अशोक राणे
पोरं फुटबॉल खेळत आहेत. जीव खाऊन धावत आहेत. प्रतिस्पध्र्यांवर निकरानं मात करीत आहेत. आपणच गोल करायला हवा, या ईर्षेनं पेटलीत. उत्तरोत्तर खेळ आक्रमक होत चाललाय.. पण! पण बॉल कुठाय..? बॉलच नाही मैदानात.. आणि तरीही खेळ फुटबॉलचाच रंगलाय. बॉलशिवाय फुटबॉल! कारण कट्टर धर्मवाद्यांनी फुटबॉलवर बंदी आणलीय.. आणि तरीही फुटबॉलप्रेमी बॉलशिवाय खेळत आहेत. हा आहे त्यांनी नोंदवलेला निषेध.. अतिशय संयमानं आणि अर्थातच मुकपणानं..! धर्माला मान्य नाही म्हणून जुलमी, क्रूर धर्मवाद्यांनी फुटबॉलप्रमाणेच अनेक गोष्टींवर बंदी आणलीय. चहा, सिगारेट नाही, संगीत ऐकायचं नाही, हसायचं नाही, रंगीत कपडे घालायचे नाहीत. त्यामुळे रस्ते सुनसान. ज्यांना जसं जमेल तसं ते या बंदीविरुद्ध निषेध नोंदवतात. बायकांनी हात उघडे ठेवू नयेत; हातमोजे घालावेत, असा फतवा निघालाय. एका बाईच्या उघड्या हाताकडे पाहत कट्टरवादी तिला जाब विचारतो. ती क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देते, ‘‘उघडे हात बघणं आवडत नाही, तर पाहता कशाला आमच्याकडे?’’
जिथं मोठय़ा प्रमाणात इस्लामी लोक आहेत, अशा कुठल्या तरी आफ्रिकन देशामध्ये हे सारं घडतंय. बाहेरून आलेला कट्टर मूलतत्त्ववादी तरुण पोरांचं ब्रेनवॉश करीत त्यांना या ‘अशा’ धर्मसुधारणेच्या कामासाठी जुंपतो. त्यातूनच एक दहशतवादी संच तयार होतो आणि म्होरक्यानं काढलेले फतवे अमलात आणत सुटतो.
‘तिम्बक्तू’ या आपल्या चित्रपटात मॉरिशसच्या अबदरानमाने सिसाकोनं हे वास्तव चितारलं आहे. धर्मवेड्या मूलतत्त्ववाद्यांमुळे जनसामान्यांचं अवघं अस्तित्वच कसं धोक्यात आलंय, याचं अगदी रोखठोख चित्रण करताना दिग्दर्शकानं या अतिरेकी वृत्तीच्या लोकांच्या जाळ्यात कोवळी पोरं कशी सापडतात, ब्रेनवॉशनंतरही काहींच्या डोक्यात संभ्रम कसे निर्माण होतात आणि त्यामुळे ते कसे अर्धे कच्चे अतिरेकी बनतात, या वास्तवाकडेही लक्ष वेधलंय. आडोशाला जाऊन सिगारेट ओढणार्या म्होरक्याला त्याचा तरुण साथीदार म्हणतो, की ‘तू लपूनछपून सिगारेट ओढतोस, हे सर्वांनाच माहीत आहे.’ इतरांवर कसली-कसली बंदी लादणारा आपला नेता मात्र काही गोष्टी करतो, हे त्यांना कळतं आणि मनात प्रश्नही उभे करतं.
धर्माला अमुकतमुक गोष्टी चालत नाहीत, असा फतवा काढण्यासाठी म्होरक्याला व्हिडिओ फिल्म करायची असते. कॅमेर्यासमोर बोलण्यासाठी तो आपल्या तरुण साथीदारांची निवड करतो; परंतु एकालाही धड बोलता येत नाही. कारण एकालाही ते धड कळलेलं नाही; म्हणून पटलेलंही नाही. एकीकडे हे असे काही मोजके प्रसंग, तर दुसरीकडे या मूलतत्त्ववाद्यांची थरकाप उडविणारी दहशत, याचं चित्रण दिग्दर्शकानं अशा काही प्रगल्भ बाळगून समज केलंय, की जगापुढे कायमचं आव्हान होऊन बसलेल्या या धर्मांध अतिरेकीपणाचं नेमकं आणि थेट दर्शन घडतं. एकूणच, हा चित्रपट हादरवून टाकणारा अनुभव देतो.
यंदाच्या कान महोत्सवात ‘तिम्बक्तू’बरोबरच ज्येष्ठ ब्रिटिश दिग्दर्शक केन लोश यांचा ‘जिमीज् हॉल’ दाखविला जाणं, हा एक चांगला योगायोग म्हणावा लागेल. धर्मांध मूलतत्त्ववादी हे काही एका विशिष्ट धर्मातच असतात असं नाही, ते सर्वच धर्मांत असतात. आपल्या अतिरेकीपणानं ते सर्वसामान्यांचं जिणं हराम करून टाकतात. ‘जिमीज् हॉल’चा काळ आहे १९३१चा. देश आहे आयर्लंड. स्वतंत्र वृत्तीचा जिमी ग्राल्टोन आपल्या मालकीच्या जागेवर एक मोठा हॉल तयार करतो. तरुण-तरुणींनी तिथं जमावं, मोकळेपणानं गप्पाटप्पा कराव्यात, वादविवाद-चर्चा कराव्यात, वैचारिक देवाणघेवाण करीत एकमेकांकडून शिकावं आणि अर्थातच गावं, नाचावं; परंतु चर्चला ते मान्य नाही. तरुण पिढीला हे सारं बिघडवेल म्हणून चर्च ‘संस्कृतिरक्षका’च्या भूमिकेत जात जणू काही सबंध समाजव्यवस्थेच्या मुळावरच आलेलं हे महाभयंकर संकट आहे, असा टोकाचा पवित्रा घेतं. केवळ कडवा विरोधच करीत नाही, तर साक्षात युद्धच पुकारतं. ‘देवा यांना क्षमा कर, कारण यांना ते काय करताहेत तेच कळत नाही,’ असं म्हणणारा ख्रिस्त ज्या चर्चमध्ये आहे, तेच चर्च हिंस्र होत जातं. जिमीनं उभा केलेला हॉल चर्चचे पाठीराखे पेटवून देतात. जिमी आणि त्याच्या पाठीराख्यांवर खुनशी हल्ले करतात; परंतु आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारेही कडवी झुंज देतात. खूप काही गमावून ते ही लढाई जिंकतात.
केन लोशसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाविषयी, त्याच्या चित्रपटांविषयी आता आणखी नव्यानं काय बोलावं..? त्याच्या प्रतिभेचा आणखी एक प्रगल्भ आविष्कार! परंतु, ‘जिमीज् हॉल’नं माणसाचं अवघं अस्तित्व, त्याचं आविष्कारस्वातंत्र्य हे केवळ कालपरवाच नव्हे, तर आजही काही अतिरेकी वृत्तीच्या लोकांच्या पकडीत कसं आहे, याचंच प्रत्ययकारक दर्शन घडवलं. त्यांचा धर्म कुठला का असेना!
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना त्या-त्या महोत्सवात नवं असं काय हाताला लागलंय किंवा लागतंय, याविषयी आम्हा महोत्सव-वारकर्यांना विशेष कुतूहल असतं. त्यासाठी आमचा शब्द असतो- ‘डिस्कव्हरी’! यंदाच्या कान महोत्सवाची ‘डिस्कव्हरी’ होती ‘रन’ हा आफ्रिकन चित्रपट! फिलिप लाकोते याचा हा पहिलाच चित्रपट! त्याआधी त्यानं उमेदवारी बरीच केली आहे. या ‘रन’च्या कथानायकाचं नावच आहे रन. तो म्हणतो, ‘‘माझं नाव रन आहे; पण मी पळपुटा नाही. मी धावतोय माझा स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी!’’
या ‘रन’नं राष्ट्राध्यक्षाचा खून केलाय. अगदी कालपरवापर्यंत ज्याच्या खांद्याला खांदा लावून जो लढला, ज्याचे आदेश पाळले, त्या आपल्या म्होरक्यालाच त्यानं गोळ्या घातल्या. कारण, कालपरवाचा हा ‘क्रांतिकारक’ आज तसाच आणखी एक सत्ताधीश होऊन बसलाय, ज्याला क्रांतिकारकांनी हुसकावून लावलं. फ्रेंच राज्यक्रांतीवरच्या आंद्रे वायदा यांच्या ‘दाँते’ची प्रकर्षानं आठवण होणं स्वाभाविक होतं. ‘अबसॉल्युट पॉवर करप्ट्स..’ हेच सत्य दोन्ही ठिकाणी बर्यापैकी केंद्रस्थानी आहे. लाकोतेचा ‘रन’ मात्र वेगळ्या वाटेनं या सत्याकडे येतो. राष्ट्राध्यक्षाचा खून केल्यानंतर पळणार्या ‘रन’चं आयुष्य फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जातं. त्याचं बालपण, पौगंडावस्थेचा काळ आणि तारुण्यात पदार्पण या तीन टप्प्यांत क्रमाक्रमानं त्याला येत जाणारं सभोवतालाचं भान आणि त्यातून त्याच्यात तयार होत जाणारा बंडखोर, असा त्याचा प्रवास त्यातून दिसतो आणि आपल्यालाही प्रेक्षक म्हणून त्यातल्या स्वाभाविकतेचा प्रत्यय येतो. सभोवतालातली विसंगती पाहत तो सर्वप्रथम मोठा होत जातो. बर्याचशा आफ्रिकन देशांत उपासमारीचं थैमान. आयव्हरी कोस्ट असाच एक आफ्रिकन देश. लहान वयातच ‘रन’ला पोटापाण्यासाठी कसली-कसली कामं करावी लागतात. त्याचं एक काम असतं, एका राक्षसी वृत्तीच्या एका खादाड महामायेची तिच्या खेळात सोबत करणं. शंभरेक माणसांचं अन्न ती काही क्षणांत फस्त करते. स्वत:ला एक वेळचं अन्न मिळताना मारामार असलेले उपाशीतापाशी लोक पैसे देऊन तिचा हा खेळ पाहतात. अचंबित होतात. खूष होतात. त्यांची करमणूक होते. रनला हे सारं उद्विग्न करून जातं. तिथून त्याचं मग क्रांतिकारकांच्या टोळक्यात ओढलं जाणं- विचारानं नव्हे, तर एका अपरिहार्यतेनं.. आणि मग पुढचं सारं काही घडतं. ‘रन’ची मांडणी डॉक्युफीचर या प्रकारची आहे. खरं तर असं लेबल लावणं बरोबर नाही; परंतु हा नेमका कुठल्या प्रकारचा चित्रपट आहे, याची कल्पना वाचकांना यावी म्हणून असा उल्लेख केला. ‘रन’ खरं तर या पठडीला पुढे नेणारा चित्रपट आहे. एक प्रखर समकालीन वास्तव मांडताना त्याची गोष्टही करायची; परंतु त्याचं राजकीय-सामाजिक पर्यावरण कणभरदेखील पातळ होऊ द्यायचं नाही, हे कसब लाकोतेनं एका प्रगल्भ जाणिवेनं साधलंय. ‘रन’ पाहिल्यावर त्यानं त्याआधी केलेल्या त्याच्या डॉक्युमेंटरी पाहायची अनावर उत्सुकता लागून राहिलीय, इतका तो आजचा आणि उद्याचा जागतिक सिनेमातला महत्त्वाचा दिग्दर्शक आहे. त्याच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा तपशील सांगितल्याशिवाय राहवत नाही. त्याच्या घराशेजारी मॅजिक नावाचं सिनेमा थिएटर होतं. कामाला जाताना त्याची आई त्याला त्या थिएटरमध्ये सोडून जायची आणि मधूनच कधी तरी घरी आणायची. पुन्हा नेऊन सोडायची. त्यानं तिथं तुकड्या-तुकड्यांत बरेच सिनेमे पाहिले आणि मग हे तुकडे जुळवून त्यातून सलग कथा रचायचा त्याला छंदच जडला. त्याचं चित्रपटाचं शिक्षण हे असं झालं.. आणि गमतीचा भाग म्हणजे ते सारे चित्रपट होते, कुंग फूचे आणि चक्क आपले हिंदी..!
रॉल्फ डी हीरच्या ‘चार्लीस कंट्री’ (ऑस्ट्रेलिया)चा नायक आपल्या स्वतंत्र वृत्ती जपू पाहतो आहे. ऑस्ट्रेलियाच्या अगदी उत्तरेकडच्या प्रदेशात राहणार्या आदिम आदिवासींमधला चार्ली त्यांचं आधुनिकीकरण करीत चाललेल्या व्यवस्थेनं जेरीस आला आहे. त्यांना ‘सिव्हिलाइज्ड’ करीत निघालेल्या व्यवस्थेचा त्याला राग आहे. त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीवर अनेक बंधनं लादली गेली आहेत. बंधनांचा हा काच असह्य झाल्यामुळे चार्ली पुन्हा जंगलात जातो आणि आपलं पिढीजात जिणं जगू लागतो; परंतु आता खूप काही बदललंय. हा ‘बदल’ त्याला त्याच्या मूळच्या जीवनशैलीत पुन्हा रुजू देत नाही आणि नागर संस्कृतीत तर तो कधीच रुजलेला नाही. एक फार मोठा आशय चित्रपट मांडू पाहतो आणि तो भिडतो. विचार करायला प्रवृत्त करतो. याच अँबोरिजिनल आदिवासींना घेऊन त्यांच्याच या भूमीत विख्यात र्जमन दिग्दर्शक वार्नर हेरझॉग यांनी केलेल्या ‘व्हेअर ग्रीन अँट्स ड्रीम’ या चित्रपटाची मला ‘चार्लीस कंट्री’ पाहताना आवर्जून आठवण झाली. त्यात असाच एक चार्ली आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या जमातीचा तो शेवटचा माणूस आहे. त्याची भाषा बोलणाराही तो एकटाच आहे आणि तो सबंध मानव जातीला सांगण्याचा प्रयत्न करतोय, की.. ही भूमी खणू नका, कारण त्याखाली हिरव्या मुंग्या स्वप्न पाहत आहेत.. अधिक काही स्पष्ट करायला हवंय..?
एखाद्या माणसानं किंवा अनुभवानं दुनियेचं खरं दर्शन घडवलं, असं आपण जे म्हणतो तसं माझं ‘द सॉल्ट ऑफ द अर्थ’ हा चित्रपट पाहिल्यावर झालं. प्रथितयश र्जमन दिग्दर्शक वीम वेन्डर्स यांनी ज्युलियानो सालगाडो याच्यासह अतिशय वेगळ्या धर्तीचा, प्रकृतीचा विलक्षण चित्रपट दिग्दर्शित केला. सेबास्टिओ सालगाडो या जगप्रसिद्ध छायाचित्रकारानं गेल्या चाळीस वर्षांत अक्षरश: जगभर हिंडून अख्खं जग त्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक संदर्भांसह आपल्या कॅमेर्यात टिपलं. ज्युलियानो त्याचा मुलगा. त्यानंही बापाबरोबर ही जगाची अजब सैर केलीय. त्यानं आणि वीम वेन्डर्सनं सेबास्टिओ सालगाडोच्या कॅमेर्यातून दिसलेलं जग- स्थिर प्रतिमा तसंच व्हीडियो-ची विलक्षण अशी मांडणी करून आणि त्याला सेबास्टिओच्या अनुभवकथनाची जोड देऊन एक असा चित्रपट केलाय, की तो आपल्याला खर्या अर्थानं आपल्या जगाचं सम्यक् दर्शन घडवतो. हे इतकं विलक्षण आणि हरखून टाकणारं आहे, की मनाशी असंख्य प्रश्न निर्माण होतात.. निसर्गानं हे एवढं काही दिलंय आणि आपण माणसं त्याचं काय करत सुटलोय. अशा या गर्भश्रीमंत जगात माणूस किती वैभवात जगू शकेल.. असं मनाशी येतायेताच आफ्रिकन देशांत अभूतपूर्व कुपोषणाला बळी पडलेल्यांच्या प्रेतांचे ढीग दिसतात.. कधी ते कचर्यासारखे कचरागाडीत खचाखच भरले जातात, तर कधी कचरा जाळून टाकावा तसे जागीच.. निसर्गाची एक-एक रूपं अवाक् आणि उत्फुल्ल होत पाहणारी नजर हे दृश्य पाहू शकत नाही.. देणार्यानं भरभरून दिलं घेणारा करंटा निघाला.. मनाशी एक विचार आला, की सगळ्या जगण्याची ही अशी माती करणार्या माणसाबद्दल पशुपक्षी काय विचार करीत असतील..?
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, चित्रपटदिग्दर्शक व परीक्षक आहेत.)