वंदना अत्रे
आणंदमधले सरोगेट हॉस्टेल. मी भिरभिरल्यासारखी तिथल्या खोल्यांमधून फिरत होते. प्रत्येक खोलीत तीन पलंग. गादीवर साध्या सुती चौकटीच्या चादरी अंथरलेले. सरोगसीसाठी हॉस्टेलमध्ये मुक्कामी आल्यापासून पुढे नऊ महिने प्रत्येक स्त्रीसाठी निश्चित केलेली तिची हक्काची जागा. दोन बाय पाच फुटाचा एक पलंग फक्त.
इतके दिवस इथे राहायचे मग बाकी सामान कुठे ठेवायचे?
‘दोन गाऊन आणि दोन पंजाबी ड्रेस. एवढेच तर असते, बाकी आणखी असते तरी काय? आणि हवे कशाला?’ - कमालीच्या अलिप्तपणो त्या सगळ्या गरोदर बायांनी मला विचारले. एखाद्या टीनाच्या टीचभर खोलीतसुद्धा ब्रह्मांड जमा करणारी बाईची जात, तब्बल दहा महिने जिथे मुक्काम ठोकायचा त्याबद्दल एवढी अलिप्तता? या बायांचे जगच तिरपागडे. एकीकडे त्यांचे नसलेले पण त्यांच्या पोटात वाढत असलेले ते बाळ. त्यासाठी घ्यावी लागणारी इंजेक्शन्स, औषधे, जेवण, आराम आणि खूप काही. पण यामध्ये कुठेच फारसे न गुंतलेले त्यांचे मन.
आणि दुसरीकडे, घरी असलेली त्यांची (स्वत:ची) मुले, दरवेळी काही चांगलेचुंगले खाताना त्यांची येणारी आठवण, नव:याचे होणारे हाल, नातलगांपासून आपले गर्भारपण लपवताना होणारी तारांबळ, यासाठी खंगणारे त्यांचे मन! नव:याचे अपुरे उत्पन्न, त्यामुळे खोळंबलेले मुलांचे शिक्षण आणि मोडक्या-तुटक्या चिरकूट घराची दुरु स्ती- बांधकाम या तीन आणि फक्त तीनच गरजा या स्त्रियांना सरोगसीच्या निर्णयापर्यंत घेऊन येतात.
बारावीपर्यंत शिकलेल्या सविताला विचारले, ‘बारावी शिकलीयेस, तुला एखादी नोकरीही मिळाली असती की. तू कशी आलीस इकडे?’ ‘ताई, बारावी पास बाईला किती पगार मिळाला असता असा? फार तर फार दोनतीन हजार. तेवढय़ा पैशात तर किराणाही येत नाही आजकाल, मग माङो घर कसे झाले असते? आता दहा महिन्यांत मी चार लाख कमावेन. माझं पक्कं ठरलंय, या सरोगसीतून मिळणा:या पैशातून माङो घर नीट बांधून घेणार मी आणि दुसरी सरोगसी करून मिळणारे पैसे फिक्स डिपॉङिाट करून मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार.! ’
- अजून पोटातल्या उसन्या मुलाचे पहिले बाळंतपणसुद्धा पार न पडलेल्या सविताचे नियोजन फार जोरदार होते!
शेजारीच बसलेल्या दीपिका आणि जुलिया यांनी कधीच शाळेचे तोंडही बघितलेले नव्हते आणि ज्या गावातून त्या आल्या त्या नडियादमध्ये त्यांना कुठला रोजगार मिळण्याची शक्यता नव्हती.
‘घरमे दो दो बेटिया, सांस, ससुर और मर्दकी तनखा तीन हजार..’ मग आधी सरोगसी केलेली एक मैत्रीण त्यांना भेटली आणि तिने सुचवले सरोगसीबद्दल. अशा खूप मैत्रिणी आज गुजरातमधील छोटय़ा गावात राहणा:या स्त्रियांना भेटत असतात, कारण त्यांच्यामार्फत एखादी स्त्री सरोगसीसाठी सेंटरवर आल्यावर या मैत्रीपूर्ण मदतीबद्दल त्या-त्या सेंटरकडून त्यांना दहा ते पंधरा हजार रु पये अशी घसघशीत बक्षिसी मिळत असते! एकदा सरोगसी करून गेलेली स्री तिची नणंद, भावजय, बहीण किंवा शेजारीण अशा कोणाला ना कोणाला घेऊन येतेच. पहिल्यांदा हा प्रस्ताव एखाद्या स्त्रीपुढे मांडल्यावर ‘किसी औरका बच्चा अपने पेटमे बडा करनेका? और वो भी पैसा लेके?’ आभाळ अंगावर कोसळावे तशा आवाजात हा प्रश्न आणि अनेक उपप्रश्न येतात. त्याला या मैत्रिणी एका वाक्यात जे उत्तर देतात ते मात्र फारच मनोरंजक आहे.
बक्कळ पैसा मिळवून आलेली ती अनुभवी स्त्री दुसरीला सांगते,
‘अरे कुछ नही, वो क्या करते है, जिसको बच्चा चाहिये ना उसका वीर्य निकालके, धोके अपने बच्चादानिमे रखते है. बस..’
- सरोगसीची किचकट प्रक्रि या इतक्या सोप्या भाषेत मांडणा:या या शहाण्या युक्तिवादाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
प्रत्यक्षात मात्र ही बाब एवढी सहज सोपी नाही. त्यासाठी एका मोठय़ा चक्रातून पार व्हावे लागते.
दोघींना.
सरोगसी करणा:या आणि त्या स्त्रीच्या पोटात जिचे बीज वाढणार असते तिला.
हा प्रवास असतो दोन स्त्रियांचा. एकाच बाळाशी दोन टोकांनी, वेगळ्या नात्याने जोडल्या जाणा:या स्त्रिया. या दोन अशा स्त्रिया असतात, ज्या अगदी भिन्नभिन्न वंश, जाती, वर्ण आणि सामाजिक, आर्थिक परिस्थिती यांतून आलेल्या असतात आणि एरवी त्यांची भेट होण्याची कधी, अगदी कधीही शक्यता नसते..
(आणंदमधल्या या भटकंतीचा सविस्तर रिपोर्ट :
यंदाच्या ‘दीपोत्सव’ मध्ये)