-बैजू पाटील
राजस्थानातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. वर्ष 2017. व्याघ्र प्रकल्पातील राजबाग परिसर. वाघाने चार बछड्यांना जन्म दिल्याची माहिती होती. त्यामुळे उत्सुकता होतीच. मला फोटोग्राफीसाठी वनविभागाकडून विशेष परवानगी मिळाली होती. दुर्दैवाने त्याचवेळी प्रियंका गांधी पतीसह तिथे आल्या होत्या. त्यामुळे तीन दिवस केवळ वाट पाहण्यात गेले. त्या गेल्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. सुदैवाने चारही बछडे दिसले.
साधारण 18 महिन्यांचे असावेत. चौथ्या दिवशी हा फोटो मिळाला. आई चार पिलांना सोडून शिकारीसाठी गेली होती. समजदार मुलांप्रमाणे हे बछडे तिथेच आजूबाजूला खेळत होते. यातील दोन शांत बछडे एकाच ठिकाणी बसून होते, तर दुसरे दोन खोड्या करण्यात व्यस्त होते.
याचदरम्यान एक कासव एका तळ्यातून दुसर्या तळ्यात जात होते. साधारण तीन फुटांचे असावे ते. या बछड्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी कासव पहिल्यांदाच पाहिले असावे. त्यामुळे या तिघांमध्ये खेळ सुरू झाला. बछड्याने पंजा मारण्याचा प्रय} केला की कासव स्वत:ला कवचाखाली बंद करून घ्यायचे.
थोड्या वेळाने ते बाहेर डोकावले की बछडे पुन्हा पंजा उगारायचे. दोन तळ्यांमधील अंतर जास्त असल्याने हा खेळ जवळपास तीन तास चालला. या कासवाने खूप पावसाळे पाहिले असावेत कदाचित. त्यामुळेच दोन बछड्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत ते सुखरूप दुस-या तळ्यात पोहोचले.
(बैजू पाटील यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल येथे 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘आय ऑन द टायगर’ या नावाने भरणा-या फोटो प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जागतिक किर्तीच्या 10 वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेली वाघांची 80 दुर्मीळ छायाचित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील. यात बैजू यांची 6 छायाचित्रे असतील.)