-बैजू पाटील
अंदमानमधील हॅवलॉक आयलँड येथे नोव्हेंबर 2017 मध्ये 20 मीटर खोल पाण्यात ‘निमो’चा हा फोटो काढला आहे. भारतातील सर्वात सुंदर आयलँड म्हणून याचा उल्लेख करता येईल. पाण्यामधील पारदर्शकता येथे जास्त चांगली आहे. पाण्यातील फोटोग्राफी ही सर्वात अवघड समजली जाते आणि जगातील केवळ 3 टक्के फोटोग्राफर्स ती करतात. पाण्यात वापरण्यासाठी वेगळा कॅमेरा नसतो. केवळ कव्हर (हाऊजिंग) वेगळे असते. पाण्यातील फ्लॅशदेखील वेगळा असतो. हे सारे फार खर्चिक असते. माझे 25 वर्षांपासून पाण्यात फोटोग्राफी करण्याचे स्वप्न होते. माजी खा. आणि ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा यांच्या मदतीमुळेच ते शक्य झाले. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यानचा काळ हा पाण्यातील फोटोग्राफीसाठी उत्तम समजला जातो.
पाण्यातील फोटोग्राफीसाठी केवळ साधने असून चालत नाहीत, तर मानसिक तयारी असणेही खूप गरजेचे असते. तुम्ही पाण्याखाली जवळपास 20 मीटर असता आणि कोणत्याही वेळी काहीही घडू शकते. मला त्यादिवशी ‘निमो’ या माशाचा हा फोटो मिळाला. तो ‘क्लोन फिश’ नावानेही ओळखला जातो. हा मासा खूप माणसाळलेला आहे. मासे साधारणत: माणूस दिसताच दूर पळतात. ‘निमो’ मात्र आपल्या जवळच घुटमळतो. आपल्याला वारंवार स्पर्श करतो. तो एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्यावर ‘निमो’ नावाचा चित्रपटदेखील निघाला आहे. माणूस जसा मसाज करून घेतो, तसा हा मासा ‘सॉफ्ट कोरल्स’ या वनस्पतीकडून मसाज करून घेत होता. मी तो माझ्या कॅमेर्यात टिपला. माणसानेदेखील या वनस्पतीमध्ये हात टाकला, तर काही वेळ हलकासा मसाज झाल्यानंतर ही वनस्पती हात मोकळा सोडते.
(वन्यजीव छायाचित्रणात 35 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार)