- सुकृत करंदीकर
रायगडावरचा हत्ती तलाव यंदाच्या पावसाळ्यात ओसंडून वाहिल्याची बातमी कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राला दिल्यानंतर रायगडावरच्यापाण्याची चर्चा मराठी मुलुखात सुरू झाली. स्वराज्याची राजधानी रायगडावरून आलेल्या या सुखद वार्तेनं कोरोनाच्या संकटकाळातही मराठी मनांमध्ये उत्साह भरला. ज्यांनी रायगडाला भेट दिली आहे त्यांच्या मनात ओसंडून वाहणार्या हत्ती तलावाच्या लाटा लहरू लागल्या, ज्यांनी रायगड अजून पाहिलाच नसेल त्यांच्या मनाला तोहत्ती तलाव जाऊन पाहण्याची ओढ लागली.शिवाजी महाराजांनी गडावरच्या प्रत्येक व्यवस्थेबद्दल नेमकं मार्गदर्शन करून ठेवलं आहे. रामचंद्रपंत अमात्यांची ‘आज्ञापत्रे’ हा विश्वासार्ह दस्तऐवज मानला जातो. एक तर ते स्वत: शिवकालीन होते. दस्तूरखुद्दशिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाई पुत्र शिवाजी या चारही छत्रपतींचे अमात्य म्हणून रामचंद्रपंतांनी जबाबदारी सांभाळली होती.शिवरायांच्या आज्ञा त्यांनी नोंदवून ठेवल्या आहेत. काही आज्ञा गडावरच्या जलव्यवस्थापनासंदर्भात आहेत. एक आहे, ‘पाणी बहुत जतन राखावे’. म्हणजेच जर गडावर पाणी नसेल तर पुढचं सगळंच खुंटलं. कारण गगनभेदी गडांवर पाणी चढवण्याची यंत्रणा त्या काळात होती कुठं? त्यामुळं ‘उदकपाहूनच गड बांधावा’ आणि असलेलं पाणी निगुतीनं राखावं अशा महाराजांच्या आज्ञा होत्या.रायगड साडेसातशे मीटर उंचीचा. या गडाचं क्षेत्रफळ सुमारे साडेबाराशे एकरांचं आहे. एवढय़ा उंचीवरच्या डोंगरी किल्ल्यावर स्वाभाविकपणे विहिरी, आड सहसा असत नाहीत. आढळतात ती टाकी आणि तलाव. काय फरक असतो दोन्हीत? दुर्ग अभ्यासक सचिन जोशी सांगतात की, टाकं हेछिन्नी, हातोड्यानं आकार देत खडकात खोदतात. त्याला चंद्रकोरीसारखा किंवा चौकोनी आकार दिला जातो. टाक्यांमध्ये जिवंत पाण्याचे झरे असू शकतात. तलावाचा तळतुलनेनं ओबडधोबड असतो. गडावरील बांधकामांसाठी दगड काढल्यानंतर जो खड्डा उरतो त्यात उतारावर भिंत बांधून पावसाळ्याचं पाणी अडवलं जातं. रायगडावर एक ना दोन 84 तलाव आणि टाकी आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठपुराव्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2017मध्ये रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. शिवरायांच्या राजधानीच्या आणि महाराष्ट्राच्या ऊर्जाकेंद्राच्या पुनर्निर्माणाचा उद्देश ठेवून हे प्राधिकरण अस्तित्वात आलं. गडावर कोणतंही काम करायचं तर पाणी हवं. पावसाळ्यात रायगडावर तुफानी बरसात होते. आकड्यात सांगायचं तर सरासरी चार हजार मिलिमीटर. तरी दिवाळीनंतर पाण्याची टंचाई भासते. कारण शिवकालीन पाणवठय़ांची देखभाल, दुरुस्ती गेल्या किमान दोनशे वर्षांत तरी कोणी केलेली नाही. त्यामुळंच रायगडाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हा प्राधान्य जलसाठय़ांच्या पुनरुज्जीवनाला प्राधान्य दिलं गेलं. हत्ती तलाव तुडुंब भरल्याची यशोगाथा हे याचंच प्रतीक.रायगड विकास प्राधिकरणात वास्तू संवर्धकाची जबाबदारी सांभाळणारे वरुण भामरे हे हत्ती तलावाच्या कामात पहिल्यापासून सहभागी आहेत. भामरे सांगतात, ‘‘पहिल्या टप्प्यात म्हणजे 2018 मधल्या मेच्या कडक उन्हात गडावरच्या 24 टाक्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली. गाळ काढण्यास सुरुवात केली. तीही शास्रीय पद्धतीनं. म्हणजे ओला गाळ काढला तर तो वाळवायचा आणि चाळून घ्यायचा. हेतू हाच की शिवकालीन वस्तू मिळाल्या तर त्याचं जतन व्हावं. यामुळंच मातीची अनेक भांडी, नाणी, शिवलिंग अशा शिवकालीन वस्तू हाती लागल्या.गाळ काढल्यानंतर 2018च्या पहिल्या पावसाळ्यात टाकं भरायचं; पण तितक्याच वेगानं रितंही व्हायचं. म्हणून त्या पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हत्ती टाक्याची विविधांगी व्हिडिओग्राफी केली. फोटो काढले. रेखाटनं चितारली गेली. या सगळ्याचं विश्लेषण पुरातत्व अभ्यासाचे तज्ज्ञ, अभियंते यांच्याकडून केलं. त्यामुळं गळती नेमकी कुठून होत असावी याचा अंदाज आला. जुनी रेकॉर्ड्स तपासल्यानंतर लक्षात आलं होतं की तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा हत्ती तलावाचं काम केलं असेल त्यानंतर पुन्हा कधी त्याची डागडुजी झालीच नव्हती, असे भामरेंनी स्पष्ट केलं.’’
शिवकाळात जेव्हा कधी हत्ती तलावाचं काम झालं असेल तेव्हा ते भक्कमच झालं होतं, असं सांगून भामरे म्हणाले की, हत्ती तलावाची पाहणी केल्यानंतर तीन फूट जाडीची भिंत बाहेरच्या बाजूला दिसली, तेवढीच तीन फुटी भिंत आतल्या बाजूला होती. या दोन्ही भिंतींमध्ये होती आठ फुटांची पोकळी. अभियांत्रिकी भाषेत ज्याला ‘कोअर’ म्हटलं जातं ती ही पोकळी ओबडधोबड तुकडे, कळीचा चुना टाकून भरली होती. याचा उद्देश काय असं विचारलं तेव्हा भामरे यांनी सांगितलं, ‘‘हा तलाव काहीसा उताराला आहे. पाण्याचा मोठा साठा झाल्यानंतर त्याचा दाब भिंतीला सहन झाला पाहिजे. त्यामुळं ही पोकळी ठेवली. एवढय़ा वषार्नंतर या पोकळीच्या दोन्ही बाजूंना असणार्या भिंतींना तडे गेले होते. त्यातून पाणी गळती होत होती. वेगवेगळ्या टप्प्यात घेतलेल्या निरीक्षणांमुळे गळतीची तीव्रता आणि ठिकाणं समजण्यास मदत झाली.’’ या सगळ्या अभ्यासानंतर यंदाच्या फेब्रुवारीत प्रत्यक्ष काम सुरू झालं. गळती थांबवण्यासाठी खास यंत्र बनवून घेण्यात आलं. या यंत्रानं अतिउच्च दाबानं पाणी सोडून भिंतींमधली पोकळी स्वच्छ करून घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यात पारंपरिक पद्धतीचं मिर्शण भरण्यात आलं. पारंपरिक म्हणजे सात दिवस भिजवलेला चुना, चांगल्या भाजलेल्या विटांची भुकटी, चाळलेली एकदम बारीक वाळू आणि बेलफळांचं पाणी हे मिर्शण. काम चालू असताना तलावातल्या कातळातही (बेड रॉक) एक मोठी दाभड (पोकळीसारखी जागा) सापडली. त्यातूनही मोठय़ा प्रमाणात गळती होत असणार. त्यातला आठ-नऊ फुटांचा गाळ काढून ही पोकळी स्वच्छ केली आणि भरून घेतली. जवळपास 80 टक्के कामं मार्चच्या 23 तारखेपर्यंत झाली. त्यानंतर लॉकडाऊनमुळं काम थांबलं. आणखी दोन ठिकाणची गळती रोखायची आहे. पण तरीही 10 जुलैपर्यंत हत्ती टाकं गच्च भरलं, असे भामरे यांनी नमूद केलं. गडावर ज्यांच्या पिढय़ान्पिढय़ा नांदल्या, त्या घरातली माणसं सांगतात की त्यांनी कधीही हत्ती तलावात इतकं पाणी पाहिलेलं नाही. त्यांच्या आज्यापंज्यांकडूनही हत्ती तलाव भरल्याचं त्यांनी कधी ऐकलेलं नाही.
सर्वाधिक वस्ती दहा हजारांचीदुर्गदुर्गेश्वर रायगड या पुस्तकाचे लेखक प्र. के. घाणेकर सांगतात, ‘‘साधारण पन्नास हजारांच्या आसपास लोक शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर आले असावेत. शिवकाळात गडाने अनुभवलेली सर्वाधिक गर्दी हीच. विविध अभ्यासातून गडावरील बांधकामाचे जितके पुरावे आढळले त्यातली 90 टक्के कामं शिवकालीन आहेत. ही बांधकामं पाहता असा तर्क निघतो की, शिवकाळात प्रत्यक्ष गडावर कायमस्वरूपी राहणार्यांची संख्या ही दहा हजारांपेक्षा जास्त नव्हती. एवढय़ा लोकांसाठीची पाणी व्यवस्था पुरेशी असल्याने शिवकाळात गडावर पाणीटंचाई जाणवल्याचे उल्लेख नाहीत.’’
..तर रायगड होईल जलसंपन्न‘रोप वे’ झाल्यापासून रायगडावरील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला तर लाखाच्या संख्येत शिवप्रेमी जमतात. एवढय़ा मोठय़ा संख्येसाठी पाण्याची व्यवस्था गडावर नाही. प्यायच्या पाण्याची बाटली तीस रुपये आणि आंघोळीची बादली चाळीस रुपयांना विकत घ्यावी लागते, अशी सद्यस्थिती आहे. पण गडावरील 84 पाणवठे दुरुस्त झाले तर मुबलक पाणी गडावर मिळू शकतं. एकट्या हत्ती तलावाचीच क्षमता अर्धा टीएमसी आहे.
sukrut.k@gmail.com(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत सहसंपादक आहेत.)