- - पवन देशपांडे
वर्षभरापासून चीनच्या कुरापतींनी आपण हैराण आहोत. सीमेवर कधी सैन्याची माघार घेतली जाते, तर कधी त्यात भर घातल्याच्याही बातम्या येतात. कधी लडाख सीमेवर कुरबुरी झाल्याचेही ऐकायला मिळते. चीन संपूर्ण सीमेवर कुठे ना कुठे घुसखोरीचा प्रयत्न करतच असल्याचे दिसते. वर्षभरापासून चीन सीमेवरच लक्ष केंद्रित झाले आहे. त्यामुळे चीनशी संबंधही बिघडले आहेत. सातत्याने होणारी ही कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. ही नजर असणार आहे किरायाची. अमेरिकेकडून घेतलेली. आपल्याला ही नजर स्वतःची हवी असेल तर त्याची किंमत आहे ४६० कोटी रुपये. या नजरेचं नाव आहे एमक्यू-९. अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली ड्रोन. मानवरहीत विमान. हे विमान चक्क ५० हजार फूट उंचीवर उडतं. साध्या डोळ्यांना ते दिसणं तर शक्य नाहीच शिवाय ते रडारमध्येही येत नाही. त्यामुळे ते आकाशात उडत असेल तर त्याला फार धोका नसतो आणि दुश्मनालाही ते दिसत नाही. असे अनेक ड्रोन अमेरिका गेल्या १३ वर्षांपासून करते आहे आणि याच ड्रोनच्या आधारे अमेरिकेने अनेक दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे. कारण क्षेपणास्र घेऊन आकाशात स्थिर राहण्याची यात क्षमता आहे. शिवाय हे जमिनीवरून ऑपरेट करता येते. म्हणजे यात व्यवस्था असून, कोणाला जाऊन बसण्याची गरज नाही. असे दोन अत्याधुनिक ड्रोन किरायाने घेण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत अमेरिकेकडून अशा प्रकारचे ३० ड्रोन विकत घेण्याचा विचार करत आहे. असे जर झाले तर चीन, पाकिस्तानवर आकाशातूनच नजर ठेवता येणार आहे.
व्हॅक्सिन टुरिझम !
कोरोना विषाणूने एका फटक्यात संपूर्ण उद्योगविश्वालाच धक्का दिला. लॉकडाऊनमुळे सारेच हैराण झाले. त्यातून टुरिझम क्षेत्रही सुटलेले नाही. विमानसेवा बंद होती. अनेक देशांनी इतर देशांतील लोकांसाठी कवाडे बंद केली होती. काही काळ भारतातून जायला आणि यायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे पर्यटनाचा संबंधच येत नव्हता. याच कारणामुळे टुरिझम उद्योग पार रसातळाला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, दरवर्षी जवळपास एक कोटी परदेशी पर्यटक भारतात येत आणि २.६ कोटी भारतीय पर्यटक विदेशात पर्यटनासाठी जात. यंदा हे सारेच खोळंबले आहे. जगभरातील पर्यटन उद्योगाची एकूण उलाढाल ही तब्बल १७ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. यातून किमान पाच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. हे रोजगारही या कोरोनामुळे धोक्यात आले आहेत. पर्यटन उद्योगाने पुन्हा उभारी घेणे त्यामुळेच गरजेचे आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही, आटोक्यात येत नाही तोवर या पर्यटन उद्योगाला पुन्हा झळाळी मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागणार आहे. पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी अनेक योजना तर आणाव्या लागणार आहेतच, शिवाय कंपन्यांनाही पुढे येऊन पर्यटकांसाठी सूट द्यावी लागेल. कोरोना प्रतिबंधक लस येईल आणि सारे जग पुन्हा नव्याने भरारी घेईल, अशीच आस आता साऱ्यांना लागून आहे. या लसीसाठी विविध देशांमध्ये स्पर्धाही सुरू आहे. कोणत्या देशाच्या लसीला प्रथम सर्वांसाठी वापरण्याची परवागी मिळते ते येत्या काळात ठरेलच; पण अमेरिकेत फायझर कंपनी तयार करत असलेली लस यात सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ही लस भारतीयांना मिळेल तेव्हा मिळेल; पण अमेरिकेत ही लस सर्वसामान्यांना टोचण्यासाठी तयार होताच तिथे जाऊन लस टोचून घेण्याची अनोखी योजना एका पर्यटन कंपनीने आणली आहे. याला त्यांनी व्हॅक्सिन टुरिझम असं कोंदण लावलं. खरं तर अमेरिकेने तशी परवानगी दिली तर मुंबईतील या पर्यटन कंपनीला भारतातून काहींना अमेरिकेत घेऊन जाता येईल. लस टोचून परत आणता येईल. पण, अशा योजनांमुळे पर्यटन उद्योगाला भरारीचे ‘व्हॅक्सिन’ मिळेल का हा प्रश्नच आहे. तूर्तास तरी या उद्योगाला पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी २०२२ उजडेल, असा अंदाज वर्तविला जातोय.
(सहायक संपादक, लोकमत, मुंबई)