे.मराठी, इंग्रजीतील या भेदामुळेच मराठी माध्यम शाळा रोज स. ७.३० ते दु. १२.०० किंवा दु. १२.३० ते सा. ५.०० अशा साडेचार तासात जे शिकवतात तेच शिकवायला इंग्लिश माध्यम शाळांना रोज ६ ते ८ तास शाळा चालवाव्या लागतात. मराठी माध्यम विद्यार्थ्यांना एक, दोनच विषयाची शिकवणी लागते, तर इंग्लिश माध्यम विद्यार्थ्यांना सहा ते आठ तास शाळेत घालवूनही वर तीन ते चार तास सर्व शिकवण्यात जास्तीचे शिकणे भाग पडते. इंग्लिश माध्यम मुलांना यामुळे लहानपण अनुभवताच येत नाही, ती अकाली प्रौढ होतात तसेच चिडचिडी, अबोल, एकाकी बनतात. हे मानसिक ताण टाळण्यासाठीही अनेक पालकांनी मुलांचे माध्यम बदलून मराठी माध्यम निवडले.वरील विश्लेषण मी महाराष्ट्रात ५००हून अधिक व्याख्यानातून मांडले. या विश्लेषणाशी स्वत:चे व आपल्या मुलामुलींचे अनुभव पडताळून अनेक पालकांनी इंग्लिश माध्यम सोडून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी माध्यम शाळेत मुलांना दाखल केले. अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत सर्व इयत्तांतील मुलांसाठी पालकांनी असा बदल केला. उदा. सहावीपर्यंत इंग्लिश माध्यमात शिकलेले विद्यार्थी अचानक सातवीला मराठी माध्यमात आले तर त्यांचा अगोदरच मराठी माध्यमातील अभ्यास भरून काढून त्यांना सध्याच्या उदा. सातवीच्या वर्षातील अभ्यासक्र माशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने कसे तयार करावे याचे प्रशिक्षण अनुदानित मराठी माध्यम शाळा शिक्षकांना सरकारने दिलेले आहे. या प्रशिक्षणाच्या आधारे नव्याने मराठी माध्यमात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अडथळ्याविना उत्तम शिक्षण मिळते.अनुदानित मराठी माध्यमातील शिक्षकांना शासन भरपूर व नियमित वेतन, सवलती देते. अनुदानित मराठी माध्यम शाळांमध्ये शिक्षक पदासाठी ठरलेल्या कमीत कमी पात्रतेइतके शिक्षण असलेल्या उमेदवारांनाच शिक्षक म्हणून भरती केले जाईल यावर शासनाचे १०० टक्के नियंत्रण असते; पण खासगी विनाअनुदान शाळांवर असे सरकारचे नियंत्रण तितक्या प्रमाणात नसते. योग्य पात्रतेचे उमेदवार शिक्षक म्हणून नेमल्यावर अनुदानित मराठी माध्यम शिक्षकांना सरकार स्वखर्चाने, निवास, भोजन व्यवस्था, प्रोत्साहन भत्ता देऊन नियमित प्रशिक्षणही देते. पुरेसे वेतन असल्यामुळे अनुदानित मराठी माध्यम शाळेतील शिक्षक दीर्घकाळ शिक्षकी पेशात राहतात त्यामुळे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील शिकवण्याचा भाग, विद्यार्थ्यांचे वर्तन, विद्यार्थ्यांची हाताळणी यासंदर्भात अनुभवाने परिपक्व झालेल्या शिक्षकांची मोठी संख्या अनुदानित मराठी शाळांमध्ये आढळते. साहजिकच अनुदानित मराठी माध्यम शाळांतील शिकवणे आणि शिकणे दोन्हींचा दर्जा चांगला असतो.विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळांचे प्रचंड आकर्षण महाराष्ट्रात, भारतात सर्वत्र वाढत गेले तरी या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता किती याबाबत पालकांनी दीडशे वर्षे चौकशीच केली नव्हती.ही माहिती मिळविण्यासाठी मीदेखील बरीच चौकशी केली, पण कोणतीही शाळा माहिती देईना. अनुदानित मराठी माध्यम शाळेत शिक्षकांची नावे व नावांसमोर त्यांचे शिक्षण, पदव्या यांची माहिती दाखवणारी पाटी असते. अशी पाटी विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळेत बहुधा नसतेच. विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळा शिक्षकांना जे वेतन देतात ते अनुदानित मराठी माध्यम शिक्षकांच्या तुलनेने निम्म्याहून कमी किंवा काही ठिकाणी एकपंचमांश असते. अन्य सवलती तर नसतातच, शिवाय नोकरी कायम नसते, दरवर्षी नव्याने नेमणुका होतात. इतक्या कमी वेतनात फळ्यासमोर उभे राहायला जे तयार होतील त्यांना शिक्षक म्हणून नेमतात व नेमताना त्यांचे शिक्षण किती हे न पाहता अतिशय कमी पात्रतेचे किंवा अगदी दहावी नापास मंडळीदेखील शिक्षक म्हणून फळ्याजवळ उभी करतात. बहुसंख्य विनाअनुदान इंग्लिश शाळा धंदा म्हणून चालवतात, पालकांकडून कितीही भरमसाठ शुल्क घेतले तरी शिक्षकांना मात्र रखवालदार, मजुराहून कमी वेतन देतात. कमी वेतनात कामाच्या बदल्यात शिक्षकच्या पात्रतेशी म्हणजे पर्यायाने शिकवण्याच्या दर्जाशी तडजोड केली जाते. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्गांच्या शिक्षकांचे स्वत:चे किमान शिक्षण किती हे सरकारने निश्चित केले आहे. कमी वेतनात मिळतील तसे शिक्षक नेमून पालकांकडून भरपूर शुल्क वसूल करून अब्जाधीश होण्याचा धंदा चालवणाºया अनेक विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळा महाराष्ट्रात आहेत. सर्व शिक्षक सरकारने निश्चित केलेल्या शैक्षणिक पात्रतेचे आहेत अशी विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळा मी गेली दहा वर्षे शोधत आहे, कोणाला अशी शाळा आढळली तर त्याचे स्वागतच आहे.अशा अनेक शाळांमधील १०० टक्के शिक्षक सरकारने ठरवलेल्या पात्रतेहून खूप कमी पात्रतेचे असतात. अशी शिक्षकाचा अभिनय करणारी मंडळी केवळ दुसरे आवडीचे, अधिक उत्पन्नाचे काम मिळेपर्यंत विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळेत नाइलाजाने, शिकवण्याची मुळीच आवड नसतानाही शिक्षकाचा अभिनय करतात. असे शिक्षक दोन महिने ते एक वर्षात शाळा सोडून जातात. विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळेत कोणताही शिक्षक फार काळ टिकत नसल्याने अनुभवी शिक्षक या शाळांमधून निर्माणच होत नाहीत. त्याचा परिणाम होऊन अशा शाळांतील शिक्षणाचा दर्जा यथातथाच राहतो. अनेक पालकांना असा कमकुवत दर्जा जाणवल्याने त्यांनी इंग्लिश माध्यम सोडून मराठी माध्यम जवळ केले.माझ्या सर्व व्याख्यानांत मी पालकांना सुचविले की ज्यांची मुले विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळेत असतील त्यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांच्या शिक्षणाची, पदव्यांची माहिती घ्या. शैक्षणिक पात्रता योग्य असेल तर ठीक, नसेल तर तातडीने माध्यम बदलून मराठी माध्यम शाळा निवडा. असंख्य पालकांनी त्यांच्या मुलांच्या विनाअनुदान इंग्लिश माध्यम शाळेतील शिक्षकांच्या शिक्षणाबाबत माहिती विचारली. त्यांना मिळालेली उडवाउडवीची उत्तरे, टाळाटाळ पाहून पालकांनी गावोगावी इंग्लिश माध्यमातून मुले काढून अनुदानित मराठी माध्यम शाळेत घाताली. या बदलाने अनेक विद्यार्थी, पालक अतिशय समाधानी आहेत. खरे तर जिथे पूर्ण पात्रताधारक शिक्षक नाहीत, शिक्षक सतत शाळा सोडतात अशी प्रत्येक शाळा बंद होऊन त्याजागी अनुदानित मराठी माध्यम शाळाच सुरू झाली पाहिजे. येत्या काही वर्षात ते होणारच असा मला विश्वास वाटतो.(लेखक मराठी शाळा चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
इंग्रजी शाळेतून मराठीकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:57 PM