‘गोरी आणि शंभर गुण चोरी’ - अशी म्हण आजही प्रचलित आहे. कातडीचा रंग गोरा असेल तर अनेक दोष झाकले जातात, आणि काळ्यासावळ्या मुलींना आपल्या गुणांच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करावं लागतं, असं यात अध्याहृत आहे. ‘गोरीच मुलगी हवी’ म्हणून लग्नाच्या बाजारातले आग्रह संपत नाहीत आणि अगदी बायकाही कुणाचं वर्णन करताना सहज म्हणतात, काळीसावळी असली तरी स्मार्ट आहे, तरतरीत आहे, हुशार आहे.-हे सारं आपल्या समाजमनांत इतकं खोलखोल रुतलेलं आहे की, गोर्या रंगाचं आकर्षण काही कमी होत नाही. त्याचा परिणाम म्हणून गोरी त्वचा मिळवून देण्याचे दावे करणार्या प्रसाधनांची बाजारपेठ कोट्यवधी रुपयांची घसघशीत उलाढाल करते आहे.कोरोनाकाळातच अमेरिकेत वर्णसंघर्ष पुन्हा उफाळला आणि ‘ब्लॅकलाइव्हज मॅटर’चा आग्रह धरून जगभरच वर्णद्वेषाची चर्चा सुरू झाली. त्यात आता बातमी आली की, ‘फेअर अँण्ड लव्हली’ या अत्यंत आघाडीच्या ब्रॅण्डने आपल्या नावातून ‘फेअर’ हा वर्ण-भेदाची भलावण करणारा शब्द बाद करण्याचं ठरवलं आहे.कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आम्ही जगभरातल्या सौंदर्यातलं वैविध्य साजरं करतो. यापुढे आमच्या उत्पादनाची माहिती देताना फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग हे शब्द आम्ही वगळत आहोत. ब्रॅण्डनेममधील ‘फेअर’ हा शब्दही यापुढे बाद करत आहोत.’कोट्यवधींची उलाढाल असलेल्या एका बड्या ब्रॅण्डने असं आश्वासक पाऊल उचलत ‘गोरेपणाचा’ आग्रह बाद ठरवावा, केवळ गोरं असल्यानेच आत्मविश्वास वाढतो, नव्या संधी मिळतात असं सांगणार्या स्वत:च्याच जाहिरातींतली मानसिकताही कालबाह्य ठरवावी ही मोठीच गोष्ट ! शादी डॉट कॉम या मोठय़ा संकेतस्थळाने ‘स्किन कलर फिल्टर’ काढत असल्याची घोषणाही याच आठवड्यात केली.या दोन गोष्टी प्रातिनिधिक आहेत आणि पुरेशा बोलक्याही! केवळ भारतातच नव्हे तर सार्या दक्षिण आशियात, भारतीय उपखंडातच गोरं दिसण्याचं मोठं आकर्षण आहे. विशेषत: लग्नाच्या बाजारात गोरं असणं हा गुण आणि काळं-सावळं असणं ही उणी बाजू मानली जाते.म्हणून तर फेअर शब्द बाद ठरवण्याच्या कंपनीच्या निर्णयावर पाकिस्तातून फातीमा भुत्ताे यांनीही ट्विट केलं आहे. त्या म्हणतात, ‘याचा अर्थ गोरं करणारं प्रॉडक्ट बाद केलं जाणार नाही, दक्षिण आशियात ते विकलंच जाईल; पण नावातून फेअर बाद केलं आहे. ही सुरुवातही काही कमी नाही !’दुसरीकडे बिपाशा बासूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर प्रदीर्घ पोस्ट लिहून मनातली खळबळ मांडली आहे.ती म्हणते, ‘मी लहान होते, तेव्हापासून ऐकतेय ‘काळी आहे; पण.’ मी मॉडेल म्हणून यशस्वी होऊ लागले तेव्हाही माध्यमांनी छापलं की, ‘डस्की गर्ल फ्रॉम कोलकाता.’ काळी असणं हे विशेषण माझ्या नावापुढे जोडणं आवश्यक होतं का? पुढे मी यशस्वी झाले, सिनेमे केले तरी माझ्या सौंदर्याची चर्चा सावळेपणाच्या चौकटीतच होत राहिली. आपल्या समाजात कातडीच्या आत खोलवर मुरलेला आहे हा रंगभेद, तो कमी होईल तेव्हा होईल; पण एका कंपनीला हे पाऊल उचलावंसं वाटलं हीच मोठी गोष्ट आहे.!’‘डार्क इज ब्यूटिफुल’ नावाची एक चळवळ चेन्नईतून चालवणार्या कविता इम्यॅन्युअल आणि या चळवळीचा चेहरा असलेली अभिनेत्री नंदिता दास या दोघींनी या दिशेने बरेच प्रयत्न चालू ठेवले. काळं-सावळं असणं हे सुंदरच आहे, गोर्या-काळ्याच्या भेदात रंगद्वेष करू नका असं सांगत अनेक महाविद्यालयात तरुण मुलामुलींपर्यंत पोहोचण्याचं काम या चळवळीने केलं. सामाजिक धारणा बदलायला, जुनाट समज मोडायला वेळ लागतोच; पण ज्या बाजारपेठेनं रंग-आग्रह अधिक टोकदार केले, अनेकांच्या मनात न्यूनगंडाची बिजं पेरत व्यावसायिक इमले बांधले त्याच बाजारपेठेतून जर बदलाचं एक पाऊल पडत असेल, तर त्याचं स्वागतच !
बदलाचं पाऊल
त्वचेचा काळा रंग गोरा करण्याचा दावा करणार्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या बहुचर्चित उत्पादनाच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द बाद करण्यात आला, हा बदल म्हटलं तर प्रतीकात्मक आहे. कारण त्यांनी उत्पादनाचं नाव बदललं आहे, उत्पादन मागे घेतलेलं नाही. अर्थात म्हणून त्यांनी जे केलं त्याचं महत्त्व कमी होत नाही. बदलाच्या दिशेनं जाणार्या प्रत्येक पावलाचं स्वागत आहे. कंपनीने आपलं उत्पादन बाजारपेठेत कायम ठेवून फक्त आपल्या उत्पादनाविषयीचा ‘संदेश’ बदलला आहे.अर्थात हेही नसे थोडके ,कारण इतके दिवस तेच म्हणत होते की, ‘फेअर इज लव्हली!’ काही कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करून त्यांनी ही धारणा, हा संदेश समाजात रुजवला. गोरं असणं ही सौंदर्याची परिभाषा झाली. मुळात जगभरात अनेक भेद आहेत, धर्म, जात, लिंग, लैंगिकता, भाषा आणि अर्थातच रंग. हे सारे भेद खोलवर रुजलेले आहेत, अगदी रंगाचाही. यासार्यात एका कंपनीने आपल्या उत्पादनाच्या नावातून फेअर हा शब्द बाद केला, ही चांगली गोष्ट आहे. पण तरीही एक प्रश्न उरतोच की, आपल्या समाजाची मानसिकता बदलणार का? ती कशी बदलेल?2013 साली चेन्नईच्या डार्क इज ब्यूटिफुल नावाच्या संस्थेशी मी जोडून घेतलं. त्याकाळात रंगभेदाचा एक व्हिडीओ केला होता, तो अनेकांना भावला. मी त्या चळवळीचा चेहरा बनले. आता 2019 साली त्या संस्थेला 10 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा ‘इंडिया गॉट कलर’ नावाचा एक उपक्रम आम्ही सुरूकेला. जनजागृती, माहिती हे सारं सुरूराहिलं. यासंदर्भातले सगळेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आता उत्पादनाच्या नावातून फेअर बाद झालं, हे म्हणजे सागरात एक थेंब पडल्यासारखं आहे.पण तरीही प्रत्येक पाऊल, प्रत्येक छोटी गोष्ट बदलाच्या दिशेनं नेणार असेल तर तीही अत्यंत महत्त्वाची आहे.
- नंदिता दासख्यातनाम अभिनेत्री
महत्त्वाचा आहे तो ‘स्वीकार’
हा बदल प्रातिनिधिक असला तरी आनंददायी आहे. त्याचं स्वागतच आहे. पण ही बदलाची फक्त सुरुवात आहे. अजून बरंच पुढं जायला हवं, आपल्या समाजात सांस्कृतिक दृष्ट्या काळ्या रंगाची हेटाळणी इतकी खोलवर आहे की, मनातून तो भेद काढून टाकणं ही प्रदीर्घ प्रवासाची गोष्ट आहे. जाहिरातीतून रंगभेद मनात मुरवला जातो, जो आहे त्याला खतपाणी घातलं जातं. तेच काम माध्यमंही करतात, सौंदर्याचं वर्णन करताना काळ्यासावळ्या मुलींच्या ‘स्मार्टनेस’चा उल्लेख करतात. त्यामुळे अनेक पातळ्यांवर, अनेक स्तरांत, अनेक माध्यमांतून हा संदेश पोहोचला पाहिजे की, काळं-गोरं, त्वचेचा वर्ण यावर सौंदर्य ठरत नाही. प्रत्येक रंगाची व्यक्ती देखणी असते. तेच समाजमाध्यमातही, आता काहीजण उघडपणे या रंगभेदाविषयी बोलतात, अतिशय अभिमानाने आपल्या रंगाचा स्वीकार करतात. मुळात स्वीकार हीच यातली गोष्ट आहे, आपल्या त्वचेचा रंग देखणाच आहे ही जाणीवच बदल घडवून आणेल.
- कविता इमॅन्युअल,संस्थापक, डार्क इज ब्यूटिफुल, चेन्नई