सुरेश साबळे
पन्नास वर्षांपूर्वी आंबेडकरी विचारधारेतून सुरू झालेल्या ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाने काळाच्या ओघात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चळवळींनाही जन्म दिला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची एकांडी वाटचाल आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.
साहित्यिकांना वाणी आणि लेखणीच्या संदर्भात मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संमेलनात नागपूर येथे आवाहन केले होते की, ‘‘उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष आकुंचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा वस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल, असं प्रवृत्तीत करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दु:खीतांचं फार घटकांचं जीवन उन्नत करण्यास झटा, त्यातच खरी मानवता आहे.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच उदात्त विचार, प्रेरणा आणि लाख मोलाचा सल्ला आहे. या भावनेतून ‘अस्मितादर्श’ या आंबेडकरी प्रेरणेच्या दलित साहित्य प्रवाहाच्या नियतकालिकाचा जन्म २८ नोव्हेंबर १९६७ साली महात्मा जोतिबा फुल्यांच्या स्मृती दिवशी पहिल्या अंकापासून झाला. अस्मितादर्श हे नियतकालिक नितळ आंबेडकरी विचार धारेला वाहिलेले आणि विविध नवनवीन वाङ्मयीन उपक्रमांना जन्म व दिशा देणारे, लेखन निर्मितीच्या कार्यशाळेच्या रूपात आज अव्याहत व अविरतपणे ५० वर्षांपासून विकसित मानसिकतेच्या माणसांचा भक्कम अजेंडा घेऊन वाटचाल करीत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं अवघा समाज पेटला आणि चळवळीद्वारे भारतीय क्षितिजावर श्रेष्ठ जागतिक विचार आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून एक नवीन भान जागृत करण्याचे कार्य दलित साहित्यानं केलं. आजपर्यंत प्रस्थापित मराठी साहित्यानं दु:ख, यातना तशाच जतन केल्या. मानसिक पातळीवर दु:खापासून बंधमुक्त करण्याचा प्रयत्न केला नाही, जो काही प्रयत्न झाला तोही केवळ काही भ्रामक जाणिवेच्या साहाय्याने. याउलट दलित साहित्य प्रवाहाने लोकशाही मूल्याधिष्ठित अपेक्षा साहित्याद्वारे अपेक्षिल्या, ह्या अपेक्षा विधायक संस्कार आणि विचारांची देवाण-घेवाण करत सतत समाजप्रबोधनाच्या चळवळीचा विचार झिरपत झिरपत शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचं काम करणारे विचारमंच म्हणजे ‘अस्मितादर्श’. अस्मितादर्श ही एक वाङ्मयीन व सांस्कृतिक चळवळ आहे. विचारातून वाङ्मयीन जाणिवा निर्माण होऊ शकतात हे दलित साहित्याने सिद्ध केले आहे. अशा या दलित साहित्य आणि सांस्कृतिक लढ्याचे मानबिंदू ठरलेले अस्मितादर्श पिढीत शोषित उपेक्षितांचा विचार मांडणारे फुले-आंबेडकरी प्रवाह झालेले आहे. सद्यस्थितीत वाढती दृकश्राव्य माध्यमं, दूरदर्शन आणि इंटरनेट, सायबर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ब्लॉग, ट्यूटरच्या जमान्यात सांस्कृतिक भूक सारखी वाढत आहे. चंगळवादी व भोगवादी युगात बोटावर मोजण्याइतक्या केवळ निवडक संस्था सामाजिक अस्तित्वासाठी, समाज प्रबोधनासाठी कार्य करताना दिसतात. यापैकीच अस्मितादर्श नियतकालिक गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीसाठी अव्याहतपणे कार्य करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेली सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक पोकळी आणि परिणामस्वरूप येणाºया सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणास समर्थपणे रोखण्यासाठी अस्मितादर्शने आपल्यापरीने निश्चित भक्कम स्वरूपाचे योगदान दिलेले आहे. त्यात दलित कवी, कलावंत, लेखकांना प्रकाशनाचे माध्यम ज्यावेळी उपलब्ध नव्हते अशा काळात अस्मितादर्शचा जन्म झाला, ती काळाची गरज होती. विज्ञान, विद्रोह आणि विश्वमयता आंबेडकरी दलित साहित्यानं ऊर्जा मानली. यामधून अस्मितादर्शमधील सर्जनशील वैचारिक आणि संशोधनपर लेखनात त्याचे प्रतिबिंब दिसू लागले. साहित्य, समाज, संस्कृती, धर्म, इतिहास, शिक्षण, आर्थिक अशा नानाविध विषयांवर अस्मितादर्श मधून चर्चा झाल्यात. अशा ख्यातीप्राप्त अस्मितादर्शचा गाडा गेल्या ५० वर्षापासून निरंतर डॉ. गंगाधर पानतावणे एक साक्षेपी संपादक म्हणून आपल्या असंख्य लेखक, कवी, कथाकार, साहित्यकार, समीक्षक नाटककार आणि हितचिंतकांच्या सहकार्यानं अहर्निश प्रयत्नाने चालवित आहेत.मानवी जीवनातील आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दु:ख भोगलेल्या साहित्यिकांनी बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेऊन या तिन्ही दु:खांना नष्ट करता येते अशी विद्याननिष्ठ भूमिका घेतली. त्यासाठी सामाजिक विषमतेवर घणाघाती प्रहार करताना वेशी बाहेरच्या जीवनाचं आक्रंदन शब्दबद्ध करून सामाजिक क्रांतीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून अस्मितादर्श आंबेडकरी लढ्याची एक सम्यक साहित्य चळवळ झालेली आहे. अस्मितादर्शचे नाते फुले, आंबेडकरांच्या सम्यम विचारांशी आणि त्यांच्या नवसमाज निर्मितीच्या स्वप्नांशी जुळलेले आहे. दलित साहित्य आज प्रमुख साहित्य प्रवाहातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रवाह झालेला आहे. इतकेच नव्हे तर दलित साहित्यानं अखिल मराठी साहित्याचा कक्षा रूंदावल्या आहेत. या प्रवाहातील साहित्यिकांच्या प्रतिभेचे स्फुलिंग फुलविण्याचे काम अस्मितादर्श करीत असते.आपल्या देशानं स्वातंत्र्याच्या अर्धशतकाचं वय ओलांडल्यानंतरही सामाजिक गुंतागुंतीची जाळी अधिक घट्ट होत आहे. धर्मांधतेचे लोंढे धर्मनिरपेक्षतेच्या उरावरून धर्माच्या दारूगुत्यात राजरोसपणे जात असताना अस्मितादर्श फुले-आंबेडकरी ऊर्जेने दलित साहित्याच्या परिवर्तनशील सामाजिक व सांस्कृतिक चळवळीद्वारे आपलं कर्तव्य गेल्या ५० वर्षांपासून अत्यंत धिरोदात्तपणे आणि निष्ठेने पार पाडीत आहे. अस्मितादर्श हे आता एक केवळ नियतकालिक राहिले नसून ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चळवळ झालेले आहे. या वाङ्मयीन चळवळीने नव्या वाङ्मयीन जाणिवा जोपासताना बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या प्रेरणांचा स्वीकार करून धर्मांधतेच्या लोंढ्यांना परिवर्तनाच्या लढ्यात सामावून घेण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे. म्हणूनच प्रस्थापित आणि शोषितांच्या लढ्यात अस्मितादर्शने नेहमीच शोषितांची बाजू यशस्वीपणे लढविली आहे. दलित शोषितांच्या उद्धाराचा आणि स्त्री-मुक्तीचा विचार अधिक प्रभावी करण्याबरोबरच साहित्य, समाज, धर्म, इतिहास, शिक्षण आदी नानाविध प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण लेखन समाजापुढे मांडतांना सामाजिक गुलामगिरीवर सूक्ष्म विचारांच्या तीक्ष्ण हत्याराने वार करून दलित समाजाच्या अस्मितेला धार आणून सामाजिक समतेच्या विचाराशी अस्मितादर्शने कायम बांधिलकी राखली आहे. त्यामुळेच गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या कालखंडातून परिवर्तन प्रक्रियेचा एक दमदार प्रवास प्रत्ययास येतो. अनेक सामाजिक प्रश्नांचा परामर्श घेऊन समाज शिक्षणाला गती देण्याचे कार्य अस्मितादर्श करीत आहे. अस्मितादर्श साहित्य संमेलन हे या नियतकालिकाची एक वैचारिक यात्रा आहे. या वैचारिक मेळाव्यातून दलित लेखकांबरोबरच अनेक दलितेतर विचारवंतांनी लेखन आणि चिंतन केल्यामुळे अस्मितादर्श आणि अस्मितादर्श साहित्य संमेलन हे एक समृद्ध फुले-शाहू-आंबेडकरी वाङ्मयीन चळवळ म्हणून आज केवळ महाराष्ट्रापुरती सीमित राहिली नसून ते आता देशात आणि देशाबाहेरील विचारवंत व अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण विचार संस्था झाली आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, दलित साहित्याच्या विश्वव्यापी आयामामुळेच परंपरागत मराठी साहित्याच्या कक्षा रूंदावल्या आहेत. त्यात अस्मितादर्शची निर्णायक भूमिका राहिली आहे, हे सत्य आता कुणालाही मान्य करावेच लागेल.
सांस्कृतिक विघटन आणि वैचारिक दुर्भिक्ष असलेल्या काळात अस्मितादर्शने आपल्या कार्यास सुरुवात करत समाजरचनेचे आणि सामाजिक जागृतीचे काम केले. यासाठी अस्मितादर्शचे ठिकाण सर्वांसाठी खुले ठेवून १९७४ सालापासून म्हणजे अस्मितादर्शच्या जन्माच्या सातव्या वर्षापासून वाचक आणि लेखकांचा साहित्यिक मेळावा दरवर्षी निरंतरपणे आयोजित करण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राबाहेरही आतापर्यंत साहित्यिक मेळावे झालेले आहेत. प्रारंभी होणाºया मेळाव्याचे रूपांतर आता साहित्य संमेलनात झाले आहे. प्रज्ञेचे तेज तळपविणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम शाबूत डोक्याची माणसं केली. कालांतराने विचारांची व्याप्ती वाढत गेली आणि त्यातूनच माणूस केंद्रबिंदू बनत गेला. पुढे माणसाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. आवाहन करणाºया आणि आव्हान स्वीकारणाºया विचारवंताच्या फौजा छावण्यांसह उभ्या राहिल्या. मोडक्या झोपड्यांवर पेटती कोलीतं फेकणाºयांना परतविण्यासाठी लंगोटीतील माणसांच्या हातात लेखनीचे शस्त्र देऊन जे झोपड्यांना साकारू शकत नाही त्यांना झोपड्या जाळण्याचे अधिकार कुणी दिले? यावर विचार करण्यासाठी अस्मितादर्श साहित्य संमेलनात शोध निबंध वाचन, परिसंवाद, कथाकथन, दलित नाटक, दलित शाहिरी, प्रकट मुलाखत आणि कविता वाचन, लेखक-वाचक संवाद.. असे उपक्रम होतात. अस्मितादर्शचे वय ५० वर्षांचे तर अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे वय ३५ वर्षांचे. अस्मितादर्शला वैचारिक पातळीवर जसे लढावे लागले तसेच आर्थिक पातळीवरही जन्मापासूनच लढावे लागत आहे. आंबेडकरी विचाराचे हे माध्यम भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. परंतु सध्या प्रतिकूल स्थिती आणि आर्थिक ताणातून लेखकांच्या/वर्गणीदारांच्या सहकार्यातून अस्मितादर्शची वाटचाल सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही शासकीय अनुदान न घेता अगदी स्वयंस्फूर्तीने अस्मितादर्शचे नियमित अंक प्रकाशित होत असून साहित्य संमेलनही होत आहे. या चळवळीस बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निश्चित निधी अस्मितादर्श नियतकालिकास आणि साहित्य संमेलन आयोजनासाठी देण्याबाबत सकारात्मक विचार करावा. पुरोगामित्वाचा वारसा सांगणाºया जाणकारांनीही आपला आर्थिक सहभाग नोंदवावा अशी ‘अस्मितादर्श’च्या ५० वर्षांच्या यशस्वी वाङ्मयीन वाटचालीच्या निमित्ताने हार्दिक सदिच्छा...!
(लेखक ‘अस्मितादर्श’ चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)