पं. गोविंदराव अग्नी यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा.
- रामदास कामत
'संगीत मत्स्यगंधा’ आणि ‘संगीत ययाति आणि देवयानी’ या नाटकात मी गायिलेल्या गाण्यांमुळे आणि ती माङयाकडून वेगळ्या प्रकारे गाऊन घेतल्यामुळे संगीत रंगभूमीवर जे यश आणि लोकप्रियता मला लाभली, त्याचे सर्व श्रेय पं. जितेंद्र अभिषेकींकडे जाते हे नि:संशय! परंतु माङया नाटय़संगीत गायनाचा मजबूत पाया ज्यांनी घातला ते दोन थोर गायक म्हणजे माझा मोठा भाऊ उपेंद्र कामत आणि पं. गोविंदराव अग्नी! या दोन्ही गायकांनी मला केवळ गाणोच शिकवले असे नाही, तर ते कसे आणि किती गावे, बेफाट ताना न मारता फक्त भावपरिपोषक असे गाणो कसे गावे हे त्यांनी शिकवले. ब:या आणि वाईट गायकांची गायकी ऐकावी; परंतु कुठची गायकी स्वीकारायची, कुठली त्यजायची हेही त्यांनी शिकवले. थोडक्यात, सच्चे गायन कुठचे आणि कच्चे कुठचे हे जाणण्याची शक्ती त्यांनी मला दिली.
1939 ते 194क् या दोन वर्षात मी प्राथमिक मराठी तिसरी आणि चौथी शिकण्यासाठी माङया आजोळी पणजीला नेवरेकरांकडे राहत होतो. या दोनपैकी एका वर्षी पणजी येथील श्री महालक्ष्मीच्या देवळात चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाकरिता होणा:या ‘संगीत शारदा’ नाटकात गोविंदराव अग्नींनी शारदेची भूमिका केल्याचे आठवते.
नंतर पणजीला 1949 साली एसएससी पास झाल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी मुंबईला येऊन माङो मामा वैकुंठमामा नेवरेकर यांच्या घरी राहायला आश्रयाला होतो. मामा गिरगावातल्या दुस:या भटवाडीत राहत असत. त्याच वाडीत एका बिल्डिंगमध्ये अग्नीबुवा राहायचे; परंतु त्या वेळी त्यांच्याशी काही संबंध आला नाही.
त्यांच्याशी संबंध आला 1956 साली. त्या वेळी ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक त्यावेळच्या मुंबई राज्य सरकारने आयोजित केलेल्या नाटय़स्पर्धेत भाग घेण्यासाठी ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ बसवत होते. त्या वेळी मी ए.जी.च्या ऑफिसमध्ये नोकरी करत होतो. एका शनिवारी असोसिएशनचे एक कार्यकर्ते जगन्नाथ सुखटणकर मला ऑफिसमध्ये भेटले आणि त्यांच्या संशयकल्लोळ या नाटकात काम करायचे असल्यास त्याच दिवशी संध्याकाळी असोसिएशनच्या ऑफिसमध्ये यायला सांगितले. मला वाटलं, नाटकातील प्रमुख भूमिका ‘आश्विन शेट’ माङया वाटय़ाला असावी. आनंदित होऊन मी संध्याकाळी असोसिएशनच्या ऑफिसमध्ये गेलो. गोपीनाथ सावकार दिग्दर्शक होते आणि गोविंदराव अग्नी संगीत दिग्दर्शक होते. मी गेलो त्या वेळी दोघेही तिथे बसले होते. त्यांनी मला गाणो म्हणायला सांगितले. मी गायलो. मी पास झालो होतो. मी गोपीनाथ सावकारांकडे मला कोणती भूमिका करण्यासाठी बोलावले आहे याची विचारणा केली. सावकार म्हणाले, ‘साधूच्या भूमिकेसाठी, म्हणजे एकच सुरुवातीचे गाणो गाण्यासाठी!’ मी हिरमुसला झालो. ‘एकच गाणो म्हणणा:या भूमिकेची निवड करण्यासाठी एवढा आटापिटा कशासाठी? ती भूमिका एखादा सामान्य गायकसुद्धा करू शकतो. मी विचार करून सांगतो’, असे म्हणालो अणि जायला निघालो. अग्नीबुवा माङया मागोमाग जिन्यापाशी आले अणि म्हणाले, ‘हे पळे, नाका म्हणू नाका, एक पद गावनसुद्धां नांव कांढूंक येता.’ सावकार माङया वागण्यावर गरम झालेले असावे. बुवा माङयाशी बोलतात ते त्यांनी पाहिले आणि गुरगुरले, ‘वचूं दी रे, ताका आडांव नाका, आमी दुसरो कोणुय पळौया.’
मी घरी आलो आणि भाईला घडलेली हकिकत सांगितली. भाई मला म्हणाला, ‘एकच गाणो असले तरी तू नकार देऊ नकोस. संस्था चांगली आहे. या नाटकाच्या निमित्ताने तुझा संस्थेत रिघाव होईल. गाणो मी बसवून देईन, चिंता करू नकोस.’
दुस:या दिवशी मी संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा होकार कळवला. अग्नीबुवा आनंदित झालेले दिसले. इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं गातो, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. ते मला म्हणाले, ‘हे पळे, हे पद तुका हाव बरे बसोवन दितां, तू कांय चिंता करूं नाका.’
पण सावकार म्हणजे जमदग्नीचा अवतार! कालच्या घुश्श्यातच ते होते. ते मला म्हणाले, ‘हे पहा, हे गाणो तुला फार वेळ गाता येणार नाही. तुला फक्त 3 मिनिटे मिळतील. या 3 मिनिटांमध्ये तुला काय कसब दाखवायचे ते दाखव.’
‘हृदयी धरा हा बोध खरा’ गाणो अग्नीबुवांनी उत्तम रितीने बसवून दिले. माङया भाईनेही त्या गाण्यावर बरीच मेहनत घेतली. प्रत्यक्ष प्रयोगात गाणो फारच गाजले. प्राथमिक फेरी साहित्य संघात होती. नाटकाने माङया गाण्यापासून पकड घेतली आणि नाटक फायनलला आले. मी काहीतरी वेगळे गातो हे सावकारांच्या आता लक्षात आले. मला त्यांचा घुस्सा निवळलेला दिसला. त्यांनी मला बाजूला नेले आणि म्हणाले, ‘हे गाणो 3 मिनिटांच्या ऐवजी 5 मिनिटे गायची मी तुला मुभा देतो; कारण तुङया गाण्यामुळे नाटकाची सुरुवात चांगली होते.’ नंतर नाटक पहिलं आलं! या माङया गाण्याच्या यशाचं श्रेय अग्नीबुवांकडे जाते हे निर्विवाद!
असोसिएशननं 1958 साली मुंबई सरकारच्या वार्षिक नाटय़स्पर्धेत ‘संगीत शारदा’ बसवायचं ठरवलं. माङया वाटय़ाला कोदंडाची प्रमुख भूमिका आली. ‘संशयकल्लोळ’ नाटकातल्या गाण्याच्या यशामुळेच ही भूमिका मला मिळाली. पुन्हा दिग्दर्शक गोपीनाथ सावकार आणि संगीत दिग्दर्शक अग्नीबुवा होते.
‘कोदंड’ ही प्रमुख भूमिका मला मिळाली हे कळल्यावर अग्नीबुवांनी मला ताबडतोब बोलावून घेतलं व सगळी गाणी शिकवायला प्रारंभ केला. बरीचशी गाणी बसवली; पण प्रयोग फक्त 4 तासांतच करण्याचे बंधन असल्याकारणाने काही गाणी उडवावी लागली; पण बुवांनी प्रेमापोटी जवळजवळ सर्व गाणी शिकवली होती. हे नाटक फायनलला पहिलं आलं आणि मला संगीताचं प्रथम पारितोषिक मिळालं. याचं श्रेय केवळ अग्नीबुवांनाच जातं.
यानंतर रघुवीर नेवरेकरांनी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक दुस:या संस्थेतर्फे बसवले होते. मला आश्विन शेटची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं. या सर्व चाली अग्नीबुबांनी बसवून दिल्या.
‘मत्स्यगंधा’ आणि ‘ययाति आणि देवयानी’ या दोन्ही नाटकांतल्या गाण्यांनी चांगलं नाव झाल्यानंतर, ‘मानापमान’ नाटकातील ‘धैर्यधर’ करावा असं वाटू लागलं. मी सावकारांशी त्याप्रमाणो माझी मनीषा सांगितली. त्यांनीही मनावर घेऊन त्यांच्या कलामंदिर संस्थेतर्फे मानापमान नाटक करायचं ठरवलं. ते मला म्हणाले, तुला धैर्यधराची गाणी प्रथम अग्नीबुवांकडे शिकून घ्यावी लागतील. एवढं सांगून ते थांबले नाहीत, मला ती गाणी शिकवायला बुवांना सांगितलं. त्यानंतर आठवडय़ातून 2-3 वेळा असे सतत 3 महिने मी बुवांकडे धैर्यधराची गाणी शिकायला जात असे. बुवांनी मला गाणी मनापासून शिकवलीच, शिवाय बालगंधर्व कसे गात होते, दीनानाथराव कसे गायचे याची त्यांनी प्रात्यक्षिकेच दाखवली. या तीन महिन्यांत बुवांकडून खूप गायन शिकून घेता आलं!
पं. गोविंदराव अग्नी हे आग्रा घराण्याचे पाईक. त्यांनी आग्रा घराण्याची तालीम या घराण्याचे बुजूर्ग गायक खादीम हुसेन खां आणि अन्वर हुसेन खां यांच्याकडे घेतली. आग्रा घराण्याची गायकी अतिशय उच्च दर्जाची असली तरी थोडीशी रूक्ष आहे, त्यात लालित्य कमी आहे; परंतु बुवांनी आपल्या गायनात लालित्य आणि माधुर्य यांचा सुरेख मिलाफ करून आपली गायकी संपन्न केली. रा. वि. राणो हे प्रख्यात नट अग्नीबुवांच्या बरोबर रघुवीर सावकारांच्या रंगबोधेच्छु नाटक कंपनीत होते. ते सांगायचे की अग्नीबुवा पहाटे 5 वाजता कमरेला एक पंचा लावून रियाजाला बसायचे. ज्या दिवशी प्रयोग असेल त्या दिवशीसुद्धा नाटक पहाटे संपल्यानंतर त्यांचा हा रियाजाचा नेम चुकला नाही.
अग्नीबुवा अजातशत्रू होते. नेहमी हसतमुख आणि कुणाविषयी वाईट न बोलणारे! उत्तम ज्ञानी आणि लालित्यपूर्ण गाणारे असले तरी उपेक्षितच राहिले. माङया नाटय़संगीत गायनाचा मजबूत पाया त्यांनी घातला हे नि:संशय.
अरे, ‘क्या बजाव’?
गोपीनाथ सावकार बुवांविषयी एक हकिकत सांगायचे. एकदा एका संगीत परिषदेत भाग घेण्यासाठी बुवा, राम मराठे वगैरे उत्तर हिंदुस्थानातल्या एका शहरात गेले होते. एका सकाळच्या प्रहरी ते तोडी राग गात होते. एक प्रख्यात तबलजी त्यांच्या साथीला बसला होता, बहुतकरून चतुरलाल असावे. हे तबलजी आडवं तिडवं वाजवून गायकाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात, अशी त्यांची ख्याती होती. हे जाणून बुवांनी बडा ख्याल गाण्यासाठी झुमरा ताल निवडला होता. हा ताल अवघड आहे आणि आडवं तिडवं वाजवता येत नाही. अवघड वाजवून गायकाला म्हणजे बुवांना जेरीस आणण्यासाठी प्रेक्षक ‘बजाव, बजाव’ असे ओरडून सांगू लागले. त्यावर तो तबलजी प्रेक्षकांना ओरडला, ‘अरे बजाव, बजाव काय म्हणता? या बुवांनी झुमरा ताल निवडून माङो हात बांधून टाकले आहेत.’ परंतु अग्नीबुवा मात्र विविध प्रकाराने गाऊन, तिय्ये वगैरे घेऊन समेवर येत होते. बडा ख्याल संपल्यानंतर द्रूत चीज त्रितालात सुरू केली, तेव्हा कुठे तबलजीला मोकळं रान मिळालं. गाणं संपलं आणि बुवांना प्रचंड दाद मिळाली. प्रेक्षकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. ही हकिकत खुद्द रामभाऊ मराठे यांनी सांगितली, असे सावकार सांगायचे.
(लेखक ख्यातनाम गायक आहेत)