- अशोक राणे
माणसाच्या जगण्याच्या करुण कहाण्या इथूनतिथून सारख्याच. सतत पाठी लागलेले जगण्याचे असंख्य प्रश्न आणि त्याला आपापल्या परीने भिडणारी माणसे सदासर्वकाळ सर्वत्र आढळतात. यातली काही असहाय, अगतिक झाल्यासारखी, तर काही एका जिद्दीने लढणारी.. पुन:पुन्हा हरत लढणारी.. त्यातली अपरिहार्यता नेमकी अधोरेखित करीत जातात.. दुखणी तीच सारी, तपशील मात्र भिन्न.. विविध स्थलकालाचा संदर्भ असलेले.. साहित्य, चित्रपट, नाटक आदी कलांमधून माणसाच्या या वेदनामय जगण्याचा संघर्ष सातत्याने दिसत राहतो. कधी कधी ते इतक्या हळव्या अवस्थेत दिसते, की वाचक-प्रेक्षक स्वत:च रडून-रडून चिंब होत जातो, तर कधी ते अशाही प्रकारे नजरेस पडते, की डोळ्याच्या कडा ओल्या होतात खर्या; परंतु अश्रूंच्या पुरात सारं वाहून न जाता कारणमीमांसेचा शोध घेतला जातो. यालाच संयमित मेलोड्रामा म्हणायला हवं.
‘टू नाईट्स वन डे’ची नायिका सँड्राची अगतिकता अशीच हळवी करते खरी; परंतु त्याच वेळी तिला या अवस्थेत ढकलणार्या सांप्रतकालीन जागतिक मंदीचा संदर्भ नजरेआड करू देत नाही. तिच्यासारख्या अनेकांच्या वाट्याला आलेली हतबलता हा आर्थिक उदारीकरणाचा आफ्टर इफेक्ट आहे, हे वास्तव यातून स्पष्टपणे दिसून येते. सँड्राच्या या अवस्थेला युरोपियन आर्थिक धोरणाचाही नेमका संदर्भ आहेच.
शुक्रवारी संध्याकाळी सँड्राला सांगण्यात येते, की तिची नोकरी गेलीय. ती अर्थातच हादरते. ऑफिसच्या बाहेर पडणार्या साहेबाला ती त्याच्या गाडीजवळच गाठते. विनवणी करते. ‘काहीच करता येणार नाही,’ असे पहिल्या फटक्यातच सांगून टाकणारा साहेब तिला एक पर्याय सुचवतो. तिने तिच्या सहकार्यांना राजी करायचे, म्हणजे तिची नोकरी सुरू राहील. सहकार्यांनी काय करायचे, तर त्यांना मिळणार्या बोनसवर पाणी सोडायचे. त्या वाचलेल्या पैशातून तिच्या पगाराची व्यवस्था होऊ शकेल, पर्यायाने तिची नोकरी टिकेल, असा हा पर्याय असतो. तिच्या १६ सहकार्यांचा होकार तिला सोमवार सकाळपर्यंत मिळवायचा असतो.. आणि हाताशी दोन दिवस व एक रात्र! त्या रात्री ती नवर्याशी यावर चर्चा करते. दोघांनाही कल्पना आहे, की हे अवघड आहे; परंतु नोकरी टिकवायची तर याला पर्यायही नाही.. आणि शनिवार सकाळपासून ती कामाला लागते.. किंबहुना या अगतिकतेला अंगावर घेते आणि क्रमाक्रमाने अधिकाधिक अगतिक होत जाते. एखाद्यावर परिस्थिती काय टोकाचे अपमानास्पद जिणे लादते त्याची ही गोष्ट! प्रचंड अस्वस्थ करणारी. हतबल करून टाकणारी.. आणि मग या सबंध वास्तवाचाच शोध घेऊ पाहणारी..
सँड्रा एकामागून एक तिच्या सहकार्यांना भेटत जाते. शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, तर कधी शहराबाहेर दूर-दूर कुठे तरी राहणार्या सहकार्यांना गाठता-गाठता ती जेरीस येते. भेटलेल्या पहिल्या व्यक्तीपासून कुणीच केवळ सहानुभूतीशिवाय काहीच देत नाही. फार तर ‘विचार करतो’ किंवा ‘करते’ एवढेच आश्वासन! कधी तोंडदेखले तर कधी खरेच मनापासून, आपलीही अगतिकता लपवीत.. तीही प्रत्येकाला सांगते आहे, की ‘बघा, जमलं तर..माझा तसा आग्रह नाही..नाही म्हणालात तरी मी समजून घेऊ शकते..’ ती घेणारच समजून. एक सहकारी तर थेट तिला विचारतोच, ‘‘मी असा तुझ्याकडे आलो असतो तर तू काय केलं असतंस.? ’’ चटकन देण्यासारखं उत्तर तिच्याकडे कसं असेल? कारण आर्थिक ओढग्रस्तीच्या काळात एक हजार युरोंचा बोनस म्हणजे केवढा आधार हे तिलाही कळतेच आहे. आणि इतकेच नाही, तर एका मानसिक रेट्यात सहकार्याने विचारलेल्या प्रश्नात आणखीही एक मोठे वास्तव दडलेले आहेच.. आज तू.. उद्या मी.. परवा आणखी कुणी तरी. कशाचीच शाश्वती नाही.
सँड्राच्या या सार्या धावपळीत, खरं तर फरफटीत व्यक्ती ते समष्टीचे चित्र उलगडत जाते. परिस्थितीने अशी काही गोची केलीय, की अवघी माणुसकीच कोंडीत सापडलीय. त्यातली विदारकता अंगावर येते. सँड्राविषयी वाटणार्या न वाटणार्या सहानुभूतीतून काही जण त्याही परिस्थितीत तिला मदत करायला तयार होतात, तर काही आश्वासन देतात, तर काही जण आपली हतबलता व्यक्त करतात. यातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींपेक्षा त्यासाठी जबाबदार असलेल्या सभोवतालच्या वास्तवाचेच दर्शन घडते. सोमवारी सकाळी १६ सहकारी गुप्त मतदान करतात. तिच्या बाजूने ७ आणि विरुद्ध ९ मते पडतात. त्या सातांमध्येही दोघांच्या कथा विद्ध करणार्या आहेत. हजार युरो त्यांनाही मोठय़ा रकमा असतात; परंतु सँड्राने कधी काळी केलेल्या मदतीपुढे त्यांना त्याचे काही वाटत नाही. कृतज्ञतेचे हे मृगजळी दर्शन विलक्षण आश्वासक वाटते. दोन दिवस, एका रात्रीच्या त्या अगतिकतेचा निकाल सँड्रा स्वीकारते. अचानक चक्रे फिरतात.. आणि तिला कामावर ठेवण्याचा निर्णय कंपनी घेते. मात्र, पगार निम्माच मिळणार असतो. गेल्या आठवड्यात ज्या कामाचा, ज्या वेळाचा पूर्ण पगार घेतला, त्यासाठी आता निम्मा पगार.. सँड्राकडे पर्यायच नाही.. पुन:पुन्हा हरत जगणे.. हरणारी लढाई लढत राहणे चालूच राहते.. जगभर अशा असंख्य सँड्रा आणि सँडी असतील..
ज्याँ आणि पीएर या दारदेन या बेल्जियन बंधूंचा हा सिनेमा पाहताना इटालियन निओरिएझमचे एक प्रणेते व्हितोरिओ डिसिका यांच्या १९४८च्या ‘बायसिकल थिव्ह्ज’ या अभिजात चित्रपटाची आठवण झाली. देशव्यापी मंदीतून अवतरलेल्या बेकारीने देशाचा काय हालबेहाल केलाय, हे एका कुटुंबाच्या कथेतून सांगत व्यक्ती ते समष्टी असा समग्र आशय डिसिकांनी सर्मथपणे आणि तितक्याच कलात्मकपणे मांडला होता. असाच अनुभव ‘टू नाईट्स वन डे’ पाहताना आला.
रशियन दिग्दर्शक आंद्रे झ्विग्युनस्तेव याच्या ‘लिव्हाइअथन’मध्ये ‘मोठा मासा छोट्या माशाला खातो’ हे चिरंतन सत्य सांप्रतकालीन राजकीय वास्तवाच्या पार्श्वभूमीवर मांडले होते. लिव्हाइअथनचा बायबलमधला अर्थ प्रचंड जलचर प्राणी, असा आहे. लेव्हिटेटचा एक अर्थ जड वस्तू जमिनीवरून अधांतरी उचलणे, असा आहे. हे दोन्ही अर्थ या चित्रपटाला लागू पडतात.
रशियाच्या उत्तरेला समुद्रकिनारी कोलयाने घराला लागूनच गॅरेज उघडलेलं आहे. त्याची तरुण पत्नी लिलया आणि आधीच्या पत्नीपासून झालेला मुलगा रोमा यांच्याबरोबर तो निवांत आयुष्य जगतो आहे. त्याचं गॅरेज आणि त्यासाठी कराव्या लागणार्या गोष्टी यांवरचा त्याचा खर्च पत्नीच्या लेखी बेहिशेबी आहे; परंतु गॅरेज आणि मोटारदुरुस्ती हे त्याचं पॅशन आहे. नवरा-बायकोतला एवढा एक संघर्षाचा मुद्दा सोडला, तर बाकी सारं ठीक आहे; परंतु ते तसं फार काळ राहू शकत नाही. त्याचं घर, गॅरेज आणि त्याभोवतीची जागा यांवर डोळा असलेला आणि तिथे मोठा कारखाना उभा करण्याची स्वप्न पाहणारा शहराचा महापौर कोलया आणि त्याच्या कुटुंबाला निवांत जगू देत नाही. आरंभी कोलयाची इस्टेट स्वत: ठरविलेल्या किमतीत विकत मागणारा हा बडा राजकीय पुढारी पुढे अधिकाधिक आक्रमक, हिंसक होत जातो आणि या मध्यमवर्गीय माणसाचं जगणं उद्ध्वस्त करीत जातो. मॉस्कोला मोठा वकील असलेला त्याचा मित्र त्याच्या मदतीला येतो आणि पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत जातो. तो गडगंज श्रीमंत पुढारी कोलयाची सर्व बाजूंनी कोंडी करीत जातो आणि मग कथानक दर वेळी वेगवेगळी आणि अनपेक्षित वळणं घेत जातं. कोलया एकटा पडत जातो.. आणि अखेर मोठा मासा छोट्या माशाला खाऊनच टाकतो.
रशियातलं हे आजचं वास्तव पाहताना, कोणे एके काळी भांडवलशाही जगापुढे निर्नायक आव्हान निर्माण करणारा हाच का तो साम्यवादी रशिया, हे मनात आल्याशिवाय राहत नाही. पैसा, अधिक पैसा, अधिकाधिक पैसा आणि त्यासाठी माणुसकी पायदळी तुडवीत टोकाची होत जाणारी हिंसक वृत्ती या नव्या युगाच्या नव्या वास्तवाचा प्रत्यय रशियातही पाहायला मिळाला. जग ज्या दिशेनं चाललं आहे, त्यात हे सारं अपरिहार्यच आहे हे मान्यच केलं, तरी याचा शेवट काय, याने अस्वस्थ व्हायला होते. ती अस्वस्थता ‘लिव्हाइअथन’ने दिली. कुणी म्हणेल ‘मोठा मासा, छोटा मासा’ हे तर फार पूर्वीपासून घडत आलंय. कबूल. वर म्हटलंच आहे, की हे चिरंतन सत्य आहे; परंतु हे आज ज्या कारणांमुळे घडतं आहे ते घाबरवणारं आहे.. जैमी रोझाल्स या दिग्दर्शकाचा ‘ब्यूटिफुल यूथ’ असाच अस्वस्थ करून गेला. युरोपियन युनियनच्या आर्थिक धोरणात स्पेन, पोर्तुगाल हे देश दिवाळखोरीत निघाले. प्रचंड प्रमाणात बेकारी, गरिबी अशी एक सारं काही उद्ध्वस्त करणारी व्यवस्थाच त्यातून निर्माण झाली. याचं अतिशय प्रत्ययकारक चित्रण ‘ब्यूटिफुल यूथ’मध्ये करण्यात आलंय.
नतालिया आणि कालरेस हे नुकतेच कुठे विशीत आलेत. प्रेमात पडलेले आहेतच. लग्न करतात. पहिलं मूलही जन्माला येतं. आता प्रेमबिम संपलेलं असतं आणि समोर उभा असतो जगण्याचा रोकडा व्यवहार. तशातच देशभर बेकारीनं थैमान मांडलेलं. नतालियाच्या आईच्या आधारानं कसंबसं तग धरून ठेवीत, मिळतील ती लहानसहान कामं करीत त्यांची कशीबशी गुजराण चालते. आईच्या खांद्यावर आधीच इतर पोरांचा भार आणि त्यात आता ही तिघं. सगळीच ओढाताण. अशा या गंभीर परिस्थितीत ही दोघं एक निर्णय घेतात.. पोर्नो फिल्ममध्ये काम करण्याचा! परंतु तिथंही एका फिल्मनंतर यांची डाळ शिजत नाही. अध:पतन झाल्याची बोचरी लाज मात्र घेऊन जगणं नशिबी येतं. एक दिवस नतालिया निर्णय घेते आणि र्जमनी गाठते. तिथं तरी नक्की काय वाढून ठेवलंय याची कोणालाच काही कल्पना नाही; परंतु त्या अनिश्चिततेला ख्रिस्ताच्या क्रूसासारखं खांद्यावर घेत नतालिया र्जमनीला जाते. काही दिवसांत तिच्याकडून पैसे येऊ लागतात. हळूहळू इथली ददात मिटते. ‘स्काईप’वर छान बोलणं होत राहतं. नतालियानं र्जमनीत सारं काही जुळवून आणलंय यानं कुटुंब सुखावतं. तिच्या पैशातून दोन घास नीट खाऊ लागतं. तिने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या लेखी ती सुपर मार्केटमध्ये नोकरी करत असते; परंतु प्रत्यक्षात ती पोर्नो फिल्मचाच आधार घेते.
‘ब्यूटिफुल यूथ’ पाहिला त्याच्या दोनेक दिवस आधी बोटीवर झालेल्या पार्टीत एका मुलीला पाहिलं होतं. विलक्षण देखण्या स्पॅनिश सौंदर्यात न्हालेलं तिचं रूप आणि स्पॅनिश ठेक्यावर तिनं सादर केलेलं फ्लेमिंगो नृत्य हे एक विलोभनीय नजाकतदार दृश्य होतं. पुढल्या दिवसांतही ती एक-दोनदा भेटली. गोड हसली. छान, आर्जवी स्वरात बोलली.. तीच ही मुलगी ‘ब्यूटिफुल यूथ’ संपल्यानंतर भेटली, तेव्हा टवटवीत फूल पार कोमेजलेलं दिसावं तशी दिसली.
‘‘मी पाहिली ही अशी नतालियासारखी माणसं..’’
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)