-दिनेशचंद्र
हरितक्रांती आणि धवलक्रांती ही अण्णासाहेब शिंदे यांनी देशाला दिलेली देणगी. ‘कृषिक्षेत्रातला निर्यातदार देश’ अशी भारताची ओळख निर्माण होण्यात त्यांचा वाटा खूप मोठा होता.
डॉ.पंजाबराव देशमुख, अण्णासाहेब शिंदे आणि शरद पवार महाराष्ट्राच्या या तीन सुपुत्रांनी देशाच्या कृषिमंत्रिपदाची जबाबदारी स्वातंत्र्योत्तर काळात ३५ वर्षे यशस्वीपणे सांभाळली आणि अन्नधान्याच्या बाबतीत देशाला संपन्न केले. तसेच कृषिक्षेत्रातला सर्वात मोठा निर्यातदार म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली. कधीकाळी भुकेकंगाल असलेला आपला देश आज स्वत:ची भूक भागवून जगातल्या अन्य राष्ट्रांना अन्न पुरवठा करतो आहे. हा भीष्मपराक्रम गाजवणारे देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक अण्णासाहेब शिंदे. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि त्यापासून प्रेरणा घेणे आजही आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळीसारख्या दुर्गम खेड्यात २१ जानेवारी १९२२ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात अण्णासाहेबांचा जन्म झाला. आई-वडिलांना शेतीकामात मदत करता करता अण्णासाहेबांनी शालेय शिक्षण घेतले. मॅट्रिकला संगमनेर येथील सर डी. एम. पेटिट विद्यालयात ते पहिले आले. पुढील शिक्षणासाठी ते बडोदा येथे सयाजीराव महाराज यांच्या आश्रयाला गेले. याचवेळी १९४२ चा स्वातंत्र्यसंग्राम सुरू झाल्याने अण्णासाहेबांनी कॉलेज शिक्षणावर बहिष्कार घातला व ते नाशिकला परतले. पट्टा किल्ल्याच्या परिसरात सिन्नर, अकोले, संगमनेर या भागात ‘प्रतिसरकार’ स्थापण्याच्या ते प्रयत्नाला लागले. इंग्रज सरकारच्या यंत्रणेला अडथळा यावा म्हणून एक पूल उडवून दिला, पण अण्णासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. तुरुंगात असतानाच साम्यवादी विचारसरणीचा अभ्यास करून अण्णासाहेबांनी लेनिनवर एक पुस्तक लिहिले. दोन वर्षांनी १९४४ साली तुरुंगातून ते कम्युनिस्ट कार्यकर्ता बनूनच बाहेर आले. सिन्नर, संगमनेर परिसरातल्या विडी कामगारांना एकत्र करून त्यांनी संघटना बांधली. अहमदनगर जिल्हा कम्युनिस्टमय झाला व अकोले, संगमनेर तालुक्यांचा परिसर कम्युनिस्टांचे बालेकिल्ले बनले. चळवळीत असतानाच ते एलएल.बी. झाले.
‘१५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाला मिळालेले स्वातंत्र्य खरे नसून केंद्रातले सरकार उलथून टाका’ असा ठराव कलकत्ता येथे कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाहून परतताच अण्णासाहेबांना अटक झाली. विवेकाची कसोटी लावून, कम्युनिस्ट पक्षाचे धोरण कसे चुकीचे आहे, हे सांगणारे पत्रक अण्णासाहेबांनी तुरुंगात असतानाच प्रसिद्ध केल्यामुळे पक्षाने त्यांना वाळीत टाकले. अशा स्थितीत अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली. कम्युनिस्टांचा बहिष्कार कायम होता. त्यामुळे अण्णासाहेब संगमनेर सोडून श्रीरामपूरला आले. श्रीरामपुरात अल्पावधीत वकिली व्यवसायात त्यांनी जम बसवला. खासगी साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या जमिनी खंडाने होत्या. त्यांना अत्यल्प खंड दिला जात होता. अण्णासाहेबांनी संबंधित शेतकऱ्यांना संघटित करून मोठी खंडकरी चळवळ उभारली. त्या चळवळीची दखल घेऊन एकरी रु. ५० इतकी खंडवा सरकारकडून शेतकऱ्यांना मिळवून दिली. त्याचवेळी जनसत्ता नावाचे साप्ताहिकही अण्णासाहेबांनी सुरू केले होते. अण्णासाहेबांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या आग्रहाखातर प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या कामात त्यांनी लक्ष घातले.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या उभारणीस साहाय्यभूत ठरतील अशा कर्तबगार विद्वानांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्याचे ‘बेरजेचे राजकारण’ यशवंतरावांनी केले. आबासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक त्यांनी अण्णासाहेबांना काँग्रेसमध्ये घेतले. पुढे डॉ. विठ्ठलराव विखेपाटील अध्यक्ष, तर अण्णासाहेब कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. त्याचवेळी १९६१ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रवरा साखर कारखान्याला भेट दिली. अशा प्रकारची सहकारी साखर कारखानदारी उत्तर प्रदेशातल्या आपल्या फुलपूर या मतदारसंघात सुरू करण्यासाठी अण्णासाहेबांना दिल्लीला पाठवा अशी विनंती पंडितजींनी यशवंतरावांना केली. अण्णासाहेब दिल्लीला गेले आणि इंदिराजींसोबत फुलपूरला जाऊन आले. अण्णासाहेबांचे कृषी-सहकाराबाबतचे ज्ञान व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन कृषी-सहकाराचा एवढा गाढा अभ्यास असलेला माणूस आपल्याला दिल्लीत हवा असा आग्रह पंडितजींनी यशवंतरावांकडे धरला व पुढच्याच वर्षी १९६२ साली कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब शिंदे काँग्रेसतर्फे खासदार झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, ‘अण्णासाहेबांसारखा कृषितज्ज्ञ दिल्लीत गेल्याने देशापुढची कृषिसमस्या माझ्यापुरती सुटली आहे.’
यशवंतरावांचा हा विश्वास अण्णासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवला. पुढची १५ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी उपमंत्री-कृषी राज्यमंत्री या पदावर त्यांनी काम केले. देशाच्या कृषिमंत्रिपदाची सूत्रे अण्णासाहेबांनी हाती घेतली, त्यावेळी देशाची कृषी व अन्नसमस्या बिकट बनली होती.
विदेशातून येणारा मिलो (निकृष्ट दर्जाचा गहू) खाऊन आपण कशीबशी गुजराण करीत होतो. १९६०-६२ च्या दोन युद्धांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. अशा स्थितीत अत्यंत आत्मविश्वासानं अण्णासाहेबांनी कृषिमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. शेती, पाणी, बी-बियाण्यांबाबत मूलभूत संशोधन केले. तसेच मातीची प्रत काय, कुठे कोणते पीक येऊ शकते यावरच्या संशोधनाला अण्णासाहेबांनी गती दिली. धान्य, कडधान्य, भाजीपाल्याची कृषी संशोधन केंद्रे व कृषी विद्यापीठांद्वारे ठिकठिकाणी लागवड व संशोधन करून हे सारे प्रयोग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले. पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू अशा देशभर एक हजार ठिकाणी शेती लागवडीचे प्रयोग यशस्वी केले.
अण्णासाहेबांच्या या प्रयोगामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. पंजाबातले गव्हाचे व भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे पंजाबातले शेतकरी अण्णासाहेबांबद्दल विशेष आत्मीयता बाळगून असत. महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांना स्वत: पुढाकार घेऊन अण्णासाहेबांनी परवानगी मिळवून दिली. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीत महाराष्ट्र अग्रेसर बनला.
पारंपरिक पद्धतीची शेती बदलून आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी, याकडे अण्णासाहेबांचा कटाक्ष असे. त्यासाठी कृषी औजारांचे उत्पादन करणारे कारखाने अण्णासाहेबांच्या पुढाकारातून सुरू झाले. ट्रॅक्टर, वीजपंप, ठिबक सिंचन आदि कृषी औजारे शेतकऱ्यांना अल्पदरात व विनाविलंब उपलब्ध झाली. शेतकऱ्याला जोडव्यवसाय मिळाला पाहिजे म्हणून संकरित गायींची पैदास, संगोपन यावर अण्णासाहेबांनी भर दिला. पंजाबातल्या जर्सी गायी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विविध कार्यकारी सोसायट्या व जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून मिळवून दिल्या. त्यामुळे महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. शेतकऱ्याच्या हाती पैसा खेळू लागला. त्यानंतर कृषी उत्पादने व दुग्ध उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना अण्णासाहेबांनी चालना दिली. दुग्धव्यवसायाबरोबरच कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मत्स्योत्पादन, सोयाबीन, सूर्यफूल व फळबाग लागवड योजना अण्णासाहेबांनी यशस्वीपणे राबवली. सोयाबीन व सूर्यफु लाच्या लागवडीमुळे विदर्भात तेल उत्पन्नाचे कारखाने मोठ्या संख्येने सुरू झाले व महाराष्ट्र खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.
‘कृषिक्षेत्रातला निर्यातदार’ अशी देशाची ओळख आता निर्माण होऊ लागली. देशात निर्माण झालेल्या अतिरिक्त धान्यसाठ्यासाठी गुदामे कमी पडत होती. त्यामुळे देशभर खुल्या मैदानात धान्याची कोठारे उभी केली. त्यानंतर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये एफ.सी.आय.ची गुदामे अण्णासाहेबांच्या पुढाकारातून देशभर उभी करण्यात आली. भुकेकंगाल भारताची भूक भागवून देशात अन्नधान्याची विपुलता निर्माण केल्यानंतरच अण्णासाहेबांनी देशाच्या कृषिमंत्रिपदाची धुरा खाली ठेवली.
सामान्य भारतीय माणसाचे जीवनमान बदलले पाहिजे, या ध्येयाने अण्णासाहेब भारलेले होते. त्यांनी सहकार चळवळीलाही दिशा दिली.
हरितक्रांती व धवलक्रांती ही अण्णासाहेब शिंदे यांनी देशाला व महाराष्ट्राला दिलेली महान देणगी आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्य पणाला लावलेल्या अण्णासाहेबांनी स्वराज्याचे सुराज्य व्हावे या उदात्त ध्येयाने अखेरच्या श्वासापर्यंत वाटचाल केली.
(लेखक माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष आणि मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आहेत.)