डॉ. यश वेलणकरएखादा भयानक प्रसंग घडल्यानंतर त्याचे दु:ख काही काळ वाटते, ते स्वाभाविक आहे; पण काही माणसात सहा महिने होऊन गेले तरी ते दु:ख हलके होत नाही. सतत त्याच आठवणी येत राहतात, भीती वाटते. या त्रासाला आघातोत्तर तणाव म्हणतात. आघातोत्तर तणाव म्हणजे पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर नावाच्या आजारात अमायग्डलाची संवेदनशीलता वाढलेली असते. एखाद्या माणसाने शारीरिक किंवा मानसिक आघात झेलला असेल, त्याच्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला असेल, त्याने एखादा भयानक अपघात पाहिला असेल किंवा भूकंप, वादळ यामुळे झालेली वाताहात अनुभवली असेल तर बराच काळ उलटून गेल्यानंतरदेखील त्या आठवणी कायम राहातात, मनात अस्वस्थता राहाते, भीतीचे सावट राहाते. झोप नीट लागत नाही, लागली तरी भीतिदायक स्वप्नं पडतात. अचानक भीतीचे झटके येतात. असा त्रास असेल त्यावेळी माइण्डफुलनेस थेरपी उपयोगी ठरते असे संशोधनात दिसत आहे.मानवी मेंदू उत्क्र ांतीने बदलत आलेला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये फक्त जैविक मेंदू असतो. तो भूक, भय आणि लैंगिक आकर्षण एवढेच जाणतो. माणसामध्येही तो असतोच. ब्रेन स्टेम, मेड्युला, हायपोथॅलॅमस म्हणजे हा जैविक मेंदू, सर्व अनैच्छिक शरीर क्रियांचे नियंत्रण करतो. त्याला प्रेम वगैरे भावना समजत नाहीत. म्हणूनच साप त्याच्यावर प्रेम करणाºया सर्पमित्राला चावण्याच्या अनेक घटना घडतात. आघातोत्तर तणाव असताना छातीत धडधड होते, ती या जैविक मेंदूमुळेच होते. सस्तन प्राणी म्हणजे बैल, कुत्रा यांच्यामध्ये जैविक मेंदूबरोबर भावनिक मेंदूही असतो. मेंदूतील लिम्बिक सिस्टीम नावाच्या भागात या गुंतागुंतीच्या भावनांचे नियंत्रण होते. त्यामुळे कुत्रा, बैल, मांजर हे प्राणी आपल्या मालकावर प्रेम करतात. माणसाच्या मेंदूतही हा भाग असतो.अमायग्डला, हायपोथालामास, हिप्पोकाम्पस या मेंदूतील भागांना भावनिक मेंदू म्हणता येईल. भीतीच्या आठवणी, आघाताच्या आठवणी मेंदूच्या याच भागात असतात. सेरेब्रल कोर्टेक्स नावाचा मेंदूचा भाग, ज्याला वैचारिक मेंदू म्हणता येईल, तो माणसाप्रमाणेच गोरिला, चिपांझी यासारख्या अधिक उत्क्र ांत झालेल्या काही माकडांच्या मेंदूतही असतो; पण प्री-फ्रण्टल कोर्टेक्स नावाचा मेंदूचा सर्वात पुढे असणारा भाग हा फक्त मानवामध्येच असतो, हा भाग अन्य प्राण्यात अविकसित असतो.सजगता ध्यानाच्या वेळी मेंदू शांत असतो. असे ध्यान करीत असताना मेंदूचे परीक्षण केले तर यावेळी प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स सक्रि य असतो; पण अमायग्डला उत्तेजित झालेला नसतो, त्याची सक्रि यता कमी असते. याचे कारण असे ध्यान करीत असताना, विपश्यनेचा, माइण्डफुलनेसचा सराव करीत असताना आपण शरीरावरील संवेदना जाणतो पण जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करतो. ही संवेदना चांगली आणि ही वाईट अशी प्रतिक्रि या करीत नाही. अमायग्डलाचे काम शरीरातील संवेदनांना प्रतिक्रि या करणे हेच आहे. नेहमीच्या आयुष्यात या संवेदना तीव्र होतात त्याचवेळी आपल्याला जाणवतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सतत काहीतरी घडत असते आणि त्याला अमायग्डला प्रतिक्रि या करीत असतो.शरीरात काहीतरी होते आहे ते खूप धोकादायक आहे असा अर्थ अमायग्डला लावतो आणि तीव्र प्रतिक्रिया देतो. माइण्डफुलनेस थेरपीमध्ये थेरपीस्ट आघातात्तर तणाव असलेल्या व्यक्तीला थोडा थोडा वेळ शरीरातील संवेदना जाणत त्यांचा स्वीकार करायची प्रेरणा देतो. असे केल्याने मेंदूतील प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स विकसित होतो, त्याच्यामध्ये नवीन पेशी निर्माण होतात. या आजारात अमायग्डला अति संवेदनशील झालेला असतो, काहीवेळा त्याचा आकारदेखील वाढलेला असतो. माइण्डफुलनेस थेरपीने ही अति संवेदनशीलता कमी होतेच आणि रोज वीस मिनिटे असे दोन महिने माइण्डफुलनेस मेडिटेशनचा सराव केला तर वाढलेला अमायग्डला संकुचित झालेला दिसून येतो. त्यामुळे या आजाराचे मूळ कारण दूर होते.या आजारात शरीरातील संवेदना खूपच त्रासदायक असतील तर जाणीवपूर्वक श्वासाची गती बदलवून, थोडा वेळ दीर्घ श्वास घेतला तर अस्वस्थता कमी होते. असा दीर्घ श्वास घेणे म्हणजेच आपल्या शरीर क्रि यांची जाणीव आणि त्यांचे नियंत्रण हे प्री-फ्रण्टल कॉर्टेक्सचे काम आहे. तो निरोगी चिंता लक्षात घेऊन भविष्याचे नियोजन करू शकतो, इतर प्राणी असे नियोजन करू शकत नाहीत.माइण्डफुलनेस थेरपी म्हणजे याच प्री-फ्रण्टल कॉर्टेक्सला दिलेला व्यायाम आहे. तो विकसित झाला, कार्यक्षम झाला की अमायग्डलाला नियंत्रणात ठेवू शकतो. त्याची अकारण, सतत प्रतिक्रि या करण्याची सवय बदलवतो त्यामुळे आघातोत्तर तणावाचा त्रास कमी होतो.आपण का राहातो सजग आणि का होतो सैराट?१. निरोगी माणसाच्या मनात भावना असतात त्यावेळी भावनिक मेंदूतील अमायग्डला नावाचा अवयव सक्रिय असतो, पण त्याचबरोबर प्री-फ्रण्टल कोर्टेक्सदेखील याचवेळी सक्रिय असतो.२. मेंदूतज्ज्ञ असे मानतात की प्री-फ्रण्टल कॉर्टेक्सचे हे उत्तेजन अमायग्डलाला नियंत्रणात ठेवण्यासाठी असते.३. अमायग्डला सक्रिय असतो त्यामुळे माणसाला राग येतो, पण त्याने तो बेभान होत नाही.४. राग योग्य वेळी, योग्य माणसासमोर, योग्य पद्धतीने कसा व्यक्त करता येईल याचा तो विचार करू शकतो.५. याउलट आघातोत्तर तणाव म्हणजे पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर (पीटीएसडी) हा आजार असणाऱ्या माणसात किंवा ज्यावेळी मनात राग, नैराश्य या विघातक भावनांची तीव्रता खूप जास्त असते त्यावेळी प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स शांत असतो आणि अमायगाडला उत्तेजित झालेला असतो.६. याच अवस्थेला इमोशनल हायजॅक असा शब्द वापरला जातो.७. माणूस रागाने बेभान होतो त्यावेळी भावनिक मेंदूने वैचारिक मेंदूला हायजॅक केलेले असते.८. तो इतक्या पटकन प्रतिक्रि या करतो की त्यामुळे वैचारिक मेंदूला काम करण्याची संधीच मिळत नाही.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
yashwel@gmail.co