शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

पर्यावरणाचा इतिहास

By admin | Published: June 07, 2014 7:20 PM

आपल्याकडे एकूणच इतिहासाविषयी उदासीनता आहे. त्यामुळे फक्त पर्यावरणाचा इतिहास कोणी लिहील, अशी शक्यताही नाही. परदेशात ही पर्यावरणाकडे फारशा गांभीर्याने पाहिले जाते असे नाही; मात्र इतिहासलेखनाबाबत ते गंभीर असतात. त्यातूनच पर्यावरणाचा इतिहास सांगणारे एक पुस्तक तयार झाले. नुकत्याच झालेल्या ‘पर्यावरण दिना’निमित्त (५ जून) या वेगळ्या पुस्तकाविषयी

 निरंजन घाटे

 
आपल्या देशाला अनेक प्राचीन परंपरांचा वारसा लाभलेला आहे; मात्र इतिहासविषयक अभ्यासाची हेळसांड आपल्याइतकी इतरत्र कुठेही झालेली दिसत नाही. जे प्राचीन परंपरांचे आणि इतिहासाचे, तेच विज्ञानाचेही. अनेक विद्यापीठांमधून निदान पुरातत्त्व विभागात संशोधन व अध्यपन चालते, बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये इतिहास विषय शिकविला जातो. मात्र, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या भारतीय विद्यापीठांमधून विज्ञानाचा इतिहास शिकविला जातो. कदाचित मी चुकत असेन; पण महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठात विज्ञानाचा इतिहास शिकविण्यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचे माझ्या ऐकिवात नाही; पर्यावरणाचा इतिहास यातच आला. अगदी क्वचित कधी तरी ‘पर्यावरणाचा इतिहास’ हा शब्द कानावर पडतो. यामुळेच मला जेव्हा मिळतील तेव्हा आणि मिळतील तशी मी वेगवेगळ्या विज्ञानशाखांच्या इतिहासाची पुस्तके खरेदी करीत आलो. ‘फाँटाना हिस्टरी ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस’ हे त्यांपैकीच एक. ‘फाँटाना’ या पुस्तक प्रकाशन संस्थेने त्यांच्या ‘हिस्टरी ऑफ सायन्सेस’ या मालिकेत भूगोल, भूशास्त्र, महासागरशास्त्र, हवामानशास्त्र, निसर्ग इतिहास (नॅचरल हिस्टरी), पुराजीवशास्त्र, उत्क्रांतिवाद आणि परिस्थितिकी अशा विविध शास्त्रांचा इतिहास आपल्याला सहज कळेल अशा भाषेत पुस्तकरूपाने उपलब्ध करून दिला आहे. ‘पर्यावरणशास्त्राचा इतिहास’ हे याच मालिकेतील एक अभ्यासपूर्ण पुस्तक. या मालिकेतील वरील सर्व विषय हे तसे पर्यावरणाशी संबंधित आहेत. या मालिकेत इतरही अनेक विषय आहेत; पण ते पर्यावरणाशी थेट नाते सांगत नाहीत.
‘द हिस्टरी ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस’ या पुस्तकाचे लेखक पीटर जे बौलर हे आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९२मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा ती ६३४ पानांची होती. पुढे त्यात भर पडली तशीच पानेही वाढली. या पुस्तकाला मी ग्रंथ म्हणायचे टाळले, कारण त्यामुळे काही तरी विद्वज्जड भाषेतला मजकूर यात असेल, असे आपल्याला उगीचच वाटू लागते. प्रत्यक्षात ‘फाँटाना’च्या ‘हिस्टरी ऑफ सायन्स’ मालेतील कुठल्याच पुस्तकात अवघड, अनाकलनीय भाषा नाही. विज्ञानाची तोंडओळख असलेली आणि वाचनाची आवड असलेली कुठलीही व्यक्ती अगदी सहजपणे पर्यावरणशास्त्राचा इतिहास जाणून घेऊ शकेल, असे हे पुस्तक आहे. पर्यावरणशास्त्राचा इतिहास कशासाठी शिकायचा? मराठीत ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी एक म्हण आहे. इतिहासात वेगवेगळ्या वेळी मानवाकडून पर्यावरणाच्या बाबतीत ज्या घोडचुका झाल्या, त्या चुका त्या-त्या वेळी खपून गेल्या, कारण त्या काळात पर्यावरणाची जाणीव कमी प्रमाणात होती; किंबहुना नव्हतीच, असे म्हणावे लागते. त्याचबरोबर, त्या काळात लोकसंख्या कमी आणि वनश्रीचे आवरण जास्त, अशी परिस्थिती होती. त्यामुळे पर्यावरणीय नुकसानीचा परिणाम कमी प्रमाणात जाणवत असे. 
औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगात बहुतेक सर्वच संस्कृतींमध्ये शेतीप्रधान संस्कृती होती. शेतीत रासायनिक खते वापरली जात नव्हती. शेणखत, सोनखत, शेतात मेंढय़ा बसविणे, कापणीनंतर राब करणे, तसेच आंतरशेती, वेगवेगळ्या ऋतूंत वेगवेगळी पिके घेणे आदी अनेक बाबींमुळे शेतीचा कस राखला जात असे. सर्वसाधारणपणे संस्कृतीगणिक यात बदल दिसून येत. उदाहरणार्थ- चीन आणि इतर पौर्वात्य देशांत म्हैस आणि शेळ्या यांचा शेतीपूरक प्राणी, तर डुकरे व कोंबड्या हे खाद्य होते. भारतातील शेती ही गाईवर आधारित होती, तर युरोपात नांगर ओढण्यासाठी घोडे वापरले जात आणि शेतीपूरक व्यवसाय हा मेंढय़ा आणि डुकरांवर अवलंबून असे. ही परिस्थिती बदलायला ज्या विविध घटकांचा प्रभाव पडला, त्यास अमेरिकेचा शोध, विशेषत: दक्षिण अमेरिकी खंडाचा शोध कारणीभूत ठरला.
एक गंमत म्हणजे उत्तर अमेरिकी खंडात घोडे नव्हतेच; पण शेतीलासाठी कुठल्याही प्राण्यांची मदत घेतली जात नव्हती. दक्षिण अमेरिकी खंडातही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती होती. 
मानवी संस्कृतीवर आणि पर्यायाने पर्यावरणावर परिणाम करणारी बहुतेक सर्व पिके ही दक्षिण अमेरिकेची जगाला देणगी आहे. यातील फक्त मका हे गवताच्या कुटुंबातील पीक आहे. राजगिरा, बटाटा, तंबाखू, मिरची, टोमॅटो, गर असलेली बहुतेक फळे ही मुळातील दक्षिण अमेरिकेतील. आशियातील एक पर्यावरणावर, जमिनीवर आणि मानवी इतिहासावर परिणाम करणारे पीक म्हणजे ऊस. या व अशा माहितीपासून पर्यावरणशास्त्र म्हणजे काय? पर्यावरणासंबंधीच्या पूर्वजांच्या कल्पना, यामध्ये अर्थात युरोपी पौर्वात्य म्हणजे ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा समावेश आहे. मध्ययुगीन युरोपातील पर्यावरणासंबंधीचे विचार-विशेषत: झाडपाल्यांची औषधे, पशुसंवर्धनासाठी झालेले प्रयत्न, त्यानंतर विद्वानांचा पर्यावरणक्षेत्रात प्रवेश, विविध क्षेत्रांतील विद्वानांची पर्यावरणविषयक मते यांचा विचार केलेला आहे.
वैचारिक क्रांती आणि पाश्‍चात्त्यांच्या साम्राज्यांचा प्रसार हे खरे तर पर्यावरणविषयक विचारांना चालना देणारे टप्पे, हे आपल्या क्वचितच लक्षात येते. युरोपी दर्यावर्दी व्यापार आणि साम्राज्यविस्तार तसेच त्यांच्या दृष्टीने अप्रगत समाजांची संपत्ती लुटण्याच्या लालसेने जगभर पसरले. त्यांच्या पूर्वजांनी आणि त्यांनी कधीही कल्पनाही केली नव्हती, असे निसर्गवैभव पाहून ते खुलावले. त्यांच्या-त्यांच्या राज्यकर्त्यांना भेटीदाखल ते वनस्पती आणि प्राणी पाठवू लागले. यातूनच क्यू गार्डनसारखी वनस्पती उद्याने आणि विविध प्रकारची प्राणिसंग्रहालये अस्तित्वात आली. पाश्‍चात्त्यांच्या आगमनामुळे काही ठिकाणचे प्राणी कायमस्वरूपी नष्टही झाले, हेसुद्धा विसरून चालणार नाही. त्यातल्या मृत्यूनंतर जगप्रसिद्ध झालेल्या डोडो या उड्डाण करू शकणार्‍या पक्ष्याचे चित्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पृथ्वीच्या पर्यावरणावर परिणाम करणार्‍या पृथ्वीच्या इतिहासातील अनेक घटनांचा यात ऊहापोह केलेला आहे. त्यात पृथ्वीचे ऑक्सिजनविरहित आद्य वातावरण, प्रकाशसंश्लेषण करून अन्न बनविणार्‍या वनस्पतींनी प्रदूषित केलेल्या वातावरणातील ऑक्सिजनची वाढ; त्यामुळे अस्तित्वात आलेली नवी जीवसृष्टी, अशा बाबींची दखल या पुस्तकात सविस्तर घेतलेली दिसते.
या पुस्तकात आजच्या पर्यावरणावर फार मोठा परिणाम घडविणार्‍या प्राचीन म्हणजे भूशास्त्रीयदृष्ट्या ऐतिहासिक घटनांची आणि त्यांनी पर्यावरणावर कोणत्या प्रकारचे परिणाम घडविले त्यांची दिलेली विस्तृत माहिती. उदाहरणच घ्यायचे झाले, तर भटकत्या भूखंडांचे घेता येईल. पृथ्वीवर पूर्वी म्हणजे ७0 कोटी वर्षांपूर्वी दोनच भूखंड होते. ते वेगळे व्हायला साधारणपणे दहा कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. ही हालचाल प्रथम जलद होती, ती पुढे मंदावली. सुरुवातीला वर्षाला ५ सेंमी वेगाने एकमेकांपासून विलग होणार्‍या या भूखंडांचा आजचा वेग दोन ते अडीच सेंमी एवढा मंदावला. या हालचालींचा प्रमुख परिणाम म्हणजे हिमालय आणि आल्प्स या पर्वतराजींची निर्मिती.
यातील हिमालयाचा भारताशी थेट संबंध असल्यामुळे त्याचा पर्यावरणावर झालेला परिणाम वानगीदाखल बघू या. पहिली महत्त्वाची घटना म्हणजे भारतात मोसमी पाऊस पडू लागला. पंजाबचा सुपीक प्रदेश, गंगायमुनेचे खोरे, गंगा-ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश हे अस्तित्वात आले. उत्तरध्रुवी या प्रदेशाकडून येणारे अतिशीत वारे हिमालय अडवितो; त्यामुळे आपली संस्कृती अस्तित्वात आली.
भारताच्या उत्तर भागातील जीवन सुसह्य झाले. हिमालयाच्या उंचीमुळे उत्तर भारतातील नद्यांना पावसाळी आणि उन्हाळी पूर येऊ लागले. जगभरात या भूखंडांच्या भटकण्याचे बरेच परिणाम दिसतात. या प्रकारचे अनेक घटक या पुस्तकातून आपल्या नजरेसमोर येतात. पर्यावरणासंबंधी बरीच नवी माहिती आपल्या पर्यावरणविषयक ज्ञानात भर घालते. सर्व पर्यावरणप्रेमींनी संग्रही ठेवावे, ज्यांना पर्यावरणविषयक संदर्भ हवे आहेत त्यांनी तर अवश्य संग्रही ठेवावे, असेच हे पुस्तक आहे, यात शंकाच नाही.
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आहेत)