- सुधारक ओलवे
नृत्य म्हणजे जणू एक सगुण साकार कविताच!
मुक्त विहरणा-या लाटा नर्तकाच्या तालबद्ध पावलांतून फुटतात, त्या तालाला साथ देत नर्तकाचं लयबद्ध शरीर, त्याचे बोलके हात संगीताच्या साथीनं आपल्याला कितीतरी गोष्टीच उलगडून सांगतात. नृत्याची ही जादू अशी विलक्षण, की नाचणारा स्वत:ला विसरून जातो. सगळे भौतिक अडसर, संकोच, स्वत:भोवतीची सारी मर्यादांची कुंपणं यापासून मुक्त होत अशा एका जगात जातो, जिथं साध्य आणि साधक हे एकरूप होऊन जातात; ताल आणि तालावर पडणारी पावलं. त्यापलीकडचं जग विरूनच जातं जणू!
माङया फोटोग्राफीच्या प्रवासात प्रेरणा बनून किती गोष्टींनी मला भरभरून दिलं. काही कवितांची पुस्तकं, काही कथा आणि काही आत्मकथाही! पण महान अमेरिकन नृत्यांगना इझाडोरा डंकन यांच्या आत्मचरित्रची भेट ही विलक्षण होती, अद्भुत होती. इझाडोरा डंकन. जगभर लोक त्यांना चाहतात. आजही! नृत्याचे साधक आणि जाणकार चाहते यांच्यासाठी तर आजही इझाडोरा ही देवतुल्य कलाकार आहे. आधुनिक नृत्याची जननी! इझाडोरा!!
19क्क् च्या पूर्वार्धातला कालखंड. त्याकाळी बॅले करण्याचे नियम अत्यंत कठोर होते. नियमात बांधलेलं नृत्य नियमानुसारच करावं लागे. इझाडोरानं आपलं नृत्य ‘बॅले’च्या या झापडबंद कठोर चौकटीतून मुक्त केलं. त्याकाळानं ठरवलेल्या नृत्याच्या व्याख्येलाच ते एक आव्हान होतं.
नृत्य करताना विहरणारे पोषाख, अनवाणी आणि पारंपरिक ग्रीक संकेतानुसार केलेलं नृत्य ही इझाडोराच्या नृत्याची एक संकल्पना होती. तिनं आपल्या नृत्यसाधनेत केलेली प्रगती, नृत्यकलेचाच केलेला विकास हे सारं त्याकाळच्या कलेबाबतच्या मुक्त विचारसरणीचा आणि उदारमतवादी प्रवाहाचा एक नैसर्गिक टप्पाच मानला जातो.
सुप्रसिद्ध लेखिका अशिफा सरकार वासी यांना मी काही वर्षापूर्वी भेटलो होतो. त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकासाठी मी फोटोग्राफी करत होतो. अप्रतिम लेखन करणा:या अशिफांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार या सा:यानं मी प्रभावित झालो. मात्र त्यानंतर काही वर्षानी मला कळलं की अशिफा या एक उत्तम बॅले डान्सर आहेत. अशिफांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या सृजनशील कल्पना आणि व्यक्तिमत्त्वातली आनंदी, उत्फुल्ल ग्रेस हे सारं पाहून मला एकदम इझाडोराचीच आठवण आली. जुनाट मनोवृत्ती सोडून खुल्या दिलानं कलेच्या सर्व प्रकारच्या शैलींचा त्यांच्या वेगळेपणासह स्वीकार करणं हे तत्त्व मला अशिफाकडेही दिसलं. इझाडोरासारखंच!
आजवर कितीतरी सिनेकत्र्यानी, कवींनी, कलाकारांनी आपापल्या परीनं इझाडोराला आदरांजली वाहिली आहे. एक सांस्कृतिक चळवळ सुरू करून कलेचा प्रचार-प्रसार करणं हेच इझाडोराचं आयुष्यभराचं ध्येय होतं. त्यासाठी जगभर प्रवास करून तिनं नृत्यकलेला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशिफाबरोबर हे फोटो शूट करताना कलेचं आणि कलाकाराचं स्वातंत्र्य या माङयाही मनातल्या संकल्पना साकारत गेल्या. म्हणूनच हे फोटोशूट म्हणजे स्वातंत्र्य, ग्रेस, उत्फुल्लता आणि ख:या अर्थाची एक मुक्त चळवळ यांचं दृश्य, भौतिक रूप आहे.
इझाडोराच्या गूढ आयुष्याला मी वाहिलेली ही एक आदरांजलीच!!
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)