- नम्रता भिंगार्डे
‘1996ला माझ्या स्वत:वरही तशीच पाळी आली होती. माझा मुलगा सहा महिन्यांचा होता. रांगत होता. एका दुपारी टॅँकर आला म्हणून मी मुलाला शेजारच्या लहान मुलाच्या भरोशावर सोडून हंडा घेऊन धावले. तिथे बराच वेळ गेला. इथे माझ्या मुलाने रांगत जाऊन स्टोव्हचं हवा भरायचं बटन तोंडात टाकलं. टँकरवर माझा नंबर लागला नाही. रिकामा हंडा घेऊन घरी आले आणि बघितलं तर पोरगं जमिनीवर निपचित पडलं होतं. एक किंकाळी फुटली तोंडातून.. त्याला मांडीवर घेतलं.. आसपासचे धावत आले. एकाने त्याच्या छातीला हात लावला. ‘धुगधुगी आहे अजून’ म्हणाला. काय तरी लवकर करायला पायजे. मी लेकरू गमावलं याच विचारात असताना त्याने पोराच्या तोंडात बोट घालून रक्तानिशी ते बूच बाहेर काढलं आणि निपचित पडलेला माझा राकेश रडायला लागला. त्याला श्वास घेताना बघून माझा अडकलेला श्वास सुटला. नंतर दवाखाना, औषधं तर केलीच; पण महिनाभर त्याचा घसा सुजलेला होता.’ - कित्येक वर्षांपूर्वी घडलेला हा जीवघेणा प्रसंग सांगताना धुळ्यातल्या बाबरे गावच्या सीमा भालेकर यांचा आवाज कापरा झाला होता.त्यांच्यासह ओट्यावर बसलेल्या सगळ्या बायकांनी डोळ्याला पदर लावला. त्या घटनेमुळे टॅँकरची धास्ती त्यांच्या मनात बसली ती कायमची.गावातली शुष्क दुपार.. मृगजळाच्या वाटेवर अजगरासारखे सुस्त पडलेले कोरडे तापट रस्ते.. बैलबंडीवर कोणीतरी पाण्याची टाकी आणतंय.. तेवढाच काय तो आवाज.. बाकी शांत.. दरवर्षीप्रमाणे यंदाचा उन्हाळाही पाण्याची विवंचना घेऊन आला. आज त्या गावात पाण्याचे स्रोत आटलेले आहेत. शेजारच्या गावच्या विहिरीवरून पाणी आणत किंवा 50 रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेऊन बाबरे या गावाची तहान भागतेय. आठवड्यातून दोन टॅँकर येतात; पण ते पाणीही पुरेसं मिळत नाही. पाण्यासाठीची भांडणं, मारामारी यांनी गावाचं संतुलन बिघडत चाललं आहे. सीमाताईंच्या घराच्या चावडीवर बायका-माणसं एकत्न जमली होती. एकेकजण पाण्यासाठी करत असलेल्या कसरती विस्ताराने सांगू लागले.मागच्या वर्षी उन्हाळ्यात सीमाताईंच्या शेजारी राहणार्या वैशाली राजपूत हिचं घर जळालं. आग विझवायला गावात पुरेसं पाणी नव्हतं. परिणामी दोन बहिणींचे कपडेलत्ते, डिग्य्रा, भांडीकुंडी, कपाट, गादी, टीव्ही सगळं सगळं बेचिराख झालं.‘‘मी आणि आई दवाखान्यात जाण्यासाठी बसस्टॅण्डवर थांबलो होतो. घरी कोणी नव्हतं. आग लागली त्यावेळी गावातले लोकं धावत आम्हाला शोधत बसस्टॅण्डला आले.’’ - 19 वर्षांच्या वैशालीने डोळ्यांसमोर घर जळताना पाहिलं. वैशालीची आई, निर्मलाबाई या पनवेलच्या एका हॉस्पिटलमध्ये चतुर्थर्शेणी कामगार म्हणून काम करते. वैशाली आणि तिची बहीण दोघी बाबरे गावातच राहतात. ‘वाटतं ना, आईजवळ रहावं; पण पनवेलमध्ये राहणं आणि शिकणं परवडणारं नाही. आई महिन्यातून एकदा काही दिवसांसाठी येते. तेव्हाच आम्ही तिला भेटू शकतो. बाकी आम्ही दोघीच’, वैशाली सांगते.मुलींचं शिक्षण व्यवस्थित चालावं म्हणून मनावर दगड ठेवून वैशालीची आई शहरात राहतेय. निर्मलाबाईंची परिस्थिती माहीत असल्यामुळे गावातल्या सगळ्या महिला वैशाली आणि तिच्या बहिणीला पोटच्या पोरीसारखं सांभाळतात.बाबरे हे गाव दरवर्षी पाण्यासाठी धडपड करतं आहे. यंदा या गावाने र्शमदानातून जलसंधारण करण्याचा निर्णय घेतला. पाण्याचा प्रश्न बिकट आहे. सगळे पर्याय थकले आता वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने हाही उपाय करून बघू म्हणून गावातले काहीजण एकत्न आले. विचाराअंती गावाने मोठी जबाबदारी वैशाली आणि सीमाताईंवर टाकली.‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेच्या निमित्ताने जलसंधारणाचं ट्रेनिंग घेण्यासाठी 19 वर्षांची वैशाली आणि 35-36 वर्षांच्या सीमाताई; दोघी गेल्या. या चार दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये आपल्या गावाचा प्रश्न त्यांना सखोल समजला. पडणारा पाऊस जिरवण्याच्या शास्रीय पद्धती दोघींना समजल्या. शोषखड्डय़ासारखा आवाक्यात असलेला उपचार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय हे समजलं आणि काहीतरी करण्याच्या इच्छेने दोघी माघारी गावात परतल्या. आज ग्रामसभा होती. संध्याकाळी गावातले सगळे बायकापोरं गोळा झाले. गेले दोन दिवस सीमाताई या दिवसाची तयारी करत होत्या. ‘मी ग्रामसभा पहिल्यांदाच पाहिली. आमचं काय काम नसतंच ग्रामसभेत जाण्याचं. एवढय़ा लोकांसमोर उभं राहून माइकवर बोलायचं धाडस होत नव्हतं. पण म्हटलं; नाही, गावकर्यांनी मोठय़ा विश्वासाने आपल्याला ट्रेनिंगला पाठवलं होतं, तर बोलायचंच. पण लोकं आपल्याला हसू नयेत म्हणून ग्रामसभेत काय काय सांगायचं ते लिहून काढलं. अभ्यास केला. एकदा घरात म्हणून पाहिलं. आणि पहिल्यांदाच मी न घाबरता ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या जलसंधारणाबाबत अर्धा तास बोलले.’ सीमाताईंना ‘वॉटर हीरो’ म्हणून गावातल्या सर्व बायका-पुरुषांच्या नजरेत सन्मान मिळाला. मुख्य म्हणजे आता ग्रामसभेत त्या नियमित जाऊ लागल्या आहेत. केवळ पाणी भरण्यापर्यंतच र्मयादित न राहता जलसंधारणाविषयी त्या बोलू लागल्या आहेत.यंदा पाऊस कमी झाला. ग्रामीण भागात रोजगारावर दिवाळीपासूनच परिणाम झाला. उन्हाळ्यात तर आसपासच्या गावांमधल्या शेतांवरही रोजगार मिळेना झाल्यावर काही ग्रामस्थ स्थलांतरित होतात, तर काही निव्वळ देवळाच्या, गावाच्या पारावर दिवसभर रिकामी बसून राहतात. स्मार्ट फोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे गावागावात मोबाइलवर काहीबाही बघत सावलीला बसलेली तरु ण मुलं हे दृश्य तर प्रत्येक गावात हमखास पहायला मिळतं. हाताला काम नसल्याने आणि टाइमपास करण्यासाठी प्रत्येकाकडे खिशात मावणारं साधन असल्याने गावातले तरुण आणि माणसं दिवसभर त्या खेळण्यात गुंतून राहतात. गावागावातल्या महिलांच्या हातांना मात्न उसंत नसते. उन्हाळ्यात शेतीची कामं नसतात. मग महिला वाळवणं घालतात. कोणी शेवया करतं, तर कोणी पापड, लोणची ! बाबरे गावातल्या त्या दुपारीही बायकांनी उन्हाळ्याची कामं काढली होती.धुळीत गिरक्या घेत आलेल्या वावटळीकडे बघून लगबगीने बाहेर येत पापडांवर पदर टाकून सुनीता राजपूत ओसरीवर बसल्या. शेणामातीनं सारवलेल्या ओसरीवर ठेवलेलं छोटं दगडी जातं. तूरडाळीनं भरलेल्या सुपात सुनीताताईंनी बांगड्या भरलेल्या हाताने तूरडाळ घेतली. स्तब्ध दुपारी दगडी जातं गोल फिरायला लागलं. जात्याची लय पकडत मनातल्या शब्दांनी ओठांवर फेर धरला.. ओवी! जिथल्या वातावरणात बहिणाबाईंच्या कवितांची सुरावट रुंजी घालते.. जिथल्या टेकड्यांच्या कानात त्यांच्या शब्दांमधलं शहाणपण घुमलं.. जिथल्या मातीला बहिणाबाईंचे हात लागले, त्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकीला बहिणाबाईंची भाषा वारसाहक्काने मिळाली आहे. सुनीता राजपूत दळता दळता अहिराणी भाषेत गात असलेली ओवी म्हणजे ओलावा आहे..बळीराजा सुखी व्हावा, शिवार पाण्याने समृद्ध व्हावं, नात्यांमध्ये गोडवा रहावा, निसर्गाला जपावं अशी गुंफण आहे. ही ओवी म्हणजे दुष्काळाचं सावट घेऊन वावरणार्या त्या शुष्क दुपारी टिकून राहिलेला ओलावा आहे..namrata@paanifoundation.in(लेखिका पानी फाउण्डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)