- डॉ. अभय बंग
‘‘तू कधी महात्मा गांधींना प्रत्यक्ष पाहिलं आहेस?’’- मी एकदा माझ्या आईला विचारलं. ती चौर्याण्णव वर्षांची आहे.‘‘आमच्या लग्नानंतर तुझे वडील व मी सेवाग्रामला राहायचो. संध्याकाळी फिरायला बापू घरासमोरून जायचे. मी रोज खिडकीतून त्यांना बघायची.’’ आई म्हणाली.माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. खुद्द महात्मा गांधी माझ्या घरासमोरून चालत जायचे !पण आई पुढे म्हणाली. ‘‘तुझा जन्म तेव्हा व्हायचा होता’’. मी कधीच त्यांना पाहिलं नाही.‘‘पुढील पिढय़ा कदाचित विश्वास ठेवू शकणार नाहीत की असा एक हाडामासाचा माणूस खरंच या पृथ्वीतलावर होऊन गेला.’’ - गांधींजींच्या मृत्यूनंतर अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाला होता. मी त्या पिढीमध्ये जन्माला आलोय; पण मला असा विश्वास ठेवण्यास कधीच अडचण वाटली नाही. मी त्यांना अनुभवायचो - बापूकुटीमध्ये, सेवाग्राम आर्शमात, वर्धा परिसरात.1936 मध्ये गांधीजींनी स्वत: खेड्यामध्ये राहण्याचा व सेवा करण्याचा निर्णय घेतला. भारतातील शिक्षितवर्गाचं लक्ष खेड्यांकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वर्धा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरचं, मुख्यत: अस्पृश्यांच्या वस्तीचं, शेगाव हे छोटं खेडं त्यांनी निवडलं. गावाचं नाव नंतर ‘सेवाग्राम’ करण्यात आलं. बापूंचा शेवटचा आर्शम आजही तिथे उभा आहे. त्या काळात वर्धा ही जणू देशाची भावनिक राजधानी झाली होती.एकदा विदेशातून पोस्टाने एक पत्न आलं. त्यावर पत्ता लिहिलेला होता - ‘भारताच्या सम्राटास; जिथे असेल तिथे.’शासकीय पोस्ट खात्याने ते पत्न व्हाईसरॉयला न पाठविता गांधीजींना पोहचवलं.हा ‘भारताचा सम्राट’ सेवाग्राममध्ये कसा राहायचा?‘‘माझ्यासाठी बांधायचं घर साधारण शेतकर्याच्या घरापेक्षा वेगळं नको.’’ - त्यांच्यासाठी कुटी बांधायची जबाबदारी असलेल्या मुन्नालालना त्यांनी सूचना केली होती. छोटीशी बापूकुटी, कस्तुरबा व स्रियांसाठी एक वेगळी कुटी, पाहुण्यांसाठी एक घर, सर्वांसाठी सामूहिक स्वयंपाकघर, जेवण्यासाठी जागा व या सर्वांच्या मध्यभागी प्रार्थनेसाठी एक मोठं अंगण एवढाच होता बापूंचा आर्शम. पण या यादीमध्ये तेथील एक गोष्ट सुटली. तेथील वातावरणातील जादू !आर्शम ही गांधीजींची प्रयोगशाळा होती. तिथे ते सत्याग्रहीच्या जीवनाचे प्रयोग करायचे. रोज कसं जगायचं ही बापूंसाठी कंटाळवाणी बाब नव्हती. रोजचे जगणे हा जणू सत्याचा शोध होता, प्रार्थना होती, शुद्धतर होण्याची साधना होती. जीवनाची कोणतीच बाब त्यांना दुर्लक्षणीय नव्हती. रिचर्ड अटेनबुरोच्या ‘गांधी’ सिनेमातला तो प्रसंग आठवतो?महत्त्वाच्या बैठकीतून गांधीजी अचानक उठून चालायला लागतात.‘‘बापू, तुम्ही कुठं चाललात? देशासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.’’ आश्चर्यचकित झालेले जवाहरलाल विचारतात.‘‘माझ्या बकरीच्या पायाला सूज आली आहे, त्याला शेक देण्याची वेळ झाली आहे.’’ घड्याळाकडे बघत बापू उद्गारतात. त्यांच्यासाठी पशू हेदेखील देशाचा भाग होते. त्यांची काळजी हा देशसेवेचा महत्त्वाचा भाग होता. सेवेतून जीवनाचा शोध हे त्यांचं रोजचं जगणं होतं. आर्शम हा त्यांच्या विचारांचा, हृदयाचा आरसा होता.गांधीजींचा आर्शम व त्यांच्या प्रेरणेने वर्धा परिसरात सुरू झालेल्या अनेक संस्था, त्यात राहणारे शेकडो कार्यकर्ते मिळून माझ्या लहानपणी एक वेगळंच जग निर्माण झालं होतं. या जगातील सर्वच जण स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलेले सत्याग्रही होते. सर्वजण चरखा चालवायचे व शुभ्र खादी नेसायचे. प्रत्येकजण स्वत: संडास सफाई व इतर र्शम करायचा व जातिप्रथा तोडायचा. या जगात वर्ग, जात, लिंग यांचा भेदभाव नव्हता.जगण्याच्या गरजा कमीत कमी करणे व स्वावलंबी जगणे हा सर्वांचा प्रयत्न असे. जगण्यासाठी निर्वाह वेतन कमीत कमी घेण्याची जणू स्पर्धा होती. आपण समाजाकडून कमीत कमी घेऊन भारतातील चाळीस कोटी गरीबांसाठी जास्त सोडण्याचा प्रयत्न होता. आज जेव्हा ‘अधिक लोभ, अधिक संपत्ती, अधिक संग्रह’ हा समाजाचा मंत्न झाला आहे, तेव्हा कधीकाळी असाही समूह होता यावर विश्वास बसणार नाही. आइन्स्टाइन म्हणाला ते खरंच ठरलं !***‘पण हा आता भूतकाळ झाला. आजच्या जगात, एकविसाव्या शतकात गांधींचं काय औचित्य आहे?’ असा प्रश्न नव्या पिढय़ा विचारतील. प्रश्न महत्त्वाचा आहे. विचार करावा लागेल. एकविसाव्या शतकात तीन महत्त्वाचे वैश्विक प्रश्न उभे आहेत. भांडवलशाहीचं पाप, पृथ्वीला आलेला ताप आणि धार्मिक द्वेष व हिंसेचा शाप ! हे ते तीन महाप्रश्न आहेत. त्यावर गांधींकडे काय उपाय आहेत?भांडवलशाहीतून आर्थिक भरभराट तर झाली; पण सोबत प्रचंड मोठी आर्थिक विषमतेची दरीदेखील निर्माण झाली. थॉमस पिकेटीचे ‘21व्या शतकात भांडवल’ हे प्रसिद्ध पुस्तक किंवा ‘ऑक्सफाम’चे अहवाल ही विषमता किती भयानक झाली आहे हे सांगतात. अशा प्रचंड विषम समाजात लोकशाही-राजकीय समता-निर्बल ठरते. र्शीमंतच माध्यमांना नाचवतात, सरकारं घडवतात व मोडतात. बाजारात आपल्याला काय हवं हे आपलं वाटणंदेखील जाहिरातीच ठरवतात. यात स्वातंत्र्य कुठे गेलं? आणि ‘ग्रीड इज गुड’ या नव्या जीवन मूल्यांमुळे बँका, आर्थिक क्षेत्न व राजकारणात भ्रष्टाचार आला. भांडवलशाही नासली. या दुष्परिणामांचं काय करावं? - हा पहिला प्रश्न.‘जास्त म्हणजे चांगलं’ ही आधुनिक जगाची घोषणा आहे. जास्त उत्पादन, जास्त खरेदी, जास्त उपभोग यातून जास्त ऊर्जा, जास्त उष्णता व शेवटी हवामानात बदल आला. पृथ्वीचं तापमान वाढलं. मग आपण कसं जगायला हवं? - हा दुसरा प्रश्न.विश्वभावना उतरणीला लागली आहे. मानव समाज हा जात, धर्म, वंश, देश या कुंपणांनी विभाजित आहे. डोक्यात धर्मद्वेष व हातामध्ये हत्यारं आली आहेत. जगभर धार्मिक व वांशिक हिंसा थैमान घालते आहे. ट्रम्प आणि तालिबान, ब्रेक्झिट आणि बाबरी, आपले आणि परके. ‘‘मारा त्यांना, हाकलून लावा’’ ! यावर उपाय काय? - हा तिसरा प्रश्न.बोला गांधीजी, बोला. यावर तुमच्याकडे काय उपाय आहेत ?गांधींचं उत्तर कुठे शोधावं? आत्मकथा, हिंद स्वराज, आणि मंगल-प्रभात या त्यांच्या तीन पुस्तकात; आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनात. ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’, असं ते स्वत:च सांगून गेले आहेत.आश्चर्य ! आजपासून शंभर वर्षांपूर्वीच गांधींनी, या तिन्ही समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपायही, सांगितले आहेत. त्यांचे उपाय बाह्य, समाजरचनेच्या रूपात आहेत. वर्गभेद आणि वर्णभेदाऐवजी, समतेवर आधारित सर्वांचं हित असलेली-सर्वोदय- ही समाजरचना ते सांगतात. हिंसक संघर्षाऐवजी ते अहिंसक सत्याग्रह हा उपाय सांगतात. पण त्यांचे तितकेच महत्त्वाचे उपाय आंतरिक, आपल्या जीवनातील बदलांच्या रूपात आहेत. ह्यइी 3ँी ूँंल्लॅी 8412ी’ा 3ँं3 84 6्र2ँ 3 2ी ्रल्ल 3ँी 61’ ि! किती सोपं. किती कठीण !अतिउपभोगामुळे पृथ्वीला ताप आला आहे. महात्मा गांधी आपल्याला सांगतात - गरजा व उपभोग कमी करा. त्यांचं कथन प्रसिद्ध आहे - पृथ्वीवर सर्वांच्या गरजेपुरतं आहे, लोभापुरतं नाही. हे तत्त्व ते स्वत:आचरायचे. बापूकुटीतील त्यांची ‘ड्रॉइंग रूम’ ही आठ बाय दहा फुटांची आहे. त्यांच्या आर्शमातील अकरा व्रतांमध्ये एक व्रत होतं ‘अपरिग्रह’. कमीत कमी संग्रह.काही लोकांच्या संपत्तीच्या अतिसंचयावर त्यांनी, उपाय सांगितला - र्शीमंतांनो, लोभ कमी करा; तुमची संपत्ती तुमची खासगी मालकी नाही, समाजाची आहे. तुम्ही केवळ तिचे विश्वस्त आहात असं वागा. कम्युनिस्ट व समाजवाद, याला गांधींचा भोळेपणा म्हणाले. र्शीमंत म्हणजे रक्ताची चटक लागलेला नरभक्षक वाघ. तो माणसाळेल? विश्वस्त होईल?पण आश्चर्य ! शंभर वर्षांनंतर जगातले सर्वात मोठे अब्जाधीश- बिल गेट्स, वॉरन बफे आणि भारतातले टाटा, अझीम प्रेमजी, नारायण-सुधा मूर्ती व नंदन-रोहिणी निलेकणी हे सर्व आपल्या खाजगी संपत्तीचा समाजासाठी विश्वस्त म्हणून वापर व वितरण करत आहेत.या गांधीला हे कसं दिसलं? कसं सुचलं? जाति-धर्मद्वेषावर त्यांचे उपाय-सर्वधर्मसमभाव आणि अस्पृश्यता निर्मूलन होते. त्यांनी स्वत: एका अस्पृश्य मुलीचे -लक्ष्मी तिचं नाव - आपली मुलगी मानून पालन केले व तिचे आंतरजातीय लग्न लावून दिले. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांच्या भूमिकेमुळे पुण्यात त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आला होता. हिंदू-मुस्लीम बंधुभावासाठी तर शेवटी त्यांचं बलिदान झालं.धर्म, जात, वंश, प्रादेशिकता यांनी आज वेड्या झालेल्या जगाला याहून अधिक गांधी काय देऊ शकत होते? एकविसाव्या शतकासाठी गांधींनी उपाय दिलेले आहेत. आपण पूर्वीच ऐकले असते तर?आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न- अजूनही ऐकलं नाही तर?असा हाडामासाचा एक खराखुरा माणूस होऊन गेला यावर अविश्वास ठेवायलादेखील पुढच्या पिढय़ा राहणार नाहीत.प्रश्न आपले, उपाय गांधींचे. पण शेवटी निवड आपली.search.gad@gmail.com(लेखक ज्येष्ठ समाजसेवक आहेत.)