-दीपक मोरेपुराच्या पाण्याने रेल्वेला चारही बाजूंनी विळखा घातल्याचे समजले आणि आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. आता सर्वकाही संपले असाच भाव बहुतांश प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. तोपर्यंत दूरचित्रवाणीचे प्रतिनिधी बोटीद्वारे रेल्वेत पोहोचले आणि ही वार्ता जगजाहीर झाली. मात्र, बचाव पथकाला पोहोचायला खूप उशीर झाला. असे असले तरी त्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेरकाढले आणि तो १४ तासांचा थरार संपला...निसर्गाची अनेक रूपे असतात. विलोभनीय, आल्हाददायक, मन प्रसन्न करणारी तितकीच विध्वंसक, प्रलयंकारीही. याचा धडकी भरविणारा प्रत्यय २६ जुलैच्या मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील आम्हा प्रवाशांना चांगलाच आला.
मी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. काम पूर्ण झाल्यानंतर २६ जुलैला महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला येण्यासाठी ठाणे स्थानकात आलो. शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेसही उशिरा सुटत होत्या. सायंकाळी साडेसातची अमरावती एक्स्प्रेस ठाण्यात रात्री पावणेनऊ वाजता आली. त्यावेळीच मनात शंकेची पाल चुकचुकली, महालक्ष्मी एक्स्प्रेस येणार की रद्द होणार. मात्र, नऊची रेल्वे सव्वानऊ वाजता आली. त्यावेळी हायसं वाटलं. रात्री दहा वाजता रेल्वे अंबरनाथनजीक आली असता पुढे रुळावर पाणी आल्याचे समजताच अचानक थांबविण्यात आली. पुन्हा रेल्वे धावू लागली. रात्री पाऊणच्या दरम्यान ती अंबरनाथ स्थानकापर्यंत आली. तेथे रेल्वे पुढे जाणार नाही असे आम्हा सर्वांना वाटले. मात्र, कर्जत लोकल पुढं स्थानकावर सुखरूप पोहोचल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेसने पुढील दिशेने मार्गक्रमण केले. त्यानंतर जवळजवळ सर्वच प्रवासी झोपी गेले.
रात्री अडीचच्या सुमारास अचानक जाग आली असता रेल्वे थांबल्याचे लक्षात आले. क्रॉसिंग असेल असे वाटले. पण नंतर रेल्वेच्या दरवाजाच्या पायरीवर पाणी आल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. प्रत्यक्ष जाऊन बघितले असता ते खरे होते. नेमके काय झाले आहे हे कळत नव्हते. तोपर्यंत पहाट झाली आणि समोरच्या दृश्याने सर्वांच्या अंगाचा थरकाप उडला. रेल्वेच्या सभोवार पाण्याने विळखा घातला होता.
काहींनी प्रशासनातील ओळखीच्या, तसेच मंत्र्यांच्या सचिवांना मोबाईलवरून याची माहिती दिली, तर काहींनी मीडियाशी संपर्क साधला. त्यावेळी गाडी बदलापूर-वांगणीदरम्यानच्या मार्गावर होती.पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. पाणी वाढून डब्यात येण्याची शक्यता वाटू लागल्याने मृत्यू समोर दिसू लागला. त्यातच डब्यात साप घुसल्याचे कुणीतरी सांगितले. त्यामुळे भीतीने गोंधळ उडाला. सकाळचे अकरा वाजले तरी बचावपथकांचा मागमूस नव्हता. तितक्यात दूरचित्रवाहिनीच्या प्रतिनिधींनी बोटीद्वारे डब्यात प्रवेश केला. त्यांनी प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांचा प्रशासनावरचा राग स्पष्ट दिसत होता. थोड्या वेळाने मोबाइल वाजू लागले.
कारण दूरचित्रवाहिनीवरून ही बातमी सर्वत्र पसरल्याने नातेवाईकांकडून विचारपूस होऊ लागली. आमच्या डब्यात राजस्थानी कुटुंब होते. त्यांची दोन लहान मुले भुकेने व्याकुळ झाली होती. मात्र, कुणाकडे त्यांना द्यावयास काहीही शिल्लक नव्हते. कारण रेल्वे सकाळी साडेसातच्या दरम्यान पोहोचत असल्याने कोणी जास्तीचे खाद्यपदार्थ आणले नव्हते. बाराच्या दरम्यान दोन हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागली. एनडीआरएफ, आरपीएफच्या बचाव पथकासह बोटीही घटनास्थळी दाखल झाल्या अन् बचावकार्याला सुरुवात झाली.
महिला, मुले यांना प्रथम बोटीतून सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास सुरुवात झाली. नंतर पुरुष मंडळींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रेल्वेत गर्भवतींसह नवजात शिशूही होते. त्यांना सुरक्षितस्थळी नेताना बचावपथकांचा कस लागला.
उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूर वांगणीदरम्यान ही रेल्वे अडकली होती. पुढेच बदलापूरचे धरण ओव्हर फ्लो झाले होते. डब्यातून उतरल्यावर रुळावर कमरेइतके पाणी होते. मानवी साखळी करून यातून मार्ग काढू लागलो. बचाव पथकाने दोन्ही बाजूंना दोरखंड बांधले होते. त्याचा आधार घेतला. प्रवाह जास्त असल्याने मार्ग काढताना नाकीनऊ आले. बचाव पथकाकडून पाणी छातीपर्यंत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातूनच जात असताना पाय सरकून मी गटांगळ्या खाऊ लागलो. चप्पलही वाहून गेली. मात्र बचाव पथकातील दोघांनी मला वाचवले.मजल दरमजल करीत मार्ग काढत आम्ही एकदाचे बाहेर पडलो. मात्र, हा भाग निर्जन होता. समोर खडा डोंगर चढायचा होता. आधीच शरीर व मन थकले होते. त्यातच पावसाच्या धारांतून चिखल तुडवत डोंगर चढण्यास अनवाणी सुरुवात केली. वाटेत स्वयंसेवकांकडून बिस्किटे व पाणी मिळत होते. वांगणी ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत पुराच्या पाण्यातून अनेकांना बाहेर काढले. चामटोल येथे आल्यावर तेथे पुन्हा बिस्किटे व बिसलरी दिल्या. तेथेच जवळ एका ग्रामस्थाचे घर होते. त्याच्याकडे चप्पलेबाबत विचारणा केली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने घरातून चप्पल आणून दिली. त्यानंतर डोंगर उतरून दहिवडीत आलो. तेथे प्रशासनातर्फे गुरुदेव ट्रस्टच्या लक्ष्मी बॅकव्हेट हॉल येथे कांदेपोहे व भात दिला. तेथेच कल्याण, बदलापूर स्थानकावर जाण्यासाठी एसटी, खासगी बसची सोय केली, तसेच कोल्हापूरला जाण्यासाठीही खासगी बसची सोय केली. यातून बरेच प्रवासी कोल्हापूरला मार्गस्थ झाले.
प्रशासनाकडून सोडलेल्या खासगी बसने मी बदलापूर स्थानकावर आलो. तेथे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कल्याणपर्यंत घेऊन जाण्यासाठी लोकल उभी होती. या गाडीतच कोल्हापूरला जाण्यासाठी विशेष एक्स्प्रेस सोडणार असल्याची घोषणा केली. अगोदर ही घोषणा केली असती तर सर्वांनाच याचा लाभ झाला असता. केवळ १५२ जण गाडीत बसले.
शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान विशेष रेल्वे कोल्हापूरच्या दिशेनं धाऊ लागली. अंगावर ओले कपडे होते. सॅकही भिजल्याने कपडेही बदलता येत नव्हते. सोबत मुंबईचे पोलीस निरीक्षक बाजीराव कळंत्रे होते. त्यांची व माझी गट्टी जमली. त्यांनी माईक आणला होता. त्याद्वारे जुन्या गाण्यांची मैफल रंगली. नाशिकचा त्र्यंबकेश्वर, शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचा विठ्ठल यांचे दर्शन घेत विशेष ट्रेन २१ तासांनी रविवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरात दाखल झाली. ...आणि तो १४ तासांचा थरार संपल्याचे जणू आम्ही मनातल्या मनात जाहीर करून टाकले.(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत)