शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

स्त्री पुजारी आणि विज्ञानयुग

By admin | Published: June 14, 2014 8:02 PM

पंढरपूरच्या विठोबासाठी पुरुष पुजारी आणि रखुमाईसाठी स्त्री पुजारी? इतके दिवस पुरुषांनीच विठोबा-रखुमाईंची पूजा केली ना? या प्रक्रियेलाच स्थगिती मिळाली हे बरंच झालं. कारण स्त्री पुजार्‍याकडून पूजा, स्नान, वस्त्राचा स्वीकार करण्यात विठोबाला काय संकोच होणार किंवा वाटणार होता का? की स्त्री पुजारी लज्जेनं ते सारं नाकारणार होती? खरं तर हे म्हणणं असणार रुजलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचंच..

- विद्या बाळ

सामान्यत: बहुसंख्य घरांमध्ये त्या-त्या धर्माचा संस्कार मूल जन्माला आल्यापासून सुरू होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो रक्तातच उतरत जातो. देव आहे की नाही किंवा धर्म चांगला की वाईट, यासारखे प्रश्न सहसा वयाबरोबर विरूनच जातात! मी अशाच संस्कारी कुटुंबात जन्मले. अनेक वर्षे (जवळपास वयाच्या ३५/४0 वर्षांपर्यंत) स्वत:ला हिंदू समजून सणवार, व्रतं केली. त्यानंतर मात्र हळूहळू अनेक प्रश्न विचारत, अनुभवांचा अर्थ लावत, सभोवतीचं सामाजिक वास्तव बघत मी बदलत गेले. आज मी अशा टप्प्यावर स्थिरावले आहे, की माझे आई-वडील हिंदू होते म्हणून कायद्यानुसार मी हिंदू आहे; पण मी केवळ मानवता हाच धर्म मानते, तसेच देव नाही, या गोष्टीवर माझा विश्‍वास आहे.
या पार्श्‍वभूमीवर, जगत असताना मी आजूबाजूला बघते, की अनेक लोक देव आहे, यावर विश्‍वास ठेवून जगतात. मनात, घरात, देवळात देवाची पूजा करतात. त्यांच्याबाबत माझ्या मनात तुच्छता नाही. विशेषत: जोपर्यंत ते देवाला घरातून उचलून रस्त्यावर बसवत नाहीत, जोपर्यंत ते देवपूजा करून देवाकडून संकटमुक्ती किंवा सुखाची प्राप्ती मिळवू बघत नाहीत, जोपर्यंत ते ‘देवच तारील’ अशा भरवशावर देवावर भार टाकून बसत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या देवपूजेला, त्यांच्या देवभक्तीला फारसं गैर मानण्याचं मला कारण दिसत नाही. मात्र, देवाच्या भक्तीपोटी त्यांची फसवणूक, पिळवणूक होते, त्यांचं शोषण होतं, तेव्हा मला त्यांचा फायदा उठविणार्‍यांविषयी पावलं उचलावीशी वाटतात किंवा जेव्हा बाबा, बुवा, माँ यांच्या भजनी लागल्यामुळे अनेकांना त्यापायी केले जाणारे लैंगिक, शारीरिक, मानसिक अत्याचारही कळेनासे होतात आणि या भोंदूशाहीचं ते सर्मथन करतात, तेव्हाही मला ते असह्य होतं किंवा या संदर्भात सरळसरळ विज्ञाननिष्ठा आणि विवेक यांना खुंटीवर टांगलं जातं, तेव्हा मला हे वास्तव भीषण आणि घातक वाटतं. त्याच वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या आणि विवेकवादासाठीच्या अथक प्रयत्नांचं मोल कळतं. या चळवळीच्या कामाची ज्योत सतत तेवती ठेवण्यासाठी आपल्याला शक्य होईल ते केलंच पाहिजे, याची जाणीव तीव्र होते. 
देव, धर्म, धार्मिक स्थळं यांना आज सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनापेक्षा कडवी धार्मिकता आणि स्वार्थी राजकीयता यांच्या अंगानं फार मोठय़ा प्रमाणात वापरलं जात आहे. अशा वेळी पंढरपूरच्या विठोबाच्या पूजेच्या संदर्भात जे नवं पाऊल पडलं आहे, त्याचं मला मनापासून स्वागत तर करायचं आहेच; पण त्यानिमित्तानं आणखी काही म्हणण्याचीही गरज वाटते आहे. बडव्यांच्या आणि उत्पातांच्या मगरमिठीतून विठोबाची मुक्तता होते आहे, हे फार महत्त्वाचं. सर्वसामान्य भक्त किंवा वारीमधला वारकरी यांच्या विठोबादर्शनात भिंती कशासाठी हव्यात? हे खरं, की जिथे संस्था असते, तिथे व्यवस्थापन हवं; पण तेही असं हवं जिथे भक्ताला समतेचं स्वातंत्र्य, न्याय आणि भक्तीच्या प्रेमाचा अनुभव घेता यावा. नियम हवेतच; पण त्यात लुबाडणूक आणि लाचलुचपत नको. या दृष्टीनं आता पंढरपूरची देवस्थान समिती विठोबा-रखुमाईंच्या पूजेसाठी पुजार्‍यांची रीतसर नियुक्ती करणार आहे, हा महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे.
प्रश्न यापुढेच आहे. पुजार्‍याच्या नेमणुकीसाठीच्या प्रक्रियेत पुरुषांचे अर्ज आले आहेत आणि काही स्त्रियांनीही तोंडी इच्छा व्यक्त केली आहे, असं कळतं. पुजार्‍यांची पात्रता कशी ठरणार? ती पारंपरिक पूजेच्या पद्धतीवर, पठणावर ठरणार असेल, तर पुन्हा ब्राह्मणांना मुभा आणि ब्राह्मणेतरांना बंदी आलीच! ती निश्‍चितच येता कामा नये. त्याही पलीकडे प्रश्न आहेच. कारण, विठोबाच्या पूजेसाठी पुरुष पुजारी आणि रखुमाईच्या पूजेसाठी स्त्री पुजारी नेमली जाण्याची शक्यता आहे, असंही समजलं! या पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेला न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे. पण तरीही या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेवर बोलायलाच हवं.
माझ्या मते, हा प्रश्न आता ऐरणीवर घ्यायलाच हवा. डॉ. आंबेडकरांच्या ‘जातीच्या उच्चाटना’ संबंधीच्या ग्रंथात आणि नंतर त्यांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानात जातिभेद आणि स्त्री-पुरुष भेदाभेद यांना थारा असता कामा नये, ही भूमिका स्पष्ट आहे. देव सार्‍या भक्तांचा आहे, म्हणूनच पुजार्‍यांची जातिविशिष्ट मक्तेदारी नको, या भूमिकेतून यापूर्वीच केरळ, तमिळनाडूसारख्या राज्यांत बडव्यांची मक्तेदारी नष्ट करण्यात आली आहे आणि तमिळनाडूत तर जयललितांच्या कारकिर्दीत स्त्रियांनाच पुजारीपद दिलं गेलं आहे.
पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईंच्या पुजार्‍यांच्या संदर्भात जे ऐकू येतं आहे, ते आक्षेपार्ह आहे. म्हणे, विठोबासाठी पुरुष पुजारी आणि रखुमाईसाठी स्त्री पुजारी! इतके दिवस पुरुषांनीच विठोबा-रखुमाईंची पूजा केली ना? आजवर विठोबाची षोडशोपचारे पूजा, वस्त्रबदल, त्याची आरास करणार्‍यानंच रखुमाईसाठी सारे सोपस्कार केले असतील ना? मग, आता स्त्री पुजार्‍याकडून पूजा, स्नान, वस्त्राचा स्वीकार करण्यात विठोबाला काय संकोच होणार किंवा वाटणार आहे का? की स्त्री पुजारी लज्जेनं ते सारं नाकारणार आहे? खरं तर विठोबा रखुमाईचं काहीच म्हणणं नसणार! म्हणणं आणि अंमलबजावणी आहे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आणि रुजलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेची.
स्त्रीसाठी शुद्धाशुद्धता, पावित्र्य, निष्ठा, भक्ती यांचे निकष मुळात पुरुषांपेक्षा या पुरुषसत्ताक व्यवस्थेत वेगळे आणि दुटप्पी आहेत. स्त्रीला पाळीच्या काळात अशुद्ध, अपवित्र कुणी ठरवलं? पाळीच्या काळात काही स्त्रियांना कंबरदुखी, पोटदुखी, पायात वांब येणं यासारखा त्रास होतो. त्यासाठी तिला ‘बरं नसतं’ म्हणा, ‘आजारी’ म्हणा. ती अपवित्र कशी काय? पुरुषाला ताप खोकला किंवा अन्य त्रास असला, तर त्याला ‘अशुद्ध’ ठरवलं जात नाही ना? मुख्य म्हणजे स्त्रीला असं त्या काळात ‘अशुद्ध’ ठरवणार्‍या धर्ममार्तंड पुरुषांना हे माहीत आहे ना, की त्यांच्या आईला पाळी येत होती; म्हणूनच तर ते या पृथ्वीवर अवतरले! स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर तिला विशिष्ट वयात मासिक ऋतुप्राप्ती होणं, हा तिच्या स्त्री म्हणून होणार्‍या वाढीचा महत्त्वाचा निकष आहे. (परंपरेनं या घटनेच्या गौरवाचा एक उत्सवही केला जातो.) त्यामुळेच मानवजाती वर्षानुवर्षे सातत्यानं जन्माला येते आहे. आजच्या विज्ञान शोधातून जन्मलेल्या कित्येक गोष्टी आमच्या शास्त्राला ‘तेव्हाच’ माहीत होत्या, असा दावा करणार्‍यांना स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थांचं ज्ञान नव्हतं का? असणारच; मात्र पुरुषसत्ताक राजकारणानं अनेक अधिकार आणि श्रेष्ठता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हा भेदाभेद केला. उदाहरणार्थ, बलात्कारासारख्या घटनेत म्हणे स्त्री भ्रष्ट होते! मग बलात्कार करणार्‍या पुरुषाचं लिंग भ्रष्ट होत नाही का? पण, पोथ्यापुराणांत देवादिकांपासून ऋषिमुनींपासूनच अशा प्रकारे ‘चळण्याची’ मुभा पुरुषाला आणि शिक्षा मात्र स्त्रीला देण्यात आली आहे! तसंच स्त्री-पुरुषांच्या संभोगातून मूल जन्माला येतं, याचं ज्ञान मानवाला झाल्यानंतर मुलगा केव्हा होतो आणि मुलगी केव्हा होते, हे ज्ञान कालांतरानं का होईना वैद्यकशास्त्रज्ञांना झालं असेलच. असं असताना स्त्रीजवळ फक्त एक्स क्रोमोझोम असतात आणि त्या एक्स क्रोमोझोमला पुरुषाकडून वाय क्रोमोझोम मिळाला, तर मुलगा जन्माला येतो आणि पुरुषांकडून त्याच्याकडे असणार्‍या एक्स आणि वाय या दोन्हींपैकी फक्त एक्स क्रोमोझोम स्त्रीकडच्या एक्स क्रोमोझोमला मिळाल्यास मुलगी जन्माला येते, हे शास्त्रीय सत्य अजूनही पुरुषांपर्यंत आणि खरं तर स्त्रियांपर्यंत पोहोचलं नसेल, तर तेही ‘वंशाचा दिवा’ या संकल्पनेला पाठबळ देणार्‍या पुरुषसत्ताक व्यवस्थेचंच राजकारण आहे.
पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईंच्या देवळासाठी पुजारी नेमण्यावरून आणखी एक पुरुषसत्ताक खेळीची गोष्ट सांगावीशी वाटते. माझ्या आत्याबाई डॉ. कमलाबाई देशपांडे १९३१मध्ये परदेशातून 
डॉक्टरेट मिळवून परतल्या. त्यांच्या आईच्या इच्छेनुसार, त्या आईसह पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला गेल्या, कमलाबाई विधवा होत्या; पण केशवपनाला त्यांच्या वडिलांनी, तात्यासाहेब केळकरांनी नकार दिला होता. ‘त्या सकेशा विधवा आहेत म्हणून त्यांना विठोबाच्या चरणस्पर्शाची संधी देता येणार नाही,’ असं सांगण्यात आलं! १९३५मध्ये दातार या विधवेनं यासाठीच लावलेला दावा जिंकल्याची नोंद कमलाबाईंच्या ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’ या पुस्तकात आहे.
इथंही पुरुषसत्ताक व्यवस्थेतून जन्मलेल्या रूढींचा प्रत्यय येतो. पतिनिधनानंतर त्या जुन्या काळात विधवेला पुनर्विवाहाला बंदी होती आणि शिवाय केशवपनाची सक्ती होती. याउलट, पुरुषाची पत्नी वारली, तर त्याच्या पुनर्विवाहाला तर बंदी नव्हतीच आणि त्याचं विधुरपण अधोरेखित करणारी स्त्रीच्या केशवपनासारखी कुठली बेडीही त्याच्या पायात नव्हती. स्त्री-पुरुष विषमता पुरुषसत्ताक व्यवस्थेनं बळकट केली. त्यासाठी नानाविविध रूढी जन्माला घातल्या, याचाच हा आणखी एक दाखला आहे!
या पार्श्‍वभूमीवर, विठोबा-रखुमाईंच्या पुजारीपदासाठी स्त्रीचीच निवड आणि नेमणूक करावी, अशी आग्रहाची मागणी आज करायला हवी. रखुमाईच्या पूजेसाठी स्त्रीला राखीव जागा कसली ठेवता? विठोबा-रखुमाई या दोघांची पूजा यापुढे स्त्री पुजारीच करील, असा दावा पुरोगामी स्त्री-पुरुषांनी महाराष्ट्रात या विज्ञानयुगात करायला हवा. ही मागणी केवळ पंढरपूरच्या मंदिरापुरतीच र्मयादित न ठेवता महाराष्ट्रातल्या तमाम देवांच्या मंदिरांसाठी ती एकाच वेळी अमलात यावी, असा आग्रह धरायला हवा. शनिशिंगणापूर असो की कोल्हापूरची अंबाबाई असो, सगळ्या स्त्री-पुरुष देवदेवींसाठी स्त्री पुजारीच यापुढे नेमले जायला हवेत, म्हणजे तरी स्त्रीच्या मासिक पाळीमागचं विज्ञान नाकारून अधिकाराचं/ सत्तेचं राजकारण करणार्‍यांना त्यांनी आता विज्ञानाच्या वाटेवर पावलं टाकायलाचं हवी, याचं भान येईल.
 
 
 
अनेक जण मला विचारतात, की तुम्ही तर देव मानत नाही; मग या देव, देवळं यांच्या संदर्भात बोलण्या-लिहिण्याचं आणि आंदोलनं करण्याचं तुम्हाला कारणचं काय? माझं उत्तर असं आहे, की मी एक जबाबदार नागरिक म्हणून माझं स्वातंत्र्य जपण्यासाठी तर प्रयत्नशील राहाणारच; पण इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये, यासाठीही धडपडणार आहे. जातिभेद आणि लिंगभेद ही विषमतेची मुळं खूप खोलवर आणि दूरवर पसरलेली आहेत. त्यांचं निर्मूलन करण्यासाठी मीच नाही, तर विचार करणार्‍या प्रत्येकानं जिवापाड प्रयत्न करणं, ही आपली सर्वांंची जबाबदारी आहे.
आत्ताच्या २0१४च्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतरची परिस्थिती अधिकच आव्हानात्मक आहे! राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत आणि त्यात एकट्या भाजपच्या जागा २८२ आहेत. भाजपबरोबर महायुतीत शिवसेना आहे. या दोन्ही पक्षांचा भर हिंदुत्ववादी राष्ट्रवादावर आहे. गेल्या काही वर्षांत, धार्मिक आणि जातीय दंगली सगळीकडे उफाळून आल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, तो देवळांच्या व्यवस्थापन समित्यांनी किंवा न्यासांनी जमवलेल्या अमाप संपत्तीचा! या संदर्भात १९२६मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘देवळांचा धर्म आणि धर्मांंची देवळे’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्याचं पुनर्वाचन आणि पुन:प्रसार होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामध्ये इतर अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांबरोबर देवस्थानांनी जमा केलेल्या पैशाबाबत ते लिहितात, ‘देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथने लावलेली आहे. सोट्याच्या तीन दणक्यांत पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्यांची कागदपत्रे मिळाली, तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते?’ त्याही पुढे जाऊन ते लिहितात, ‘हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता, लुच्चालफंग्या, चोर, जाट ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. सत्यसाईबाबा, शिर्डीचं साईसंस्थान पद्मनाभ मंदिर या संदर्भातील गेल्या वर्षा-दोन वर्षांंतील कृतिहीन चर्चा आजही आठवतात. असहाय, गरीब, अंधश्रद्धा आणि त्याबरोबर गैरधंद्यातून अमाप पैसा मिळवणारे अनेक जण इथल्या देवळांना गडगंज संपत्तीची कोठारं बनवतात. हे सर्व धर्मांंच्या प्रार्थना मंदिरांबाबत खरं आहे; म्हणूनच घटनेतील धर्मनिरपेक्षतेला स्मरून या गरीब देशातील अमाप संपत्तीची, देवळांची कोठारं मोकळी करंण निकडीचं आहे!
या संदर्भात डॉ. दाभोलकरांच्या खुनाची घटना आठवते. व्यापक जनहिताचा पुन्हा एकदा विचार करत भोळ्याभाबड्या जनतेला फसवणार्‍या भोंदूंविरुद्ध अहिंसक पद्धतीनं लढणार्‍या या माणसाला पाठीमागून गोळ्या झाडून मारून टाकण्यात आलं. महात्मा फुले यांच्या काळातही त्यांचा क्रांतिकारक विचार न झेपणार्‍यांनी त्यांच्या खुनाची सुपारी घेऊन दोन रामोशी त्यांच्या वाड्यात पाठवले होते. फुले त्यांना सामोरे जाऊ शकले, त्यांच्याशी संवाद करू शकले, त्या संवादातून मारेकर्‍यांना आपली चूक समजली. ते माघारी गेले आणि त्यातला एक जण तर पुढे फुले यांचा विद्यार्थी झाला! संवाद करण्याचं धैर्य फुले यांच्याजवळ होतं आणि अशिक्षित असूनही त्या मारेकर्‍यांना विचार ऐकून त्यानुसार बदल करण्याएवढं शहाणपण होतं! आजच्या ताज्या परिस्थितीत मनगटी ताकद आणि सत्तेचा माज यांचा मुकाबला करण्यासाठी परिवर्तनवाद्यांची एकजूट आणि निर्धार यांची आत्यंतिक गरज आहे. त्यासाठी गोपाळराव आगरकरांच्या भूमिकेनुसार, ‘इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार,’ हा निर्धार निर्भयपणे जपणं आपल्या हातात नक्की आहे.