- टेकचंद सोनवणे
दिवे, आकाशकंदील, गोडधोड जेवण, सोशल मीडियावरून शुभेच्छा, फटाकेबंदी व फटाक्यांच्या वापरामुळे वाढणारे प्रदूषण- याशिवाय दिवाळसण पूर्ण होणारच नाही. फटाके, बंदी, प्रदूषण आपल्या सांस्कृतिक चर्चेचा भाग झाले आहेत. दिवाळाचा आनंदठेवा फटाक्यांच्या मौजेने द्विगुणित करणारी पिढी सदैव फटाकेबंदीला विरोध करीत असते. आमच्याच सणाला निर्बंध, बंदीची आठवण का येते- असा मेसेज व्हाॅट्सॲप विद्यापीठ डिग्रीबहाद्दरांनी फॅरवर्ड केला असेल. पाच हजार कोटी रुपयांची मोठी उलाढाल असलेल्या फटाक्यांच्या बाजारपेठेला विविध राज्यांनी घातलेल्या बंदीचा फटका बसेलच. ही एक बाजू. दुसरी बाजू - फटाक्यांमुळे हवेत मिसळल्यामुळे होणारी आरोग्याची हानी कधीही भरून निघत नाही.
दिल्ली, राजस्थानसह काही राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत तर माजी केंद्रीय राज्यमंत्री, विद्यमान राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी फटाकेबंदी उशिरा जाहीर केली म्हणून निदर्शने केलीत. फटाकेबंदी अयोग्य नाही; पण विलंब झाला हे रास्त कारण पुढे करून त्यांनी एकाचवेळी विरोधक व समर्थकांनादेखील सांभाळले. दिवाळीचा सण चार दिवसांनी संपेल; पण फटाक्यांमुळे हवेत पसरणारी विषारी द्रव्ये लोकांचे आरोग्य कमी करतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१६ साली पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १ लाख १ हजार ७८८ मुलांचा मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाला. आरोग्य संघटनेचा हा अहवाल एअर पल्यूशन ॲण्ड चाइल्ड हेल्थ - प्रिसक्रायबिंग क्लिन एअर या नावानं प्रसिद्ध आहे. लहान मुलांच्या मृत्यूचे कारण होते पीएम २.५.
गर्भवती महिलांना प्रदूषणाचा धोका अधिक. लहान मुलांवरही दुष्परिणाम. दमा, अस्थम्यासारखे श्वसनविकार असलेल्यांचा तर श्वासच गुदमरतो. फटाक्यांमध्ये १५ विषारी घटक असतात ज्यामुळे सारे दुष्परिणाम होतात. अर्थात सारेच फटाके प्रदूषण पसरवत नाही. हरित फटाक्यांमुळे प्रदूषण पसरत नाही किंवा अत्यंत कमी पसरते- असे राष्ट्रीय हरित लवादाने वारंवार स्पष्ट केले आहे.
दिवाळी, फटाके, प्रदूषण हे तीनही शब्द दिल्लीशी संबंधित असल्यानेच आपल्याकडे प्रदूषणाची सर्वाधिक चर्चा होते. एका अभ्यासानुसार २०१३ ते २०१६ दरम्यान दोनदा दिवाळी असताना दिल्ली-एनसीआर शेजारच्या राज्यांमध्ये शेतकरी पराली जाळत होते. तेव्हा व दोनदा दिवाळी नसताना पराली जाळली जात असताना प्रदूषण तितकेच वाढले होते. काही जण म्हणतात फटाक्यांमुळे फारसा फरक पडत नाही. पराली जाळल्यामुळेच प्रदूषण वाढते व फटाक्यांमुळे त्यात मोठी भर पडते. यंदा सरकारला कोरोनाचे भक्कम कारण असल्याने तात्काळ प्रभावाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. २०१७ साली दिल्लीत हवा दिवाळीआधी विषारी झाली व दिवाळीनंतर त्यात दुसऱ्या दिवशी (लक्ष्मीपूजन) पीएममध्ये सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाली होती. तर पाच दिवसांनी त्यात १०० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
जगातील सर्वच प्रदूषित शहरांमध्ये हीच स्थिती आहे. बीजिंग हे त्यातील एक. आलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाआधी २००८ पर्यंत चिनी नवे वर्षे, छोटे-मोठे सण फटाके उडवून साजरे केले जात. जशी प्रदूषणाची पातळी वाढली तशी त्यावर बंदी घालण्यात आली. तेथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना फटाके फोडायचे असल्यास बीजिंगमधील रिंग रोडच्या हद्दीबाहेर जाऊनच फटाके फोडले जातात. आता तर लोकांनाही त्याची सवय झाली.
आपला मुद्दा धार्मिक आहे. त्यांच्या अमुक सणाला त्यांनी केले तर चालते मग आम्ही का नाही. आमचेच सण कसे दिसतात. हा मुद्दा बुद्धीविलासासाठी ठीक आहे; पण सृष्टी संवर्धन, संरक्षण हाही आपल्याच संस्कृतीचा भाग. शिवाय दिवाळी म्हटली की, फटाके आलेच यालाही शास्रीय आधार तसा नाहीच. असला तरी आता आतषबाजीचे जे कर्कंश स्वरूप दिसते तो तर नक्कीच नसेल. आपली खरी समस्या इथेच आहे.
बहुसंख्यांना जबाबदारीचे भान असायला हवेच. कोरोनाने जगात थैमान घातले आहे. तुमच्याकडे असलेला पैसा, तुम्ही सोशली किती पाॅवरफूल आहात – हे कोरोनाला ठावुक नसते. कोरोना नेस्तनाबूत करतो. ज्यांच्या घरात कोरोना शिरला त्यांच्या अनुभवावरून आपल्याला हे कळेल. अनेक राज्यांनी कोरोनाची धास्ती घेऊन फटाक्यांवर बंदी घातली. त्याचे आपण स्वागत करायला हवे. अर्थकारणाला फटका बसलाच आहे. फटाकेबंदीमुळे त्यात थोडी वाढ होईल; पण मानवी जीवन महत्त्वाचे. साऱ्या समस्या त्यापुढे क्षीण भासतात. त्याशिवाय का आपण लॅकडाऊनचा पर्याय निवडला. कितीही उपाय योजिले तरी कोरोना लढ्यात सरकारी यंत्रणा लोकसहभागाशिवाय कमीच पडणार. त्यामुळे कोरोनाच नव्हे तर मानवी तजोभंग करणाऱ्या प्रत्येक अंधारलेल्या संकटात आपले मतभेद, रूढी-परंपरा बाजूला ठेवून सहकार्य करायला हवे. जाणिवेच्या पलीकडे नेणीवत हे समजून घेतले तरच आपले समाजभान जागरूक राहील. अन्यथा कर्कंश आतषबाजी फटाक्यांची असे की विचारांची – प्रदूषण होणारच.
(लेखक दिल्लीच्या लोकमत आवृत्तीत विशेष प्रतिनिधी आहेत.)
delhi.tekchand@gmail.com